एल अँड टीचे अध्यक्ष म्हणतात, '90 तास काम करा', पण त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?

    • Author, चंदन कुमार जजवाडे
    • Role, बीबीसी हिंदी

"कामगारांनी आठवड्यातून 90 तास काम केलं पाहिजे. रविवारीही काम केलं पाहिजे," असं मत लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केलं.

सुब्रमण्यम यांच्या विधानावर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर पुन्हा एकदा कामगारांनी आठवड्यात किती तास काम करावं यावर वाद सुरू झाला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री दिपीका पादुकोणने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत कामगारांनी 90 तास काम करण्याच्या विधानावर आपलं मत व्यक्त केलं.

दीपिकाने म्हटलं की, कंपन्यांमध्ये उच्च पदांवरील व्यक्तींनी अशी विधानं करणं धक्कादायक आहे. या इंस्टाग्राम स्टोरीत दीपिकाने #mentalhealthmatters हा हॅशटॅगही वापरला आणि मानसिक आरोग्य महत्वाचं असल्याचं अधोरेखित केलं.

यापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनीही आठवड्यातून 70 तास काम करण्याबद्दल वक्तव्य केलं होतं.

एस. एन. सुब्रमण्यम यांनी नुकतेच एल अँड टी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर बोलताना आठवड्यात 90 तास काम करण्याबाबत वक्तव्य केलं. त्यांच्या व्हिडीओचा एक भाग रेडिटवर पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये सुब्रमण्यम म्हणतात, "आठवड्यात 90 तास काम करायला हवं. मला तुमच्याकडून रविवारी काम करून घेता येत नाही याचं मला वाईट वाटतं. जर मी तुमच्याकडून रविवारीही काम करून घेऊ शकलो, तर मला आनंद होईल. कारण मी स्वतः रविवारी काम करतो. तुम्ही घरी बसून काय करता."

"तुम्ही घरी बसून किती काळ तुमच्या पत्नीचा चेहरा पाहत राहणार?" असंही सुब्रमण्यम यांनी म्हटलं.

सुब्रमण्यम यांच्या विधानामुळं कामाचे तास, विश्रांतीची गरज आणि वैयक्तिक आयुष्य याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Shaadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल यांनी सोशल मीडिया एक्सवर यावरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "जर पती-पत्नी एकमेकांना बघणार नाहीत, तर मग आपण जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश कसा बनू?"

कोण काय म्हणालं?

या चर्चेत महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, "आपण कामाच्या कालावधीपेक्षा कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मला वाटतं. 40 तास, 70 तास किंवा 90 तास काम करण्याचा हा मुद्दा नाही. तुम्ही काय करत आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही 10 तास काम करूनही जग बदलू शकता."

"मी एकटा असल्यानं मी एक्स या सोशल मीडियावर नाही हे मी लोकांना सांगतो. माझी पत्नी सुंदर आहे आणि मला तिला पाहायला आणि तिच्यासोबत वेळ घालवायला आवडतं," असंही त्यांनी नमूद केलं.

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनीही एस. एन. सुब्रमण्यम यांच्या विधानावर टीका केली आहे.

आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटला उत्तर देताना अदार पूनावालांनी महिंद्रा यांचे समर्थन केले आहे. ते म्हणतात, "खरंय, माझ्या पत्नीला देखील मी खूप छान वाटतो आणि तिला रविवारी माझ्याकडे पाहात बसायला आवडतं. कामाचे तास नव्हे, तर कामाची गुणवत्ता महत्त्वाची आहे."

उद्योजक हर्ष गोएंका यांनीही आनंद महिंद्रा यांच्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

हर्ष गोयंका म्हणाले, "आठवड्यातून 90 तास काम? 'सनडे'चं नाव बदलून सन-ड्युटी करावं की सुट्टीच्या संकल्पनेला मिथक म्हणून घोषित करावं? कठोर परिश्रम करणं आणि हुशारीनं काम करणं हा यश मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ते करायला हवे, असं मला वाटतं. मात्र, आयुष्याला सतत ऑफिस शिफ्ट करण्यापुरतं मर्यादित राहायचं का? हा यशाचा नाही, तर थकण्याचा मार्ग आहे."

खरंतर भारतात, कारखाने, दुकानं आणि व्यावसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी कामाचे तास निश्चित केले जातात. याबाबत कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे स्थायी आदेश आहेत.

वादावर लोक काय म्हणतात?

आठवड्यात किती तास काम करावं, या विषयावर बीबीसीनं नागरिकांची मतं जाणून घेतली. यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून आल्या.

कोणी म्हटलं कामासाठी 6 तास पुरेसे आहेत, तर कोणी म्हटलं कामासाठी 8 ते 9 तास असावेत.

"एल अँड टीचे अध्यक्ष कामगारांचं शोषण करण्याचा सल्ला देत आहेत," असा आरोपही फरहान खान नावाच्या एका सोशल मीडिया युजरने इंस्टाग्रामवर कमेंट करत केला.

दरम्यान, प्रदीप कुमार नावाचा एक युजर म्हणाला, "काम पूर्ण होईपर्यंत काम केलं पाहिजे, ते कामाच्या वेळेवर आधारित नसावं."

दुसरीकडं ब्रिजेश चौरसिया म्हणाले, "किती वेळ काम करावं हे पगारावर अवलंबून असतं. आम्ही धर्मादाय संस्थेसाठी काम करत नाही. आम्ही जीवन जगण्यासाठी आणि उदरनिर्वाह करण्यासाठी काम करतो."

याशिवाय अन्य एका युजरने जर मी मालक असेल, तर मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे, अशी कमेंट केली.

डॉक्टरांचं म्हणणं काय?

बीबीसीशी बोलताना, दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे डॉक्टर डॉ. संजय राय म्हणाले, "आठवड्यातील 48 तास काम करण्यामागे एक कारण आहे. तुम्ही किती काम करू शकता हे तुम्ही काय करता यावर देखील अवलंबून आहे."

"तुम्ही कंपनीचे मालक असाल, तर तुम्ही कोणत्याही दबावाखाली काम करत नाही. तुम्ही मालकी हक्काच्या नात्यानं काम करता. लोक ऑफिसमध्ये दबावाखाली काम करतात की आनंदाने काम करतात यावर बरंच काही अवलंबून आहे," असंही संजय राय यांनी नमूद केलं.

ते पुढे असंही म्हणतात की, जास्त शारीरिक श्रमाची आवश्यकता असलेल्या कामात किंवा खेळात व्यक्ती लवकर थकते. सामान्यतः शारीरिक कष्टाच्या कामात स्त्रिया पुरूषांपेक्षा लवकर थकतात.

पुण्यातील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील एमेरिटस प्रोफेसर डॉ. अमिताव बॅनर्जी म्हणाले, "आपल्या देशाची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे अशाप्रकारची वक्तव्ये केली जाऊ शकतात. मात्र इतर देशांमध्ये तुम्हाला अशी वक्तव्ये करणारे लोक सापडणार नाहीत."

"खरं म्हणजे कामाची व्याख्या काय आहे? एक शारीरिक काम असे आहे ज्यामध्ये तुम्ही 8 तास काम करता. कारखान्यात असो किंवा गाडी चालवताना तुम्ही जास्त वेळ काम केलं, तर थकल्यानंतर अपघात वाढतील," असंही ते नमूद करतात.

डॉ. अमिताव बॅनर्जी म्हणतात, "सर्जनशील लोक 24 तास काम करू शकतात. तुम्ही जेव्हा काम करत नसता तेव्हाही तुम्हाला कल्पना सुचतात. असे लोक त्यांच्या स्वप्नातही काम करू शकतात. जसा बेंझिन या एक रासायनिक संयुगाचा शोध स्वप्नात लागला होता."

"आर्किमिडीजनं बाथटबमधून साबण पडताना पाहिला आणि युरेका-युरेका असं ओरडला. यावरून त्याने नंतर सिद्धांत मांडला. न्यूटननं झाडावरून फळ पडताना पाहिलं आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला, असं सांगितलं जातं," असं बॅनर्जी यांनी सांगितलं.

लोक आयुष्यातील कामाच्या संतुलनाबद्दल बोलतात आणि कधीकधी जास्त कामामुळं ते शारीरिक आणि मानसिक आजारांना बळी पडतात.

हे समजून घेण्यासाठी, बीबीसीने दिल्लीतील बी. एल. कपूर मॅक्स हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रतीक किशोर यांचं मत जाणून घेतलं.

डॉ. किशोर म्हणाले, "जास्त काम केल्यानं किंवा कठोर परिश्रम केल्यानं तुमच्या झोपेवर परिणाम होतो. जर शरीराला विश्रांती मिळाली नाही, तर तुमचे हार्मोन्स सतत सक्रिय राहतात. यामुळे आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतील. याचा परिणाम म्हणून शरीरातील धमन्या कठीण होतात. रक्तदाब वाढू शकतो, लठ्ठपणा, साखर, कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका आणि मेंदूचा झटका येण्याचीही शक्यता वाढते."

"आपल्या शरीराला ठराविक वेळ काम करावं लागतं आणि ठराविक वेळ विश्रांती घ्यावी लागते. याचा परिणाम रोगांशी लढण्याच्या आपल्या क्षमतेवरही होतो."

"विश्रांती घेतल्यानं शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना रिकव्हर होता येते. याचा विचार करून एका दिवसात जास्तीत जास्त 8 तास काम करता येतं. परंतु आपण घरी आल्यानंतरही काम करतो. त्यामुळे कामाचे तास 10 तासांपर्यंत जातात," असंही डॉ. किशोर नमूद करतात.

'जेव्हा कशाचाच उपयोग होत नाही, तेव्हा कठोर परिश्रमाचा उपयोग होतो'

एम्सचे माजी डॉक्टर आणि 'सेंटर फॉर साईट'चे संस्थापक डॉ. महिपाल सचदेवा यांचे कामाच्या तासांवरून सुरू असलेल्या वादावर वेगळे मत आहे.

बीबीसीशी बोलताना सचदेव म्हणाले, "प्रत्येक देशाकडे काम आणि विकासासाठी एक कालमर्यादा असते. जपानच्या लोकांनी अणुहल्ल्यानंतर कठोर परिश्रम केले आणि खूप काम केले. तुम्हाला पुढे जायचं असेल आणि तुमच्यात कामाची आवड असेल, तर तुम्ही अधिक काम कराल. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे कामही (रोजगार/नोकरी) असायला हवं."

"लोक गुणवत्तेबद्दल आणि प्रमाणाबद्दल बोलतात. जर 'काम हीच पूजा' असेल, तर दोन्ही एकत्र का होऊ शकत नाही. तुम्ही सतत काम करू शकत नाही. तुम्हाला विश्रांती घेण्याची गरज असते."

डॉ. सचदेव म्हणतात की, जर एखाद्या डॉक्टरकडं 50 रुग्ण असतील, तर तो सर्वांना तपासू शकतो किंवा त्यांना भेटण्यास नकार देऊ शकतो, एवढंच तो करू शकतो.

"कामामुळे ताण येतो हे खरं आहे. मी डोळ्यांचा डॉक्टर आहे म्हणून मी म्हणेन की त्यामुळं डोळ्यांवर ताण येणं, डोकेदुखी, डोळे लाल होणं यासारखा त्रास होऊ शकतो. मात्र कोण किती काम करू शकतं, हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं असतं. कारण एखाद्याचं शरीर त्याला किती काम करण्याची परवानगी देतं हे पाहावं लागतं."

"असं असलं तरी शेवटी मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की, जेव्हा कोणताही उपाय कामी येत नाही, तेव्हा फक्त कठोर परिश्रमच उपयोगी पडतात," असंही सचदेवा नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)