You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'दिवाळीत मुस्लीम व्यापाऱ्यांवर बहिष्कारा'च्या वक्तव्याचा अहिल्यानगरच्या बाजारात किती परिणाम झालाय? - ग्राऊंड रिपोर्ट
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
अहिल्यानगरमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी "हिंदूंकडूनच खरेदी करा" असं आवाहन केलं आणि वादाला सुरुवात झाली.
संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर अहिल्यानगरमधील दुकानांवर भगवे झेंडेही लावण्यात आले.
'ओम' लिहिलेल्या या भगव्या झेंड्यांवरून हिंदू दुकानदार कोण ते ओळखता येईल, असं हिंदूत्ववादी संघटनांची भूमिका होती आणि ग्राहकांनी या दुकानांमधूनच खरेदी करावी, असा आग्रह देखील होता.
पण या सगळ्यामुळे नगरच्या बाजारात नेमका काही फरक पडला आहे का? या वादाचे काही पडसाद बाजारपेठेत जाणवत आहेत का? याचा आढावा बीबीसी मराठीनं घेतला आहे.
झेंडे आणि राजकारण
अहिल्यानगरचा कापड बाजार प्रसिद्ध आहे. त्याला लागून असणार्या गल्ल्यांमध्ये दागिन्यांपासून सजावटीच्या साहित्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची रेलचेल आहे.
दुकानातच नाही तर दुकानांबाहेरही कपड्यांचे स्टॉल सजलेले आहेत.
दिवाळी सुरू होण्याच्या आदल्या दिवशी बीबीसीची टीम नगरच्या बाजारात पोहोचली, तेव्हा बाजारात व्यापारी झगमगते दिवे लावून आणि दुकानातल्या नव्या साहित्यासह दिवाळीच्या स्वागतासाठी तयार होते.
बाजारात हळूहळू लोक येत होते, दुकानात चौकशी करत होते आणि काही वस्तूंची खरेदीही करताना दिसत होते.
यातल्या अनेक दुकानांसमोर भगवे झेंडे फडकत होते. हे झेंडे लावण्यामागचं कारण सांगताना इथल्या हिंदुत्ववादी संघटनांचे नेते कुणाल भंडारी यांनी ईदला मुस्लिमांकडूनही असेच फतवे निघत असल्याचा दावा केला.
बीबीसी मराठीशी बोलताना कुणाल भंडारींनी या मोहिमेचा फायदा हिंदू व्यापाऱ्यांना होत असल्याचा दावा केला.
ते म्हणाले, "आम्ही झेंडे देत होतो, त्यावेळी दुकानदार उस्फूर्तपणे ते लावत होते. व्यापाऱ्यांमध्ये संदेश गेला. आम्ही व्यापाऱ्यांशी संपर्क करतो किंवा व्यापारी आमच्याशी संपर्क करतात, तेव्हा गिर्हाईक हे झेंडे पाहूनच आत येत असल्याचं ते सांगतात. ग्राहक यावेळी हिंदूंकडूनच खरेदी करत आहे, याचा मोठ्या प्रमाणावर फायदा त्यांना होत आहे."
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील यामुळेच हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याचा दावा त्यांनी केला.
कुणाल भंडारी म्हणाले, "या ठिकाणचे राज्यकर्ते देखील पूर्वी भाषण करताना मशिदींमधून जाऊन यायचे. आता परिस्थिती बदलताना दिसत आहे, त्यामुळे त्यांना हिंदूंची बाजू घ्यावी लागत आहे."
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष आणि मुस्लिम नेते डॉ. परवेझ अश्रफी यांनी मात्र भंडारींचा फतव्याचा दावा खोडून काढला.
असा फतवा निघाल्याचं त्यांनी दाखवावं असं म्हणतानाच अश्रफी यांनी ईदला गरिबांकडून, गरजूंकडून खरेदी करण्याचं आव्हान करत असल्याचं म्हटलं.
बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. अश्रफी म्हणाले, "आम्ही स्थानिक लोकांना विनंती केली की, तुम्ही झेंडे लावत आहात, त्याचं आवाहन करत आहात की हिंदूंकडूनच खरेदी करा, तर तुम्ही मोठे फ्लेक्स लावून हिंदूंना 70 टक्के डिस्काऊंट देण्याची घोषणा करावी. म्हणजे अडचणीत असणाऱ्या हिंदूंना याचा फायदा होईल आणि त्यांचा सण चांगला साजरा होईल.
"दरम्यान, व्यापाऱ्यांचं जे नुकसान होत आहे त्याची भरपाई स्थानिक आमदार करतील. तसंच, ज्या लोकांनी झेंडे लावले नाहीत त्यांना आम्ही विनंती केली की, तुम्ही तिरंगे लावा, म्हणजे लोकांना कळेल भगवे झेंडे लावणारे कोण आहेत आणि तिरंगे लावणारे कोण आहेत."
नगरच्या बाजारपेठेत काय परिस्थिती?
हिंदू विरुद्ध मुस्लिम असं राजकारण सुरू असताना व्यापाऱ्यांना मात्र चिंता सतावत होती ती कमी झालेल्या व्यवसायाची.
यंदा प्रत्येक दुकान दिवाळीसाठी सजलेलं असताना ग्राहक मात्र अपेक्षेप्रमाणे येत नसल्याचं व्यापारी सांगत होते.
मराठवाड्याला लागून असलेल्या नगर जिल्ह्याच्या काही भागाला अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे वेगवेगळ्या तालुक्यांमधून येणाऱ्या ग्राहकांनी यंदा पाठ फिरवल्याचं त्यांनी नोंदवलं.
परिणाम इतका की वसुबारसेच्या दिवशी देखील नेहमीच्या तुलनेत 25 टक्केच धंदा झाल्याचं ते सांगत होते.
हिंदू मुस्लिम राजकारणाचा परिणाम बाजारपेठेत दिसत नसल्याचं सांगत, इथल्या आयेशा चुडीवाला या दुकानाच्या बाहेर आपला स्टॉल लावणारे योगेश तवर बीबीसीशी बोलत होते.
ते म्हणाले, "माझ्या मते व्यापाऱ्याला धर्म नसतो. सिम्पलशी गोष्ट आहे, व्यापाऱ्याला धर्म नसतो. त्याचा धर्म हा तो जी काही वस्तू विकत आहे ती चांगल्या पणाने विकून ग्राहकाची सेवा करणं हा त्याचा मूळ धर्म असायला हवा."
गेल्या चार-पाच वर्षांमध्ये उलाढाल कमी होत चालल्याचं तवर यांनी नोंदवलं. यंदा त्याहूनही जास्त परिणाम होत असल्याचं ते म्हणाले.
तर तयार कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या राजेश तिवारींनी नोंदवलं की, वसुबारसेच्या दिवशी बाजारपेठेत काहीशी रेलचेल पहायला मिळाली.
इतर दिवशी ग्राहक नसल्याचं सांगत तिवारी म्हणाले, "मार्केटवर परिणाम नाही. आमचे ग्राहक साधारण आहेत. ते आपल्या हिशोबाने चालू आहेत. ईदच्या वेळी ते असं म्हणत असतील तर वीट आहे, पण आपला सण म्हणल्यावर आपल्या हिशोबाने सुरू आहे व्यवसाय. मुळात यंदा ग्राहकच नाहीत. नेहमीच्या तुलनेत फक्त 25 टक्के ग्राहक आहेत."
तर बांगड्या आणि दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या हमजा चुडीवाला यांनी अतिवृष्टीचा फटका चांगलाच बसला असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले, "पावसामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जे ग्राहक आहेत ते दिसत नाहीत. यंदा शेतकऱ्यांचा जो पैसा आहे तो आला नाही असं दिसतं."
तर आकाशकंदील आणि सजावटीचं सामान विकणाऱ्या शेख शम्स यांच्या दुकानातही फारशी गर्दी नव्हती.
ते म्हणाले, "त्या झेंड्याचा काही परिणाम नाही. इथं लोक गुण्यागोविंदाने राहतात. तालुका पातळीवर जी बाजारपेठ आहे, तिथं जे पाणी घुसलंय त्याचा परिणाम मार्केटवर आहे."
अहिल्यानगरचं धार्मिक राजकारण
मुळात ऐतिहासिक काळापासून अहिल्यानगरची परंपरा ही एकोप्याची असल्याचं स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मांडतात.
आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबाच्या राजकीय वाटचालीतही मुस्लिम समुदायाचा महत्त्वाचा वाटा राहिल्याचं ते नोंदवतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे चित्र बदलण्याचा वारंवार प्रयत्न होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
29 सप्टेंबरला नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या परिसरात रांगोळी काढण्यावरून झालेल्या वादाचं पर्यवसान दगडफेकीत झालं होतं.
आमदार संग्राम जगताप यांनीही हिंदुत्ववादी भूमिका उघडपणे घेतली ती अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेकच्या देवळाच्या जवळ असलेलं एक धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करूनच.
मात्र, अशा घटनांचा खरंच लोकांवर परिणाम होतो का, याबाबत सांगताना सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी शाह शरिफ दर्गा आणि शहाजीराजेंची आठवण करून दिली.
शेख म्हणाले, "नगर शहरामध्ये शहा शरिफ दर्गा आहे. मालोजीराजेंनी त्या ठिकाणी नवस केला आणि त्यांना मुलं झाली शहाजी आणि शरिफजी. या सगळ्या शहराला मोठा इतिहास आहे. ज्ञानेश्वरी लिहिली ते नेवासे नगर जिल्ह्यात आहे. ही संतांची आणि सुफींची भूमी आहे. मात्र जिल्ह्याच्या बाहेरचे लोक इथल्या स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून इथलं वातावरण खराब करत आहेत. लोकांना मात्र याचा काही फरक पडत नाही."
लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी संघटना फक्त आपला राजकीय अजेंडा राबवत असल्याचा मुद्दा नोंदवला.
ते म्हणाले, "शेतकर्यांना जे नुकसान भरपाई मिळायची होती ती नरकचतुर्दशीच्या रात्रीपर्यंत मिळाली नव्हती. शेतकरी कधी पैसे काढणार, कधी मार्केटला जाणार? शेतकर्यांचं पीक हेच अपत्य असतं. त्यामुळे बाजारपेठेत निरुत्साह आहे. मध्यमवर्ग खरेदी करताना दिसत आहेत."
पुढे ते म्हणाले, "अनेक मुस्लिम आणि शीख यांनी फराळ वाटप, फटाके खरेदी करताना दिसले. मुळात सण आणि धर्म यांची संकल्पनाच मोडत चालली आहे आता. लोकांसाठी हा मुद्दाच नाही. लोकांचे आणि व्यवसायिकांचे नाते वर्षानुवर्षांचे आहे, ते असे एका क्षणात तुटत नाही."
तर सामाजिक कार्यकर्ते आनंदा शितोळे यांनीही ही बाब महत्वाची असल्याचं नोंदवलं.
ते म्हणाले, "नगर जिल्हा संपूर्णपणे ग्रामीण शेतीच्या अर्थकारणावर अवलंबून असणारा जिल्हा आहे. संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी माल विकण्यासाठी येतात. शेतकरी फळांच्या बागा आहेत, त्याचा विक्रेता मुस्लिम आहे. शेतकरी पशुपालन करतात, त्यांचा ग्राहक मुस्लिम असतो. अशी ही अर्थव्यवस्था एकमेकांवर अवलंबून आहे."
"त्यामुळे शंभर टक्के स्वावलंबी कोणी असू शकतात, पण स्वतंत्र संपूर्ण जगात आणि देशात जी परिस्थीती आहे, तीच आमच्याकडे आहे. त्यामुळे कितीही धार्मिक तेढ माजवण्याचा प्रयत्न झाला तरी पोट महत्वाचं आहे हे सामान्य जनतेला चांगलं समजतं."
तर प्राध्यापक मेहबुब सय्यद यांनी इथली सामाजिक वीण ही सर्वधर्मसमभावाची असल्याचं सांगताना म्हटलं, "सर जमी अहिंद पर अखवा मे आलम के फिराक काफिले बसते गए हिंदूस्ता बनता गया."
धार्मिक तेढ निर्माण करण्याचा परिणाम हा 14 ते 22 या वयोगटातील मुलांवर होत असल्याचं नोंदवत ते म्हणाले, "अलीकडच्या काळामध्ये हे जे घडतंय, याचे साधारणपणे 14-15 ते 20-22 या वयोगटातले, ज्यांना मानसशास्त्रातले अस्वस्थ वयोगटातले असे जे तरुण आहेत, यांच्यावर परिणाम होत असेल."
"पण मुळात असं ग्राऊंड लेव्हलवर फारसं जाणवत नाही असं वाटतं. विशेषतः सोशल मिडिया आणि माध्यमं यांच्यातून याला बळकट करणारं वारंवार येताना दिसतं. पण अजून तरी पूर्ण अंधारून आलं आहे असं म्हणावसं वाटत नाही", असंही ते म्हणाले.
मुळात ज्या आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे हा मुद्दा चर्चेत आला, त्यांच्या कुटुंबीयांच्या वाटचालीत मुस्लिम समुदायाचं योगदान मोठं असल्याचं स्थानिक पत्रकार भैरवनाथ वाकळे नोंदवतात.
जगताप कुटुंबाच्या राजकीय वाटचालीवर बोलताना भैरवनाथ वाकळे सांगतात, "संग्राम जगताप यांचे वडील अरूण जगताप यांच्या राजकीय काळात अनिल राठोड हिंदुत्ववादी नेते होते, तर दुसरीकडे स्वतः अरूण जगताप धर्मनिरपेक्ष राजकारण करायचे. त्यामुळे त्यांना सुरुवातीपासून मुस्लीम समुदायाकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. त्या बळावर ते मोठे झाले."
अहिल्यानगरमध्ये धार्मिक मुद्द्यांवर दुफळी निर्माण करण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. यापूर्वी देखील वेगवेगळ्या कारणांनी इथं तणाव निर्माण होत राहिला आहे.
फक्त नगरच नाही, तर राज्यातही अनेक ठिकाणी अशी वक्तव्यं, मोर्चे, मुद्दे यातून असाच तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे.
आता राज्यकर्ते राज्याला हिंदुत्वाची प्रयोगशाळा होऊ देणार की कायद्याच्या आधारे अशा घटना आणि व्यक्तींना आळा घालणार, हा प्रश्न आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)