व्यायाम करण्यासाठी इलेक्ट्रोलाईट्स ड्रिंक्सची खरंच गरज आहे का?

    • Author, यास्मिन रुफो
    • Role, बीबीसी न्यूज

जिम किंवा धावण्याच्या ट्रॅकवर आता इलेक्ट्रोलाइट्स ड्रिंक्स पिणं अगदी सामान्य आहे. त्यामुळे खेळ-व्यायामातली कामगिरी सुधारते आणि आवश्यक खनिजांची हानी भरून काढण्यासाठी मदत होते, असं सांगून इलेक्ट्रोलाईट्सची विक्री होते.

पूर्वी फक्त व्यावसायिक खेळाडू ही पेयं प्यायचे. मात्र आता ती सामान्य लोकांपर्यंत आली आहेत. जिममध्ये जाणाऱ्यापासून कार्यालयांत काम करणाऱ्यामध्ये तसेच रोज प्रवास करणाऱ्यांमध्ये 'हायड्रेशन बुस्टर'च्या नावाखाली याचा प्रचार होत आहे.

वास्तविक इलेक्ट्रोलाइटस् म्हणजे सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजं शरीरातील नसा, स्नायू आणि द्रवपदार्थाचा तोल नियंत्रित करण्यासाठी मदत करतात.

मात्र स्पोर्ट्स ड्रिंक, त्याची पाकिटं, पावडरी यावर काहीशे रुपये खर्च होतो.

लिव्हरपूल जॉन मूर्स विद्यापीठातील क्रीडा पोषणसंशोधक प्राध्यापक ग्रेम क्लोज यांच्या माहितीनुसार बहुतांश लोक यावर अकारण पैसे खर्च करत आहेत.

फक्त विशिष्ट वेळीच याचा वापर व्हावा

प्राध्यापक क्लोज सांगतात, "शरीरात इलेक्ट्रोलाइट्स कमी होणं असामान्य स्थितीत होतं. कारण शरीर स्वतःच त्यांचा समतोल राखत असतं."

"जर सामान्य आणि संतुलित आहार घेतला, तर बहुतांश लोकांना इलेक्ट्रोलाइट्स अशीच मिळत असतात. कारण बहुतांश पदार्थांत मीठ असतं आणि फळं -भाज्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं."

काही विशिष्ट परिस्थितीत जसं की दीर्घ किंवा वेगवान व्यायामप्रकारात जेव्हा जास्त घाम येतो तिथं इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कमी होऊ शकते.

प्राध्यापक क्लोज यांनी बीबीसी स्लाइस्ड ब्रेडला सांगितलं, "जर तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल, तर सोडियमच्या रुपात इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करणं चूक नाही. त्यातही तुम्ही जास्त घाम येणारा व्यायाम करत असाल तर ते वाईट नाही."

"याबरोबरच इलेक्ट्रोलाइट्स ड्रिंक्समुळे तहानही वाढू शकते. त्यामुळे लोक जास्त पाणी पितात. भरपूर व्यायाम करण्यासाठी ते आवश्यक आहे."

फक्त पाणी प्या किंवा ऑम्लेट खा

मात्र जिममधला व्यायाम किंवा 5 किलोमीटर धावण्याच्या व्यायामासाठी इलेक्ट्रोलाइट्सची काही गरज नाही.

क्लोज सांगतात, "फक्त पाणी पित राहा. तेच पुरेसं आहे. "

"अर्थात काही लोकांना इलेक्ट्रोलाइट्स ड्रिंक्सची चव आवडते. त्यांना व्यायामादरम्यान जास्त पाणी पिण्याची गरज भासते. अशावेळेस यात काही वाईट नाही", असं क्लोज यांना वाटतं.

महागड्या पावडरशिवाय ते काही सोपी घरगुती पेयं सुचवतात.

ते सांगतात, "दोन तृतियांश पाणी, एक तृतियांश फळांचा रस (जसं की अननसाचा रस) आणि एक चिमूट मीठ मिसळा. एवढीच हलकीशी चव लागेल एवढं बास आहे."

यात तुम्हाला जवळपास 6 टक्के कर्बोदकं आणि इलेक्ट्रोलाइट्स असलेलं संतुलित मिश्रण मिळतं.

सकाळसकाळी इलेक्ट्रोलाइट्स उत्पादनं घेतल्यामुळे काही विशेष फरक पडतो याबद्दल काहीही पुरावा नाही.

एका ऑम्लेटमध्ये इलेक्ट्रोलाइट्सच्या पाकिटापेक्षा जास्त इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्यामुळे सकाळचं खाणं जास्त परिणामकारक असते.

वेग वाढेल किंवा ताकद येईल, असं होणार नाही

स्पोर्टस ड्रिंकचा आधार कर्बोदकं असतात.

आपलं शरीर 70 ते 90 मिनिटं कठीण व्यायाम करण्यापुरताच कर्बोदकं साठवू शकतं. त्यामुळे जास्त सराव करणाऱ्या खेळाडूंना अशी पेयं उपयोगाची असतात.

प्राध्यापक क्लोज सांगतात, "मात्र क्लोराइड, कॅल्शियम, फॉस्फरससारखी खनिजं त्यात घातल्यामुळे फायदा होतो यासाठी काही ठोस पुरावा नाही. आपलं शरीर एरव्हीही त्याचा समतोल चांगल्या प्रकारे राखतं."

व्यायामादरम्यान पुरेसं पाणी, कर्बोदकं आणि सोडियम असलं पाहिजे याची फक्त काळजी घेतली पाहिजे.

इलेक्ट्रोलाइट्सची गरजच नसते, असं नाही. त्याची गरज फक्त दीर्घ, कठीण आणि उष्ण वातावरणातील व्यायामासाठी असते. रोजच्या व्यायामासाठी त्याची गरज नाही.

हां. जर तुम्ही उष्ण तापमानात फारवेळ व्यायाम करत आहात आणि पाणी पिण्यासाठी स्वतःला सजग करत राहावं, असं वाटत असेल तर सोडियमचं प्रमाण वाढवण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स ड्रिंक्स घेणं ठीक आहे.

पण अशी उत्पादनं काहीही दावा करत असले, तरी यामुळे आपल्या व्यायामातल्या कामगिरीत अतिरिक्त "जर एखादं उत्पादन यामुळे आपली खेळातली, व्यायामातली कामगिरी 10 टक्क्यांनी वाढेल असा दावा करत असेल तर ते खोटं आहे असं समजा."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)