You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गाझा युद्धाची झळ निरागस मुलांना, परदेशातील उपचारांसाठीही करावी लागतेय प्रतीक्षा
- Author, कॅरोलिन हॉले
- Role, बीबीसी न्यूज, इटली
इस्त्रायलने गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये हजारो लोक मारले गेले आहेत. जखमींना उपचारांसाठी परदेशात नेण्याची गरज आहे. परंतु, खूपच कमी लोकांना देश सोडण्याची परवानगी मिळत आहे. याची सर्वाधिक झळ लहान मुलांना बसत आहे.
उंच... अजून उंच, अजून उंच... झोका देणाऱ्या आईला लहानगी झायना म्हणत राहते. एकेका झोक्यासरशी तिचे डोळे उत्साहाने चमकत जातात. उत्तर इटलीच्या पडुआ या उपनगरातील एका लहान खेळाच्या मैदानावरील हे दृश्य. खरे तर एरवी जगात कुठेही दिसणारे हे सर्वसामान्य दृश्य. पण इटलीतील या दृश्याला करुणेची झालर आहे.
दोन वर्षांची झायना तिचं डोकं नीट हलवू शकत नाही. तिच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला, मान आणि डोक्यावर खोल जखमा झालेल्या आहेत. झायना आता सुरक्षित आहे. आणि त्या चिमुकलीला वाटतेय, की ती जणू हवेतच उडते आहे.
उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी
दक्षिण इस्रायलवर 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने हल्ले केले. त्यानंतर सुरू झालेल्या युद्धात हजारो लोक जखमी झाले. अशा पाच हजार जखमींना परदेशातील उपचारासाठी गाझा सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, या युद्धात गाझातील 22 हजारांहून अधिक नागरिक जायबंदी झाले आहेत. परंतु मे महिन्यात इजिप्तच्या सीमेवरील राफा क्रॉसिंग बंद केल्यापासून फारच कमी लोकांना देश सोडण्याची परवानगी मिळाली आहे.
"17 मार्च हा आमच्यासाठी दु:स्वप्नाचा दिवस होता. दक्षिण गाझामधील अल-मवासी येथे आम्ही तंबूत राहत होतो. खरे तर खान युनिसमधील आमच्या घरातून आम्हाला दोनदा परागंदा व्हावे लागले.
"पहिल्यांदा राफा आणि नंतर अल-मवासीमधील निर्वासितांच्या तंबूंमध्ये. तिथे आपण सुरक्षित आहोत, असे आम्हाला वाटत होते. आम्ही राहत असलेल्या तंबूत झायना आणि तिची चार वर्षांची बहीण लाना खेळत होत्या. त्याच वेळी जोरदार हवाई हल्ला झाला. घाबरलेली झायना पळत आली आणि मला बिलगली. माझ्या हातात त्यावेळी उकळत्या सुपाचे भांडे होते. ते झायनाच्या अंगावर सांडले. माझ्यासमोर तिचा चेहरा आणि त्वचा जळाली. मी तिला तशीच उचलून अनवाणीच रस्त्यावर पळाले."
त्यावेळी आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण आलेला होता. त्यामुळे उपचार मिळणे अवघड झाले होते. पण शेवटी रेडक्रॉसच्या डॉक्टरांनी झायनावर उपचार केले.
गाझाच्या युरोपियन हॉस्पिटलमध्ये वडिलांच्या पायावरील त्वचेचे झायनाच्या जखमांवर रोपण केले गेले. त्यानंतर पुढील उपचार इजिप्तमध्ये झाले. अधिक उपचारांसाठी तिला इजिप्तहून इटलीला नेण्यात आले.
'आमचा हमासशी काही संबंध नाही'
17 वर्षीय आलाच्या गाझातील घरावर गेल्या वर्षी हवाई हल्ला झाला होता. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. ती झायनाला इथे भेटली आणि दोघींची लगेच गट्टी जमली.
आला म्हणत होती, “एवढ्याशा मुलीने किती वेदना सहन केल्या आहेत. मी तिच्याहून वयाने खूपच मोठी आहे, तरी मला कधीकधी वेदना असह्य होतात. मग झायनाचे काय होत असेल?"
चार मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आला तब्बल 16 तास अडकली होती. तिथून तिची सुटका करण्यात आल्यानंतर तिला समजले, की तिचे शिवणकाम करणारे वडील मरण पावले आहेत. तसेच, विद्यापीठात शिकणारा तिचा भाऊ नाएल आणि नर्सिंग काम करणारा वाएल यांचे ढिगाऱ्याखालचे मृतदेह सापडलेही नाहीत.
“मी ढिगाऱ्याखाली पूर्ण वेळ जागी होते. छातीवर आणि शरीरावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे मला धड श्वासही घेता येत नव्हता. निपचित पडलेल्या अवस्थेत मी फक्त माझ्या कुटुंबाचा विचार करत होते, की त्यांचे काय झाले असेल?”
इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात वडील आणि भावांसोबतच आलाने तिचे आजोबा आणि काकूही गमावली.
"त्यांचा हमासशी काहीही संबंध नव्हता. माझे सगळे आप्त मी गमावले. इटलीत होणाऱ्या उपचारांवर मी समाधानी आहे, पण मला चिंता वाटते आहे गाझाची आणि तेथील माझ्या बांधवांची," आला सांगत होती.
दुसरीकडे, इस्रायली संरक्षण दलाने बीबीसीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या युद्धात नागरिकांना लक्ष्य केले जात नाही. हमासचे बळ मोडण्यासाठी ही लष्करी मोहीम राबविली जात आहे. ज्यामध्ये नागरिकांची हानी होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
तर, हमास संचलित आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एक वर्षापूर्वी संघर्ष सुरू झाल्यापासून गाझामध्ये 41 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने जखमी पॅलेस्टिनींसाठी ‘मल्टिपल मेडिकल इव्हॅक्युएशन कॉरिडॉर’साठी वारंवार आवाहन केले आहे. त्यात म्हटले आहे, की मे महिन्यापासून केवळ 219 रुग्णांना देश सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सेव्ह अ चाइल्ड आणि किंडर रिलीफ; या अनुक्रमे ब्रिटीश आणि अमेरिकन धर्मादाय संस्थांच्या पाठपुराव्यामुळे झायना आणि आला यांना देशाबाहेर उपचारासाठी नेण्यात आले. त्यासाठी या संस्थांनी इस्रायल, इजिप्त आणि अमेरिकन सरकारकडे अनेक दिवस चिकाटीने
प्रयत्न केले.
इजिप्तमधून इटलीला मुलींसोबत आलेल्या किंडर रिलीफच्या नादिया अली म्हणतात, “प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास झायना आणि आला या खरोखर भाग्यवान आहेत. कारण उपचारांच्या प्रतीक्षेत इतर अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे."
नशिबी येणार जन्मभराचे अपंगत्व
या दोन मुलींच्या नशिबात या वेदना किती काळ असतील, याबद्दल अनिश्चितता आहे. कारण या दोघींनाही पुढचे काही महिने फिजिओथेरपीच्या वेदना सोसाव्या लागणार आहेत. त्यानंतर त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया होणार आहेत. झायना आणि आला या दोघीही सध्या इटलीतील बर्न स्पेशालिस्ट डॉ. ब्रुनो अझेना या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांच्याशी डॉ.
ब्रुनो अझेना फारच ममतेने वागतात. पण डॉक्टरांना या दोघींबाबतची कडवट बातमी सांगावीच लागणार आहे. आलाच्या पायांवरील जखमा एवढ्या खोल आहेत, की तिला आता पूर्वीप्रमाणे चालता येणार नाही आणि झायनाच्या डोक्यावरील केस कधीच वाढणार नाहीत. मुलीबाबत काही तरी चमत्कार होईल, या
आशेने गाझा सोडलेल्या झायनाची आई शायमा यामुळे अत्यंत निराश झाली आहे.
झायनालाही आता लक्षात येऊ लागले आहे, की ती तिच्या बहिणींपेक्षा वेगळी आहे. मात्र इतर मुलींप्रमाणे ती जेव्हा केस बांधायला सांगते, तेंव्हा तिला काय सांगावे, असा प्रश्न तिच्या आईला पडतो.
शायमाच्या पतीला मात्र देश सोडण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे एकट्याने मुलीला सांभाळणे तिच्यासाठी भावनिक दृष्ट्याही कठीण आहे. भविष्याबद्दल चिंतीत असलेल्या शायमाला तिच्या
लाडक्या लेकीपासून आपले अश्रू लपवावे लागत आहेत. शिवाय युद्धादरम्यान उपचाराविना कर्करोगाने दगावलेल्या आईची आठवणही तिचा पिच्छा सोडत नाही.
शायमा म्हणते, “या युद्धामुळे मला खूप किंमत मोजावी लागली. आम्ही देवाचे आभारी आहोत, की किमान आम्ही युद्धग्रस्त भागातून बाहेर तरी पडू शकलो. इतर जखमी पॅलेस्टिनी लोकांनाही आमच्याप्रमाणेच उपचार मिळतील, अशी मला आशा आहे. त्यांचे रक्षण व्हावे आणि युद्ध थांबावे, यासाठी मी देवाकडे सतत प्रार्थना करते आहे.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)