जेव्हा शरद पवारांनी गौतम अदानींबद्दल म्हटलं होतं, 'लोकलमध्ये वस्तू विकणाऱ्या तरुणाने उभारलं साम्राज्य'

शरद पवार, गौतमी अदानी आणि अजित पवार

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शरद पवार, गौतमी अदानी आणि अजित पवार
    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठी

"पवार साहेब आणि माझे 30 वर्षांपेक्षा जुने संबंध आहे. मी त्यांच्याकडून खूप शिकलो ते ज्ञानाच्याही पलीकडचं आहे. ते माझे मेंटॉर आहेत."

"रात्रंदिवस काम करणारा आणि अतिशय साधा असणारा हा तरुण उद्योजक (गौतम अदानी) जमिनीवर पाय ठेवून आहे."

दोन प्रसिद्ध व्यक्तींनी एकमेकांचं कौतुक करताना काढलेले हे उद्गार. या दोन व्यक्ती म्हणजे उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार.

बारामतीमध्ये रविवारी (28 डिसेंबर 2025) शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI चं उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रिती अदानी हे होते.

राज्य आणि केंद्रीय राजकारणातही कायम चर्चेत असणारं बारामती या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं.

कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येणार हे या चर्चेचं कारण होतंच. पण गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी आणि संबंध यावरही या निमित्ताने पुन्हा चर्चा सुरू झाली.

माध्यमांनी हा कार्यक्रम आणि अदानी-पवार भेटीचं त्यांच्या पद्धतीनं विश्लेषण केलंच. पण तेवढंच नाही तर, प्रामुख्यानं सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून लोकांनी अगदी परखडपणे त्यांची मतं मांडली.

सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातही शरद पवार हे विरोधकांच्या भूमिकेतून सरकारवर टीका करताना दिसतात.

पण, राहुल गांधींसह विरोधकांचा एक मोठा गट अदानी आणि सरकारच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित करत असताना शरद पवार मात्र कशाचीही पर्वा न करता अगदी उघडपणे गौतम अदानींबरोबर घनिष्ठ संबंध असल्याचं अगदी अभिमानानं सांगतात. त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात अदानींची उपस्थिती असते.

एवढंच काय तर प्रचंड चर्चा झालेल्या 'हिंडनबर्ग' प्रकरणावेळीही विरोधक आक्रमकपणे टीका करत असताना शरद पवारांनी मात्र या प्रकरणी वेगळीच भूमिका मांडत या प्रकरणातील हवा काढून घेतल्याचं त्यावेळी विश्लेषकांनी म्हटलं होतं.

या निमित्ताने शरद पवार आणि गौतम अदानींचे संबंध कसे राहिले आहेत आणि ते कशाप्रकारे समोर आले आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी रविवारच्या कार्यक्रमात अदानी आणि पवारांनी उधळलेली एकमेकांबाबतची स्तुतीसुमनं कशी होती? ते पाहूयात.

'पवार साहेब माझे मेंटॉर'

या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने बारामतीमध्ये पवार कुटुंबही एकत्र जमल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण पवार कुटुंबानं गौतम अदानींच्या कुटुंबाचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं. दोन्ही कुटुंबांमध्ये असलेला जिव्हाळा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यातून दिसून आला.

या कार्यकमात बोलतानाही शरद पवारांनी गौतम अदानींचं तोंडभरून कौतुक केलं. गौतमभाई असा उल्लेख करत गौतम अदानींनी अगदी शून्यातून सुरुवात करत आज हे यश मिळवलं असल्याचं शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.

पवार म्हणाले, "काहीतरी करावं अशी गौतमभाईंची इच्छा होती. पण गुजरातमध्ये मर्यादा होत्या म्हणून ते मुंबईत आले. खिशात काहीही नव्हतं. पण मुंबई कष्ट करणाऱ्याला उपाशी ठेवत नाही आणि गौतमभाईंनी त्याचा फायदा घेतला."

गौतम अदानींचा व्यवसाय 23 राज्यांत पसरला असल्याचा उल्लेख पवारांनी केली. त्यांनी लाखो हातांना काम दिलं आहे. त्यामुळं त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी म्हणून त्यांना बोलावलं, असं शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, गौतम अदानी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तर अदानींनीही भाषणात सुरुवातीला पवारांची स्तुती केली. पवार कुटुंबाबरोबर आपले संबंध 30 वर्षांपेक्षा जुने असल्याचं गौतम अदानी म्हणाले.

"मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि ते ज्ञानापेक्षाही पलीकडचं असून ते माझे मेंटॉर आहेत," असं म्हणत गौतम अदानींनी पवारांबाबतच्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना आपण बारामतीला अनेकवेळा (डझन्स ऑफ टाईम्स असं अदानी भाषणात म्हणाले) भेट दिली असल्याचं गौतम अदानींनी सांगितलं.

"पवार साहेबांनी बारामतीमध्ये जे काही केलं ते विकासापेक्षाही खूप मोठं आहे. संपूर्ण भारतानं आदर्श घ्यावा, अशी ही ब्लूप्रिंट पवार साहेबांनी तयार केली आहे," असही अदानी म्हणाले.

पवारांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक करताना, पवार साहेबांना ग्राऊंड रिअ‍ॅलिटी आणि नॅशनल अजेंडा यात समन्वय कसा साधायचा हे माहिती असल्याचंही गौतम अदानी म्हणाले.

कार्यक्रमातील सुप्रिया सुळे यांच्याही भाषणाची चांगलीच चर्चा झाली. गौतम अदानी आणि प्रिती अदानी आपल्याला मोठ्या भाऊ आणि वहिनीसारखे असून ते मला हक्कानं रागवतातही, असं सांगत सुप्रिया सुळेंनी दोन्ही कुटुंबांचं भावनिक नातं सांगितलं.

तर, अजित पवारांनी त्यांच्या भाषणात गौतम अदानींच्या साम्राज्याचा किती विस्तार किती मोठा आहे यावर भर दिला.

'लोक माझे सांगाती'मध्ये कौतुक

पवार आणि अदानी यांचे संबंध किती जवळचे आहेत याचा अंदाज यावरूनही लावता येईल की, पवारांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रातही गौतम अदानींचं उल्लेख आणि कौतुक केलं आहे.

आत्मकथेतील पान क्रमांक 123 वर शरद पवार लिहितात, "गौतम अदानी नावाच्या तरूणाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या तरूण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. कमालीचा कष्टाळू आणि साधा. शून्यातून त्यानं आपलं आजचं साम्राज्य उभं केलं. लोकलमध्ये छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले.

"मग तो हिऱ्यांच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते. पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता. पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. यामधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमणभाईंकडे मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला."

अदानी आणि पवार कुटुंबीय

फोटो स्रोत, ANI

"मुंद्रा वाळवंटी भागातील बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे. या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हे शिवधनुष्य पेललं. आज 50 हजार एकर जमिनीवर वसलेलं हे बंदर देशातील सर्वात मोठं आणि अद्ययावत बंदर आहे."

गौतम अदानींना वीजनिर्मिती क्षेत्रात उतरण्याचा सल्ला दिला होता, असंही पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

एका कार्यक्रमात पवार अदानींना म्हणाले, "आज गौतम अदानी आले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ऊर्जानिर्मितीसाठी या परिसरात प्रकल्प उभा करावा. गौतम अदानी यांनीही त्यांच्या भाषणात माझ्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला. त्यांनी भंडाऱ्यात ऊर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला." असं शरद पवारांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.

शरद पवारांनी हे कित्येक वर्षांपूर्वी लिहिलं होतं. आता वीज निर्मितीच्या उद्योगातील आघाडीचं नाव म्हणून गौतम अदानी हे संपूर्ण भारतात परिचित आहेत.

दरम्यान, सत्ता बदलली तरी गौतम अदानी यांचे शरद पवार यांच्याशी असलेले संबंध अद्याप कायम आहेत.

"रात्रंदिवस काम करणारा आणि अतिशय साधा असणारा हा तरुण उद्योजक जमिनीवर पाय ठेवून आहे," असं पवारांनी पुस्तकात लिहिलं आहे.

'हिंडनबर्ग' प्रकरण आणि पवारांची भूमिका

हिंडनबर्ग या संस्थेनं 2023 मध्ये अदानींच्या संदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यावरून एकच गदारोळ सुरू झाला होता. यात अदानी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले होते, तर अदानी समूहानं हा अहवालच फेटाळून लावला होता.

याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उडवली होती. पण त्याचवेळी विरोधी पक्षातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेल्या शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळं सर्वांनाच धक्का बसला होता.

अदानी बारामतीत

फोटो स्रोत, ANI

एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी, "हिंडनबर्ग अहवालामध्ये भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत आहे," असं म्हटलं होतं.

"एका परदेशी संस्थेने त्यांच्या बाजूने वक्तव्य केलं. या वक्तव्याने देशात गदारोळ माजला. अशा प्रकारची विधाने यापूर्वी काही जणांनी केली होती. त्यावरून संसद सभागृहात गोंधळही झाला होता. पण, यावेळी त्याला विनाकारण जास्त महत्त्व देण्यात आलं. हा अहवाल आणणारा कोण आहे? त्याचा विचार होणं आवश्यक होतं. आम्ही तर त्याचं नाव पूर्वी कधीच ऐकलेलं नव्हतं. त्याची पार्श्वभूमी काय आहे? त्याचाही विचार व्हायला हवा होता," असं पवारांनी म्हटलं होतं.

एवढंच नाही तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणीही निरर्थक असल्याचं पवार म्हणाले होते.

पवार-अदानींमध्ये वारंवार भेटी

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीची चर्चा होत असली तरी यात नवीन काही नाही. एकीकडे अदानींवर राहुल गांधी टीका करत असताना शरद पवार त्यांच्याबरोबर एकाच मंचावर असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.

बारामतीमध्ये अनेकवेळा भेटी दिल्याचं गौतम अदानींनी रविवारी त्यांच्या भाषणातच सांगितलंच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्गचा अहवाल आला होता. त्यानंतर पवार आणि अदानींच्या झालेल्या भेटी चर्चेचं कारण ठरल्या होत्या.

एप्रिल 2023 मध्ये गौतम अदानी यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये सुमारे 2 तास चर्चा झाल्याचं इंडियन एक्सप्रेसनं म्हटलं होतं.

त्यानंतर 2 महिन्यांच्या आतच म्हणजे जून 2023 मध्ये अदानी पुन्हा पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचल्याचं समोर आलं होतं.

याच वर्षी म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये गौतम अदानी आणि शरद पवार यांनी एकत्रितपणे गुजरातमध्ये अदानींच्या एका प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं.

डिसेंबर 2023 मध्ये विद्या प्रतिष्ठानच्या इंजीनियरिंग डिपार्टमेंटच्या रोबोटिक लॅबच्या कार्यक्रमासाठी अदानी बारामतीत पोहोचले होते. तसंच याच दरम्यान अदानींनी शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेटही घेतली होती.

मध्यंतरी आमदार रोहित पवार हे गौतम अदानींची गाडी चालवत त्यांना एका कार्यक्रमाला नेलं होतं.रविवारीही रोहित पवार गाडी चालवताना दिसले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)