बीडमध्ये आणखी एका गँगवर 'मकोका' लावला, या कायद्यात नेमकी किती शिक्षा होते?

बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत

फोटो स्रोत, Facebook/Beed Police

फोटो कॅप्शन, बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत

बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या दोन गँगवर मकोकाअंतर्गत कारवाई केलीय. सुदर्शन घुले याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आज (27 जानेवारी) बीड पोलिसांनी आठवले गँगवर देखील मकोकाची कारवाई केलीय.

13 डिसेंबर 2024 रोजी पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबारची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींवर ही कारवाई करण्यात आली. यात प्रामुख्याने अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई याचा समावेश आहे. या आरोपींनी आतापर्यंत 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.

या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर या गँगवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि सनी आठवले याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याच आठवले गँगवर ही कारवाई करण्यात आली आहे.

ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडत आहेत. त्या ठिकाणी मकोका प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

तसंच, गंभीर स्वरूपातील गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि टोळीची माहिती घेऊन ही कारवाई सुरू राहणार असल्याचं बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असणाऱ्या आरोपींवर तसेच खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय. मकोका म्हणजे संघटित गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी आणण्यात आलेला कायदा.

काय आहे हा कायदा? तो कधी लावला जातो? आणि त्यानुसार शिक्षेच्या तरतुदी काय आहेत?

भारतामध्ये पूर्वी एक कायदा होता - TADA - Terrorist and Disruptive Activities (Prevention) Act. हा कायदा 1985 मध्ये अस्तित्वात आला होता आणि 1995 पर्यंत तो अंमलात होता. त्यानंतर इतर कायद्यांनी याची जागा घेतली.

संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका याच टाडाच्या धर्तीवर आहे.

अटक, न्यायालय

फोटो स्रोत, Getty Images

मकोका म्हणजे The Maharashtra Control Of Organised Crime Act, 1999 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा 1999 - याचा उल्लेख मोक्का असाही केला जातो.

24 फेब्रुवारी 1999 ला हा कायदा अस्तित्वात आला.

अरुण गवळी, छोटा राजन, छोटा शकील, इक्बाल कासकर या सगळ्यांवर यापूर्वी विविध प्रकरणांत मकोका लावण्यात आलेला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मकोका कुणावर लावला जातो?

हप्ता वसुली, खंडणी वसुली, खंडणीसाठी अपहरण, खून किंवा खुनाचा प्रयत्न, बेहिशोबी पैसे मिळवून देणारं बेकायदेशीर कृत्य, अंमली पदार्थांची तस्करी - विक्री, सामूहिक गुन्हेगारी अशा आरोपांसाठी मकोका लावला जातो.

एकापेक्षा जास्त आरोपींनी एकत्र येऊन गुन्हा केल्याचा आरोप असेल, एखाद्या आरोपीविरोधात गेल्या 10 वर्षांमध्ये अशा प्रकारचे गुन्ह्यांचे किमान दोन गुन्हे दाखल असतील आणि कोर्टाने याची दखल घेतलेली असेल, तर अशा आरोपींवर मकोका लावला जातो.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

संघटित गुन्हेगारीविषयीची माहिती असणाऱ्या, अशा व्यक्तींशी संपर्क - संबंध असणाऱ्या, गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक वा इतर स्वरूपात मदत करणाऱ्या व्यक्तीवरही मकोका लावला जाऊ शकतो.

मकोका लावल्यामुळे काय होतं?

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या आरोपीवर मकोका लावला की या व्यक्तीला अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही. आणि अटक झाल्यानंतरही सहजासहजी जामीन मिळू शकत नाही. या कायद्यानुसार पोलिसांना चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांची मुदत मिळते.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

इतर गुन्ह्यांमध्ये हा कालावधी 90 दिवसांचा असतो. आरोपीचा कबुलीजबाब पोलिसांना नोंदवून घेता येतो. या कबुलीजबाबाच्या आधारे इतर आरोपींवर कारवाई करता येते. मकोका लावलेल्या आरोपीला विशेष न्यायालयासमोर हजर करून आरोपीला 30 दिवसांपर्यंतची पोलीस कोठडी मिळू शकते.

मकोकानुसार आरोपींना काय शिक्षा होऊ शकते?

मकोकाच्या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात होते. या आरोपींना किमान 5 वर्षं ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

जर या गुन्ह्यामुळे कुणाचा मृत्यू झाला असेल तर आरोपींना मृत्यूदंड वा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाण्याची तरतूद या कायद्यात आहे.

सोबतच एक लाखापासून ते पाच लाखांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. आरोपीची बँक खाती गोठवणं, मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही या कायद्यात आहे.

मकोका कसा अस्तित्वात आला?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मकोका हा कायदा कसा अस्तित्वात आला यासंदर्भात बीबीसी मराठीने माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी मकोका कसा अस्तित्वात आला याबद्दल सांगितले होते.

संघटित गुन्हेगारी कशी कमी करायची, त्यावर काय उपाय योजना हव्यात, काय तरतुदी हव्यात याचा विचार करून हा कायदा आणण्यात आल्याचे दीक्षित यांनी बीबीसी मराठीला सांगितले होते.

"गुन्हेगारी कमी करायची असेल तर लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. पण लोक तेव्हाच तक्रार करायला पुढे येतात जेव्हा त्यांना खात्री असते की पोलीस कारवाई करतील. आणि पोलीस तेव्हाच कारवाई करू शकतात जेव्हा त्यांना कायद्याचं पाठबळ आहे. MCOCA मुळे पोलिसांचे हात बळकट झाले.

"हे गुन्हेगार काही साधे नव्हते तुरुंगातही ते मारामाऱ्या करत असत. त्याचबरोबर Preventive Detention Act (म्हणजे काही होणार असा संशय आल्यास संशयिताला ताब्यात घेतलं जातं) या कायद्याचा वापर करून पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला."

जशी शहरं विस्तारतील तसं गुन्हेगारीचं स्वरूप बदलतं आणि संघटित गुन्हेगारी येतेच, ती आटोक्यात आणण्यासाठी मकोकाचा आणण्यात आल्याचे दीक्षित यांनी सांगितले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)