You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशियाच्या लष्करी विमानांना टार्गेट, ट्रकमधून सोडले ड्रोन; युक्रेनचं 'स्पायडर वेब' कसं पार पडलं?
- Author, लॉरा गोझी
- Role, बीबीसी न्यूज
हा अत्यंत असाधारण आणि चाणाक्षपणे आखलेला हल्ला होता – अभूतपूर्व, व्यापक आणि 18 महिन्यांच्या तयारीचं फलित.
1 जून रोजी, युक्रेनने त्यांच्या 100 हून अधिक ड्रोनद्वारे रशियाच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला चढवला, ज्यामध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर्सना लक्ष्य केलं गेलं.
या ऑपरेशनला 'स्पायडर वेब' असं नाव देण्यात आलं होतं. रशियाच्या अनेक भागांमधून - उत्तरेकडील आर्क्टिक सर्कलच्या वर असलेल्या मर्मन्स्कपासून पूर्वेकडील अमूर प्रदेशापर्यंत, युक्रेनमध्ये 8000 किलोमीटर अंतरावर - स्फोटांच्या बातम्या येऊ लागल्यापासूनच हा हल्ला किती मोठा असेल याचा अंदाज येऊ लागला होता.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं त्यांच्या देशातील पाच प्रांतांमध्ये हल्ला झाल्याचं स्पष्ट केलं आहे. मुरमान्स्क, इरकुत्स्क, इवानोजो, रियाजान आणि अमूर या ठिकाणी हे हल्ले झाले आहेत. पण यापैकी फक्त मुरमान्स्क आणि इरकुत्स्कमध्येच विमानांचे नुकसान झाले असून इतर ठिकाणचे हल्ले हाणून पाडण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे.
हल्ल्यानंतर लगेचच प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये युक्रेनच्या सुरक्षा सेवेचे प्रमुख (एसबीयू) वासिल मालियुक हे उपग्रह नकाशा पाहताना दिसत आहेत, जो रशियाने सांगितलेल्या हवाई तळांच्या ठिकाणांशी मिळता आहे.
ऑपरेशन 'स्पायडर वेब' कसं पार पडलं?
युक्रेनच्या लष्करी गुप्तचर संस्थेने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अनेक छोट्या ड्रोनची रशियामध्ये तस्करी करण्यात आली होती. त्यांना मालवाहक ट्रकच्या खास डब्यांमध्ये (कंपार्टमेंट) ठेवले गेले होते. त्यानंतर हजारो मैल दूर चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांना जवळच्या लष्करी हवाई दलांवर दूरस्थपणे (रिमोटली) लाँच केले गेले.
परंतु, ट्रक चालकांना आपण नेत असलेल्या वाहनात नेमकं काय याहे, याची कल्पनाही नव्हती. योजलेल्या स्थळावर ट्रक पोहोचल्यानंतर ड्रोन लाँच करण्यात आले आणि त्यांना ठरवलेल्या ठिकाणांवर पाठवण्यात आलं.
दरम्यान, ऑनलाइन व्हीडिओमध्ये एका ट्रकमधून ड्रोन बाहेर पडताना दिसत आहे. एका ट्रकचालकाने रशियाच्या सरकारी मीडिया 'रिया नोवोस्ती'ला सांगितलं की त्याने आणि इतर चालकांनी दगडफेक करून ड्रोनला उड्डाण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
रशियन टेलीग्राम चॅनेल 'बाझा'च्या अपुष्ट अहवालांनुसार, अनेक ट्रक चालकांनी सांगितलं की त्यांना रशियातील वेगवेगळ्या ठिकाणी लाकडी केबिन पोहोचवण्यासाठी व्यावसायिकांनी बुक केले होते.
काही चालकांनी सांगितलं की, नंतर त्यांना फोनवरून ट्रक कुठे पार्क करायचा याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यांनी तसं केलं, पण नंतर ड्रोन बाहेर येताना पाहून त्यांना आश्चर्य वाटलं.
या कारवाईचे निरीक्षण करणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी (1 जून) रात्री सोशल मिडियावर सांगितलं की, या धाडसी हल्ल्यासाठी 117 ड्रोनचा वापर करण्यात आला होता आणि त्याच्या तयारीसाठी 'एक वर्ष, सहा महिने आणि नऊ दिवस' लागले.
लक्ष्यित स्थळांपैकी एक स्थळ एफएसबी (रशियन सुरक्षा सेवा) च्या कार्यालयाशोजारी होतं, असंही त्यांनी नमूद केलं.
या हल्ल्याच्या संदर्भात काही लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचं रशियाने म्हटलं आहे. परंतु, झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांनी या ऑपरेशनमध्ये मदत केली "त्यांना रशियाच्या हद्दीतून बाहेर काढण्यात आलं आहे, आणि आता ते सुरक्षित आहेत."
इर्कुत्स्क प्रदेशातील उस्त-कुट शहरातील स्थानिक अधिकाऱ्यांनी एका टेलिग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की ते बेलाया लष्करी हवाई तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या संदर्भात युक्रेनियन वंशाच्या 37 वर्षीय व्यक्तीचा शोध घेत आहेत. मात्र, ती टेलीग्राम पोस्ट नंतर काढून टाकण्यात आली आहे.
ड्रोन हल्ले
युक्रेनच्या एसबीयूने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये लाकडी केबिनमध्ये ठेवलेले काळ्या रंगाचे अनेक ड्रोन दिसत आहेत. ज्याला रशियन लष्करी ब्लॉगर्सनी चेल्याबिंस्कमधील एका गोदाम म्हणून ओळखलं आहे.
ब्रिटनस्थित ड्रोनतज्ज्ञ डॉ. स्टीव्ह राईट यांच्या मते, या हल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेले ड्रोन हे सामान्य क्वाडकॉप्टर होते, जे जड स्फोटके वाहून नेऊ शकत होते.
त्यांनी असंही सांगितलं की या हल्ल्याला असाधारण बनवणारी गोष्ट म्हणजे हे ड्रोन रशियात लपवून पोहोचवले गेले आणि नंतर उपग्रह किंवा इंटरनेट लिंकद्वारे रिमोटने संचलित दूरस्थपणे (रिमोटली) लाँच केले गेले.
झेलेन्स्की यांनी सांगितलं की 117 पैकी प्रत्येक ड्रोनचा स्वतःचा एक स्वतंत्र पायलट होता.
डॉ. राईट यांनी हेही नमूद केलं की हे ड्रोन जीपीएसच्या सहाय्याने उडू शकत होते, आणि शक्यतो स्थानिक रशियन जैमिंग तंत्रज्ञानानुसार रिमोट कंट्रोलद्वारे कार्यरत होते.
पण हे ड्रोन युक्रेनकडे नेमके कुठून आले, याची माहिती युक्रेननं उघड केलेली नाही. परंतु, युद्ध सुरु झाल्यापासूनच त्यांनी ड्रोन निर्मितीमध्ये लक्षणीय प्रगती केली असून हे ड्रोनदेखील देशातच तयार करण्यात आल्याची शक्यता आहे.
लक्ष्य
झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात म्हटलं, "रशियाचं खूप मोठं नुकसान झालं आहे, आणि ते योग्यच होतं."
युक्रेनच्या म्हणण्यानुसार, 41 रणनीतिक (स्ट्रॅटेजिक) बॉम्बर्सना लक्ष्य करण्यात आलं होतं. आणि 'किमान' 13 विमानं नष्ट करण्यात आली आहेत. पण रशियाने मात्र, काहीच विमानांचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे.
बीबीसीने पडताळलेल्या व्हिडीओंमध्ये मुरमन्स्कमधील ओलेनगोर्स्क आणि इर्कुत्समधील बेलाया हवाई तळांवर नुकसान झालेली विमाने दिसून येत आहेत.
हल्ल्यात लक्ष्य केलेल्या ज्या बॉम्बर्सची चर्चा सुरु आहे, त्यात कदाचित टू-95 (Tu-95), टू-22 (Tu-22) आणि टू-160 (Tu-160) या विमानांचा समावेश आहे.या विमानांची दुरुस्ती कठीण आहे आणि आता त्यांचे उत्पादन होत नसल्याने त्यांना बदलणंही अशक्य आहे.
कॅपेला स्पेसने शेअर केलेल्या रडार सॅटेलाइट छायाचित्रांमध्ये बेलाया एअरबेसवर किमान चार रशियन बॉम्बर्सचं गंभीर नुकसान झाल्याचं किंवा ते पूर्णपणे नष्ट झाल्याचं दिसून येत आहे.
एसबीयू प्रमुख वासिल मालियुक म्हणाले, "युद्धाच्या नियमांनुसार आणि परंपरेनुसार, आम्ही पूर्णपणे वैध लक्ष्य अशा – लष्करी हवाई तळ आणि विमानांना लक्ष्य केलं, कारण हीच विमानं आमच्या शांततामय शहरांवर बॉम्बहल्ले करत होती."
लष्करी गुप्तचर विमानांनाही केलं लक्ष्य
युक्रेनियन क्षेपणास्त्रांना रोखण्याची आणि रशियन हल्ले करण्याची क्षमता वाढवणाऱ्या लष्करी गुप्तचर विमान A-50 ला देखील लक्ष्य करण्यात आले.
रशियाकडे नेमके किती ए-50 विमानं आहेत, हे स्पष्ट नाही, परंतु फेब्रुवारी 2024 मध्ये युक्रेनचे लष्करी गुप्तचर प्रमुख किरीलो बुडानोव्ह यांनी ही संख्या आठ असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे कोणतेही नुकसान रशियासाठी मोठा धक्का ठरू शकते.
एसबीयूने सोशल मीडियावर दावा केला आहे की "स्पायडर वेब" ऑपरेशनमुळे रशियाचं अंदाजे सात अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे.
रशियाच्या सरकारी माध्यमांनी या हल्ल्यावर मौन बाळगलं असून, रविवारीच्या प्राइम टाईम टीव्ही रिपोर्ट्समध्ये फक्त प्रादेशिक अधिकाऱ्यांची विधानं पुन्हा सांगितली गेली. सोमवारपर्यंत या बातम्या बुलेटिनमधून पूर्णपणे गहाळ झाल्या होत्या.
इंटरनेटवर आणि इतर ठिकाणी युक्रेनियन नागरिकांनी या ऑपरेशनचं जोरदार कौतुक केलं. एका व्यक्तीने तर याला 'टायटॅनिक' हल्ला असं संबोधलं.
झेलेन्स्की यांनी टेलीग्रामवर लिहिलं, "अर्थात, सर्वकाही आत्ताच सांगता येणार नाही, परंतु या युक्रेनियन कारवाया इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नक्कीच नोंदवल्या जातील."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.