'यायलाच लागतंय' म्हणत ढवारा मटणच्या व्हायरल होणाऱ्या रिल्स आणि जेवणाचं समाजशास्त्र

    • Author, पंकज फणसे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"नाद करती काय? आज सकाळी एवढी कापलेत आणि संध्याकाळच्याला एवढ्याचा बेत आहे!! यायलाच लागतंय..."

अगदी सकाळी मोबाईलची स्क्रीन अशी आरोळी ठोकत महाराष्ट्राची भूक चाळवत आहे.

बोकडांवर थाप देत केलेलं आक्रमक मार्केटिंग, गर्दीचे चित्रण, गावरान भाषेतील हॉटेलमालकाचे निवेदन, मालकच वस्ताद असल्याचे सांगून थोपविले जाणारे अस्सलपण, आणि त्या नादाने ढवारा मटण या काहीशा अपरिचित प्रकाराची होणारी प्रसिद्धी असे बरेच पैलू या व्हायरल होणाऱ्या रिल्सच्या संदर्भाला जोडले गेले आहेत.

हिंसाचाराचा अतिरेक म्हणून नाकं मुरडणाऱ्यांपासून ते दिवसाला एक लाख रुपये कमावणारा युवक म्हणून कुतुहूल असे पदर या प्रसिद्धीला आहेत.

रील्सयुगात चकचकाट आणि झगमगाटाच्या दुनियेत एका आडबाजूच्या, कोणतेही समर्पित व्यावसायिक शिक्षण नसलेल्या हॉटेल्सनी गाजवलेला धुमाकूळ लक्षात घेता या प्रसाराच्या मागे हॉटेल्सच्या जेवणाची चव हा एकमेव मुद्दा नसून रील्सचे प्रसारशास्त्र आणि अन्नाचे समाजशास्त्र लक्षात घेणे देखील गरजेचे आहे.

ढवारा जेवणाच्या सोशल मीडियावरील धूमाकुळीचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचा हा केलेला प्रयत्न!

रील्सचे प्रकार

महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या छोट्या हॉटेलच्या रील्सचा आढावा घेतल्यास लक्षात येईल की, सध्या दोन प्रकारच्या व्हीडिओची चलती आहे.

एकीकडे चकचकीत, पांढरपेशी हॉटेल्सच्या जाहिराती, ज्यामध्ये स्वच्छता, नीटनेटकेपणा, सादरीकरण, सजावट या हॉटेलव्यवसायात पारंपरिक मागणी असणाऱ्या घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे.

पारंपरिक चुलीवरील रश्श्यासोबतच मटण रान सारखे महाराष्ट्राशी नाळ नसलेले खाद्यपदार्थ लोकप्रिय करण्याचा प्रयत्न होत आहे.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुखवस्तू चौकोनी कुटुंब जे अनेक मध्यमवर्गीयांचे स्वप्न असते, त्या आदर्शाचा प्रेक्षकांच्या मनावर बिंबविण्याचा भरीव प्रयत्न आपल्याला या रील्सच्या माध्यमांतून दिसतो.

उपनगरीय भागांत असणारे हे हॉटेल आणि त्यांच्या शाखा यांचे लक्ष्य शहरी मध्यमवर्गीय कुटुंब असतात.

साहजिकच, मार्दवपूर्ण भाषा, नम्रता आणि सौजन्यशीलतेचा केलेला कल्पक वापर आपल्याला दिसेल. कधी कधी केला जाणारा छोट्या विनोदी कथानकांचा हलका-फुलका वापर, मराठी उद्योजकाचे यशस्वी होणे आदी गोष्टींमुळे या रील्स मध्ये वैविध्य येत आहे.

दुसरीकडे होटल गावरान भाषेत रील्स करणाऱ्या मालकांच्या काही विशिष्ट हॉटेलनी महाराष्ट्राचे ग्रामीण अवकाश व्यापले आहे.

काळजाला भिडणारी भिडस्त भाषा, अस्सल गावठी शैलीचा कलात्मक वापर, कोणत्याही संकलनाशिवाय, गोंगाटासहित केले जाणारे सादरीकरण, स्पर्धेच्या नावाखाली कापल्या गेलेल्या आणि जिवंत बोकडांचे प्रदर्शन, आक्रमक भाषा यांचा वापर आजपर्यंतच्या रेस्तरॉ व्यवसायाची जी मानके निश्चित झाली आहेत त्याच्या विरुद्ध आहे.

लोकांना आपल्यातलाच असणारा पण फॉर्च्युनर सारख्या स्वप्नातल्या गाडीचा मालक त्याच्या मार्दवापेक्षा जास्त भावतो. तसेच प्रयोगशील आणि नावीन्यपूर्ण पदार्थांऐवजी कंदुरी, ढवारा वगैरे पारंपरिक पदार्थांची वाढलेली मागणी आणि आकर्षण हे खाद्य अस्मितेचे उदाहरण आहे.

पुण्यातील पेठांत चुलीपासून चालू झालेली खाद्यअस्मितेची भटकंती सध्या ढवारा मटनापर्यंत पोहोचली आहे.

अन्नाची सामाजिक वाटचाल

अन्नाच्या अस्मितेचा विचार करता, जागतिकीकरणाच्या दुनियेत नवउदारमतवाद बहुतांश जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर राजकारणाचा प्रवाह जगभरात सगळीकडेच अस्मितावादी घटकांकडे ओढला गेला.

ढोबळमानाने त्याचाच एक स्थानिक परिपाक अन्नपदार्थांमध्ये उतरलेला दिसतो. अगदीच बारकाईने निरीक्षण केल्यास व्हायरल होणाऱ्या रील्समुळे लोकांमध्ये 'गटात न बसणारा प्राणी' होण्याची भीती उत्पन्न होते. त्यामुळं लोक गर्दी होत असलेल्या ठिकाणी जाण्याची धडपड करतात. तरुणाईच्या भाषेत त्याला सध्या FOMO (Fear of Missing Out) म्हणतात.

अन्नाचे समाजशास्त्रीय अभ्यासक आणि 'अन्न हे अपूर्णब्रह्म' या पुस्तकाचे लेखक शाहू पाटोळे यांच्या मते आजकाल अन्न हे आजकाल उदर भरणापेक्षा लोकांना दाखविण्याचे साधन झाले आहे.

अन्नाच्या सजावटीपेक्षा आपण काय खातो, कुठे खातो अशा गोष्टींमुळे समाजमाध्यमांत मिळणारी प्रसिद्धी वाढत असून यामुळे अन्नग्रहणाचे उद्दिष्ट बदलत आहे.

अन्नाला अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय पदर आहेत. तुम्ही काय खाता, तुम्हाला काय आवडतं यावर तुमचं समाजातील स्थान निश्चित होतं अथवा तुम्ही सामाजिक उतरंडीमध्ये कोणत्या स्थानावर आहात त्यानुसार तुमची आवड ठरत असते.

पाटोळेंच्या पुस्तकातील मांडणीनुसार अन्नाचे सात्विक आणि तामसी हे भेद या वर्गवारीमुळे, जातिभेदामुळे अस्तित्वात आले आहेत.

फारच सोप्या पद्धतीने पाहता, विदेशात अथवा उच्चभ्रू लोकांच्या सहवासात आलेला व्यक्ती गावरान खाणे तिखट आणि तेलकट म्हणून अवहेलना करतो. मात्र, त्याचवेळी केएफसी सारख्या ठिकाणी तळलेले पदार्थ असोत वा जंक फूड, आवडीने, स्टेटस सिम्बॉल म्हणून खाताना दिसेल.

'द थिअरी ऑफ लेजर क्लास (1899)' या पुस्तकात थॉर्स्टीन वेबलेन या अभ्यासकाने 19 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात अमेरिकन समाजात कामाची विभागणी आणि त्यामुळे निर्माण झालेली अतिरिक्त संपत्ती यांची मांडणी करून निष्कर्ष काढला की ही संपत्ती सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती.

वरिष्ठ वर्गाचा अतिरिक्त खर्च आणि अपव्ययाची भूमिका, तसेच इतर वर्गांवर त्यांच्या रीतीभातींचे अनुकरण करण्याचा दबाव, यामुळेच वर्गविषमता टिकून राहिली.

सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विस्तारलेला सुखवस्तू जीवनपद्धतीचा प्रभाव याच गोष्टीकडे बोट दाखवतो.

एका दृष्टीने असे पाहता येईल की, रील्समधील अमर्यादित थाळी तसेच बाहुबली, सरपंच वगैरे अवाढव्य थाळ्यांचा जो सुळसुळाट झाला आहे तो देखील या अपव्यय करून वरचढ ठरण्याच्या प्रवृत्तीचे द्योतक आहे.

एकीकडे मालक वर्चस्व सिद्ध करतो की, तुम्ही जेवढे खाल तेवढेच नाही तर जेवढे वाया घालवाल ते देखील देण्यास आम्ही समर्थ आहोत.

तर दुसरीकडे ग्राहक वर्ग या अपव्ययाच्या माध्यमातून दर्शविण्याचा प्रयत्न करतो की, महागड्या हॉटेलमधे जाऊन अन्न वाया घालविण्याची देखील आमची ऐपत आहे. त्यातून मग रील्सवाल्यांचे 'क्वांटिटी आणि क्वालिटी' केंद्रित व्हिडिओज व्हायरल होतात.

'आवडती चव' ही अशी गोष्ट आहे जी नैसर्गिकपणे आकारास न येता समाजाकडून संस्कारित केली जाते.

स्टीफन मॅनेल या अभ्यासकाने चवीची सांस्कृतिक दृष्ट्‍या केली जाणारी बांधणी आणि समर्थन याचे विश्लेषण केले.

'ऑल मॅनर्स ऑफ फ़ूड (1985)' या पुस्तकात त्यांनी विविध ऐतिहासिक स्रोतांच्या सूक्ष्म अभ्यासावर आधारित, म्हणजे आधुनिक काळातील स्वयंपाकपुस्तके, व्यापारी मासिके आणि महिला मासिकांमधील स्वयंपाक सदरे यांचा अभ्यास करून "फ्रेंच लोकांनी 'हॉट क्विझिन' (उच्च पाककला) विकसित केली. तर इंग्रजांनी का केली नाही?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.

त्याचबरोबर टेबल मॅनर्स, पंचतारांकित हॉटेल्समधील खाद्यपदार्थ यांच्यावर उच्चवर्गाचा असलेला प्रभाव मेनेल यांनी दाखवून दिला.

ज्याप्रमाणे फ्रेंच खाद्यपदार्थांना पाकविश्वात प्रतिष्ठा मिळाली त्याप्रमाणे भारतीय खाद्यपदार्थ प्रतिष्ठित का झाले नाहीत?

याचे उत्तर शोधताना अर्जुन अप्पादोराई यांनी 'हाउ टू मेक ए नॅशनल क्विजिन (1988)' या पुस्तकात विशद केले आहे की, युरोपमध्ये खाद्यपदार्थांना उपभोगाची आणि सौंदर्याची वस्तू म्हणून पाहिले गेले.

मात्र भारतीय समाजात अन्न हे कायम धार्मिक आणि नैतिक चौकटीतून पहिले गेले. ही सौंदर्यात्मक आणि उपभोगात्मक दृष्टी सध्याच्या काळात माध्यमांच्या अन्न व्याप्तीमुळे सुकर झाली आहे.

नव्या सामाजिक व्यासपीठाची निर्मिती

अन्न हे सार्वजनिक व्यासपीठावर आल्यानंतर हॉटेल किंवा रेस्तरॉ ही अशी जागा बनते जिथे अन्नपदार्थ तयार केले जातात, ग्रहण केले जातात, तसेच चवीचे निर्धारण आणि प्रदर्शन होऊन एखादी विशिष्ट चव स्वीकारली अथवा नाकारली जाते. ज्यावेळी घरातील अन्नाला पावित्र्याच्या नजरेतून पाहिले जाते, तेच चौकटीबाहेर आल्यावर बहुआयामी बनते.

त्यामुळेच प्रसिद्ध असणारा अन्नपदार्थ केवळ प्रसिद्ध असल्याने मागणी वाढण्याचे प्रकार वाढले आहेत.

तिरामिसू सारखा बहुतांश भारतीय लोकसंख्येला अपरिचित असणारा पदार्थ अल्पकाळात प्रसिद्ध होतो याच्यामागे हाच तर्क आहे.

यर्गन हेबरमस या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञाने आपल्या 'द स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मशन ऑफ द पब्लिक स्फिअर (1962)' या ग्रंथात सार्वजनिक व्यासपीठांची निर्मिती कशी होते याचे विश्लेषण केला आहे.

कधी काळी राजाच्या दरबारात होणारी अभ्यासपूर्ण चर्चा आणि मतनिर्मिती 18 व्या शतकात युरोपमधील कॉफीगृहांमध्ये संक्रमित झाली. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असणे आणि दिसणे उमराव वर्गासाठी आवश्यक वाटू लागले.

छायाचित्रांच्या युगात या ठिकाणी चर्चेत सहभागी झाल्याच्या तसबिरी उमरावांच्या दिवाणखान्याच्या भिंतींवर लटकू लागल्या. अशा ठिकाणी अन्नपदार्थांचा स्वाद दुय्यम होऊन त्या ठिकाणी सहभागी होण्याला प्राथमिकता प्राप्त झाली.

हीच परंपरा महाराष्ट्रात विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने होणाऱ्या चहापान समारंभात पाहता येईल. सहभागापेक्षा बहिष्कारासाठी प्रसिद्ध असणारा हा समारंभ राजकीय संदेश देण्याचे प्रतीक बनला.

सध्याच्या काळात ग्रामीण सामाजिक-राजकीय पटलावर व्हायर होणाऱ्या रील्स आणि स्थळे याठिकाणी सहभाग नवप्रस्थापित वर्गाच्या आदान प्रदानाचे माध्यम बनला आहे.

बऱ्याचदा अशा प्रसिद्ध हॉटेल्सवर चवीपेक्षा स्थानिक प्रभावकांच्या माध्यमातून मान-सन्मान, हार-तुरे, पाठिंब्याचे आणि सहानुभूतीचे प्रदर्शन झिरपताना दिसते.

संवेदनशीलतेचा नावीन्यपूर्ण वापर करून या हॉटेलचा मालक लाभार्थी न ठरता समाजातील हुल्लडबाजांचा बळी ठरल्याचे दाखवून प्रतिमासंवर्धन केले जाते.

आपल्या जाणिवा आणि नेणिवांमध्ये असणारा वर्चस्ववादी, मुजोर, पुरुषसत्ताक मालक पडद्यावर भाबडा, अशिक्षित, पापभिरू म्हणून उभा राहतो तेंव्हा प्रेक्षकांना भावनातिरेकाने उचमळून येते. हेच पाहून आपले राजकीय नेते पण व्यवस्थेचा बळी अशी प्रतिमा संवर्धित करत असतील का?

अनेक स्थानिक उद्योजक या रील्सच्या माध्यमातून एकमेकांना सहकार्य करून व्यावसायिकरित्या आकारास आल्याचे चित्र दिसत आहे.

हॉटेल व्यवसायातील कामगारांचा अभ्यास केला तर ते कष्टकरी, कलाकार, कारागीर म्हणून, किंवा स्थलांतरित समूहांचे प्रतिनिधी म्हणून पाहिले जाऊ शकतात. त्याचवेळी ते चवीचे निर्माते, ग्राहक आणि पाककलेच्या बदलत्या मानदंडांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे घटकही आहेत.

जेव्हा मालक स्वतःच कारागीर किंवा वस्ताद बनतो तेंव्हा तो अभिजनवादी अथवा प्रस्थापित चवीचा प्रतिनिधी म्हणून बाजारात उतरलेला असतो.

बऱ्याचदा परप्रांतीय कारागीरांमुळे चवीला एखाद्या हॉटेलला स्थानिक मान्यतेसाठी झगडावे लागते. तो संघर्ष मालकाच्या सहभागानंतर विरळ झालेला दिसतो.

लिंगभाव आणि मांसाहार

स्त्री बद्दलची संवेदना हा या रील्सचा महत्वाचा विषय असतो. उदाहरणार्थ, 'भाग्यश्री' हॉटेलच्या मालकाने हॉटेल उभारणीमध्ये पत्नीला दिलेले श्रेय असो अथवा महागड्या गाडीची दिलेली भेट! ग्रामीण स्त्रिया सार्वजनिक मंचापासून दूर राहत असताना अशा माध्यमांतून त्यांचा सहभाग वाखाणण्यासारखा आहे.

त्याचवेळी खरेच या रील्स ग्रामीण महिलांच्या मुक्ततेचा अथवा ग्रामीण प्रस्थापित पुरुषांच्या मानसिकतेच्या बदलाचा द्योतक आहे काय? थोडा सखोल विचार केल्यास असे दिसते की, कोणत्याही व्यक्तीला (स्त्री असो वा पुरुष) प्रतिगामी, पुरुषसत्ताक म्हटल्याचे आवडत नाही. मात्र पुरुषी मानसिकता दुर्दैवाने सर्वांच्याच पालनपोषणाचा भाग बनली आहे.

या रील्स सध्याच्या समाजाचे सोयीस्कर उदाहरण आहे जिथे संवेदनशीलता उघडपणे दर्शविली जाते आणि मर्दानगी सुप्तपणे पेरली जाते.

त्यामुळे उथळ कथानकाचा भाग बनणारी, दिखाऊ स्त्रीवादी भूमिका या रील्स मधून ठळकपणे मांडली जाते त्याचवेळी पुरुषी सत्तेला आवश्यक असणारे मर्दानगीचे संदेश अदृश्य माध्यमातून पोहोचविले जातात.

डिजिटल क्षेत्र हे मर्दानगीचे आखाडे बनले आहेत. शड्डू ठोकत प्रतिस्पर्धी हॉटेल मालकाला आव्हान देणारा रील्सचा नायक ही मर्दानगी वाहून नेत असतो.

रीलमधला क्वांटिटीवरील भर, मोठमोठी भांडी भरून ठेवले जाणारे मटण, बोकड 'तोडताना' केले जाणारे चित्रण, नाद करतो काय अशी मर्दानी भाषा, गर्दीच्या संख्येवर केली जाणारी यशाची परिभाषा हे सर्व या पितृसत्ताक आणि मर्दानी मानसिकतेच्या कलाने रील्सचे केले जाणारे चित्रण!

सर्वच गोष्टींना हत्ती, घोडा वगैरे संबोधून उत्कट आणि उदात्त दाखविण्याचा प्रयत्न पुरुषी भव्य-दिव्यपणाचे लक्षण आहे. पारंपारिकदृष्ट्या, पुरुषत्व हे भव्यतेच्या अभिव्यक्तींशी सांस्कृतिकरित्या जोडले जाते.

मोठ्या प्रमाणावरील कर्तृत्व, वर्चस्व, विजय आणि शाश्वत प्रभाव यावर भर देऊन बाह्य, मोजता येणाऱ्या कामगिरीद्वारे त्याचे मूल्य सिद्ध केले जाते.

भव्यता अशा समाजाशी सुसंगत आहे ज्यात स्पर्धा, पदानुक्रम (सर्वात मोठा, बलवान, शक्तिशाली असणे), सन्मान आणि वारसा यांसारखे गूढ आदर्श यावर भर दिला जातो.

त्याचवेळी भावनांचा योग्य वापर करून हॉटेल मालकाला नम्र दाखविणे, स्त्री केंद्रित चित्रण अथवा तिला कथानकाचा गरजेपुरता भाग बनविणे हा या रील्सचा स्त्रीवादी भाग!

स्त्रीत्व हे पारंपरिकरित्या संवेदनशीलता आणि भावनिक अभिव्यक्तीशी सांस्कृतिकरित्या निगडीत आहे, जे जीवनातील सूक्ष्म, वैयक्तिक आणि नातेसंबंधीय पैलूंवर लक्ष केंद्रित करते.

यामध्ये पालनपोषण, सहानुभूती, भावनिक बुद्धिमत्ता आणि नातेसंबंध उभारणी या गुंतागुंतीच्या कामावर भर दिला जातो.

संवेदनशीलतेमुळे सूक्ष्म तपशील, न बोललेल्या भावना आणि आंतरिक क्षणांचे गहन महत्त्व यांचे कौतुक करणे शक्य होते. उदा. शांतपणे सहन करण्याची क्षमता, खोल वैयक्तिक प्रेम किंवा एखाद्या व्यक्तीवर झालेल्या नुकसानीचा परिणाम.

भावनिक अभिव्यक्ती स्वतःच या चौकटीत संवाद आणि सामर्थ्याचा एक प्रमुख मार्ग म्हणून मान्यता दिली जाते, ज्यामुळे जोडणीतून, वैयक्तिक परिवर्तनातून आणि मानवी बंधनांच्या गुंतागुंतीतून सापडणाऱ्या शक्तीवर प्रकाश टाकला जातो. वरवर दिसणाऱ्या रीलच्या कथानकामध्ये असे अनेक गहन आणि सूक्ष्म अर्थ दडलेले आहेत.

या रील्सच्या पुढे जाऊन सर्वच ठिकाणी मटण बनविणाऱ्या कारागीराला प्रसिद्धी मिळते, मात्र त्याच ठिकाणी चविष्ट भाकर बनविणारी स्त्री चर्चाकेंद्रापासून अलिप्त का राहते?

मटण हे आपल्या संस्कृतीमध्ये पुरुषपणाशी जोडले गेले आहे. मटण खाणे, तोडणे आणि बनविणे या सर्व गोष्टींना रांगडेपणाची झालर आहे. बऱ्याचदा मांसाहार टाळणाऱ्या व्यक्तीला समाजात पुरुषपणाबद्दल टोमणे मारले जातात.

अनेक ठिकाणी स्त्रियांच्या मांसाहारावर निर्बंध लादून मांसाहार पुरुषसत्ताक क्षेत्र ठेवल आहे. तसेच हिंसा, रक्त अशा गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे मटण पुरुषप्रधान क्षेत्र बनले आहे.

पुराणांपासून शुद्धतेच्या संकल्पनांमध्ये स्त्रीला जबाबदाऱ्या निभाविण्याची पारंपरिक भूमिका सुपूर्द केल्यामुळे मांसाहार क्षेत्रातील स्त्रीचा वावर मर्यादित बनला आहे.

तसेच आर्थिक दृष्ट्‍या मौल्यवान गोष्टीवर संसाधनांसाठी स्त्री आणि पुरुष यांच्यात जेंव्हा स्पर्धा होते तेंव्हा कष्टप्रधान प्रवृत्तीमुळे मांसाहारावर दावा सांगण्याची पुरूषांची प्राथमिकता राहिली आहे.

मटण शिजविणे हे वर्चस्ववादी, कौशल्यपूर्ण तर भाकरी थापणे हे अप्रगत कामाचे स्वरूप मानण्यात येऊ लागले. यामुळे व्यावसायिक ठिकाणी अन्न आणि लिंग भूमिकांबाबतच्या सामाजिक धारणांमधील श्रेणीव्यवस्था चिरस्थायी झाल्या आहेत.

कमेंट्सचे विश्लेषण

कमेंट सेक्शनमधील अनुयायांचा तमाशा हा देखील एक अभ्यासपूर्ण विषय आहे. अमुक हॉटेल एवढ्या मतांनी आघाडीवर किंवा बाप तो बापच वगैरे प्रतिक्रिया दर्शवितात की डिजिटल मार्केटिंगमध्ये प्रत्यक्ष संबंध नसणारे घटक देखील सक्रिय भूमिका बजावतात.

समर्थकांच्या संघर्षामुळे आभासी जगातील स्पर्धा प्रत्यक्षात उमटताना दिसत आहे. तसेच मराठी उद्योजकाच्या यशस्वितेची कहाणी म्हणून त्याला येणारा भावनिक संदर्भ समर्थकांचे मजबूत जाळे निर्माण करून त्रयस्थ घटकांमार्फत विनामोबदला प्रसिद्धी मिळवित आहेत.

आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शाकाहार आणि मांसाहाराच्या समर्थकांचा या कमेंट सेक्शनमधे होणारा संघर्ष!

महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक परिवर्तनाचे वारे येऊन बहुतांश लोक मांसाहार वर्ज्य करीत आहेत. शाहू पाटोळे यांच्या मताप्रमाणे शाकाहारापेक्षा शाकाहारी दहशतवादाचा धोका चिंतित करणारा आहे. शाकाहारी लोकांच्या आक्रमक कमेंट्स नेमका हाच धोका दर्शवितात.

कुणी काय खावे आणि कुणी काय विकावे? हा ज्याचा त्याचा प्रश्न! मात्र, शाकाहाराच्या नावाने नैतिक श्रेष्ठतेचे अवडंबर माजवून इतरांना डोस देणाऱ्या तृणभक्षी बोक्यांची वाढलेली संख्या या सेक्शनमधे दिसते.

तसेच एकीकडे राज्यसंस्थेद्वारा शाकाहाराचा पुरस्कार केला जात असताना बहुजन समाजात वाढलेले मांसाहाराचे प्रस्थ आणि अशा हॉटेल्सची संख्या हे दर्शविते की धर्माच्या नावाखाली नागरिकांच्या वैयक्तिक आवडीनिवडीवर निर्बंध अखेरीस कुचकामीच ठरतात.

एकीकडे हलाल पद्धतीला विरोध होत असताना गोल टोपी घालून या रील्समध्ये दिसणाऱ्या खाटकांकडे पाहून खाणारा आणि पाहणारा अपवादानेच विरोध करताना दिसतो.

थोडक्यात राज्यसंस्थेने प्रसूत केलेल्या कथानकाचे स्थानिक पातळीवर किती परिणाम होतात हे मोजण्याचा एक उपयुक्त घटक म्हणून या रील्सच्या कॉमेंट सेक्शनचा उल्लेख करता येईल.

एकूणच, सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या ढवारा मटनाच्या रील्स या केवळ हॉटेल्स मध्ये विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थापुरत्या मर्यादित नाहीत. भविष्यातील पांढरपेशी विपणन पद्धतीवर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.

मीडियाच्या लोकशाहीकरणामुळे लोकांना आवडणाऱ्या गोष्टी आहे त्या स्वरूपात, संस्करणाशिवाय त्यांच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग खुला झाला आहे.

याचेच अनुकरण इतर व्यावसायिक करण्याची चिन्हे नाकारता येणार नाहीत. यापुढे व्यवसाय हे केवळ आर्थिक नफ्याचे क्षेत्र न राहता त्यांमध्ये अस्मिता आणि भावना याची सांगड घालून ते अधिक हृदयस्पर्शी बनविण्याचा प्रयत्न होत राहील. सामान्य लोकांच्या दृष्टीने पाहता खाद्यअस्मितेची चटक सामान्यांसाठी आर्थिक ओझे आहे.

शाहू पाटोळे म्हणतात की, इन्स्टा रील्सच्या नादात लोक ऑथेंटिक आणि गावरान गोष्टी शोधत आहेत आणि पुरवठादार गरिबांचे अन्न त्यांच्यावर लादत आहेत.

वजडी हा स्वस्तात मिळणारा पदार्थ आज मटणाएवढाच महाग झाला आहे. तीच गत आहे ज्वारी आणि बाजरीची! गव्हाच्या अर्ध्या किमतीमध्ये मिळणारी ज्वारी आणि बाजरी या वाढत्या मागणीमुळे तेवढ्याच भावाने विकली जात आहे. सोशल मीडियावरील अन्नप्रदर्शनीयता गरीबाचे अन्न हिसकावून घेत आहे.

वरवर दिसणाऱ्या या रील्स मागे मोठे सामाजिक, अर्थिक, राजकीय गणित दडले आहे. नकळत या रील्सच्या माध्यमातून समाजाला आवडणाऱ्या गोष्टी पुरविल्या पण जातात आणि लघू प्रमाणात सुखद बदलांची ओळख करून दिली जाते.

तसेच लोकांच्या सामूहिक वर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या अनुकरणीय वृत्तीचा अभ्यास होऊन सामाजिक जागरूकता तपासली जाते. जी राजकीय उद्दिष्टांसाठी प्रयोगशाळा म्हणून वापरली जाण्याही शक्यता नाकारता येत नाही.

पौराणिक गोष्टींपासून तंत्रज्ञानापर्यंत व्यापलेल्या या रीलविश्वाकडे केवळ एक सेन्सेशन म्हणून दुर्लक्ष केल्यास बरीच सामाजिक तत्त्वे दुर्लक्षित होण्याचा धोका आहे.

इर्व्हिंग ग्रॉफमन या अभ्यासकाने आपल्या 'द प्रेजेंटेशन ऑफ सेल्फ इन एव्हरिडे लाइफ (1959)' या पुस्तकात म्हटले आहे की समाज हा एक रंगमंच असून त्यामध्ये पडद्यावरील आणि पडद्यामागील असे दोन्ही घटक एकाचवेळी कार्य करत असतात.

रीलमध्ये दिसणारे कलाकार हे एका व्यवस्थेचे चित्रण करणारे पडद्यावरील कळसूत्री बाहुले आहेत ज्यांचे नियंत्रण पडद्यामागील प्रस्थापित घटकांद्वारा केली जाते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

लेखक जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रिसर्च स्कॉलर आहेत.

(या लेखामध्ये हॉटेल आणि रेस्तरॉ या शब्दांचा वापर खाद्यगृह या एकाच अर्थाने केलेला आहे. बोलीभाषेतील अर्थाशी साधर्म्य जुळविण्याच्या प्रयत्नात हे शब्द आलटून पालटून वापरले गेले आहेत.)