पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, राजकारणही तापलं; आतापर्यंत काय घडलं?

पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापुरमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीसोबत ही घटना घडलीय.

या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुलीसोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

स्थानिक न्यायालयाने आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित विद्यार्थिनी ओडिशाची रहिवासी असून ती खासगी वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.

आसनसोल-दुर्गापुर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त अभिषेक गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितलं की, "प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे, म्हणून पोलीस सर्व बाजूंचा विचार करत पावलं तपास करत आहे."

पोलिसांनी काय सांगितलं?

विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, "10 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास विद्यार्थिनीला तिच्या कॉलेजमधील एक विद्यार्थी त्याच्या मित्रांसह तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर पालकांना कळलं की, त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे."

दरम्यान, पोलिसांनी स्थानिक पत्रकारांना सांगितलं की, विद्यार्थिनी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीसोबत काहीतरी खाण्याच्या निमित्ताने कॉलेज कॅम्पसबाहेर गेली होती, तेव्हा काही तरुणांनी तिच्यावर टिप्पणी केली आणि तिच्या सोबत गैरवर्तन केलं, तिचा मोबाईल आणि पैसे हिसकावले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर त्या पुरुष साथीदाराला धमकावून तेथून हाकलून देण्यात आले आणि त्यानंतर मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर कथितपणे सामूहिक अत्याचार करण्यात आला.

विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, सामूहिक बलात्कार करून आरोपी विद्यार्थिनीचा मोबाईल आणि पैसे घेऊन पळून गेले. तक्रारीत असंही म्हटलं आहे की, विद्यार्थिनीला दुर्गापुर येथील एका रुग्णालयात गंभीर स्थितीत दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी डॉक्टरांनी तिची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं सांगितलं.

विद्यार्थिनीच्या पालकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, "आमची मुलगी येथे सुरक्षित नाही. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे."

विद्यार्थिनीच्या आईने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा केला आहे. तर, एका पोलीस अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की, वैद्यकीय तपासणी अहवाल येईपर्यंत याबाबत नक्की काही सांगता येणार नाही.

पोलिसांनी घटनेच्या रात्री विद्यार्थिनीच्या वर्गमित्राला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. शनिवारी रात्री उशिरा आणखी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं. आणि चौकशीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

महाविद्यालय प्रशासनाकडून निवेदन जारी

वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाबाबत एक निवेदन जारी केलं आहे. त्यात द्वितीय वर्षात शिकणारी एक विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्याबरोबर एक घटना घडल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सांगितलं, "ते दोघे संध्याकाळी 7:58 च्या सुमारास कॅम्पस बाहेर गेले, थोड्या वेळाने विद्यार्थी परतला आणि मुख्य गेटसमोर वाट पाहत थांबला, नंतर 5-7 मिनिटांनी तो निघून गेला. त्यानंतर तो विद्यार्थी विद्यार्थिनीसोबत परतला. त्यावेळेस त्या दोघांपैकी घटनेबाबत कोणी काहीच बोललं नाही किंवा कळवलं नाही आणि विद्यार्थिनी तिच्या वसतिगृहात परतली.

कॉलेज प्रशासनानुसार, वसतिगृहात परतल्यानंतर विद्यार्थिनीने दावा केला की तिचा मोबाईल हरवला असून कॉलेज कॅम्पसबाहेर तिच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

महाविद्यालय प्रशासनाने सांगितलं की, "यानंतर डीन आणि प्राचार्य यांना तत्काळ माहिती देण्यात आली. सध्या विद्यार्थिनी वैद्यकीय निरीक्षणाखाली असून तिची स्थिती सुधारत आहे. सध्या आमची प्राथमिकता विद्यार्थिनीच्या शारीरिक आणि मानसिक पुनर्वसनावर आहे."

या प्रकरणाच्या चौकशीत महाविद्यालय पूर्णपणे सहकार्य करत असल्याचंही महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

महाविद्यालय प्रशासनाने सांगितलं की, "दोन्ही विद्यार्थी प्रौढ आहेत आणि स्वतःच्या मर्जीने ते कॅम्पसबाहेर गेले होते. ते कॅम्पस बाहेर गेले असल्याने, बाहेर नेमकं काय घडलं हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही, परंतु, आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत."

दोषींना कठोर शिक्षा केली जाईल – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, "ही घटना अतिशय चिंताजनक आणि धक्का देणारी" आहे. महाविद्यालय प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देणं आवश्यक आहे, असंही त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, "हे एक खासगी महाविद्यालय आहे. तीन आठवड्यांपूर्वी ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर तीन मुलींवर बलात्कार झाला होता. ओडिशा सरकार तिथे काय कार्यवाही करत आहे? ही मुलगी एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. ती रात्री 12:30 वाजता बाहेर कशी आली? माझ्या माहितीनुसार, ज्या भागात ही घटना घडली, तो भाग जंगलाला लागून आहे. तिथे काय घडले हे मला माहिती नाही, चौकशी सुरू आहे."

तसेच, त्यांनी पुढे सांगितले, "ती जागा जंगलाच्या जवळ आहे. पोलीस सर्वांची चौकशी करत आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. तीन जणांना अटक करण्यात आली आहे आणि दोषींना कडक शिक्षा केली जाईल."

अशा घटना 'कोणत्याही राज्यात निंदनीय आहेत', असंही मुख्यमंत्री म्हणाल्या.

त्यांनी पुढे सांगितले, "अशा घटना मणिपूर, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्येही घडल्या आहेत. तेथील सरकारनंही कठोर पावले उचलायला हवीत. आमच्या राज्यात आम्ही एक-दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल केलं आणि न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली."

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलं की, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची, विशेषत: मुलींची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. पोलिस चौकशी करत आहेत आणि दोषींना 'कठोर शिक्षा' केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधी पक्षांनी काय प्रतिक्रिया दिली?

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून म्हटलंय की, "ओडिशा येथील विद्यार्थिनीसोबत पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये घडलेली सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत निंदनीय आणि वेदनादायी आहे. ही बातमी ऐकून मला खूप धक्का बसला आहे. या संवेदनशील प्रकरणात मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मागणी करतो की, त्यांनी आरोपींविरुद्ध कायद्यानुसार अशी कारवाई करावी, जी एक मजबूत उदाहरण बनेल."

ते म्हणाले, "पीडिता लवकर बरी व्हावी अशी मी प्रार्थना करतो. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पश्चिम बंगाल सरकारशी संपर्क साधून आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. ओडिशा सरकार पीडितेच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करेल."

पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते शुभेंदु अधिकारी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये कोणतीही महिला सुरक्षित नाही. पोलीस पूर्णपणे राजकीय पक्षपातीपणाने काम करत आहेत. पोलिसांचा अजेंडा केवळ ममता बॅनर्जी आणि त्यांच्या भ्रष्ट लोकांना संरक्षण देणं हाच आहे."

समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव म्हणाल्या, "पश्चिम बंगालमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही, देशभरात महिलांविरुद्ध अशा घटना वाढत आहेत."

झारखंडमधील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते बाबूलाल मरांडी म्हणाले, "बंगालमधील सरकार हवी तशी गुंडगिरी करते. त्यांना सरकारविरुद्ध कोणताही आवाज नको आहे. घटना घडायच्या आणि ते त्यांना दडपून टाकत असत. तिथे कायदा आणि सुव्यवस्था आधीच बिकट आहे."

राज्य सरकारने काय म्हटलं?

पश्चिम बंगाल सरकारच्या मंत्री शशी पंजा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देतानाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

त्या म्हणाल्या, "दुर्गापुरच्या एक खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सामूहिक बलात्काराचा आरोप आहे. पोलीस तपास सुरु आहे. पीडितेचे पालक ओडिशाहून आले आहेत आणि त्यांनी चौकशीवर विश्वास व्यक्त केला आहे. पीडितेची काळजी घेतली जात आहे. वैद्यकीय आणि मानसिक समुपदेशन आणि तपासणी सुरु आहे. तिचं विधान खूप महत्वाचं आहे."

शशि पंजा म्हणाल्या, "भाजप एक राजकीय पक्ष आहे आणि महिलांविरुद्ध अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे राजकारण होऊ नये. दुर्दैवाने, भाजप नेहमीच राजकारणाच्या दृष्टिकोनातून प्रकरणांकडे पाहते, जे अनावश्यक आहे. आम्हाला हे पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही की कोलकाता भारतातील सुरक्षित मेट्रोपोलिटन शहरांपैकी एक आहे. पश्चिम बंगाल महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी काम करते हे आपल्याला पुन्हा सांगण्याची गरज नाही."

"आम्हाला हे पुन्हा सांगायचं नाही, कारण सर्वांना माहिती आहे की मुख्यमंत्री महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या अन्यायाच्या घटनांबाबत तडजोड करणार नाहीत. आम्हाला चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबावं लागेल. आणि भाजपने राजकारण करण्याचा किंवा याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये."

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला गेल्या काही काळापासून महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. विशेषतः कोलकात्याच्या कॉलेज कॅम्पसमध्ये बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्यानंतर सुरक्षेवरुन विविध प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

या वर्षी जुलैमध्ये कोलकाता येथील एका लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात कॉलेजच्या एका माजी विद्यार्थिनीसह दोन विद्यमान विद्यार्थी आणि एका सुरक्षा रक्षकालाही आरोपी करण्यात आलं होतं, त्यांना अटक करण्यात आली होती.

तसेच, मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एक महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या हत्येविरोधात अनेक दिवस निदर्शनं झाली.

या प्रकरणात, त्याच कॉलेजमध्ये काम करणाऱ्या संजय रॉयला अटक करण्यात आली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)