‘माझ्या मुलाला उघडं करून झाडाला उलटं टांगून मारलं, त्याच्या अंगावर लघवी केली’

शेळी आणि कबुतरं चोरल्याच्या संशयावरून 4 तरुणांना झाडाला उलटं टांगून मारहाण केल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये समोर आला आहे.
येथील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव परिसरात शनिवारी (26 ऑगस्ट) ही घटना घडली.
संबंधित घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींपैकी एकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील नाना गलांडे यांच्या काही दिवसापूर्वी शेळी आणि काही कबुतरं चोरीला गेली होती.
चोरीच्या संशयावरून शनिवारी (26 ऑगस्ट) सकाळी चार तरूणांना त्यांच्या घरातून नेण्यात आलं आणि कपडे काढून त्यांना झाडाला उलटं लटकवून अमानुष मारहाण करण्यात आली.
त्यानंतर जखमी तरूणांना श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

फोटो स्रोत, @RVikhePatil
जखमी तरुणाची आई श्रीकला माळी यांनी घटनेवषयी माहिती देताना सांगितलं की, “माझ्या मुलाला ते बोलायला आले आणि सोबत घेऊन गेले. मी पण त्यांच्या मागे गेले. तर त्यांनी माझ्या मुलाला दोन-तीन झापडी मारल्या. मग पोरं बोलवायला सांगितलं. तुमच्या मुलाचं काही नाही म्हणून त्यांनी मला घरी पाठवून दिलं.
“मी घरी आले. पण घरात मला आवाज यायला लागला. त्यामुळे मी पुन्हा तिकडे गेले, तर माझ्या मुलाला उघडं केलेलं होतं. माझ्या पोराला मारलं त्यांनी. मी गेले तेव्हा त्यांनी माझ्या पोराच्या अंगावर लघवी टाकली. मीठ टाकून माझ्या पोराला मारलं. मी सोडवायला गेले, तर माझ्याशी धक्काबुक्की केली.”
या घटनेतील दुसऱ्या पीडित तरुणाची आई सुरेखा खंडागळे यांनीही त्यांच्या मुलाला मुलाला उघडं करुन, अंगावर मीठ टाकून मारहाण झाल्याचा आरोप केला.
घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको
हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यासह राज्यभरात उमटू लागले आहेत.
या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं केली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ हरेगावा फाटा इथं पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
आरपीआयचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी म्हटलं की, “दलित कुटुंबातील मुलांना चोरीच्या संशयावरुन मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या अंगावर लघवी करण्यात आली. त्यांना खूप वेळ बांधून ठेवण्यात आलं होतं. या घटनेचा आम्ही निषेध केला आहे. आरोपींना तत्काळ अटक करावी ही आमची मागणी आहे.”
दरम्यान, अहमदनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पीडित तरुणांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली.
"या तरुणांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून दिलासा दिला," असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनीही हॉस्पिटलमध्ये जाऊन तरूणांची भेट घेतली.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “कबुतर आणि शेळ्या चोरी करण्याच्या संशयावरुन या तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील 6 आरोपींपैकी एका आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. बाकी आरोपी शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
मारहाण करणाऱ्यांवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनेबाबत समाजमाध्यमांवर कुणी अफवा पसरवत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
ही अनास्था बदलल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर
या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, “श्रीरामपूर प्रकरणातील एका पीडित मुलाशी आणि त्याच्या आजी सोबत आताच फोनवर बोलणं झालं. त्याला मारहाण करण्यात आली, त्याच्यावर लघवी करण्यात आली, त्याच्यावर थुंकण्यात आलं, त्याला थुंकी चाटायला भाग पाडलं गेलं, नागवलं गेलं आणि झाडाला उलटं लटकवलं गेलं. भयानक आहे ना?
“ना इथला जातीय भेदभाव, तुच्छता, अपमान, शिवीगाळ, हिंसा, क्रूरता नवीन आहे, ना या सगळ्यांबद्दल असणारी सरकारी अनास्था.
“वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मी आपल्याला शब्द देतो, या अनास्थेला आव्हान देऊन तिला बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
आंबेडकर यांनी पीडित कुटुंबीयांची फोनवर चौकशीही केली.
यावेळी पीडित महिलेने ॲड. आंबेडकर यांना साद घालून न्याय मिळवून देण्याची विनंती केली. त्यावर 1 सप्टेंबर रोजी ते स्वतः पीडित परिवाराच्या भेटीला येत असल्याचं त्यांनी सांगितलं. या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पोस्ट केला आहे.
"हा जातीय अत्याचारच आहे आणि तो जातीयवादी मानसिकतेतून घडलेला आहे. तीन दलित मुलांना 'शिक्षा' देण्याचा अधिकार आपल्याला आहे ही मानसिकता इथल्या जातीय व्यवस्थेनेच जोपासली आहे. इतर कोणाला कबुतर चोरीच्या संशयावरून इतकी अमानुष मारहाण झाली असती ? निश्चितच नाही''! अशी पोस्ट लिहित ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपला संताप व्यक्त केलाय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








