पाकिस्तानचे झिया-उल-हक 1970 मध्ये 'पॅलेस्टिनींच्या नरसंहारात' सहभागी होते का?

    • Author, आबिद हुसैन
    • Role, बीबीसी उर्दू
    • Reporting from, इस्लामाबाद

जवळपास सात दशकांपासून सुरू असलेल्या पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षामध्ये साधारणतः पॅलेस्टिनी अरबच इस्रायलच्या सैन्याशी भिडलेले दिसतात.

परंतु जवळपास 55 वर्षांपूर्वी पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना मुस्लीम देश असलेल्या जॉर्डनविरुद्धही युद्ध करावे लागले होते. या संघर्षात पॅलेस्टाईनला प्रचंड मनुष्यहानीला सामोरे जावे लागले होते.

पण अनेकांना कदाचित हे माहीत नसेल की, या युद्धात पाकिस्तानच्या एका लष्करी अधिकाऱ्याचीही महत्त्वाची भूमिका होती.

1970 मधील 16 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत चाललेल्या युद्धाला इतिहासात 'ब्लॅक सप्टेंबर' नावाने ओळखले जाते. त्यातलाच हा प्रसंग आहे.

कालांतराने काही अभ्यासकांनी लिहिलं की, जॉर्डनचे शासक शाह हुसैन यांना या युद्धात निर्णायक सल्ला देणारे पाकिस्तानी अधिकारी म्हणजे झिया-उल-हक होते. त्यांच्या सल्ल्यामुळेच जॉर्डनचे सैन्य विजयी झाले.

झिया-उल-हक त्या काळात जॉर्डनमध्ये काय करत होते?

1967 मधील 'सहा दिवसांचे युद्ध' (Six-Day War) इस्रायलने जिंकले होते. त्या पराभवानंतर जॉर्डनमध्ये स्थिती तणावपूर्ण होती.

इजिप्त आणि सीरियासोबत जॉर्डनलाही मोठा फटका बसला होता. जेरुसलेम, गाझा व वेस्ट बँक या प्रदेशांवरचा ताबा त्यांना गमवावा लागला होता.

या परिस्थितीतही पॅलेस्टाईनच्या आत्मघातकी पथकाने वेस्ट बँक सीमेवर छावणी टाकली आणि इस्रायलच्या ताब्यातील भागांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आणि सीरिया व इराकचा पाठिंबा मिळू लागला.

ही वाढती शक्ती पाहून शाह हुसैन यांनी त्यांचे पाकिस्तानी मित्र, ब्रिगेडियर झिया-उल-हक यांची मदत मागितली. त्या वेळी झिया ओमानमधील पाकिस्तानी दूतावासात डिफेन्स प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.

लेखक तारिक अली यांनी 'द ड्युअल' (The Duel) या पुस्तकात नमूद केले आहे की, झिया-उल-हक अमेरिकेतून प्रशिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्यांना जॉर्डनमध्ये पाठवण्यात आले. जॉर्डनला नुकतंच सहा दिवसांच्या युद्धानंतर पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

उद्दिष्ट होतं पाकिस्तान आणि जॉर्डनच्या लष्करातील संबंध मजबूत करणे आणि तेथील घडामोडींचा अहवाल पाकिस्तानला पाठवणे.

या गोष्टीला दुजोरा देताना अमेरिकेच्या सीआयएचे माजी अधिकारी ब्रूस रिडेल यांनी आपल्या 'व्हाट वुई वॉन' (What We Won) या पुस्तकात लिहिले आहे की, झिया-उल-हक तीन वर्षांपूर्वी जॉर्डनला आले होते.

पाकिस्तान आणि जॉर्डनच्या सैन्यामध्ये परस्पर संबंध वाढवावेत आणि जॉर्डनमध्ये घडणाऱ्या घटनांचा अहवाल पाकिस्तानला पाठवावा अशी त्यांच्यावर जबाबदारी होती.

झिया यांच्या सल्ल्याने जॉर्डनला मिळाला विजय

झिया-उल-हक यांनी केवळ यापेक्षा अधिक जबाबदारी पार पाडली. सीआयएचे अधिकारी जॅक ओकोनेल आपल्या 'किंग्स काउंसल' (King's Counsel) या आत्मचरित्रात लिहितात की, "1970 मध्ये जेव्हा सीरियाचे रणगाडे जॉर्डनमध्ये घुसले आणि अमेरिकेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शाह हुसैन चिंताग्रस्त झाले."

ही बिकट परिस्थिती पाहून शाह हुसैन यांनी आपले 'मित्र' जिया-उल-हक यांना सीरियाच्या सीमेवरचा दौरा करून तेथील प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती जाणून घेण्याची विनंती केली.

जॅक ओकोनेल लिहितात की जेव्हा जॉर्डनच्या अधिकाऱ्यांनी झिया-उल-हक यांना परिस्थितीबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की "परिस्थिती फारच खराब आहे."

ब्रूस रिडेल यांनी त्यांच्या पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणात लिहिले आहे की, या प्रसंगी झिया-उल-हक यांनी शाह हुसेन यांना सीरियन सैन्याच्या विरोधात जॉर्डनच्या हवाईदलाचा वापर करण्याचा सल्ला दिला.

"हाच तो निर्णय ठरला ज्यामुळे जॉर्डनला युद्ध जिंकता आले."

'ब्लॅक सप्टेंबर'मध्ये झिया-उल-हक यांच्या भूमिकेबाबतची सर्वात महत्त्वाची कबुली शाह हुसेन यांचे भाऊ आणि त्या वेळचे युवराज हसन बिन तलाल यांनी ब्रूस रिडेल यांच्याशी बोलताना दिली होती.

शाहांची शिफारस आणि झियांची बढती

ब्रूस रिडेल लिहितात की, प्रिन्स हसन बिन तलाल यांनी त्यांना एप्रिल 2010 मध्ये सांगितले होते की "झिया-उल-हक शाह हुसेैन यांचे मित्र आणि विश्वासू सहयोगी होते."

या युद्धात त्यांच्या मदतीबद्दल शाही कुटुंब खूप आभारी होते. त्यांची उपस्थिती इतकी महत्त्वाची होती की ते जवळजवळ सैन्याचे नेतृत्व करत होते.

ब्रूस रिडेल यांच्या मते, "झिया-उल-हक यांच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली, कारण हे स्पष्ट होते की झिया-उल-हक यांनी जॉर्डनच्या सैन्यासोबत लढाईत सहभागी होऊन आपल्या राजनयिक जबाबदाऱ्यांचे आणि आदेशांचे उल्लंघन केले होते."

परंतु या योगदानाचे बक्षिस झिया-उल-हक यांना शाह हुसेैन यांच्या शिफारशीच्या स्वरूपात मिळाले. शाह हुसेैन यांनी ब्लॅक सप्टेंबर युद्धातील झिया-उल-हक यांच्या कामगिरीची माहिती पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना दिली.

यानंतर पंतप्रधान भुट्टो यांनी झिया-उल-हक यांना ब्रिगेडियरवरून मेजर जनरल पदावर बढती दिली.

नंतर झुल्फिकार अली भुट्टो यांचे माजी सल्लागार राजा अन्वर यांनी आपल्या 'द टेररिस्ट प्रिन्स' या पुस्तकात पंतप्रधान भुट्टो यांच्या चुकीच्या निर्णयांविषयी लिहिले आहे की, जर त्या प्रसंगी शाह हुसेन यांनी झिया-उल-हक यांची शिफारस केली नसती, तर निश्चितच झिया-उल-हक यांची लष्करी कारकीर्द ब्रिगेडियरपदीच संपली असती.

ते लिहितात की, "असं म्हटलं जातं की झिया-उल-हक यांनी ब्लॅक सप्टेंबर नरसंहारात भाग घेतला होता आणि लष्करी तसंच राजनयिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन केले होते."

पण शाह हुसैन यांच्या शिफारशीनं कदाचित पंतप्रधान भुट्टो यांना हा संकेत दिला की, झिया-उल-हक निष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्यास तयार आहेत.

झिया-उल-हक खरंच' ब्लॅक सप्टेंबर' सहभागी होते का?

हे युद्ध अधिकृतपणे 16 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत झाले. त्यानंतर पुढच्या वर्षी जुलैपर्यंत लहानसहान स्वरुपात चकमकी सुरू राहिल्या.

वेगवेगळ्या संदर्भांनुसार आणि ब्रूस रिडेल यांच्यासह अनेक विश्लेषकांच्या मते या लढाईत आत्मघातकी पथकातील तीन ते चार हजार पॅलेस्टिनी ठार झाले, तर सुमारे 600 सिरियन सैनिक मारले गेले आणि जॉर्डनचे 537 सैनिक मारले गेले.

पण दुसऱ्या बाजूने पाहिले, तर पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांच्या मते फार मोठ्या संख्येने आत्मघातकी पथकातील हल्लेखोर मारले गेले होते. त्यांची संख्या 20 ते 25 हजारांच्या दरम्यान असल्याचे सांगितले गेले.

पाकिस्तान पॅलेस्टाईनच्या संघर्षात नेहमी त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाकिस्तानचे धोरण पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारे आणि इस्रायलचा विरोध करणारे, असेच राहिले आहे.

भूतकाळात जेव्हा जेव्हा इस्रायलसोबत पुन्हा राजनयिक संबंध सुरू करण्याचे संकेत मिळाले, तेव्हा त्यावर तीव्र टीका झाली आहे. तसेच तो पॅलेस्टाईनसोबतचा विश्वासघात मानले गेले आहे.

मात्र याला दुसरी बाजूही आहे.

तारिक अली यांनी आपल्या 'द ड्युअल' या पुस्तकात प्रसिद्ध इस्रायली जनरल मोशे दयान यांचे विधान उद्धृत केले आहे की, "शाह हुसैन यांनी 11 दिवसांत जितके पॅलेस्टिनी मारले, तितके इस्रायलने 25 वर्षांतही मारले नाहीत."

त्याचप्रमाणे, डाव्या विचारसरणीचे भारतीय पत्रकार आणि इतिहासकार विजय प्रसाद यांनी 2002 च्या एका लेखात लिहिले आहे की, "शाह हुसैन यांनी झिया-उल-हक यांच्या मदतीने पॅलेस्टिनींना हरवण्यासाठी खानाबदोश सेना पाठवली आणि त्यानंतर असा नरसंहार झाला ज्याची मोजदाद करणे अशक्य आहे."

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिले प्रशिक्षण

परंतु याच्या अगदी उलट बाजू 15 वर्षांपूर्वी एका माजी पाकिस्तानी राजनयिक अधिकाऱ्याने मांडली होती, जे त्या काळात म्हणजे सप्टेंबर 1970 मध्ये जॉर्डनमध्ये तैनात होते.

ऑगस्ट 2010 मध्ये इंग्रजी वृत्तपत्र द न्यूज मध्ये प्रकाशित लेखात माजी राजदूत तय्यब सिद्दीकी यांनी लिहिले होते की, "सहा दिवसांच्या युद्धातील पराभवानंतर विविध अरब देशांनी पाकिस्तानकडे लष्करी मदत आणि प्रशिक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर पाकिस्तानने जॉर्डन, सीरिया आणि इराकमध्ये आपल्या अधिकाऱ्यांना पाठवलं."

तय्यब सिद्दीकी लिहितात की, जॉर्डनला पाठवण्यात आलेल्यांमध्ये तिन्ही दलांचे 20 वरिष्ठ अधिकारी होते. त्यांचे नेतृत्व लष्कराचे मेजर जनरल नवाझिश अली करत होते आणि झिया-उल-हक त्यांचे डेप्युटी होते.

ते पुढे लिहितात की, शाह हुसेन यांच्या विनंतीवरून नंतर पाकिस्तान हवाईदलाची एक रेजिमेंटदेखील जॉर्डनला पोहोचली.

परंतु या संपूर्ण पथकाने केवळ जॉर्डनच्या सेनेला प्रशिक्षण देणे हेच अपेक्षित होते, कोणत्याही युद्धात सहभागी होणे अपेक्षित नव्हते.

तय्यब सिद्दीकी लेखात पुढे लिहितात की, "पाकिस्तानी राजदूत आणि लष्करी तुकडीप्रमुख यांच्या अनुपस्थितीत मी दूतावासाचे नेतृत्व करत होतो. 2 सप्टेंबरला मला झिया-उल-हक यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, शाह हुसेैन यांनी सीरियन सीमेच्या जवळ इरबिद शहरात त्यांना लष्करी डिव्हिजनचे नेतृत्व करण्यास सांगितले आहे, कारण जॉर्डनचा कमांडर रणांगण सोडून पळून गेला आहे."

ते पुढं लिहितात की, "मी ताबडतोब संरक्षण सचिव गयासुद्दीन यांना फोन करून ही बाब सांगितली. त्यांनी कोणतीही शंका न घेता परवानगी दिली.

मी हरकतीची नोंद घ्यायचा प्रयत्न केला, तर त्यांनी मला थांबवत सांगितले, 'आम्ही इस्तिखारा (ईश्वराचे मार्गदर्शन) करून घेतला आहे. हाशमी साम्राज्याचा झेंडा उंचावत आहे. बादशाहांच्या आदेशांचे पालन करा.

लष्करी तुकडीचे नेतृत्व घेतले हाती

तय्यब सिद्दीकी यांच्या मते, झिया-उल-हक यांनी लष्करी तुकडीचे नेतृत्व हाती घेतले होते, पण कोणताही लष्करी मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वीच सीरियाने अमेरिका आणि इस्रायलच्या दबावाखाली आपली सेना मागे बोलावून घेतली.

ते लिहितात, "कथित पॅलेस्टिनी नरसंहारात झिया-उल-हक यांची भूमिका एवढ्यापुरतीच होती."

लेखाच्या शेवटी तय्यब सिद्दीकी यांनी लिहिले आहे, "सामान्यतः असे निश्चितपणे म्हटले जाते की झिया-उल-हक हजारो पॅलेस्टिनींच्या हत्या करण्यात सहभागी होते आणि त्यानंतर यासर अराफत यांनी ठरवले होते की ते कधीही पाकिस्तानला जाणार नाहीत."

"पण याचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही. यासिर अराफात नंतर अनेक वेळा पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेले."

(ही बातमी आधी बीबीसी हिंदीच्या पानावर 24 मे 2021 रोजी प्रकाशित झाली होती. याला अद्ययावत करण्यात आले आहे.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.