सीमा देव यांचं रमेश देवांसोबतच भांडण आणि एकमेकांशी न बोलता शूट केलेलं ‘ते’ गाणं

सीमा देव

फोटो स्रोत, Getty Images

सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचं आज वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं.

गेली अनेक वर्षं त्या अल्झायमर्स आजाराने त्रस्त होत्या.

अजिंक्य देव यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं, की आज (24 ऑगस्ट) सकाळी 7 वाजता सीमा देव यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. त्या गेली 3 वर्षं अल्झायमर्सने त्रस्त होत्या आणि कोणालाच ओळखत नव्हत्या.

त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

त्यांचे मूळ नाव नलिनी सराफ असे होते. अभिनेते रमेश देव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचा मुलगा अजिंक्य देव यांनीही अनेक मराठी सिनेमांत अभिनय केला आहे, तर दुसरा मुलगा अभिनय प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.

1957 साली सीमा यांनी 'आलिया भोगासी' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत.

त्यांनी आतापर्यंत 80 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं.

2013 मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचं निधन झालं.

'आता भांडण पुरे...'

सीमा देव-रमेश देव

फोटो स्रोत, ajinkya deo

'वरदक्षिणा' या चित्रपटातलं ते गाणं आहे. त्यावेळी या दोघांचा अबोला होता. त्या गाण्याचं शूट होण्याच्या आधी रमेश देव यांनी सीमा देव यांना एका कागदावर 'आता भांडण पुरे झालं' असं लिहून पाठवलं होतं.

लग्नाच्या आधी जोडप्यांमध्ये होतात तशी भांडणं झाली होती आणि दोघांना सारखं सोबत काम करावं लागायचं. या चित्रपटांमध्ये लव्ह सिन शूट करत असताना दोघेही दिग्दर्शकांची मदत घ्यायचे. एकमेकांशी बोलत नसायचे.

एकदा रमेश देव दुसऱ्या मुलीशी बोलत असताना त्यांनी सीमा देव यांचं नाव घेतलं. रमेश देव सीमा देव यांना नलू असं म्हणायचे.

नलू म्हटल्यावर ती मुलगी त्यांच्यावर भडकल्याचं रमेश देव सांगतात. ती मुलगी चिडली आणि मग रमेश देव यांना वाटलं की सीमा देव यांच्यावर त्यांचं खरं प्रेम झालेलं आहे आणि मग त्यांनी सीमा देव यांना भांडण मिटवण्यासाठी चक्क पत्रच लिहिलं.

‘अमिताभला पाहून वाटलं होतं जिराफासारख्या या माणसाला कोण हिरो करेल?’

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

‘आनंद’ चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभव सांगतात सीमा देवयांनी सांगितलं की, "अमिताभ बच्चन यांना जेंव्हा पहिल्यांदा आनंद चित्रपटाच्या सेटवर पाहिलं, तेंव्हा मी रमेश देव यांना विचारलं की हा या चित्रपटाचा हिरो आहे का? त्यावर ते म्हणाले की नाही राजेश खन्ना हिरो आहेत पण हादेखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका करतो आहे.

अमिताभ दिसायला अगदी उंच होते आणि त्यांची मान बगळ्यासारखी दिसत होती. त्यांना पाहून वाटलं की, इतक्या उंच माणसाला हिरो म्हणून कुणी घेईल का? त्यानंतर अमिताभने केलेल्या कष्टाच्या जोरावर खूप मोठं यश मिळवलं. यामध्ये त्यांनी केलेली मेहनत आणि नशिबाने त्यांना दिलेली साथ या दोन प्रमुख गोष्ट होत्या.

अमिताभच्या वक्तशीरपणाबद्दल बोलताना रमेश देव म्हणाले की, "अमिताभच्या यशामध्ये नशीब तर होतंच पण त्याहीपेक्षा जास्त त्यांचा वक्तशीरपणा आणि शिस्त ही त्यांच्या यशाला कारणीभूत ठरली असं मला वाटतं. एकदा सकाळी सातच्या शिफ्टला मी आणि अमिताभ सोबत बसलेलो असताना एक फोन आला.

त्या फोनवर त्या चित्रपटाचा दिग्दर्शक विचारत होता ‘वो लंबू आय है क्या? वो खुद भी टाइम पर आता है और हमें भी परेशान करता है.’ हे अमिताभ बच्चन यांनी ऐकलं आणि ते म्हणाले की, "जी हां, मै लंबूही बात कर रहा हूँ, और मैं यंहा आकर बैठा हूँ, आपके इंतजार में हूँ. अमिताभचं हे उत्तर ऐकून तो दिग्दर्शक दिवसभर माफी मागत होता."

आनंद चित्रपटातील एक दृश्य

फोटो स्रोत, Ajinkya Deo

फोटो कॅप्शन, आनंद चित्रपटातील एक दृश्य

अभिनेत्री सीमा देव यांनी एका गोष्टीची खंत बोलून दाखवली होती. ‘आनंद’ हा सिनेमा त्यांच्या बॉलिवुडमधल्या लक्षणीय कामांपैकी एक मानला जातो. त्यांचं कामही अचानकच मिळालं होतं.

सिनेमात आनंद हेच मुख्य पात्र कॅन्सरग्रस्त असतं. ते पात्र उपचारांसाठी मुंबईला येतं, म्हटल्यावर दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी डॉक्टर साकारण्यासाठी एका मराठी अभिनेत्या शोधात होते. तेव्हा कुणाच्या तरी सांगण्यावरून रमेश देव मुखर्जींच्या ऑफिसला गेले आणि त्यांचं नाव निश्चित झालं.

रमेश देव आणि सीमा देव यांचं लग्न त्यापूर्वीच लग्न झालं होतं, आणि ते मुंबईतल्या एका लहानशा घरात राहायचे.

एकदा दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी सहज रमेश देव यांच्या घराजवळून जात असताना त्यांनी अचानक देव यांच्या घरी भेट दिली. तिथे मुखर्जी यांची भेट सीमा देव यांच्याशी झाली. रमेश आणि सीमा यांच्यातलं संभाषण आणि केमिस्ट्री पाहून मुखर्जी रमेश देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी सीमा देव यांना कास्ट करण्याचा निर्णय घेतला.

‘आनंद’सारख्या सिनेमात रोल मिळाल्यावर हे मराठी दांपत्य खुश होतं. त्यातच सीमा यांच्या पात्र सुमन कुलकर्णी ही आनंद अर्थात राजेश खन्नाला राखी बांधून त्याला भाऊ मानते. तिला त्याच्या आजारपणाविषयी सुरुवातीला सांगितलं जात नाही, पण नंतर कळल्यावर ती खूप जीव लावून त्याची काळजी घेते, असं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

सीमा देव-रमेश देव

फोटो स्रोत, FACEBOOK/MRUNAL KULKARNI

या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान सुपरस्टार राजेश खन्ना यांचे देव दांपत्याशी चांगले संबंध जुळले होते. पूर्ण सिनेमातही त्यांचे एकत्र अनेक सीन होते. मात्र शेवटच्या सीनला, जेव्हा आनंद अखेरचा श्वास घेत असतो, तेव्हा तिथे त्याची बहीण कुठेच दाखवण्यात आलेली नाही.

“मला कळलंच नाही, जी बहीण संपूर्ण सिनेमात आनंदची काळजी घेते, जी त्याला राखी बांधते, त्याच्यावर एवढं प्रेम करते, तीच बहीण त्याच्या मृत्यूशय्येवर त्याच्याजवळ का नसते? ऋषिकेश मुखर्जींनी असं का केलं, मला माहिती नाही. पण तो सीन शूट झाला होता, त्यामुळे नंतर मी काही बोलले नाही,” असं सीमा देव यांनी लेखिका अनिता पाध्ये यांना सांगितलं होतं. पाध्येंनी हा किस्सा त्यांच्या ‘दहा क्लासिक्स’ या पुस्तकात मांडलं आहे.

त्यांनी यात आणखी एक किस्सा सांगितला आहे. एकदा रमेश आणि सीमा देव यांच्यात ‘आनंद’च्या सेटवर कुठल्या तरी विषयावरून वाद सुरू होता. ते एकमेकांशी बोलण्यात इतके मग्न होते की ऋषिकेश मुखर्जी त्यांचं बोलणं ऐकत आहेत, हे त्यांना कळलंच नाही.

पण त्यांच्या लक्षात येताच ते थांबले. तेवढ्यात ऋषिकेश दादांना सुचलं की यांच्यातल्या अशाच मराठी संभाषणाचा, एका किरकोळ भांडणाचा किस्सा ‘आनंद’मध्ये घ्यावा. या निमित्ताने आनंद अर्थात राजेश खन्नाच्या वाट्यालाही एक-दोन मराठी ओळी आल्या होत्या.

1971चा ‘आनंद’ देव दांपत्यासाठी बॉलिवुडची दारं खुली करणारा एक मोठा सिनेमा ठरला.

मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

सीमा देव यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करून सीमा देव यांना श्रद्धांजली दिली.

ते म्हणाले, "मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या, मराठी चित्रपटसृष्टीत सालस, प्रेमळ चेहरा असलेल्या आणि चित्रपटसृष्टीसाठी मैलाचे दगड ठरलेल्या सिनेमांमधील भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले."

"सीमा देव यांनी मराठी, हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हिंदी आणि मराठी अशा जवळपास ८० सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. जगाच्या पाठीवर, मोलकरीण, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला, आनंद, कोशिश यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय ठरल्या. भूमिकांमधील त्यांचा सहज सुंदर वावर आणि भूमिका अक्षरश: जिवंत करण्याचे कसब यामुळे त्यांनी रसिकांची मने जिंकली."

"प्रत्येक पिढीला त्या आपल्या कुटुंबातील वाटाव्यात इतका सच्चेपणा त्यांच्या भूमिकांतून दिसत असे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. देव कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी असून सीमा देव यांना श्रद्धांजली अर्पण करतो," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

सीमा देव यांची चित्रपट कारकिर्द

  • जगाच्या पाठीवर (1960)
  • मिया बीबी राजी (1960)
  • वरदक्षिणा (1962)
  • प्रेमपत्र (1962)
  • मोलकरीण (1963)
  • जुने ते सोने (1967)
  • सरस्वतीचंद्र (1968)
  • आनंद (1971)
  • अपराध (1972)
  • बदला (1977)
  • यही है जिंदगी (1977)
  • दादा (1979)
  • जवानी की कहानी (1986)
  • नसीब अपना अपना (1986)
  • सर्जा (1987)
  • संसार (1987)
  • बेनाम बादशाह (1991)
  • जीवन संध्या (2021)
  • जेता (2022)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)