कोव्हिड लशींचा हार्ट अटॅकशी संबंध होता का? एम्सचा अहवाल काय सांगतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शुभ राणा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
भारतामध्ये कोव्हिड-19 महामारीच्या काळात कोट्यवधी लोकांना लस देण्यात आली होती.
भारताच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाशी संबंधित CoWIN पोर्टलनुसार, डिसेंबर 2025 पर्यंत लसींचे 220 कोटींपेक्षा अधिक डोस देण्यात आले.
कोव्हिड लसीबाबत एम्स दिल्लीचा एक नवा अहवाल समोर आला आहे. त्यात म्हटलं आहे की "तरुणांमधील अचानक होणाऱ्या मृत्यूंचा कोव्हिड लस किंवा संसर्गाशी कोणताही संबंध नाही."
या अभ्यासाबाबत बीबीसी हिंदीने आरोग्यतज्ज्ञांशी संवाद साधला.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), "2024 अखेरपर्यंत जगभरात 13.64 अब्जांहून अधिक कोव्हिड लसींचे डोस देण्यात आले आहेत."
जागतिक आरोग्य संघटन आजही कोव्हिड लसीकरणाची शिफारस करते.
दरम्यान, एम्सच्या अभ्यासात हार्ट अटॅकच्या मागे हृदयरोग हेच सर्वात मोठे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अहवाल काय सांगतो?
भारतामध्ये कोव्हिड-19 महामारीच्या काळात कोट्यवधी लोकांना लस देण्यात आली होती.
भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबंधित CoWIN पोर्टलनुसार, डिसेंबर 2025 पर्यंत लसींचे 220 कोटींपेक्षा अधिक डोस देण्यात आले.
कोव्हिड लसीबाबत एम्स दिल्लीचा एक नवा अभ्यास समोर आला आहे. त्यात म्हटलं आहे की "तरुणांमधील अचानक होणाऱ्या मृत्यूंचा कोव्हिड लस किंवा संसर्गाशी कोणताही संबंध नाही."
या अभ्यासाबाबत बीबीसी हिंदीने आरोग्यतज्ज्ञांशी संवाद साधला.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), "2024 अखेरपर्यंत जगभरात कोव्हिड लसींचे 13.64 अब्जांहून अधिक डोस देण्यात आले आहेत."
जागतिक आरोग्य संघटन आजही कोव्हिड लसीकरणाची शिफारस करते.
दरम्यान, एम्सच्या अभ्यासात हार्ट अटॅकच्या मागे हृदयरोग हेच सर्वात मोठे कारण असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.
तरुणांमधील मृत्यचे मुख्य कारण काय?
एम्स दिल्लीच्या पॅथॉलॉजी आणि फॉरेन्सिक मेडिसिन विभागाने मे 2023 ते एप्रिल 2024 या एका वर्षाच्या कालावधीत शवविच्छेदन-आधारित अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध केला.
"तरुण प्रौढांमधील अचानक मृत्यू: भारतातील एका मोठ्या रुग्णालयात एक वर्षाचा अभ्यास" असा हा अहवालात आहे.
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये हा अहवाल प्रकाशित झाला असून, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)चे ते प्रमुख जर्नल आहे.
अभ्यासात आघात, आत्महत्या, हत्या किंवा ड्रग्सच्या गैरवापरामुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश न करता, अचानक झालेल्या मृत्यूंचे विश्लेषण करण्यात आले आहे.
एकूण 94 तरुण (19–45 वर्ष) आणि 68 ज्येष्ठ नागरिक (46–65 वर्षे) प्रकरणांची तपासणी करण्यात आली. तरुणांचं सरासरी वय 33.6 वर्षे असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
एम्सच्या अभ्यासानुसार तरुणांमधील मृत्यूंची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
• हृदयरोग (कार्डिओव्हॅस्क्युलर आजार) हे सर्वात मोठं कारण – तरुणांमधील सुमारे दोन-तृतीयांश मृत्यू यामुळे झाले.
• या मृत्यूंपैकी 85% प्रकरणांमध्ये एथेरोस्क्लेरोटिक कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) आढळून आले, म्हणजेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये 70% पेक्षा जास्त ब्लॉकेज आढळून आले.
• सर्वाधिक प्रभावित रक्तवाहिनी – लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी, त्यानंतर राइट कोरोनरी आर्टरी
• तरुणांच्या मृत्यूंपैकी सुमारे एक-तृतीयांश प्रकरणांमध्ये न्यूमोनिया, टीबी यांसारख्या श्वसनसंस्थेशी संबंधित आजार कारणीभूत
• तरुणांमध्ये दारू आणि धूम्रपानाचे व्यसन
या अभ्यासात सुमारे 20% प्रकरणांमध्ये मृत्यूचे कोणतेही स्पष्ट कारण आढळले नाही. म्हणजेच शवविच्छेदनानंतरही मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समजू शकलं नाही.
एम्सने लसीवरील त्यांच्या अभ्यासात असा दावा केला आहे की, कोव्हिड संसर्गाचा इतिहास किंवा लसीकरणाची स्थिती आणि अचानक मृत्यू यांच्यात कोणताही महत्त्वाचा संबंध नाही.
'एम्स'च्या अहवालावर प्रश्न
पुण्याच्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या कम्युनिटी मेडिसिन विभागातील डॉक्टर आणि प्राध्यापक डॉ. अमिताभ बॅनर्जी यांनी एम्सच्या अभ्यासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
"या अभ्यासात सुमारे 20% प्रकरणांमध्ये मृत्यूचे कारण समजू शकले नाही (अनएक्सप्लेंड डेथ किंवा निगेटिव्ह ऑटोप्सी) असं सांगण्यात आलं आहे.
या अज्ञात प्रकरणांमध्ये कोव्हिड लसीची काही भूमिका होती का? एम्सने या प्रकरणांची अधिक सखोल चौकशी करायला हवी होती."
मात्र, एम्सच्या अभ्यासात असं म्हटलं आहे की, या अभ्यासात नमूद मृत्यू झालेल्या व्यक्तींचे सरासरी वय केवळ 30.5 वर्षे होते. यामध्ये 50% लोकं 30–40 वयोगटातील होते तर 40% 20–30 लोक वयोगटातील होते.
यातील अर्ध्या प्रकरणांमध्ये हृदयाच्या ऊतींची सूक्ष्म तपासणी (हिस्टोपॅथॉलॉजी) करण्यात आली असता, हृदयात काही किरकोळ बदल आढळून आले.
जसे की हृदयाच्या स्नायूंचे थोडे जाड होणे, धमन्यांमध्ये चरबीचा पातळ थर साचणे किंवा हृदयाच्या छोट्या भागांमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्याच्या सौम्य खुणा दिसणे.
एम्सचा हा अभ्यास पुढे सांगतो की, हे बदल इतके गंभीर नव्हते की ते थेट मृत्यूचे कारण ठरू शकतील.

डॉ. अमिताभ बॅनर्जी, भारतात वापरल्या जाणाऱ्या कोविशिल्ड लसीचा संदर्भ देत म्हणतात, "युरोपमधील अनेक देशांनी दुर्मिळ परंतु गंभीर दुष्परिणामांमुळे (जसे की रक्ताच्या गुठळ्या आणि VITT), विशेषतः तरुणांमध्ये कोविशिल्ड लस तात्पुरती स्थगित केली होती."
डॉ. अमिताभ बॅनर्जी यांनी अॅस्ट्राझेनेका कंपनीने लसीचे उत्पादन बंद केल्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोरोनाची लस तयार करणाऱ्या फार्मास्युटिकल कंपनी अॅस्ट्राझेनेका हिने सुमारे वर्षभरापूर्वी आपल्या लसीचे "गंभीर दुष्परिणाम" होऊ शकतात, हे मान्य केले होते.
ब्रिटनच्या हायकोर्टात कंपनीनं हेही मान्य केलं होतं की, लसीमुळे थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS)सारखी स्थिती उद्भवू शकते.
अॅस्ट्राझेनेकानेच भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने कोविशिल्ड लस तयार केली होती.
डॉ. अमिताभ बॅनर्जी पुढे म्हणतात, "हे दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ म्हणजेच 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' असले तरी, कोट्यवधी लोकांवर मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यामुळे प्रभावित लोकांची संख्या मोठी असू शकते."

फोटो स्रोत, Getty Images
एम्स दिल्लीमध्ये पॅथॉलॉजीचे प्रोफेसर आणि या अभ्यासाचे सहलेखक डॉ. सुधीर अरावा म्हणाले, "आमच्या प्राथमिक अभ्यासातून स्पष्ट होते की तरुणांमधील अचानक मृत्यूंचे कारण कोव्हिड लस नाही.
भारतात तरुणांच्या अशा मृत्यूंवर फारसा अभ्यास झालेला नाही. आम्ही याची तपासणी केली आणि हे मृत्यू कोविडशी संबंधित नसल्याचे आम्हाला आढळून आले."
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार डॉ. मोहसिन वली म्हणतात, "हे खरे आहे की कोव्हिड लस आणि अचानक हृदयविकाराच्या मृत्यूंवरील एम्स आणि आयसीएमआरच्या संयुक्त अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की लस आणि तरुणांमधील अचानक मृत्यू यांच्यात कोणताही संबंध नाही.
पण मी लोकांना वारंवार सांगतो की, आपण कोव्हिडचा तो काळ का विसरतो? कोव्हिड अजूनही आपल्यासोबत आहे आणि तसाच राहील. आपण सोपा मार्ग निवडतो आणि लसीला दोष देतो."
डॉ. मोहसिन वली पुढे म्हणतात, "मी मान्य करतो की भारताने अनेक देशांना कोव्हिड लस मोफत आणि दान म्हणून दिली आहे. त्या देशांकडून अशा कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत.
मग हे आपल्या देशातच का घडत आहे? आपण मुलांच्या दैनंदिन दिनचर्येकडे, त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष करतो. आपण मुलांचे रक्तदाब तपासत नाही, त्यांच्या फास्ट फूड आणि चीजसारखे पदार्थ खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करतो."
ते पुढे स्पष्ट करतात, "एम्सने अहवालात जरी लसीचा अचानक झालेल्या मृत्यूंशी संबंध नसल्याचं सांगितलं असलं, तरी तरुणांचा अचानक मृत्यू होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, हे देखील त्यांनी अभ्यासात स्पष्ट करायला पाहिजे होतं."

फोटो स्रोत, Getty Images
मात्र एम्सच्या अभ्यासात तरुणांच्या अचानक मृत्यूंचे सर्वात मोठे कारण हृदयाशी संबंधित आजार असल्याचं सांगितलं आहे.
त्यानंतर श्वसनाशी संबंधित समस्या येतात. हृदयविकारामुळे झालेल्या मृत्यूंपैकी 85% प्रकरणांमध्ये धमन्यांमध्ये चरबी साचणे (कोरोनरी आर्टरी डिजीज) आणि त्यामुळे हार्ट अटॅक होणे हे प्रमुख कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ते मूळ कारणांवर भर देत म्हणतात, "भारतामध्ये पूर्वीही हृदयविकार होत होते, पण आता ते कमी वयात होत आहेत. यामागे तीन 'S' कारणीभूत आहेत - स्ट्रेस (ताण), स्लीप म्हणजेच झोपेची कमतरता आणि स्मोकिंग (धूम्रपान)."
डॉ. सुधीर अरावा तरुणांमधील अचानक मृत्यूंचे कारण त्यांच्या कामाच्या सवयी आणि पद्धती आणि त्यासोबतच्या सवयी असल्याचे सांगतात.
ते पुढे म्हणतात, "अनेक तरुण दारू पितात आणि धूम्रपान करतात, ज्यामुळे थेट कोरोनरी आर्टरी डिजीज होतो. त्यामुळे जीवनशैलीत बदल करणे अत्यावश्यक आहे."
डॉ. अरावा पुढे सांगतात, "लोकांनी वैज्ञानिक स्रोतांवर विश्वास ठेवावा आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहावे."
एम्सचा हा अभ्यास भारतातील तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे अधोरेखित करतो.
ॉयामागे ताणतणाव, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव आणि एकूणच जीवनशैली जबाबदार असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. आरोग्यविषयक जनजागृती, नियमित तपासणी आणि स्क्रीनिंगद्वारे अशा मृत्यूंना आळा घालता येऊ शकतो, असेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











