रील्समुळे डोळे आणि मानेवर काय परिणाम होतो? 'टेक्स्ट नेक सिंड्रोम'बद्दल जाणून घ्या

रील्समुळे आपल्या मानेवर आणि डोळ्यांवर काय परिणाम होतो? महत्त्वाची माहिती

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

हातात फोन घेतला की, रील्स पाहायला सुरुवात करता? सकाळी उठल्यापासून मोबाईल, लॅपटॉप, टॅब, टीव्ही असं एका स्क्रीननंतर दुसऱ्या स्क्रीनकडे पळापळ सुरू असते का?

एखादी कल्पना आली की, गुगलवर शोधा, पुस्तकंही स्क्रीनवरच वाचा, कंटाळा आला की ओटीटी, कामासाठी लॅपटॉप, रील्स आणि फोन, मेसेज. एखाद्या वस्तूसाठी किंवा जेवण मागवण्यासाठी पुन्हा फोन असा स्क्रीनप्रवास दिवसरात्र सुरू असेल, तर आपण नक्कीच संकटाच्या दिशेने प्रवास करत आहोत हे निश्चित.

सततच्या स्क्रीनमुळे शरीर आणि मनावर परिणाम होतात, हे विविध मार्गांनी आतापर्यंत सर्वांना समजलं आहे. पण आता गेल्या काही काळामध्ये ते परिणाम आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचले आहेत.

त्यातच एक मोठा परिणाम म्हणजे टेक्स्ट नेक सिंड्रोम. सततच्या स्क्रीनचा मान आणि डोळ्यांवर काय परिणाम होतो याची माहिती आपण येथे घेऊ.

टेक्स्ट नेक सिंड्रोम आणि डोळ्यांवर होणारा स्क्रीनचा परिणाम तपासण्याआधी आपण आधी आपल्या आजूबाजूला नजर फिरवू म्हणजे याचं मुख्य कारण लक्षात येईल.

स्क्रीन म्हणजे टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, सर्व प्रकारचे कॉम्प्युटर, पुस्तक वाचण्याचे गॅजेट याशिवाय काही न करता बसलेली व्यक्ती आता शोधणं फारच कठीण झालेलं दिसून येईल. कितीही कडक नियम असले, तरी फोन वापरत गाडी चालवणारे, चालता-चालता कानाला हेडफोन्स लावून स्क्रीनकडे पाहणारे लोक तुम्हाला दिसतील.

इतकंच नाही तर सिग्नलच्या 30-40 सेकंदातही फोनकडे पाहिल्याशिवाय बरं न वाटणारे आजूबाजूला आहेत. हीच स्थिती बागा, मोकळ्या जागांच्या बाबतीत आहे. मिळेल त्या जागेवर टेकून फोनकडे पाहणारे लोक दिसतील.

प्रवासातही रेल्वे-बसमध्ये असताना फोनमध्ये मान न खुपसलेला माणूस दिसणं दुर्मिळ झालं आहे. या सगळ्यामुळे आपल्या सर्वांचा स्क्रीनचा वापर भरपूर वाढला आहे हे सांगायला कुठल्याही वेगळ्या पुराव्याची गरज नाही.

मानेवर काय परिणाम?

मोबाईल, लॅपटॉप, टॅब किंवा अशा गॅझेटससाठी तुम्ही दीर्घ काळ मान खाली वाकवून बसता तेव्हा तुमच्या मानेवर ताण येतो. यामुळे होणाऱ्या आजाराला टेक्स्ट नेक सिंड्रोम असं म्हणतात.

यासाठी आपण एक साधी संकल्पना समजून घेऊ. ही संकल्पना आहे ग्रॅव्हिटी लाईन किंवा गुरुत्वाकर्षण रेषा.

मानदुखी बीबीसी मराठी आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

गुरुत्वाकर्षण रेषा एखादी वस्तू किंवा व्यक्तीच्या मध्यातून ती ज्या पृष्ठभागावर किंवा जमिनीवर आहे तिथपर्यंत जाणारी सरळ उभी रेषा. ही रेषा काल्पनिक असते. या रेषेच्या दिशेने गुरुत्वाकर्षण त्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर कार्य करत असते.

गुरुत्वाकर्षण रेषा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुरुत्वाकर्षण रेषा

जेव्हा आपली कवटी म्हणजे डोकं या गुरुत्वाकर्षण रेषेपासून दूर जातं तेव्हा आपल्या मानेच्या स्नायूवर ताण येतो. अशावेळेस आपलं डोकं पुन्हा गुरुत्वाकर्षण रेषेवर यावं यासाठी मानेचे स्नायू सतत काम करत राहातात. ते स्नायू सतत ओढल्यासारखे तणावात राहातात. असं फार काळ चाललं की मान दुखायला लागते. नंतर मानदुखीचा आजारच होतो.

मानदुखी बीबीसी मराठी आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हळूहळू मान पुढे करुन फोन वापरायची सवय लागते आणि मग पुढचे त्रास सुरू होतात.

याला टेक्स्ट नेक सिंड्रोम असं म्हणतात. थोडक्यात सतत डोकं, मान खाली वाकवून होणाऱ्या त्रासाला सुरुवात होते.

याचा आणखी काय त्रास होतो?

या प्रकारच्या मानदुखीमुळे आणखी अनेक त्रास होतात. याबद्दल आम्ही एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात स्पाइन सर्जरी विभागाचे संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. करुणाकरन यांच्याशी चर्चा केली.

ते म्हणाले, "या सर्वांचा तुमच्या सांध्यावर परिणाम होतो आणि तुम्हाला स्पाँडिलोसिस होण्याची शक्यता वाढते. तसेच सर्व्हायकल डिस्कची झिजही यामुळे होते."

(सर्व्हायकल डिस्क म्हणजे आपल्या मणक्याच्या किंवा मेरुदंडाच्या दोन हाडांमध्ये असलेला गादीसारखा भाग. यामुळे त्या हाडांची हालचाल सोपी होते. या भागाची झीज झाल्यास वेदना जाणवतात.)

सर्व्हायकल डिस्क. दोन हाडांमध्ये असलेलं कुशन किंवा गादीसारखा भाग. या प्रातिनिधिक चित्रात जिथं या गादीचं नुकसान झालंय तो भाग लाल रंगात दाखवण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर्व्हायकल डिस्क. दोन हाडांमध्ये असलेलं कुशन किंवा गादीसारखा भाग. या प्रातिनिधिक चित्रात जिथं या गादीचं नुकसान झालंय तो भाग लाल रंगात दाखवण्यात आला आहे.

डॉ. करुणाकरन सांगतात, "सर्व्हायकल डिस्कला काही इजा झाल्यास शरीराच्या वरच्या सर्व भागात त्रास जाणवू शकतो. प्रचंड वेदना जाणवणं, सुन्नपणा येणं असे त्रास होतात. टेक्स्ट नेक सिंड्रोम असणाऱ्या लोकांना राऊंडेड शोल्डर्सचा त्रास होतो म्हणजे खांदे पुढे झुकल्यासारखी स्थिती होणं."

"सततच्या मान वाकवून राहिलेल्या स्थितीमुळे खांदे पुढे पडल्यासारखे होतात. स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर तसेच तुम्ही ज्या बोटांनी टाईप करता, फोन वापरता त्यावर ताण येतो. जर तुमचं डोकं योग्य स्थितीत म्हणजे खांद्यांपासून दूर जात असेल, ग्रॅव्हिटी लाईनपासून दूर जात असेल तर वेदना होत राहणार."

टेक्स्ट नेक सिंड्रोमवर उपाय काय?

डॉ. करुणाकरन सांगतात, "एकदा का तुमचं शरीर राऊंडेड शोल्डर्सच्या स्थितीत गेलं की तुम्हाला पाठीचे भरपूर त्रास सुरू होतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमची स्क्रीन डोळ्यांच्या समोर धरणे. फोन, लॅपटॉप वापरत असताना अधूनमधून तुमचे हात वर करणे, हातांना स्ट्रेच करणं आवश्यक आहे. हा ताण दिला तर तिथल्या उतींना आराम मिळेल. बसताना, फोन वापरताना तुम्ही याचा विचार केला पाहिजे."

फोन वापरणाऱ्यांनी सतत स्क्रोल करत राहाणाऱ्यांनी आपल्या पाठीची, हाताची, खांद्याचीही काळजी घेतली पाहिजे. सतत स्क्रोल केल्यामुळे अंगठ्याला टेक्स्टिंग थंब नावाचा आजारही सुरू होतो. थोडक्यात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास त्याचे परिणाम आपल्या शरीर-मनावर दिसणार आहेत.

राऊंडेड शोल्डर्स, सततच्या फोन किंवा स्क्रीनवापरामुळे पुढे पडलेले खांदे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राऊंडेड शोल्डर्स, सततच्या फोन किंवा स्क्रीनवापरामुळे पुढे पडलेले खांदे

स्क्रीनसमोर तुम्ही दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे, रक्तातील साखरेचे आणि इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित राखण्याच्या शारीरीक क्षमतेमध्ये व्यत्यय येतो, ज्यामुळे टाइप 2 मधुमेह, चिंता वाटणे आणि नैराश्य येणे, लठ्ठपणा, सांधे आणि स्नायूंमधील, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे तसेच स्ट्रोक आणि हृदयविकाराचा त्रास होतो.

दीर्घकाळ एका जागी बसल्याने पाठीच्या स्नायुंवरही ताण येतो आणि मणक्याच्या समस्या निर्माण होतात. बैठी जीवनशैली पाठदुखी, मानदुखी, ऑस्टिओपोरोसिस आणि व्हेरिकोज व्हेन्स सारख्या आजारांना आमंत्रण देते.

मानदुखी बीबीसी मराठी आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

बैठ्या जीवनशैलीमुळे मृत्यूदर वाढत असून हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (कार्डिओ व्हस्क्युलर डिसीज), डायबिटीस मेलिटस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. याशिवाय एकाच ठिकाणी अधिक वेळ बसून राहिल्याने डीप व्रेन थ्रोम्बोसिसचा (डीव्हीटी) धोका संभवू शकतो. यात शरीरात खोलवर असलेल्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.

त्यामुळे स्क्रीनच्या नादात एकाच जागी बसून राहाणं धोक्याचं आहे. थोड्यावेळानं उठून आपल्या शरीराची हालचाल करणं गरजेचं आहे.

रील्स पाहण्याच्या सवयीपासून डोळे कसे वाचवायचे?

सतत रील्स पाहिल्यामुळे स्क्रीनचा वापर केल्यामुळे आपल्या डोळ्यांवर घातक परिणाम होतात. डोळे कोरडे होणं, डोळ्यांचे स्नायू थकून जाणं, लहान मुलांना लांबचं दिसणं कमी होणं (निकटदृष्टिता) असे त्रास होतात. झोप नीट न लागणं, झोपेत अध्येमध्ये जाग येणं असे त्रास होतात.

डोळ्यांवर या रील्सचा आणि सततच्या स्क्रीनचा काय परिणाम होतो याबद्दल आम्ही बदलापूरच्या डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या मंदार मयेकर यांच्याशी चर्चा केली.

मानदुखी बीबीसी मराठी आरोग्य डोळेदुखी मोबाईलचा ताण

फोटो स्रोत, Getty Images

स्क्रीनचा डोळ्यांवर परिणाम होतो म्हणजे नक्की काय होतं असा प्रश्न विचारला तेव्हा डॉ. मयेकर म्हणाले, "जेव्हा आपण दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहतो, तेव्हा पापण्यांची उघडझाप कमी होते. यामुळे डोळे कोरडे पडतात. त्याचबरोबर डोळ्यांच्या स्नायूंवर सतत ताण येतो आणि त्यामुळे थकवा जाणवू शकतो."

"रात्री स्क्रीनचा वापर केल्यास मेलाटोनिन या झोपेसाठी महत्त्वाच्या असलेल्या हार्मोनच्या निर्मितीत अडथळा येतो. परिणामी, शांत झोप लागत नाही."

"दीर्घकाळ रील्स पाहिल्यामुळे डोळ्यांवर होणाऱ्या परिणामाची लक्षणे म्हणजे लालसरपणा, वेदना होणे, पाणी येणे, खवखवणे, चुरचुरणे, जळजळणे, लक्ष केंद्रित करणे कठीण जाणे आणि दृष्टी अंधुक होणे आहेत."

लहान मुलांना स्क्रीनचा काय त्रास होतो?

आईवडील सतत स्क्रीनचा वापर करत असल्याचं पाहून लहान मुलांनाही टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, टॅब वापरण्याची इच्छा होत असल्याचं तुम्हाला जाणवलं असेल. काही ठिकाणी मुलांनी झोपावं, दंगा न करता जेवावं किंवा शांत राहावं यासाठी त्यांच्या हातात फोन दिला जातो. ही सवय अत्यंत घातक आहे.

आपण शांतपणे जेवलो तर आपल्याला फोन वापरायला मिळतो हे मुलांच्या लक्षात येतं. अशावेळेस आपण काय खातोय, किती खातोय, कसं खातोय याकडे त्यांचं लक्ष लागत नाही.

अशा जेवणामुळे मुलांचं पोषण होईल याची खात्री तर देता येणार नाही, पण या सवयीमुळे त्यांची एकाग्रता कमी होणं, स्क्रीनची सवय लागणं, डोळ्यांवर परिणाम होणं, चिडचिड असे त्रास वाढतील.

लहान मुलांना स्क्रीनचा काय त्रास होतो?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. मंदार मयेकर सांगतात, "लहान मुलांनी जास्त वेळ स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्याचा आकार वाढतो, ज्यामुळे निकटदृष्टिता (मायोपिया) हा दोष निर्माण होऊ शकतो आणि काही वेळा तिरळेपणाही दिसून येतो. त्यामुळे अभ्यास आणि स्क्रीन वापर अशा निअर ॲक्टिव्हिटींचा (स्क्रीन डोळ्याच्या अगदी जवळ ठेवून करावी लागणारी कामे) कालावधी (शाळेच्या वेळेव्यतिरिक्त) दररोज 2 तासांपेक्षा जास्त नसावा, हे महत्त्वाचे आहे."

लहान मुलांना स्क्रीनचा काय त्रास होतो?

फोटो स्रोत, Getty Images

"मुलांनी दररोज किमान 2 तास नैसर्गिक प्रकाशात खेळावे, यासाठी त्यांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहित करावे. आई-वडिलांनी लहान बाळे आणि टॉडलर्सपासून मोबाईल, टॅब अशा स्क्रीन डिव्हाइसेस दूर ठेवावेत. कारण यामुळे त्यांच्या नाजूक डोळ्यांना हानी पोहोचू शकते. दृष्टी मंदावणे किंवा तिरळेपणासारखी लक्षणे दिसल्यास तातडीनं नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा." असंही डॉ. मयेकर सुचवतात.

मायोपिया टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय

गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांमध्ये मायोपिया या आजाराचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येतं. मायोपिया हा एक डोळ्यांचा आजार आहे. मायोपियाला सोप्या शब्दांत शॉर्ट सायटेडनेस किंवा निअरसायटेडनेस असं म्हणतात. थोडक्यात या व्यक्तीला ठराविक अंतरापर्यंतच दृश्य दिसते.

थोड्या अंतरावरचे पाहण्यासाठी मग चष्म्याचा आधार घ्यावा लागतो. या व्यक्तींना होणाऱ्या त्रासाचं निदान वेळीच झालं नाही, तर मात्र पुढे वेगवेगळ्या गुंतागुंतीला सामोरे जावं लागतं. विशेषतः लहान मुलांच्या प्रगतीमध्ये हा मोठा अडथळा होऊ शकतो.

  • पुस्तक वाचताना पुस्तक आणि आपले डोळे यात पुरेसं अंतर असलं पाहिजे.
  • पुस्तकावर पडून, झोपून वाचू नये. आपले मूल असं करत असेल तर त्यात सुधारणा करावी आणि डोळ्यांची तपासणीही करुन घ्यावी.
  • मोबाईल, कॉम्प्युटर, टॅबलेटसारखी उपकरणं पुरेशा उजेडात वापरावीत, अंधारात त्यावरील मजकूर वाचण्याचा किंवा पाहण्याचा प्रयत्न करू नये.
  • घरामध्ये, कामाच्या ठिकाणी पुरेसा विशेषतः नैसर्गिक उजेड जास्त येईल अशी व्यवस्था करावी.
  • डिजिटल उपकरणं, टीव्ही, संगणक 20 मिनिटं वापरल्यावर थोड्यावेळासाठी विश्रांती घ्यावी. योग्य चौरस आहार घ्यावा.

स्क्रीन टाईम कसा कमी करायचा?

स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी डॉ. मंदार मयेकर सांगतात,

  • लोकांनी वैयक्तिक कारणांसाठी स्क्रीनकडे पाहण्याचा वेळ मर्यादित ठेवावा आणि त्याऐवजी मित्र-परिवारासोबत वेळ घालवावा किंवा व्यायामासाठी वेळ द्यावा.
  • ऑफिसच्या कामामुळे स्क्रीन टाइम जास्त होत असेल, तर 20-20-20 नियम पाळावा. म्हणजे दर 20 मिनिटांच्या स्क्रीन टाइमनंतर 20 सेकंदांचा छोटा ब्रेक घ्यावा आणि त्या वेळेत सुमारे 20 फूट लांब असलेल्या वस्तूकडे पाहावे.
  • तसेच झोपेच्या आधी, विशेषतः झोपण्याच्या एक तास आधी स्क्रीनचा वापर टाळावा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)