तुमच्या हाता-पायावर, बोटांवर, नखांजवळ चट्टे येतात? खाजही सुटते? मग हे वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हातावर, हातांच्या बोटांवर किंवा दोन बोटांच्यामध्ये सतत खाज येऊन लालसर डाग पडलेले जाणवतात का? किंवा पायावर तसेचं अंगावरही काही गोल आकाराचे आकार आणि लाल डाग आलेले दिसतात का? हे तुम्हाला सतत होत असेल तर ही टिनिया मॅन्युअमची लागण असू शकते.
टिनिया मॅन्युअम हा एकप्रकारचा संसर्ग असून यामुळे शरीरावर विविध ठिकाणी डाग पडतात आणि खाज सुटते. या जागेवर खाजवल्यामुळे ते अधिकच लाल होतात आणि त्याचा दाह वाढतो.
यामुळे याची वेळीच तपासणी करुन घेणं गरजेचं आहे.
टिनियाला रिंगवर्म असंही म्हणतात. ही एक बुरशी असते. त्याचा संसर्ग आपल्या अवयवांवर होतो. हे गोलाकार असल्यामुळे याला रिंगवर्म अशा नावानं ओळखलं जातं. या गोलाकार कडा आपल्या अवयवांवर दिसून येतात. हातावरच्या संसर्गाला टिनिया मॅन्युअम असं म्हटलं जातं.
15 ते 65 वयोगटातील सर्व वयोगटातील तसेच स्त्री पुरुष दोघांमध्येही हा संसर्ग आढळू शकतो. या संसर्गाचे वेळीच व्यवस्थापन करणे हे जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी गरजेचे आहे. यामध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याने काळजीची आवश्यकता असल्याने त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
टिनियाचा संसर्ग हातावर झाल्यास त्याला टिनियम मॅन्युअम असं म्हणतात. या स्थितीला ॲथलिट्स हँड असंही म्हणतात. हाताच्या वरच्या भागावर, तसेच दोन बोटांच्या मधल्या भागावर हा संसर्ग होतो. पायावरती विशेषतः चवड्यावर होणाऱ्या संसर्गाला टिनिया पेडीस किंवा ॲथलिट्स फूट असं म्हणतात.
मांड्यांच्या आतल्या भागात तसेच नितंबांच्या मध्ये आणि लिंगाच्या बाजूने असे रिंगवर्म संसर्ग होत असेल तर त्यास जॉक इच असं म्हणतात त्याला टिनिया क्रुरिस असेही नाव आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लहान मुलांना डोक्यावर संसर्ग होत असल्यास त्याला टिनिया कॅपिटस असे म्हणतात. आपल्या शरीराला जेथे घड्या पडतात तेथेही हा संसर्ग होण्याची शक्यता असते. नखांमध्ये आणि नखांच्याभोवतीही रिंगवर्मचा संसर्ग होतो.
कारणे आणि लक्षणे
हा संसर्ग का होतो आणि त्याची लक्षणं काय याबद्दल आम्ही मुंबईतील झायनोव्हा शाल्बी रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुरभी देशपांडे यांच्याशी चर्चा केली.
त्या म्हणाल्या, "हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट त्वचेच्या संपर्काने किंवा वस्तूंद्वारे (उदा. टॉवेल, कपडे) पसरतो. त्वचेला जिथे संसर्ग झाला आहे, तिथली जागा लाल होते. त्या ठिकाणी खूप खाज सुटते किंवा खवले,चट्टे उठतात. त्वचेवर जिथे चट्टे उठले आहेत. त्या भागांना प्लेक्स म्हणतात. जे लोक प्राण्यांना हाताळतात, त्यांच्या संपर्कात असतात किंवा सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करतात त्यांना या संसर्गाचा धोका जास्त असतो. कुत्रे आणि मांजरींसारख्या प्राण्यांपासूनही हा संसर्ग होऊ शकतो. शिवाय, घट्ट कपडे किंवा बूट घालणे किंवा घाम येणे या संसर्गाची शक्यता वाढवू शकतात."
त्या म्हणाल्या, "टिनियाचे निदान करण्यासाठी डॉक्टर सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने संक्रमित क्षेत्रातील त्वचा तपासू शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतल्या शरिफा स्किन केअर क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरिफा चौसे यांनीही याबद्दल अधिक माहिती दिली.
डॉ. चौसे म्हणाल्या, "त्वचेचा इतर व्यक्तीच्या संक्रमित त्वचेशी संपर्क आला तर याचा धोका असतो. प्राणी तसेच जेथे या बुरशीचा संसर्ग झालेला असतो अशा पृष्ठभांगाशी संपर्क आल्यास टिनियाचा त्रास होऊ शकतो. भरपूर घाम येणे तसेच हाताची स्वच्छता नीट न राहिल्यास हे अधिक वाढतं. वेळीच यावर उपचार न झाल्यास त्रास वाढतो. मात्र, टिनिया मॅन्युअम आणि हँड डर्मेटायटिसमध्ये फरक आहे.
"टिनियाच्या संसर्गामध्ये त्वचेवर खवले, चट्टे आणि लाल रंगाचे डाग दिसून येतात. तर हँड डर्मेटायटियमध्ये डागाला अशी कोणतीही लाल कडा नसते. हँड डर्मेटायटिस हे अलर्जीमुळे होतात."
टिनियाच्या संसर्गावर उपचार काय?
- डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांनी संसर्ग व्यवस्थापित केला जाऊ शकतो.
- टिनिया मॅन्युअम टाळण्यासाठी, तुमचे हात स्वच्छ आणि कोरडे ठेवा आणि सक्रिय टिनिया संसर्ग असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क टाळा.
- तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा. डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा.
- डॉक्टरांनी दिलेली औषधे तसेच क्रीम वेळीच वापरा.
- तुमच्या खासगी वापरातल्या वस्तू इतरांना देऊ नका, इतरांच्या वस्तू वापरू नका.
- कपडे, टॉवेल अशा वस्तू इतरांच्या वापरू नका.
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्याची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











