नरेंद्र चपळगावकर : कायद्याची ‘भाषा’ आणि भाषेचा ‘कायदा’ जाणणारे साहित्यिक

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं आज (25 जानेवारी) निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(न्या. चपळगावकर जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले, तेव्हा बीबीसी मराठीनं त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारा लेख प्रसिद्ध केला होता. तो लेख आज पुन्हा वाचकांसाठी देत आहोत.)

महाराष्ट्राला गेल्या अनेक शतकांची वैचारिक आणि सामाजिक सुधारणांची परंपरा लाभली आहे. गेल्या दोनशे वर्षांमध्ये काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विचारवंत, लेखक, कलाकार आणि राजकीय नेते महाराष्ट्रातील समाजाला दिशा देत आले आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळात आणि विशेषतः आजच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरही अनेक तज्ज्ञांनी, विचारवंतांनी हे काम सुरू ठेवले. त्या मांदियाळीतच न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं नाव आहे.

वर्धा येथे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीकडे आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या सामाजिक जीवनातील योगदानाकडे पाहाण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.

नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले.

हैदराबाद संस्थानात नोकरी मिळेल या शक्यतेने त्यांचे पूर्वज बीडला म्हणजे हैदराबाद संस्थानात आले खरे पण पुढे याच कुटुंबाचा हैदराबाद मुक्तीसंग्राम, मराठवाड्यातील सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय वाटचालीत महत्त्वाचा वाटा राहिला.

हैदराबाद संस्थान हे इतर भारतीय संस्थानांपेक्षा वेगळे होते. राजकीय दडपशाहीबरोबर सांस्कृतिक दडपशाहीचा रेटा मोठा होता.

तेलगू, मराठी, कन्नड अशा बहुभाषिक आणि संख्येने अधिक असणारे लोक या संस्थानात असले तरी सर्व कामकाजात उर्दूला महत्त्वाचं स्थान होतं.

शिक्षण आणि इतर कामकाज याच भाषेतून करण्याची सक्ती असे. त्यामुळे इतर संस्थांने आणि प्रांतांपेक्षा या संस्थानातले लोक दुहेरी पारतंत्र्यात जगत होते.

त्यातही काही लेखक, वर्तमानपत्रं, साप्ताहिकांनी या सांस्कृतिक काळोखात उजेडाच्या झरोक्यांसारखं काम सुरू ठेवलं होतं. परंतु हैदराबादच्या मुक्तीसाठी झालेल्या पोलीस अक्शन हे संस्थानी जाचाचं कवाड पाडून टाकलं.

यामुळे खुल्या विचारांचं, मराठीच्या विकासाचं वातावरण हैदराबाद संस्थानातील मराठी जिल्ह्यांमध्ये सुरू झालं.

या खुल्या वातावरणाच्या पहिल्या पिढीत नरेंद्र चपळगावकर यांच्यासारखे लोक अग्रक्रमावर राहिले.

निजामाचं संस्थान ते स्वतंत्र भारतातील महाराष्ट्र या स्थित्यंतराच्या संधीकाळासह दोन्ही काळांचा अनुभव यांना घेता आला.

हैदराबाद ते महाराष्ट्र

नरेंद्र चपळगावकर यांचा बीडमध्येच 14 जुलै 1938 रोजी जन्म झाला. त्यांचे चुलत आजोबा आणि वडील हैदराबाद संस्थानामध्ये वकिली करत असत. हैदराबाद संस्थान भारतात सामील झाल्यावरही त्यांच्या वडिलांनी बीड येथे वकिली सुरू ठेवली होती. त्यांच्या कुटुंबातील काही लोक संस्थानच्या सरकारी नोकरीतही होते.

नरेंद्र चपळगावकर यांचं शिक्षण बीडमधील चंपावती विद्यालय, मदरसे फोकानिया येथे झाले. त्यानंतर त्यांनी अमरावती येथे इंटर, औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय येथे पदवीचे शिक्षण घेतले.

त्यानंतर औरंगाबादमध्येच त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले तर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए पदवी संपादन केली.

शालेय जीवनात त्यांना लागलेली भाषेची गोडी महाविद्यालयीन शिक्षणाच्यावेळेस वृद्धिंगत होत गेली.

सुधीर रसाळ यांच्यासारखे समिक्षक मित्र आणि अध्यापक म्हणून त्यांना लाभले त्याचप्रमाणे वा. ल. कुलकर्णी यांच्याकडूनही त्यांनी मराठी साहित्याचे धडे गिरवले.

लेखनाची सुरुवात

लहानपणापासून वाचन, वक्तृत्व याची आवड असणाऱ्या चपळगावकर यांनी शिक्षणाबरोबरच इतर अनेक क्षेत्रातील मित्र जोडले.

सुरुवातीपासून कायदा आणि मराठी भाषा या दोन्ही विषयांवर त्यांचं एकाचवेळी एकसमान प्रेम राहिले. यामुळेच ते पत्रकारिता, अध्यापन, लेखन, वकिली, संपादन अशा विविध प्रकारचं काम करू शकले आहेत.

चंपावती विद्यालय, लातूरचे दयानंद महाविद्यालय, औरंगाबादचे माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय येथे त्यांनी काहीकाळ अध्यापनाचे काम केले.

बीडमधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. सकाळ आणि केसरीसाठी त्यांनी नियमित बातमीदारीचं कामही केलं.

याशिवाय किर्लोस्कर मासिक, मनोहर साप्ताहिक तसेच प्रतिष्ठान, स्वराज्यसारख्या नियतकालिकांमध्ये त्यांनी लेखन केलं.

मुकुंदराव किर्लोस्कर, शांताबाई किर्लोस्कर, प्रभाकर उर्ध्वरेषे यांच्याशी त्यांना दीर्घकाळ स्नेह राहिल्यामुळे अनेक साहित्यिक उपक्रमात त्यांना मोलाचा वाटा उचलता आला.

नरेंद्र चपळगावकर यांचे वडील पुरुषोत्तम चपळगावकर हे काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सहभाग घेतला होता.

त्यांना अनेकवेळा कारावासही भोगावा लागला. परंतु त्यांच्या या राजकीय आणि स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे चपळगावकर कुटुंबाचा अनेक नेत्यांशी संबंध आला.

या नेत्यांमध्ये अनंत भालेराव, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.

राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आणि अशा महान नेत्यांचा जवळचा सहवास याचे संस्कार त्यांच्यावर झाले.

वकिली

न्या. चपळगावकर यांनी सुरुवातीच्या काळात अध्यापनाचे काम केल्यानंतर त्यांनी औरंगाबादमधून पुन्हा बीडला जाण्याचा निर्णय घेतला.

तेथे त्यांचे वडील वकिलीची प्रॅक्टिस करत होते. त्यांच्याकडेच वकिली करण्याचा निर्णय नरेंद्र चपळगावकर यांनी घेतला.

16 वर्षे बीडला वकिली करताना त्यांना विविध खटल्यांचा अनुभव आला. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे जीवन आणि त्यांचे अंतरंग पाहाण्याची संधी त्यांना मिळाली.

त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये काही काळ वकिली केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायपिठ स्थापन झाल्यावर त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

वकिली, न्यायदान, लेखन अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली.

ग्रंथ

माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांच्या ग्रंथलेखनाची सुरुवात कायदेविषयक पुस्तकांनी झाली. अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याची ओळख करुन देणारं एक पुस्तक आणि निवडणूक कायद्यावरील लॉ ऑफ इलेक्शन्स या इंग्रजी पुस्तकाचं त्यांनी सुरुवातीला लेखन केलं.

त्यानंतर सुधीर रसाळ यांच्याबरोबर त्यांनी अनंत भालेराव यांच्या निवडक अग्रलेखांचं पुस्तक संपादित केलं. त्याबरोबरच भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक त्यांनी लिहून प्रसिद्ध केलं.

स्वामी रामानंद तीर्थ यांचा मराठवाडा, हैदराबादच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर सखोल प्रभाव आहे. स्वामीजी आणि चपळगावकर यांच्या कुटुंबाचा चळवळीच्या काळापासून संबंध असल्यामुळे चपळगावकर यांनी त्यांचे कर्मयोगी संन्यासी नावाने चरित्र लिहिले.

त्यासाठी त्यांनी हैदराबाद, दिल्ली येथिल कागदपत्रांचा अभ्यास केला आणि हे पुस्तक सिद्ध केले.

राज्यघटनेचे अर्धशतक, विधिमंडळे आणि न्यायसंस्थाः संघर्षाचे सहजीवन , तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, सावलीचा शोध, न्यायाच्या गोष्टी, कहाणी हैदराबाद लढ्याची, संस्थानी माणसं अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी आठवणीतले दिवस नावाने आत्मचरित्रपर आठवणी लिहिल्या आहेत.

त्यांना या लेखनाबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनचा दिलिप चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

साहित्य संमेलन आणि नरेंद्र चपळगावकर यांचा सुरुवातीपासून संबंध आलेला आहे. किंवा संमेलनाला उपस्थित राहाणं, तिथं साहित्यिकांना भेटणं याचा त्यांच्या मराठीत लेखन आणि भाषाप्रेमाच्या वाढीला हातभार लागला असं म्हणता येईल.

औरंगाबादमध्ये झालेल्या साहित्य संमेलनानंतर त्यांनी मिरज, इचलकरंजी, सांगली, मालवण अशा विविध ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनांना त्यांना उपस्थित राहाता आलं.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कामकाजात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाची कार्यकारिणीत त्यांनी सहभाग घेतला आहे. मराठवाडा साहित्य संमेलनातही ते सहभागी झाले.

2004 साली माजलगाव येथे झालेले मराठवाडा साहित्य संमेलन 2012 साली त्यांनी पुण्यात झालेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, औरंगाबाद येथे 2014 साली झालेले जलसाहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले. आता 96 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले आहेत.

संवादाचं महत्त्व

माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर गेल्या शंभर ते दीडशे वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वृत्तीत झालेल्या बदलाचा अभ्यास करत आहेत. त्यातील प्रदीर्घ काळ त्यांनी स्वतः पाहिला आहे. त्यांनी स्वतः निरीक्षणं नोंदवली आहेत आणि आपली मतंही मांडली आहेत.

अलिकडे सामाजिक जीवनातला आणि व्यक्तिजीवनातला संवाद कमी झाला आहे हे सांगतात. संवादातल्या विषयाबरोबरच दुसऱ्याशी संवाद करावासा वाटण्यासाठी लागणारा जिव्हाळा कमी झाल्याचं निरीक्षण ते मांडतात.

ते लिहितात, “जेथे विचारांची देवाणघेवाण व्हावी अशी अपेक्षा आहे, अशा क्षेत्रातला संवादही जर कमी झाला, आपले मतभेद मोकळेपणाने व्यक्त होणेच थांबले तर अशा वर्धिष्णू क्षेत्रातही खुरटेपण येईल. धर्म आणि जाती यांच्या भिंती ओलांडून एकसंध होणाऱ्या समाजाचे स्वप्न राज्यघटनेने पाहिले. प्रत्यक्षात आपण उलट्या दिशेने प्रवास करत आहोत. जर परधर्मीय किंवा परजातीय व्यक्तीच्या मुलभूत मानवी चांगुलपणाबद्दलच आपल्या मनात शंका निर्माण बोत असेल किंवा केली गेली असेल तर संवाद कसा होणार?”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)