पाकिस्तानची अर्थव्यवस्था बिकट, पण शेअर बाजारात तेजी; इथे पैसे कोण गुंतवतंय?

पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, तन्वीर मलिक
    • Role, पत्रकार, पाकिस्तान

पाकिस्तानच्या शेअर बाजारात सध्या ऐतिहासिक तेजीची मालिका सुरू आहे. गेले काही आठवडे शेअर बाजारातील तेजीमुळे निर्देशांक जवळपास दररोज एक नवीन उच्चांकी पातळी ओलांडतोय.

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकाने एका दिवसात 65 हजार आणि 66 हजार अंकांची पातळी ओलांडली आणि पाकिस्तान शेअर बाजाराचा निर्देशांक इतिहासातील सर्वोच्च पातळी गाठत 66 हजार 223 अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारातली तेजीची ही मालिका ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरू झाली. त्यावेळी शेअर बाजाराचा निर्देशांक 50 हजार अंकांच्या पातळीवर होता, मात्र दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत निर्देशांकात 16 हजार अंकांची विक्रमी वाढ झाली.

ऑक्टोबरच्या मध्यापासून शेअर बाजारात सुरू असलेल्या वाढीचा संबंध बाजार विश्लेषक पाकिस्तानच्या आर्थिक निर्देशांकांमध्ये झालेल्या काही सुधारणांशी जोडतात.

पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) यांच्यातील कर्मचारी स्तरावरील कराराचा विशेष उल्लेख इथे केला जातोय, ज्या अंतर्गत पाकिस्तानला सत्तर दशलक्ष डॉलर्सचा कर्जाचा हफ्ता मिळणार आहे, जो पाकिस्तानच्या परराष्ट्र वित्तपुरवठा क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातोय.

शेअर बाजारातील ऐतिहासिक तेजीची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ही तेजी तेव्हा आलेली आहे जेव्हा पाकिस्तानची अर्थव्यवस्था अडचणी आणि संकटांना सामोरी जातेय.

देशातील उद्योग संकटात सापडलाय. दुसरीकडे सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक महागाईमुळे अडचणींचा सामना करत आहेत. या आठवड्यात गॅस आणि विजेच्या दरात वाढ झाल्याने अडचणी आणखी वाढल्या आहेत.

पाकिस्तानमधील पेट्रोलियम पदार्थ आणि खाद्यपदार्थांच्या किमतींनीही आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे.

पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

आता प्रश्न असा आहे की शेअर बाजारातील विक्रमी वाढ पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती मांडतं का आणि त्याचा फायदा सामान्य पाकिस्तानी नागरिकांनाही झालाय किंवा भविष्यात होईल का?

तेजी कायम राहील का?

चालू आठवड्यात शेअर बाजाराच्या निर्देशांकात 4 हजार 532 अंकांची वाढ झाली, जो एक नवीन विक्रम आहे, परंतु बाजारातील ही विक्रमी वाढ आर्थिक कारणांमुळे झाली की सट्टेबाजीच्या माध्यमातून आणली गेलेय.

याबाबत अर्थतज्ज्ञ सना तौफिक यांनी बीबीसी सोबत चर्चा केली.

त्यांनी म्हटलं की, 'आपण जर बाजारातील सध्याच्या तेजीची कारणं पाहिली तर असं लक्षात येईल की ही वाढ एखाद्या बुडबुड्यासारखी नाहीये की जो पटकन फुटून जाईल. भविष्यातही ही तेजी कायम राहू शकते.'

याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाजार खूप काळापासून या तेजीची वाट पाहत होता. खराब आर्थिक परिस्थितीचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झालेला आणि बाजारातील शेअर्सच्या किंमतींनी निच्चांक पातळी गाठली होती, असंही त्या म्हणाल्या.

‘निर्देशांक 75 हजार अंकांपर्यंत पोहचू शकतो'

बाजारातील तेजीमागे काही कारणं आहेत आणि अर्थव्यवस्थेत होणा-या सुधारणेवर शेअर बाजाराने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, असं आर्थिक तज्ज्ञ आणि बँक ऑफ पंजाबचे मुख्य अर्थतज्ज्ञ श्याम अली यांनीही मान्य केलं.

ते म्हणाले की, ‘आयएमएफ’ आणि पाकिस्तान यांच्यातील कर्मचारी स्तरावरील कराराने बाजाराला आधार दिला. पाकिस्तानच्या काही आर्थिक निर्देशांकांमध्ये सुधारणा झाल्यामुळे ही तेजी आलेय हेही तितकंच खरं आहे.

पाकिस्तान शेअर बाजार

फोटो स्रोत, Getty Images

आर्थिक बाबींचे तज्ज्ञ समीउल्लाह तारिक यांच्या मते, शेअर बाजार आणखी वर जाऊ शकतो आणि येत्या काही महिन्यांत बाजार 70 हजार ते 75 हजार अंकांपर्यंत पोहचू शकतो.

शेअर बाजारात तेजी का आली?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पाकिस्तानच्या आर्थिक निर्देशांकांत अलिकडच्या काही आठवड्यांमध्ये किंचित सुधारणा झालेय. चालू खात्यातील तूट कमी होऊन विनिमय दरात थोडीफार सुधारणा झाली आहे, परंतु पाकिस्तानातील रूतलेला औद्योगिक विकासाचा गाडा अजूनही मंदीचा सामना करत असून सामान्य माणूस महागाईने त्रस्त आहे.

परंतु शेअर बाजारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल काय समजतं, या प्रश्नावर सना तौफिक म्हणाल्या की, मुळात शेअर बाजार असं सूचित करतो की, अर्थव्यवस्थेत सुधारणा होतेय आणि भविष्यात आर्थिक आघाडीवर सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल.

त्यांनी म्हटलं, की तसं पाहायला गेल्यास अर्थव्यवस्थेत काही सुधारणा झाल्या आहेत, त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे विनिमय दर मजबूत होणं आणि देशाच्या परराष्ट्र वित्तपुरवठा क्षेत्रात झालेल्या काही सुधारणा आहेत. देशाची चालू खात्यातील तूट कमी झालेय.

आर्थिक स्थितीत सुधारणा होत असल्याचे संकेत बाजाराकडून दिले जातायत. परंतु हे देखील तितकंच खरं आहे की यावेळी महागाई ही सर्वात मोठी समस्या आहे, जी पाकिस्तानी लोकांसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे, असंही त्या म्हणाल्या

महागाई ही पाकिस्तानातली सध्याची सर्वात मोठी समस्या आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महागाई ही पाकिस्तानातली सध्याची सर्वात मोठी समस्या आहे

सायम अली म्हणाले की, अर्थव्यवस्था पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही, पण एवढं नक्की झालंय की त्यामध्ये थोडीफार सुधारणा झालेय, कारण मागच्या दोन वर्षांपासून जे आर्थिक संकट ओढवलंय त्याची व्याप्ती कमी झालेय आणि बाजाराने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय.

बाजारातील तेजीचा सर्वसामान्यांना काय फायदा?

पाकिस्तानमध्ये सध्या चलनवाढीचा दर तीस टक्के आहे. वीज आणि गॅसची बिलं, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणि खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या अवाजवी किमतींमुळे सर्वसामान्य पाकिस्तानी त्रस्त आहेत.

सायम अली यांचं म्हणणं आहे की, बाजारातील तेजीचा सर्वसामान्यांना कोणताही थेट फायदा होत नाही, परंतु कंपन्यांना चांगलं उत्पन्न मिळत असेल आणि ते बोनस शेअर्स आणि नफ्याच्या रूपात वाटलं जात असेल, तर ज्या सामान्य लोकांनी शेअर्स खरेदी केले आहेत, त्यांना फायदा होतो.

"याबरोबर कंपन्यांना जर चांगलं उत्पन्न मिळत असेल तर ते भविष्यात भांडवली गुंतवणूक करून त्यांचं उत्पादन वाढवू शकतात, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत काही सुधारणा होऊ शकते ज्याचा इतरप्रकारे सामान्य माणसाला फायदा होऊ शकतो.”, असंही ते म्हणाले.

पाकिस्तान चलन

फोटो स्रोत, Getty Images

मात्र शेअर बाजारातील सध्याच्या तेजीचा सामान्य माणसाच्या कोणताच फायदा नाही, असं सायम अली यांनी स्पष्ट केलं.

सना तौफिक म्हणाल्या की, सध्या शेअर बाजारात भांडवली गुंतवणूकदारांची संख्या सुमारे अडीच लाख आहे, जी 22 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात काहीच नाही.

याचा अर्थ असा आहे की, पाकिस्तानच्या शेअर बाजारातल्या तेजीचा एका सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीवर कोणताही थेट परिणाम झालेला नाही परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर शेअर बाजार चांगली कामगिरी करून आर्थिक सुधारणांच्या दिशेने वाटचाल करत असेल तर भविष्यात कदाचित महागाई कमी होण्याची शक्यता आहे.

कोणत्या क्षेत्रांमुळे तेजी आली?

विविध कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाल्याने पाकिस्तान शेअर बाजारात तेजी आली आहे.

काही क्षेत्रांनी चांगली कामगिरी केल्यामुळे शेअर बाजाराने सध्या ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.

सना यांनी याबाबत सांगितलं की, यावेळी सर्वाधिक वाढ बँकांच्या शेअर्समध्ये दिसून आलेय. देशातील उच्च व्याजदरांमुळे बँकांना अधिक उत्पन्न मिळतंय.

त्याचप्रमाणे तेल आणि वायू क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीही खूप वाढल्या आहेत, ज्यामध्ये परकीय भांडवली गुंतवणुक असल्याचं कळतंय, असंही त्या सांगतात. तेलाच्या वाढत्या दरांमुळे तेल क्षेत्रातील कंपन्या आणि रिफायनरींच्या शेअर्सनी सध्या उच्चांकी पातळी गाठली आहे.

विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या चालू आठवड्यातील शेअर्सच्या किमतीत झालेली वाढ बघितली तर बँकांच्या शेअर्सच्या किमती अवघ्या एका आठवड्यात 1704 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

तेल आणि वायू क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती जवळपास एक हजार टक्क्यांनी वाढल्या आहेत. खत आणि तेल कंपन्यांच्या समभागांच्या किमतीतही लक्षणीय वाढ नोंदवण्यात आलेय.

परदेशी गुंतवणूकही केली जातेय?

शेअर बाजाराच्या ऐतिहासिक तेजीत स्थानिक भांडवली गुंतवणूकदारांकडून खरेदीचा कल वाढत असताना, सोबतच आता विदेशी भांडवली गुंतवणूकदारही त्यात अधिक सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय.

पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

सना तौफिक म्हणाल्या की, सध्या बाजारात स्थानिक आणि परदेशी असे दोन्ही भांडवली गुंतवणूकदार आहेत आणि यावर्षी वीस ते तीस दशलक्ष डॉलर्सची परदेशी भांडवली गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.

लक्षात घ्या की, पाकिस्तान शेअर बाजारातील विदेशी भांडवली गुंतवणुकीच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात बाजारात 35 दशलक्ष डॉलर्सची भांडवली गुंतवणूक झाली, जी गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक भांडवली गुंतवणूक होती.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात एक कोटी 10 लाख डॉलर्सपेक्षा अधिक भांडवली गुंतवणूक केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)