You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान निवडणूक: नवाझ शरीफ आणि इम्रान खान एकमेकांच्या भूमिकेत कसे पोहचले?
- Author, फरहत जावेद और फ्लोरा ड्रूरी
- Role, इस्लामाबाद आणि लंडनहून
पाकिस्तानातील राजकारण यापूर्वी कधीही न पाहिलेल्या टप्प्यातून जात आहे. देशातील जनतेमध्ये राजकारणाबद्दल एकीकडे राग आणि निराशा आहे. तर दुसरीकडे त्यांना या निवडणुकीकडून आशाही आहेत.
24 कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानमध्ये सलग तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. लष्करी राजवट आणि हुकूमशाहीचा इतिहास पाहिला तर ही देशासाठी मोठी गोष्ट आहे.
मात्र, 8 फेब्रुवारीच्या निवडणुका कथित लष्करी हस्तक्षेपाच्या सावटाखाली होत आहेत. पाकिस्तानच्या इतिहासात वादग्रस्त ठरली नसेल अशी एकही निवडणूक नाही.
सध्या देशाचे एक माजी पंतप्रधान तुरुंगात आहेत तर दुसरे माजी पंतप्रधान स्वघोषित वनवास संपवून आपल्या देशात परतले आहेत.
गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या राजकारणात राजकीय गोंधळ सुरू आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या भविष्यासाठी ही निवडणूक का महत्त्वाची आहे, हे जाणून घेऊया.
भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानची सीमा इराण आणि तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानशी जोडली गेली आहे. पाकिस्तानचे अमेरिकेशी लव्ह अँड हेट प्रकाराचे संबंध आहेत, तर चीनसोबत जवळचे संबंध आहेत.
गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानात सत्तेसाठी नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. 2022 मध्ये, तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी करून आघाडी सरकार स्थापन करण्यात आले.
यानंतर गेल्या वर्षी काळजीवाहू सरकारनं सत्ता हाती घेतली. त्यांनी नोव्हेंबरपर्यंत देशात निवडणुका घेणं अपेक्षित होतं, पण निवडणुका लांबत गेल्या.
देशाच्या सुरक्षेपासून ते आर्थिक मुद्द्यांपर्यंत, महत्त्वाच्या धोरणांवर कठोर निर्णय घेता यावे, यासाठी सध्या देशाला स्थिर सरकारची सर्वाधिक गरज असल्याचा पाकिस्तानमधील बहुतेक लोकांचा विश्वास आहे.
मात्र, निवडणुकीच्या शर्यतीत सामील नेत्यांकडे पाहिलं तर हे स्थैर्य दूरच असल्याचं स्पष्टपणे दिसतं.
नवाझ शरीफ, पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) - पीएमएल-एन
नवाझ शरीफ पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. 2018 च्या निवडणुकीत ते उमेदवार नव्हते.
ते तुरुंगात होते. ते कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळले होते आणि त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती.
प्रकृती खालावल्यानंतर ते 2019 मध्ये उपचारासाठी लंडनला गेले आणि तिथंच राहत होते.
गेल्या वर्षी ते मायदेशी परतले. 2022 मध्ये, इम्रान खान सत्तेतून बाहेर पडल्यानंतर नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली.
2024 च्या निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच, नवाझ शरीफ यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्याची आजीवन बंदी देखील घटनाबाह्य घोषित करण्यात आली.
लष्कर आणि इम्रान खान यांच्यातील वाढत्या अंतरामुळे नवाझ शरीफ यांचा चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असा पाकिस्तानमधील अनेकांचा अंदाज आहे.
असं असलं तरी, लष्कर भूमिका बदलू शकते हे शरीफ यांना माहीत आहे. शरीफ यांच्या तिसऱ्या कार्यकाळापासून (2013) लष्कर आणि त्यांच्यात बराच तणाव होता. त्यानंतर शरीफही सत्तेबाहेर होते.
त्यांच्या कार्यकाळात 1999 मध्ये लष्करी उठाव झाला होता.
इम्रान खान
पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे नेते आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान तुरुंगात आहेत. ते आपल्यावरील आरोपांना 'राजकीय सूड' आणि 'षड्यंत्र' म्हणत आहेत.
इम्रान खान यांच्या सत्तेत येण्याची आणि सत्तेबाहेर जाण्याची लष्कराशी संबंधित आहे.
2018 मध्ये, त्यांच्या टीकाकारांनी त्यांना 'लष्कराचा मुखवटा' म्हटलं होतं आणि आता ते तुरुंगात असताना, माजी पंतप्रधान तुरुंगात असण्यामागे लष्कर हे मुख्य कारण असल्याचा आरोप त्यांचे समर्थक करतात.
पाकिस्तानचे भविष्य बदलू शकणारा नेता अशी खान यांची प्रतिमा 2018 मध्ये तयार केली जात होती.
घराणेशाहीचे राजकारण संपवणं, भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकणं, न्यायव्यवस्थेत बदल करणं, तरुणांना नोकऱ्या देणं आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं, यांविषयी ते आपल्या भाषणात बोलत होते.
मात्र त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती बिघडली, महागाई वाढली आणि अनेक विरोधी नेते तुरुंगात गेले, प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आली आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनासह पत्रकारांवर हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या.
पाकिस्तान-तालिबानसोबतच्या शांतता वाटाघाटी असोत किंवा अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला पाठिंबा असो, खान यांच्यावर या बाबींसाठी मोठ्या प्रमाणावर टीका झाली.
अलीकडच्या काळात इम्रान खान यांची लोकप्रियता कमी झाल्याचं पाकिस्तानातील काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
ते तुरुंगातून बाहेर आले असते, तरी 2023 मध्ये त्यांचा पराभव निश्चित होता, असं या विश्लेषकांचं म्हणणं आहे.
पण, सर्वेक्षण करणारी कंपनी गॅलपनं जानेवारी 2024 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात म्हटलंय की, इम्रान खान अजूनही पाकिस्तानचे सर्वांत लोकप्रिय नेते आहेत.
मात्र, गेल्या सहा महिन्यांत शरीफ यांची लोकप्रियता वाढली आहे.
पीटीआयला प्रचारासाठी योग्य संधी दिली जात नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पक्षातील अनेक बडे नेते तुरुंगात आहेत किंवा त्यांनी पक्षाशी संबंध तोडले आहेत.
पीटीआयच्या नेत्यांना आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. 'क्रिकेट बॅट' हे निवडणूक चिन्हही पक्षानं गमावले आहे.
बिलावल भुट्टो
बिलावल भुट्टो झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) पक्ष गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर होता. झरदारी हे पक्षाचे अध्यक्षही आहेत.
बिलावल हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे पुत्र आहेत. 2007 मध्ये बेनझीर यांची हत्या झाली होती. बिलावल भुट्टो हे देशाचे मंत्री राहिले आहेत.
बिलावल यांचा पक्ष मोठमोठी आश्वासने देऊन निवडणुकीत उतरला आहे. यात पगार दुप्पट करणं, सरकारी खर्चात कपात करून बजेट वाढवणं, यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे.
सध्याची परिस्थिती पाहता ही धोरणं अंगीकारण्याची संधी पक्षाला मिळेल, हे सध्या तरी अशक्य दिसतंय. पण युतीचं सरकार स्थापन झाल्यास ते किंगमेकर ठरू शकतात, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
बीबीसीशी बोलताना भुट्टो म्हणाले होते की, “पीएमएलएन आणि पीटीआय यापैकी एकाची निवड करणं हा खूप कठीण निर्णय असेल.”
गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सध्याच्या काळातही फारसा बदल झालेला नाही, असं पाकिस्तानच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेल्या लोकांना वाटतं.
यावेळीही डझनभर उमेदवार अपात्र ठरले आहेत. ते एकतर तुरुंगात आहेत किंवा काही कारणामुळे निवडणूक लढवत नाहीयेत.
अशात पाकिस्तानातील लोकांना अपेक्षा आहे ती अशा सरकारची जे स्थिर असेल आणि त्यांना वाढती महागाई, बिघडलेली अर्थव्यवस्था आणि वाईट सुरक्षा व्यवस्था यांपासून दिलासा देईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)