VPF म्हणजे काय? PPF पेक्षा जास्त परतावा देणारा, टॅक्स वाचवणारा 'हा' पर्याय माहीत आहे का?

दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी आणि सोबतच टॅक्स वाचवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण PPF मध्ये पैसे गुंतवतात. पीपीएफ म्हणजे Public Provident Fund.

पण अजून एक पर्याय आहे, ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही पीपीएफच्या तुलनेत अधिक परतावा मिळवू शकता. हा पर्याय म्हणजे व्हॉल्युएंट्री प्रोव्हिडंट फंड (VPF).

हा पर्याय काय आहे? तो कोणासाठी योग्य आहे? VPF - PPF मध्ये फरक काय आहे? हे आपण समजून घेऊया.

पीपीएफ म्हणजे काय?

पीपीएफ म्हणजे 'पब्लिक प्रोविडंट फंड' म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. हा एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा अतिशय उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.

पीपीएफचं खातं उघडण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते. त्यामुळे कोणत्याही वयाची व्यक्ती खातं उघडू शकते.

पीपीएफमध्ये दरवर्षी कमीत कमी 500 रूपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. या योजनेवर सध्या 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.

हे खाते 15 वर्षांत मॅच्युअर होते. अनेक जण 15 वर्षांनंतर पैसे काढून खर्च करतात. तर काही पीपीएफची मुदत वाढवून घेतात.

तुम्ही पीपीएफ खात्यात दरमहिन्याला पैसे टाकू शकता किंवा वर्षभराची सगळी रक्कम एकदाच भरू शकता.

पीपीएफ खाते 15 वर्षांचे असते, म्हणजे हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचे सगळे पैसे काढू शकता.

पण तुम्हाला कोणत्याही कारणासाठी अचानक पैसे लागले तर सहा वर्षानंतर पीपीएफ खात्यातील काही पैसे काढू शकता.

पैसे काढताना तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, यावर पैसे काढण्याची मर्यादा ठरत असते.

जर तुम्ही तुमचं पीपीएफ खातं मॅच्युरिटीपुर्वीच बंद केलं, तर तुम्हाला मिळणारं व्याज कमी होऊ शकतं. त्यामुळे पैसे काढण्याआधी नीट विचार करूनच ठरवावं लागतं.

व्हीपीएफ म्हणजे काय?

नोकरी करणाऱ्यांच्या पगारातून दरमहा EPF म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडचे पैसे कापून जातात.

पण EPF मध्येच गुंतवणुकीचा सुरक्षित, कर बचत आणि चांगला परतावा देणारा आणखीन एक पर्याय आहे. तो म्हणजे, व्हॉल्युएंट्री प्रोव्हिडंट फंड अर्थात व्हीपीएफ.

हा फंड म्हणजे पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याच्या एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडाच्या कॉन्ट्रिब्युशनच्या वर स्वतःहून केलेली गुंतवणूक.

EPF कंपल्सरी असतो, तर हा दुसरा पर्याय नावाप्रमाणेच व्हॉल्युएंट्री म्हणजे ऐच्छिक असतो.

तुमच्या पगारातून PF चे 12% रक्कम कापून जाते. त्यापुढची ही रक्कम असते. आणि ही फक्त कर्मचाऱ्याकडून दिली जाते. कंपनी किंवा एम्प्लॉयर हे अधिकचं कॉन्ट्रिब्युशन देत नाही.

यामध्ये तुम्हाला PPF पेक्षा अधिक परतावाही मिळू शकतो आणि सोबतच PPF सारखे टॅक्स वाचवण्याचे फायदेही मिळू शकतात.

PPF च्या तुलनेत VPF मध्ये जास्त परतावा मिळतो. सध्या - नोव्हेंबर 2025 मध्ये PPF चा व्याजदर आहे - 7.1%

VPF चा सध्याचा व्याजदर आहे 8.25%.

VPF चा व्याजदर हा नेहमीच EPF च्या व्याजदराइतका असतो आणि PPF पेक्षा जास्त असतो. गेल्या काही वर्षांत PPF पेक्षा VPF - EPF चे व्याजदर जास्त राहिले आहेत.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये -

  • EPF - 8.15%
  • PPF - 7.1%

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये -

  • EPF - 8.25%
  • PPF - 7.1%

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये -

  • EPF - 8.25%
  • PPF - 7.1%

व्हीपीएफमध्ये गुंतवणूक कशी करायची?

VPF मध्ये गुंतवणूक करणं सोपं आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या ऑफिसच्याच अकाऊंट्स डिपार्टमेंटशी संपर्क साधावा लागेल. तुमचं VPF अकाऊंट उघडून तुम्हाला किती रक्कम दरमहा टाकायची आहे, ते त्यांना सांगा.

त्यानंतर दरमहा तुमची तेवढी ठराविक रक्कम VPF साठी कापली जाईल.

नोकरी बदलल्यानंतर तुमचा EPF आणि VPF एकाच UAN नंबरद्वारे ट्रान्सफर होईल.

मग यावर टॅक्स बेनिफिट काय आहे? तर PPF प्रमाणेच आहे. इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80C नुसार VPF वर तुम्हाला टॅक्स डिडक्शन मिळू शकतं.

VPF मध्ये केली जाणारी गुंतवणूक, त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी एकूण रक्कम या तीनही गोष्टी Tax free - करमुक्त आहेत.

याला EEE - Exempt - Exempt - Exempt कॅटेगरी म्हणतात.

EPF आणि VPF मध्ये दर आर्थिक वर्षाला रु.2,50,000 पर्यंतची करमुक्त गुंतवणूक करता येते.

EPF - VPF मधलं एखाद्या कर्मचाऱ्याचं कॉन्ट्रिब्युशन यापेक्षा जास्त असेल तर अडीच लाखांपेक्षा अधिकच्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स लागेल. एम्प्लॉयरच्या कॉन्ट्रिब्युशनची रक्कम टॅक्स फ्री असेल.

VPF चा लॉक-इन काळ - EPF प्रमाणेच आहे. म्हणजे PF मधले पैसे काढण्यासाठीच्या अटी इथेही लागू होतात.

तुमच्याकडे Partial Withdrawal - थोडे पैसे काढण्याचा पर्यायही असेल पण तुमचं खातं किमान 5 वर्षं असेल तरच टॅक्समध्ये सूट मिळेल.

(हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञाशी किंवा गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.