मुंबई, बॉम्बे आणि बम्बई: भारताच्या आर्थिक राजधानीच्या नावाचा इतिहास

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईत 'आय आय टी'च्या कार्यक्रमात 'बॉम्बे ते मुंबई' या तीन दशकांपूर्वी झालेल्या नामांतरणावरुन वक्तव्य केलं आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी करत असलेल्या या शहरात राजकीय वादंग उसळला.

''आय आय टी' च्या नावामध्ये पूर्वीचं बॉम्बे आहे असं ठेवलं, ते मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं' अशा आशयाचं विधान डॉ सिंग यांनी केलं होतं.

अगोदरच हा मुंबईत राजकीय असण्यासोबत भावनिक प्रश्न आहे. शिवसेना आणि 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'सारखे प्रादेशिक राष्ट्रवादाचे राजकारण करणारे पक्ष याबद्दल सातत्यानं आक्रमक राहिले आहेत. त्यांनीही या वादात तात्काळ उडी घेतली.

'मनसे प्रमुख' राज ठाकरे यांनी पुन्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे असं म्हणत समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहिली.

त्यात ठाकरे म्हणतात, "जितेंद्र सिंह यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे."

महानगरपालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असतांना भाषिक अस्मितेचा हा मुद्दा तापतांना पाहून भाजपानंही मग जरा सावरुन घेण्याची भूमिका घेतली. 'आय आय टी'च्या नावात 'मुंबई' अंतर्भूत करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या मुद्द्यावरुन राजकीय वाग्युद्ध लगेच संपेल असं दिसत नाही, पण त्यानिमित्तानं मुंबईच्या नावामागचा, त्यातल्या बदलामागचा रोचक इतिहास मात्र समजून घेण्यासारखा आहे.

'मुंबादेवी' इथली म्हणून मुंबई

मुंबईचा इतिहास शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले. कालौघात अनेक राज्यकर्ते इथे येऊन गेले. प्रत्येकाच्या काळात या भूभागाची रचना, त्याचं महत्व बदलत गेलं. काही संशोधकांनी हा इतिहास मागे नेत नेत अगदी अश्मयुगापर्यंत नेला.

1930 साली के. आर. यू. टॉड हे ब्रिटिश नौदल अधिकारी कुलाब्याला समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना त्यांना एक दगड सापडला. टॉड यांनी निरखून पाहिल्यावर हा दगड काही साधासुधा नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हा दगड म्हणजे थेट अश्मयुगीन माणसाचं हत्यार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

आजच्या मुंबईतल्या मच्छिमार-कोळी बांधवांचा या अश्मयुगातल्या लोकांशी संबंध असल्याची शक्यता 'मुंबई शहर गॅझेट' पुस्तकात जयराज साळगावकर व्यक्त करतात.

साळगावकर यांनी पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे हे कोळी आर्यपूर्व गुजरातमधून मुंबईत आले. येताना गुजरातमधून मुंबादेवीला मुंबईत आणलं आणि हेच मुंबादेवी मुंबईचं आद्य दैवत झालं.

इथल्या स्थानिक मच्छिमार अथवा कोळी समुदायाची देवी असलेल्या मुंबादेवीशी एक दैवतकथाही जोडलेली आहे. जेव्हा या प्रदेशावर एका राक्षसानं कब्जा केला तेव्हा कोळी समाजानं देवाचा धावा केला आणि 'मुंबादेवी' प्रगट झाली, असा या कथेचा आशय आहे.

या 'मुंबादेवी' मुळेच 'मुंबई'हे नाव मिळालं असं अनेकांनी लिहून ठेवलं. काही कागदपत्रांमध्येही हे उल्लेख मिळतात. मराठी भाषिक प्रामुख्याने पहिल्यापासून 'मुंबई' असंच म्हणत आले आहेत.

पुढे जेव्हा उत्तरेकडून इतर भाषिक जेव्हा मुंबईत आले तेव्हा याच शब्दाचं 'बम्बई' असंही एक रूप झालं. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये वा इथल्या रोजच्या हिंदी वापरामध्येही ते ऐकायला मिळतं.

पोर्तुगिजांमुळे 'बॉम्बे'

पुढे चौदाव्या शतकात या सात बेटांच्या प्रांतात पोर्तुगिजांचं आगमन झालं. त्याअगोदर इथं गुजरातच्या सुलतानाचं राज्य होतं. गुजरातच्या सुलतानाने 1534 साली मुंबईचा ताबा पोर्तुगीजांना दिला.

दीव, वसई, मुंबई असा प्रांत पोर्तुगीजांच्या हातामध्ये आल्यानंतर पोर्तुगीजांनी व्यापार आणि धर्म या दोन्हीचा प्रसार वाढवायला सुरुवात केली.

मुंबईतली भातशेती, इथून होणारा व्यापार याचा सगळा कर पोर्तुगीज मिळवू लागले. नौदलाचा एक चांगला तळही इथं बनला.

पोर्तुगिजांनी या भागाला 'बॉम बे' म्हणजे 'चांगली खाडी' असं त्यांच्या भाषेत म्हणायला सुरुवात केली. त्यावरुन ते 'बॉम्बे' असं नामकरण झाल्याचं म्हटलं जातं. हा शब्द पुढे युरोपातून इथे आलेल्या इंग्रजांच्याही वापरात आला.

1661 मध्ये पोर्तुगिजांकडून इंग्रजांनी मुंबई घेतली आणि इथं त्यांचं राज्य सुरु झालं. ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सुरु होतं. त्यांच्या कालखंडात सरकारी दफ्तरांमध्ये इंग्रजी हीच भाषा प्रामुख्यानं असल्यानं तिथंही 'बॉम्बे' हाच शब्द रुळला.

सध्याच्या महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या एकत्रित प्रदेशालाही, म्हणजे 'मुंबई प्रांता'ला, अगोदर 'बॉम्बे प्रेसिडन्सी' आणि नंतर 'बॉम्बे प्रॉव्हिन्स' असं म्हटलं जायचं.

1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात ही वेगळी राज्यं जन्म घेण्यापर्यंत या एकत्र राज्याला मुंबई अथवा बॉम्बे असं सरकारदरबारी म्हटलं जायचं.

मराठी भाषकांचा आग्रह आणि 'बॉम्बे' वा 'बम्बई'चं 'मुंबई' झालं

मराठी भाषिक मात्र कायम या शहराला 'मुंबई' असंच म्हणत राहिले आणि तसंच म्हणायचा आग्रहही सातत्यानं करत राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र' अशीच घोषणा होती. शहर आणि त्याच्या नावावर संख्येनं अधिक असलेल्या मराठी भाषिकांनीच हक्क सांगितला.

पुढे 'शिवसेने'चा उदय महाराष्ट्राच्या राजकारणात झाल्यावर 'मराठी अस्मिता'हाच त्यांच्या राजकारणाचा मुख्य बिंदू होता. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेनं या शहराचं अधिकृत नाव 'मुंबई'च असं करावं अशी जाहीर मागणी सुरु केली. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात त्याचा सातत्यानं उल्लेख राहिला.

शिवसेनेसोबतच भाजपाचे मुंबईतले ज्येष्ठ नेते राम नाईक यांनीही 90 च्या दशकापासून 'मुंबई' हेच शहराचं नाव करावं, अशी मागणी सुरू केली. मराठी भाषिकांची ही मागणी प्रत्यक्षात आली 1995 मध्ये जेव्हा राज्यात भाजपा शिवसेना युतीचं सरकार पहिल्यांदा आलं.

मनोहर जोशी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं या शहराचं अधिकृत नाव 'मुंबई' असं करावं हा प्रस्ताव पारित केला आणि पुढे तत्कालिन केंद्र सरकारनं 6 ऑक्टॉबर 1995 ला त्याला मान्यता देऊन अंतिम शिक्कामोर्तब झालं.

अर्थात 'मुंबई' हे अधिकृत नाव करण्याला विरोधही झाला होता. 1996 मध्ये हा नावबदल थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

पण अंतिमत: उच्च न्यायालयानं हा बदल मान्य केला आणि सरकारदरबारी सर्वत्र, राज्य आणि केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये 'मुंबई' हे नाव करण्यात आलं.

'मुंबई'च्या या निर्णयानंतर पुढील काही काळात 'मद्रास'चं चेन्नई आणि 'बंगलोर'चं बंगळुरू या अनुक्रमे तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांच्या राजधान्यांचं तेथील प्रादेशिक नावांमध्ये नामांतर झालं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)