पहलगाम ते महात्मा गांधी; मोहन भागवत विजयादशमीच्या भाषणात काय म्हणाले?

@RSSorg

फोटो स्रोत, @RSSorg

आज 2 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. त्यासाठी हेडगेवार स्मारक समिती इथं कार्यक्रमाची तयारी सुद्धा करण्यात आली आहे.

विजयादशमीच्या भाषणामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुरुवातीलाच महात्मा गांधी यांचा उल्लेख केला.

ते म्हणाले, "आज महात्मा गांधी यांची जयंती आहे. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांमध्ये ते अग्रगण्य होतेच, पण स्वातंत्र्यानंतर भारताचे भवितव्य 'स्व' म्हणजेच आत्मतेवर आधारित असावे, असा दृष्टिकोन मांडणाऱ्यांमध्येही त्यांचे विशेष स्थान आहे.

"आजच भारताचे माजी पंतप्रधान, दिवंगत श्री लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती आहे. साधेपणा, नम्रता, प्रामाणिकपणा आणि निर्धार यांचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या शास्त्रीजींनी देशासाठी आपले जीवन अर्पण केले."

तसेच, गुरू तेग बहादूर यांचाही उल्लेख त्यांनी प्रामुख्याने केला. ते म्हणाले, "या वर्षी श्री गुरु तेग बहादूर जी महाराज यांच्या बलिदानाचा 350 वा स्मृतिदिन आहे. परधर्मीय आक्रमकांच्या अत्याचारांपासून हिंदू समाजाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतःचीच ढाल केली आणि आपल्या प्राणांचे बलिदान दिले."

स्वावलंबनाला पर्याय नाही- भागवत

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, "22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये, परधर्मीय अतिरेक्यांनी हिंदू धर्माबद्दल विचारल्यानंतर 26 भारतीय नागरिक पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्यामुळे संपूर्ण भारतात शोक, दुःख आणि संतापाची लाट उसळली. काळजीपूर्वक नियोजनानंतर भारत सरकारने मे महिन्यात या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण कालावधीत देशाच्या नेतृत्वाची ठाम भूमिका, आपल्या सशस्त्र दलांचे शौर्य आणि युद्धसज्जता, तसेच समाजाची एकजूट आणि निर्धार याचे प्रेरणादायी दृश्ये पाहायला मिळाली."

तसेच, त्यांनी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, "प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्याने संपूर्ण भारतातून आलेल्या भाविकांच्या संख्येच्या बाबतीत सर्व पूर्वीचे विक्रम मोडीत काढत नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या सर्व निकषांवर मात करत, या मेळ्याने भारतभर श्रद्धा आणि एकतेची लाट निर्माण केली."

नक्षलवादी आंदोलनाबद्दल ते म्हणाले, "अत्यंत कठोर कारवाई आणि त्यांच्या विचारसरणीतील पोकळपणा व क्रूरतेबाबत जनतेमध्ये जागृती झाल्यामुळे नक्षलवादी आंदोलन मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आले आहे. या भागांमध्ये न्याय, विकास, सद्भाव, सहानुभूती आणि ऐक्य सुनिश्चित करण्यासाठी एक सर्वसमावेशक कृती आराखडा आवश्यक आहे."

@RSSorg

फोटो स्रोत, X/@RSSorg

"आर्थिक क्षेत्रातही प्रचलित परिमाणांवर आधारित आपली आर्थिक उन्नती होत आहे असे म्हणता येईल. आपल्या देशाला जागतिक प्रगतिशील अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सामान्य जनतेमध्ये असलेला उत्साह आपल्या उद्योगात विशेषतः नवीन पिढीमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. तथापि, या सध्याच्या आर्थिक व्यवस्थेच्या रचनेमुळे श्रीमंत आणि गरिब यामधील दरी वाढत आहे.आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. शोषकांसाठी अधिक सुरक्षित असलेल्या शोषणाची एक नवीन व्यवस्था स्थापन झाली आहे. पर्यायाने पर्यावरणाचे नुकसान झाले आहे व मानवी संवादात व्यावसायिकता,अमानुषता वाढली आहे. या त्रुटींमुळे आपण मागे पडत कामा नये. अमेरिकेने स्वतःच्या स्वार्थासाठी अलिकडेच लागू केलेले आयात शुल्क धोरण आपल्याला काही पैलूंवर पुनर्विचार करण्यास नक्कीच भाग पाडणार आहे. जग परस्परावलंबनावर चालते. तथापि वैश्विक जीवनाची एकता लक्षात घेऊन स्वावलंबी होऊन जीवन जगणे आवश्यक आहे. दुसऱ्या देशांवर असलेली आपली निर्भरता कमी करण्यासाठी स्वदेशी, स्वावलंबनाला दुसरा पर्याय नाही."

श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशच्या स्थितीचा उल्लेख

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सरसंघचालक म्हणाले, "जगभरात प्रचलित असलेल्या भौतिकवादी आणि उपभोगवादी विकास धोरणाचे प्रतिकूल परिणाम मूलतत्त्ववादी, व्यक्तिवादी दृष्टिकोनावर आधारित आहेत.ते अधिकाधिक गडद देखील होत आहेत. भारतातही याच धोरणामुळे गेल्या तीन ते चार वर्षांत अनियमित, अप्रत्याशित पाऊस, भूस्खलन आणि हिमनद्या सुकण्यासारखी उदाहरणे दिसून आली आहेत. दक्षिण आशियातील पुष्कळसा जलस्रोत हिमालयातून येतो. हिमालयात या आपत्तींची घटना भारत आणि दक्षिण आशियातील इतर देशांसाठी एक धोक्याचा इशारा आहे."

"अलिकडच्या काळात, आपल्या शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. श्रीलंका, बांगलादेश पाठोपाठ नेपाळमध्ये सत्तांतरास कारणीभूत ठरलेल्या जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे.अशा अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती भारतात तसेच जागतिक स्तरावर सक्रिय आहेत. सरकार आणि प्रशासनाचे समाजापासून, समाजाच्या प्रश्नांपासून दुर्लक्ष, कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासकीय प्रक्रियांचा अभाव ही असंतोषाची नैसर्गिक कारणे आहेत. तथापि हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. केवळ लोकशाही मार्गांनीच समाज आमूलाग्र बदल साध्य करू शकतो. हिंसक घटनांमुळे जागतिक वर्चस्ववादी शक्तींना गैरफायदा घेण्याची संधी मिळण्याची शक्यता असते. आपले शेजारी देश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडलेले आहेत. एक प्रकारे, ते आपले कुटुंबीयच आहेत. आपल्या शेजारी देशांमध्ये आपल्या स्वतःच्या हितांचे रक्षण करण्यापेक्षा शांतता, स्थिरता, प्रगती भारताच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

"विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जगातली प्रगती, मानवी जीवनाला आरामदायी बनवणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग, नवनवीन सोयी सुविधा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे राष्ट्रांमधील वाढलेली जवळीक, या सर्व गोष्टी वैश्विक सुखद परिस्थिती असल्याचे जाणवते.तथापि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेग आणि मानव त्यांच्याशी जुळवून घेत असलेल्या गतीमध्ये एक महत्त्वपूर्ण अंतर आहे.परिणामी सर्व सामान्य लोकांच्या जीवनात असंख्य समस्या उद्भवत आहेत.सध्या सुरु असलेली युद्धे,इतर लहान मोठे संघर्ष, पर्यावरणीय ऱ्हासामुळे निसर्गाचा होणार कोप, समाज व कुटुंबांचे विघटन, नागरी जीवनात वाढता भ्रष्टाचार, अत्याचार या देखील भयावह आहेत.या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न देखील केले गेले आहेत. परंतु ते त्यांची वाढ थांबवण्यात अथवा संपूर्ण उपाय प्रदान करण्यात अयशस्वी ठरले आहेत. विकृत, परस्परविरोधी विचारांना आश्रय देणाऱ्या शक्तींचे संकट, जे संबंध मानवतेत कलह आणि हिंसाचार वाढवत असताना, भविष्यात या समस्यांचे निराकरण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतातही आपण कमी-अधिक प्रमाणात या परिस्थितीचा अनुभवत आहोत. आता जग भारतीय विचारसरणीच्या माध्यमातून जगासमोर निर्माण झालेल्या भीषण समस्यांचे निराकरण शोधत आहे."

"आपल्या सर्वांना आशा, आत्मविश्वास देणारी गोष्ट म्हणजे आपल्या देशात विशेषतः नवीन पिढीमध्ये, देशभक्ती, श्रद्धा आणि आपल्या संस्कृतीवरील विश्वासाची भावना सतत वाढत आहे. विविध धार्मिक आणि सामाजिक संघटना,व्यक्ती ज्यामध्ये स्वयंसेवकांचा देखील समावेश आहे. तरुणाई वंचितांची निःस्वार्थपणे सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. यामुळे सामुदायिक सक्षमीकरणाची भावना, स्वतःच्या पुढाकाराने समस्या सोडवण्याची आणि गरजा पूर्ण करण्याची तरुणांची क्षमता आपसूक वाढत आहे.संघ स्वयंसेवकांना समाज हिताच्या कामात थेट सहभागी होण्याची वाढती इच्छा अनुभवायला मिळते. समाजातील बुद्धिजीवींमध्ये देखील आपल्या देशाच्या स्वरूप, गरजा, मानवी जीवन दृष्टिकोनांवर आधारित बाबींवर सखोल अभ्यास,शोध सुरु आहे."

@RSSorg

फोटो स्रोत, @RSSorg

"शताब्दी वर्षात, व्यक्तिमत्व विकासाचे कार्य देशात भौगोलिकदृष्ट्या व्यापक होऊन स्वयंसेवकांच्या उदाहरणाद्वारे सामाजिक वर्तनात उत्स्फूर्त बदल घडवून आणणारा पंच परिवर्तन कार्यक्रम व्यापक व्हावा यासाठी संघ प्रयत्नशील राहणार आहे."

"या कार्यक्रमाचे उद्दिष्ट व्यक्ती आणि कुटुंबांना या पाच क्षेत्रांमध्ये त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी सक्रियपणे सहभागी करून घेणे आहे. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्व बोध आणि स्वदेशी आणि नियम, कायदे, नागरिक अनुशासन आणि संविधानाचे पालन करणे काळाची गरज आहे. या कार्यक्रमात समाविष्ट केलेल्या कृती दैनंदिन आचरणात आणण्यासाठी सोप्या आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संघाच्या कार्यक्रमांमध्ये वेळोवेळी या कार्यक्रमांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली आहे. संघाच्या स्वयंसेवकांव्यतिरिक्त, समाजातील इतर अनेक संस्था आणि व्यक्ती देखील असेच कार्यक्रम राबवत आहेत. संघाचे स्वयंसेवक त्यांच्याशी सहयोग साधून समन्वयाचे कार्य करत आहेत."

"जगाच्या इतिहासात भारताचे वेळोवेळी महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे असा जागतिक धर्म प्रदान करणे ज्याने जगाचे हरवलेले संतुलन पुनर्संचयित केले व जागतिक जीवनात संयम आणि प्रतिष्ठेची भावना निर्माण केली. आपल्या पूर्वजांनी भारतात राहणाऱ्या विविध समाजांना एकत्र केले आणि हे कर्तव्य वारंवार पूर्ण करण्यासाठी सदैव जागरूक केले. स्वतंत्र भारताच्या समृद्धी आणि संभाव्य विकासाच्या नवोत्थानाचे हे चित्र होते जे आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे आणि राष्ट्रीय पुनर्जागरणाचे प्रणेत्यांसमोर होते."

RSS च्या व्यासपीठावरून रामनाथ कोविंद यांची महात्मा गांधींना आदरांजली

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणापूर्वी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहून संबोधन केले.

ते म्हणाले, "केशव बळीराम हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोघांचा माझ्यावर प्रभाव आहे

"दीक्षाभूमी, आणि हेडगेवार यांच्या श्रद्धेय स्थानाचे दर्शन करण्याचे भाग्य मला लाभले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हे भारतातील जनतेला एकत्र आणणारे, त्यांना अभिमान आणि गौरव व प्रगतीचा पुनरुत्थान देणारा एक पवित्र, विस्तारलेला वटवृक्ष आहे.

"डॉ. हेडगेवार यांच्या सखोल विचारांमुळे एक सामान्य व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांना समजून घेण्याचा माझा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे. आजच्या दिवशी, मी डॉ. हेडगेवार जी, श्री गुरुजी, श्री बाळासाहेब देवरस जी, श्री रज्जू भैय्या जी आणि श्री सुदर्शन जी यांना अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.

"डॉ. हेडगेवार जी यांनी संघटनेचे जे रोप लावले आणि वाढवले, त्याला श्री गुरुजींनी योग्य विस्तार दिला आणि त्याच्या मुळांना बळकट केले.

"डॉ. मोहन भागवत दूरदर्शी सामाजिक वैज्ञानिक आहेत. माझी संघासोबत 1992 च्या निवडणुकीत ओळख झाली. रा. स्व.संघात अस्पृश्यता आणि जातीय भेदभाव नाही. अटलजींनी आमचं सरकार आंबेडकरांच्या सिद्धांतावर काम करतं, आम्ही आंबेडकरवादी आहोत असं सांगितलं. संघ दलितविरोधी नाही हे सांगण्याचं काम अटलजींनी केलं."

रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या भेटीच्या संदर्भात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उल्लेख करत असे म्हटले की, "संघाच्या संदर्भात असलेले चुकीचे समज दूर करण्याची गरज आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)