You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिलांना लैंगिक समाधान मिळण्यास अडचणी येण्याची 'ही' आहेत 8 कारणं
महिलांच्या लैंगिक अपेक्षा समजणं ही एक कठीण गोष्ट आहे, अगदी लैंगिक संबंधाच्या विषयांवरील तज्ज्ञ आणि डॉक्टर यांच्यासाठी सुद्धा हे कठीण काम आहे.
हा विषय समजून घेण्यासाठी खूप काम करायचं बाकी आहे, कारण अनेक महिलांना नातेसंबंधादरम्यान लैंगिक समाधान मिळत नाही, तर काही असंही म्हणतात की त्यांनी त्यांच्या आयुष्यात अशाप्रकारचं समाधान कधीच अनुभवलं नाही.
नातेसंबंधादरम्यान महिलांना समाधानी करणारे अनेक घटक असतात. जसे की मनातले विचार, मानवी शरीरावर होणारे शारीरिक आणि भावनिक परिणाम यांचा यात समावेश आहे.
प्रेमसंबंधादरम्यान महिलांना समाधानी राहण्यापासून रोखणाऱ्या आठ घटकांकडे बीबीसीनं लक्ष वेधलं आहे.
1. भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी
जर एखाद्या महिलेनं भूतकाळात हिंसक किंवा वाईट घटनेचा अनुभव घेतला असेल, ज्यामुळे तिच्या वैवाहिक स्थैर्याला धक्का बसला असेल, तर ती एक गंभीर समस्या असू शकते.
अशावेळी तिनं पतीला हे सांगितलं पाहिजे जेणेकरून तो तिला समजून घेऊ शकेल.
एखाद्या महिलेसाठी दुसऱ्या व्यक्तीसोबत अशा विषयांबाबत चर्चा करणं कठीण असू शकतं, परंतु यामुळे मदत मिळणं शक्य होतं. अशावेळी तिनं तज्ज्ञ व समुपदेशकांशी बोलणं सुद्धा महत्वाचं आहे.
"हे खूप कठीण असतं, कारण त्या अनुभवांच्या आठवणी त्रासदायक असतात आणि कदाचित जे घडलंय त्याबद्दल बोलल्यानं मनावरील ताण अजून वाढू शकतो," असं माद्रिद इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्री अँड कम्युनिकेशनचे प्रमुख डॉ. हेक्टर गाल्वान म्हणतात.
2. थकवा
डॉ. गाल्वान सांगतात की, काही स्त्रिया कौटुंबिक किंवा सांस्कृतिक नियमांमुळे स्वतःला दडपून घेतात, पण अशा महिला फार कमी आहेत. त्यांच्या अनुभवात बहुतेक महिलांच्या बाबतीत थकवा हाच मुख्य घटक आहे.
"संभोगात समाधान मिळवण्यासाठी शरीराला मोकळेपणा आणि विश्रांती गरजेची असते", असं डॉक्टर सांगतात.
डॉ. गाल्वान सांगतात, "थकवा असला तरी शरीराला संवेदना जाणवू शकतात, पण पूर्ण समाधान यायला शरीर आणि मन पूर्णपणे शांत आणि मोकळं हवं."
दिवसभराची नोकरी, घरकाम, प्रवास आणि मुलं सांभाळणं यामुळे महिलांचा थकवा वाढतो. अशा वेळी काही महिला समाधान मिळाल्याचं नाटक करतात, जेणेकरून वेळ वाचवता येईल.
मानसशास्त्रज्ञ अशी परिस्थिती टाळण्याचा सल्ला देतात, त्याऐवजी एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि यावर तोडगा काढण्यासाठी पत्नीनं तिच्या पतीशी बोललं पाहिजे, असंही सुचवतात.
3. संवादाचा अभाव
संभोगाच्या वेळी आपल्या जोडीदाराला काय वाटतं याचा आपण अंदाज बांधू शकतो, परंतु नेमकं त्याला कसं वाटत असेल हे आपल्याला समजत नाही.
आवाज, हालचाली किंवा भावना ऐकून तुम्ही समजून घेऊ शकता. पण सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे बोलून स्पष्ट करणं.
तज्ज्ञ सांगतात ,"अनेकांना आपल्या जोडीदाराला त्याच्या झोपण्याची पद्धत बदलायला सांगणंही जड जातं."
लैंगिक समाधान हवे असेल तर पतीपत्नींमध्ये संवाद असावा, तज्ज्ञ सांगतात.
जोडीदाराला आपली आवड, गरज सांगावी लागते, मगच त्यांना ती समजेल.
4. फोरप्लेचा अभाव
डॉ. कंगवान सांगतात, मागील काही वर्षांत लोक फोरप्ले किंवा जवळीक साधायला जास्त वेळ देतात.
"दहा वर्षांपूर्वी याबबातीत स्त्री-पुरुषांमध्ये असमानता होती. पुरुष खूप लवकर समाधानी होत. पण आता गोष्टी बदलत आहेत."
पण समस्या केवळ वेळेची नाही, तर काय आणि कसं करायचं हेही महत्त्वाचं आहे.
पत्नीनं तिच्या पतीला तिला काय हवं आहे आणि ते कसं करायचं हे स्पष्टपणे सांगणं ही चांगली कल्पना आहे.
"महिला बऱ्याचदा आम्हाला सांगतात की पुरुषांना नेमकं काय आणि कसं करायचं हे माहित नसतं, परंतु त्या त्यांच्या जोडीदाराला याबाबत सांगण्यास घाबरतात, कारण सांगितल्यानंतर जोडीदार दुखावला जाईल असं त्यांना वाटतं किंवा त्यांना याची लाजही वाटते."
5. इच्छेचा अभाव
ब्रिटीश हेल्थ ऑथॉरिटीच्या मते, महिला आयुष्यात विविध टप्प्यांवर नैराश्याचा सामना करत असतात. जसं की गरोदरपणात, प्रसूतीनंतर किंवा मासिक पाळी बंद झाल्यावर.
तणाव, चिंता, औषधांचे दुष्परिणाम किंवा हार्मोनल बदल यामुळेही त्यांची इच्छा कमी होत जाते. या सर्व गोष्टींचा एखाद्या महिलेला नातेसंबंधात कसं वाटतं यावर परिणाम होऊ शकतो.
एजन्सीच्या मते, जेव्हा स्त्रीच्या शरीरात तयार होणारे टेस्टोस्टेरॉन कमी होते तेव्हा तिची इच्छा कमी होते. हार्मोन संबंधित ग्रंथींमध्ये गडबड झाल्यास असं घडू शकतं.
अशा वेळी डॉक्टरांकडून उपाय किंवा सल्ला घ्यावा.
6. जबरदस्ती किंवा जबाबदाऱ्यांचा अतिरेक
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा सेंटर फॉर माइंडफुलनेस अँड डेटिंग स्टडीजनं तक्रारी घेऊन पुढे आलेल्या काही लोकांचा अभ्यास केला तेव्हा असं आढळलं की काही लोक नेहमी स्वतःच्या इच्छेप्रमाणे इतरांना वागायला भाग पाडतात किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करतात.
म्हणून शरीराला आणि मनाला मोकळं ठेवणं, आराम देणं फार गरजेचं आहे.
7. संभोगाच्या वेळी वेदना
जेव्हा महिलांच्या आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा असे बरेच घटक समोर येतात ज्यांमुळे एखाद्या महिलेला लैंगिक समाधान मिळत नाही.
यापैकी एक आहे व्हॅजिनिस्मस, म्हणजे महिलांच्या योनीतील स्नायू आकसणे. यामुळे महिलेला संभोगादरम्यान वेदना होते, म्हणून तिची कधी कधी जवळीक साधण्याची इच्छा राहत नाही, असं ब्रिटिश आरोग्य एजन्सीनं म्हटलं आहे.
"असं मुख्यतः तेव्हा होतं, जेव्हा महिला सहवासाबाबत नकारात्मक भावना बाळगतात किंवा प्रसूती दरम्यान किंवा एखाद्या शस्त्रक्रियेमुळे दुखापत झालेली असते."
डॉ. गाल्वान सांगतात, "जेव्हा मेंदू अशा गोष्टीकडे शिक्षा किंवा त्रास म्हणून पाहतो, तेव्हा महिलेची इच्छा कमी होते आणि ती जवळीक टाळते"
योनीत कोरडेपणा किंवा संसर्ग असल्यास डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला जातो.
8. पती-पत्नीच्या नात्यातील अडचणी
तज्ज्ञांनी ओळखलेली आणखी एक मोठी समस्या म्हणजे पती-पत्नीच्या नात्यातील तणाव.
"कधीकधी जोडपी आमच्याकडे वैवाहिक जवळीकीबद्दल तक्रारी घेऊन येतात, जसं की एखाद्या महिलेला कसं समाधान मिळत नाही, परंतु पण पाहिल्यावर कळतं की मुळात नात्यातच अडचण आहे", असं डॉक्टर सांगतात.
तसं असल्यास मुख्य तणाव, गैरसमज, वाद शोधून ते सोडवणंच गरजेचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)