‘75 आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न,’ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं भवितव्य काय?

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, SHARDUL KADAM/BBC

फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्यावर्षी आजच्या दिवशी एक मोठी बातमी समोर आली आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. बातमी एवढी धक्कादायक होती की सुरुवातीला कोणी विश्वास ठेवायलाही तयार नव्हतं. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतरची ही सगळ्यात मोठी राजकीय अविश्वसनीय बातमी होती. पण पुढे याच बातमीने महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदललं. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण होतंय.

21 जून 2022. हा दिवस एका ऐतिहासिक राजकीय बंडांच्या बातमीनचे उजाडला. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारमधील काही मंत्री आणि आमदार नॉट रिचेबल असल्याची बातमी येऊन धडकली. तोपर्यंत उद्धव ठाकरे यांचे सहकारी आणि सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 आमदारांसह सुरत गाठली होती. पाहता पाहता ही संख्या 40 आमदारांवर पोहोचली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पडली.

शिवसेना दोन गटात विभागली. दोन्ही गटात किंवा पक्षात शिवसेना प्रमुख एकच आहेत. आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. एका गटाचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहेत तर दुसऱ्या गटाचं नेतृत्त्व मुख्यनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. पक्षासाठी न्यायलयीन लढाई आणि निवडणूक आयोगाची लढाई जिंकण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं. त्यामुळे भाजपसोबत एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेली सत्ता आज स्थिर आहे.

आता प्रश्न उपस्थित होतो तो पुढे काय? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला पक्ष म्हणून शिवसैनिक स्वीकारणार का? एकनाथ शिंदे मुख्य नेते असलेल्या शिवसेनेची संघटनात्मक रचना पुढे कशी असेल? आणि येत्या काळात पक्ष संघटना वाढवण्यात एकनाथ शिंदे यांना किती यश मिळेल? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

शिवसेनेची पुढची रणनीती काय?

19 जून 1966 हा शिवसेनेचा स्थापना दिवस आणि 21 जून 2022 हा शिवसेनेतील बंडाचा आणि त्यानंतर शिवसेनेला मिळालेल्या नवीन नेतृत्त्वाचा दिवस. या दोन्ही तारखांची नोंद शिवसेनेच्या इतिहासात आता कायमस्वरुपी महत्त्वाची आहे.

एकाबाजूला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचं मोठं आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर शिवसेनेचं नेतृत्त्व म्हणून आपली प्रतिमा भक्कम करणं आणि आपल्या नेतृत्त्वातील शिवसेना पक्षाचं बळ वाढवणं हे आव्हान आहे.

गेले 365 दिवस बंडाची कायदेशीर लढाई लढण्यात आणि मुख्यमंत्री म्हणून राज्याचं प्रशासन चालवण्यात एकनाथ शिंदे यांचा कस लागला. पण आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते राज्यात शिवसेनेचं नेतृत्त्व म्हणून ठसा उमवटवण्याचं आणि निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार आणि त्याहून जास्त आमदार निवडून आणण्याचं.

नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिन पक्षाकडून साजरा झाला. मुंबईतील नेस्को मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमासाठी राज्यभरातून शिवसैनिक, पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

एक तास सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आमची शिवसेना ही हिंदुत्ववादी विचारधारा असलेली बाळासाहेबांची शिवसेना आहे हे ठसवण्याचा प्रयत्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाच्या सोहळ्याचं सादरीकरण याठिकाणी करण्यात आलं.

एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन

फोटो स्रोत, SHARDUL KADAM/BBC

फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांमधून, त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत व्यासपीठाच्या ठिकाणी प्रवेश केला.

आपल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवाय, आता पक्ष वाढीसाठी आपण तयारी करत असून पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी राज्यभरात शिवसेना वाढवावी असे आदेश दिले.

भाषणात ते म्हणाले, “खेड्याखेड्यात शिवसेनेची शाखा उभी करा, घराघरात शिवसैनिक निर्माण करा,” असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

यावेळी शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांनी आपला एक महिन्याचा पगार पक्षाला निधी म्हणून दिल्याची घोषणा केली.

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर आणि शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि आमदार निवडणुकांना कसे समोरे जाणार? शिवसेना म्हणून त्यांना मतदार स्वीकारणार का? आणि 40 आमदारांच्यापलिकडे पक्षाचं अस्तित्त्व काय आहे? असे प्रश्न उपस्थित झाले.

यासंदर्भात आम्ही उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, “आम्ही आता पक्षवाढीसाठी काम करत आहोत. आम्ही आतापर्यंत जिल्हा प्रमुख, उपनेते, शाखा प्रमुख, महिला आघाडीचे पदाधिकारी नेमले आहेत. आम्ही युवा सेना नेमली आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की, पक्ष आहे त्यापेक्षा आता वाढला पाहिजे.”

शिवसेनेचा वर्धापन दिन

फोटो स्रोत, SHARDUL KADAM/BBC

फोटो कॅप्शन, शिवसेनेचा वर्धापन दिन

प्रत्येक शाखेत शिवसेनेचा कार्यकर्ता असला पाहिजे यादृष्टीने पक्ष संघटना काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवथेना बुथ प्रमुख नेमणार आहेत आणि त्यांअंतर्गत दोन शिवदूत नेमले जातील जे राज्यभरात शिवसेनेचे काम करतील.

मुंबईत आणि राज्यातील इतर विमानतळावर शिवसेना आपल्या कामगार संघटना तयार करत आहे. तसंच हॉस्पिटल, 5 स्टार हॉटेलमध्ये कामगार वींग उभी करण्याची तयारी सुरू आहे अशीही माहिती उदय सामंत यांनी दिली.

शिवसेनेची स्वतंत्र अल्पसंख्याक विंग सुद्धा असणार आहे. तसंच आरोग्यासाठी स्वतंत्र सेल उभी केली जाईल. राज्यातील रुग्णांना पक्षाच्यावतीने आर्थिक मदत केली जाणार असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा महिन्यात 75 कोटी रुपयांचं वाटप झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

शिंदे सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत असंही ते म्हणाले.

उदय सामंत पुढे सांगतात, “आहेत त्यापेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याच्यादृष्टीने आपचं नियोजन सुरू आहे. जिल्हा परिषदेवरही आमचे लोक निवडून येतील. पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना, भाजप, आरपीआय महायुती एकत्र लढवणार आहे.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यासाठी पक्षाचे कार्यकर्ते वाढावेत, शिवसैनिकांनी साथ द्यावी, पदाधिकारी पक्षात यावे यासाठीही शिवसेना राज्यभरात काम करत आहे.

“मुख्यमंत्री राज्यभरात दौरे करत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे तो एनकॅश करण्याची जबाबदारी आमची आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे,” असंही ते म्हणाले.

शिवसेनेच्या आहेत त्या शाखांमध्येच काम सुरू करणार की शिंदेच्या शिवसेनेचे स्वतंत्र नवीन शाखा उभारणार? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, “आम्हाला कोणाचीही संपत्ती नकोय हे आधीच एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत आमचं स्वतंत्र कार्यालय आहे. इतर ठिकाणीही आम्ही नवीन कार्यालय सुरू केली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात नवीन शाखा सुरू करत आहोत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय उभारणार.”

“40 आमदारांचे 75 आमदार कसे होतील यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना आणि भाजप मिळून 200 संख्याबळाहून अधिक आमदार निवडून आणण्याचं आमचं लक्ष्य आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसैनिक

फोटो स्रोत, SHARDUL KADAM/BBC

फोटो कॅप्शन, शिवसैनिक

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘जय महाराष्ट्र!हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ या पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर सांगतात, “मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची शाखा उभारल्याचं कुठेही दिसत नाही. काही पदाधिकारी आणि नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. परंतु शाखांमधील कार्यकर्ते आजही संभ्रमात आहे. आपल्या नेतृत्त्वाखाली शिवसेना त्यांना वाढवायची आहे तर गेले एक वर्ष ते काय करत होते? असा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी ना कधी घ्याव्याच लागतील. त्यावेळी माजी नगरसेवक शिंदे यांच्यासोबत जातील असं होऊ शकेल. पण कार्यकर्त्यांचं काय करणार आहेत, मुंबईतल्या शाखांमधील कार्यकर्ते शिंदेंसोबत गेलेले नाही.”

“शिवसेना पक्षाचं नाव मिळूनही आता पाच महिने उलटले. तरीही संघटनात्मक बळ त्यांना अजून वाढवता आलेलं नाही. शिवसेनेची सगळी संघटनात्मक ताकद ही शाखा आहे. शाखांमधले कार्यकर्ते आणि त्यातून मिळणारी लोकप्रियता यामुळे हे शिवसेनेचं बळ होतं. या पातळीवर काही काम झालंय असं मला तरी दिसत नाही,”

शिवसेनेतल्या दोन गटात कोणाकडे किती आमदार आणि खासदार?

2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 55 आमदार जिंकून आले. यापैकी 40 आमदार आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर उर्वरित 15 आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.

शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे. तर 6 खासदार उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत.

लोकसभा आणि विधिमंडळ पक्षाची कार्यलय एकनाथ शिंदे गटाला मिळाली आहेत. तर शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा आजही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत.

शिवसेना

फोटो स्रोत, SHARDUL KADAM/BBC

फोटो कॅप्शन, शिवसेना

एकनाथ शिंदे यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत?

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. सरकार तर कोसळलंच पण पक्षावरच दावा केल्याने उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना पक्षही निसटला.

हे सरकार घटनाबाह्य असल्याचं सांगत ठाकरे गटाने सातत्याने एकनाथ शिंदे आणि आमदारांवर टीका केली. याच्या निषेधार्त गेल्या वर्षभरात ठाकरे गटाकडून ‘गद्दार’ म्हणूनच त्यांचा उल्लेख करण्यात आलं.

‘गद्दार दिवस’ साजरा करण्याचं आवाहनही पक्षाने दिलं आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. ज्यापद्धतीने हे बंड घडलं त्यानंतर राज्यभरात उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळत असल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या मतदारांची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळत असल्याचं चित्र आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता याविरोधात काऊंटर स्ट्रॅटेजी करण्यात आली आहे.

वर्धापन दिनाला एकनाथ शिंदे यांनी केलेलं भाषण हे याचदृष्टीने होतं. आम्हीच शिवसेना वाढवली, त्यासाठी केसेस अंगावर घेतल्या, वेळेप्रसंगी मार खाल्ला, तुरुंगात गेलो, याच नेत्यांमुळे शिवसेना मोठी झाली असे उद्गार एकनाथ शिंदे यांनी काढले.

अगदी मुंबईतील 92 च्या दंगलीपासून व्यासपीठावरील याच नेत्यांनी (शिंदे गटातील आमदार,खासदार, ज्येष्ठ नेते) शिवसेनेसाठी अनेक धोके पत्करले आणि तुरुगांत जायची तयारी ठेवली आणि त्यांनाच हिणवलं गेलं असं सांगत एकनाथ शिंदे यांनी बंड केलेल्या आमदारांनी पक्षासाठी मोठं योगदान दिलंय पण त्यांनाच अपेक्षित सन्मान मिळाला नाही हे सांगण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून केला.

शिवसेना

फोटो स्रोत, SHARDUL KADAM/BBC

फोटो कॅप्शन, शिवसेना

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केसेस आहेत का? त्यांनी कधी पक्षासाठी धोका पत्कारला का? उलट काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली अशा पद्धतीची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. ‘उद्धव ठाकरेच गद्दार आहेत,’ असं थेट विधान एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केलं.

या भाषणाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना, जनतेला हे सांगण्याचा प्रयत्न केला की खरे गद्दार आम्ही नाही, आम्ही क्रांती केली आहे, उठाव केला आहे आणि खरे पीडित तर आम्ही आहोत. आम्हाला हिंदुत्वासाठी आणि आमच्या सन्मानासाठी हा निर्णय घ्यावा लागला.

“मी कालही कार्यकर्ता होता, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ताच राहील,”असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात जेवढ्या सह्या केल्या नाहीत तेवढ्या मी एका दिवसात करतो. आधीचे मुख्यमंत्री पेन ठेवत नव्हते. माझ्याकडे दोन दोन पेन आहेत,”असाही टोला त्यांनी लगावला.

ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, “सहानुभूतीचं कार्ड खेळण्याचा अधिकार जसा उद्धव ठाकरे यांना आहे तसा तो एकनाथ शिंदे यांनाही आहे असं सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मी सुद्धा संघर्ष करत मोठा झालोय हे शिवसैनिकांना सांगण्याचा हा प्रयत्न आहे. केवळ प्रशासकीय कामं करून नव्हे तर सहानुभूतीचं कार्ड आता खेळलं पाहिजे याची जाणीव एकनाथ शिंदे यांना झाली असावी.”

“निवडणुकांना सामोरं जाताना विकास विरुद्ध सहानुभूती अशी लढाई झाली तर सहानुभूती श्रेष्ठ ठरू शकते हे त्यांच्या लक्षात आलं असावं आणि म्हणूनच आपण कोणत्या वातावरणात निर्णय घेतला हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न ते करत आहेत,”

सर्वोच्च न्यायालयाने निकालात अनेक ताशेरे ओढले असले तरी पूर्व परिस्थिती आम्ही पूर्ववत करू शकत नाही असं न्यायालयाने म्हटल्याने एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिळाला. या निर्णयामुळे शिंदे सरकार तरलं. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं आहे. पण या प्रक्रियेला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांना हा दिलासा असला तरी त्यांच्यासमोर आजही अनेक आव्हानं आहेत असंही संदीप प्रधान सांगतात. ते म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार होत नाही ही अस्वस्थता आजही आहे. बाहेरून नेते प्रवेश करत आहेत. पण सत्तेचा फायदा मिळण्यासाठी लोक त्यांच्याकडे येत आहेत. यामुळे सत्तेच वाटप सगळ्यांमध्ये होईल आणि आलेल्या प्रत्येकापर्यंत त्याचा लाभ पोहचवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहेच.”

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, SHARDUL KADAM/BBC

फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे

“शिंदेंना हे करता आलं नाही तर ही अस्वस्थता वाढू शकते. सत्तेसाठी लोक जमा होतात तेव्हा त्याचं आकर्षण असतं. पण नाहीसं झालं की लोक बाहेर पडण्याचीही शक्यता असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हेच झालं होतं. आपला मुख्यमंत्री असून त्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही असंच नेत्यांना, आमदारांना वाटलं. आता हीच अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडूनही आमदारांची असणारच, ती पूर्ण करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे,”

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. यासाठी जागांचं वाटप, वाटाघाटी, आमदारांच्या अपेक्षा, त्यांच्या मुलांना, पत्नीला तिकीट मिळवून देणं अशा बऱ्याच अपेक्षा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना असतात.

“आता मुख्यमंत्री असाताना आणि भाजपसोबत सत्तेत असातना त्यांना त्या पूर्ण करता येणार का, वाटाघाटीत भाजपने दिल्या नाहीत तर नाराजी वाढू शकते,” असंही संदीप प्रधान सांगतात.

तर कोणतीही संघटना अचानक उभी राहत नाही. त्यासाठी त्यांना राज्यभरात फिरावं लागेल असं ज्येष्ठ पत्रकार आणि ‘जय महाराष्ट्र!हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ या पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर सांगतात.

"एकनाथ शिंदे राज्यव्यापी नेते आहेत का हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर हे मोठं आव्हान आहे. वर्षभरात नवीन शाखा उभारणीसाठी एकनाथ शिंदे गटाने काय केलं. त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद आहे त्यांची सत्ता आहे. तरीही संघटनात्मक शाखा, विभाग प्रमुख नेमल्याचं चित्र दिसत नाही. कोणतीही संघटना अचानक उभी राहत नाही. त्यासाठी राज्यभरात फिरावं लागेल. राज्यभरात प्रभाव टाकणारे कोणते नेते त्यांच्याकडे आहेत?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

"शिवसेनेच्या जुन्या काळात अनेक मोठ्या नेत्यांनी गावागावात फिरून संघटना उभी केली होती. त्या काळात दादा कोंडके यांनी शिवसेनेचा प्रचार केला होता. छगन भुजबळ, दिवाकर रावते यांच्यासारखे नेते राज्यभरात फिरत होते. 40 आमदारांपैकी किती आमदार आपआपल्या जिल्ह्यात जाऊन शाखा उभी करतील? आमदारांनी संघटानात्मक बांधणीसाठी काही केल्याचं दिसत नाही. यामुळे एकनाथ शिंदे यांना संघटना मोठी करायची असेल तर खूप मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे," असंही ते म्हणाले.

आगामी काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या कोणत्या गटाला शिवसैनिक आणि मतदारांनी स्वीकारलंय हे या निवडणुकींच्या निकालातच स्पष्ट होऊ शकले.

हे ही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)