अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण कसं प्रत्युत्तर देईल? 'या' आहेत 3 शक्यता

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी
    • Author, सरबस नाजारी
    • Role, बीबीसी न्यूज

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला दोन आठवडे होत आले असतानाच, अमेरिकेनं या संघर्षात उडी घेतलीय.

अमेरिकेनं इराणच्या प्रमुख आण्विक ठिकाणांवर हवाई हल्ले करत या संघर्षाला गंभीर वळणावर नेलंय. अमेरिकेनं लक्ष्य केलेल्या ठिकाणांमध्ये इराणचं सर्वात सुरक्षित मानलं गेलेलं फोर्दो हे आण्विक ठिकाणही आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या भूमिगत फोर्दो अणुउत्पादन केंद्रावर 13 हजार 600 किलोग्रॅम वजनाचा 'मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर' बॉम्ब टाकण्याची परवानगी दिली. त्यासोबतच, नतांझ आणि इस्फहानलाही लक्ष्य केलं.

इराणचे हे तिन्ही अणुउत्पादन केंद्र पूर्णपणे नष्ट झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. सोबत ट्रम्प यांनी असा इशाराही दिला की, इराणनं प्रत्युत्तर दिल्यास याहून अधिक शक्तिशाली हल्ला केला जाईल.

दुसरीकडे, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी आधीच अमेरिकेला इशारा दिला होता, "जर अमेरिका युद्धात सामील झाली, तर अमेरिकेचं 'अभूतपूर्व नुकसान' होईल आणि इराण सर्व पर्यायांचा विचार करत आहे."

1) अमेरिकेच्या ठिकाणांवर हल्ला

इराणने इशारा दिलाय की, अमेरिकेचा कोणताही हल्ला त्यांच्या हितसंबंधांना धोका पोहोचवेल.

या हल्ल्यानंतर इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सनी एक निवेदन देत म्हटलं, "अमेरिकेला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होईल."

त्यासोबतच, सहजपणे हल्ला करता येणाऱ्या ठिकाणांची यादीही जाहीर करण्यात आली.

इराक, बहारीन, कतार, संयुक्त अरब अमिरात (यूएई), सौदी अरेबिया, कुवैत, जॉर्डन आणि सीरिया इथे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. ही सर्व ठिकाणं इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या आवाक्यात येतात.

कतारमधील विशाल अल-उदैद एअर बेस आणि बहरीनमधील नौदल तळांवर, तर अमेरिकेचे पाचवे नौदल आरमार तैनात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

इराणचे वरिष्ठ कमांडर कासिम सुलेमानी यांना मारण्याचा आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या आधीच्या कार्यकाळात दिला होता आणि सुलेमानी यांना मारण्यात आलं होतं. त्यानंतर सुलेमानींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराकमधील अमेरिकन सैन्याच्या 'अल असद एअरबेस'वर इराणनं हल्ला केला होता.

या हल्ल्याच्या आधी इराणने अमेरिकेला आधीच इशारा दिला होता. त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लष्करी तळाचं मोठं नुकसान झालं होतं. इराण यावेळेसही अशीच रणनीती अवलंबू शकतो.

मात्र, सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत जर इराण अशा टप्प्यावर पोहोचला की, आपल्याकडे आता गमावण्यासारखे काहीही राहिले नाही, तर मग दूतावासांपासून ते अमेरिकेच्या बिनलष्करी ठिकाणांवरही हल्ला होऊ शकतो. सद्यस्थितीत या धोक्याची शक्यता अधिकच वाढली आहे.

2) होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणं

इराणमधील राजकीय नेते आणि लष्करी अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देत आले आहेत. जेव्हा इराणचा पाश्चात्य देशांशी तणाव वाढतो, तेव्हा ही धमकी पुन्हा पुन्हा ऐकू येते.

पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातादरम्यान असलेली होर्मुझ सामुद्रधुनी हा एक अरुंद समुद्री मार्ग आहे. जगभरात वाहतूक होणाऱ्या तेलाचा सुमारे पाचवा भाग याच मार्गाने जातो.

होर्मुझ बंद करण्यासंदर्भात वक्तव्यं आता वाढत आहेत. कट्टरतावादी असं म्हणतायेत की, याचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावर आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होईल.

होर्मुझ सामुद्रधुनीला स्फोटक सुरंगं, क्रूझ क्षेपणास्त्रं, किनारी सुरक्षा आणि युद्धनौकांद्वारे बंद करता येऊ शकते. या सर्व गोष्टींचे उत्पादन आणि विकास इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स 'कोर'ने अलीकडच्या वर्षांत केले आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी
फोटो कॅप्शन, होर्मुझची सामुद्रधुनी

मात्र, होर्मुझ बंद करणं इराणसाठीही तोट्याचे ठरू शकते. यामुळे चीनसोबतचे व्यापार संबंध गुंतागुंतीचे होऊ शकतात. कारण चीन हा इराणच्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे.

याआधीही इराणने रेड सी आणि पर्शियन आखातात ड्रोन, क्षेपणास्त्रं आणि स्फोटक सुरंगांद्वारे जहाजांवर आणि इतर ठिकाणांवर हल्ले केले आहेत. पण यावेळी अमेरिकेच्या कारवाईनंतर तो सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांसारख्या शेजारी देशांतील तेल वाहून नेणाऱ्या टँकर, बंदरं आणि तेलसाठ्यांवर अधिक शक्तिशाली हल्ला करू शकतो. याचा जागतिक तेल क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून झालेल्या या हल्ल्यानंतर इराणमधील अति-रुढीवादी नेत्यांनी सौदी अरेबियातील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य बनवण्याची वक्तव्य केली आहेत.

3) प्रॉक्सी कार्ड

इस्रायलसोबत सुरू असलेलं युद्ध आणि अमेरिकेचा हस्तक्षेप अशा दोन गोष्टी घडत असण्याच्या काळात लढाऊ गट इराणसाठी 'संकटाच्या काळात उपयोगी ठरणारे मित्र' ठरू शकतात.

जर या गटांनी इराणसोबत मिळून अमेरिकेच्या तळांवर आणि पुरवठा मार्गांवर हल्ले केले, तर ते हल्ले लहान असले, तरीही अमेरिकेसाठी चिंताजनक स्थिती निर्माण करणारे ठरू शकतात.

इराणने या गटांना अनेक वर्षांपासून पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरवली आहेत. मात्र, सध्या हे गट अशी कोणतीही गंभीर लढाई लढण्याच्या स्थितीत दिसत नाहीत.

इस्रायलसोबत ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान झालेल्या लढाईत हिजबुल्लाह कमकुवत झालीय. ती सध्या केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी इराणी लष्कराला थेट मदत करण्याचं कोणतंही आश्वासन दिलं नाहीय.

इराण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराण
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हिजबुल्लाहनं आता शस्त्रं खाली ठेवावीत आणि देशाच्या पुनर्बांधणीत, तसंच आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी, असा हिजबुल्लाहवर लेबनॉन सरकार आणि प्रसारमाध्यमांचा दबाव आहे.

येमेनमधील हूती बंडखोरांनीही या युद्धादरम्यान इस्रायलवर हल्ले केलेले नाहीत. मात्र, अमेरिकेच्या अलीकडील हल्ल्यांपूर्वी आणि नंतर रेड सीमधील अमेरिकन जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. जर धमकीनुसार काहीएक केलं, तर मे महिन्यात अमेरिकेसोबत झालेल्या कराराचं ते उल्लंघन ठरेल.

इराकनंही आतापर्यंत केवळ अमेरिकेविरुद्ध इशारे देऊनच इराणला पाठिंबा दिला आहे. तसंच, इराणसाठी सकारात्मक राहिलेले बशर अल-असद यांची सत्ता सीरियातून गेलीय. त्यामुळे सीरियन सरकार आणि त्यांच्या प्रॉक्सी (सहाय्यक) गटांकडूनही पाठिंब्याची ताकद कमी होताना दिसतेय.

तरीसुद्धा, जर मोठा संघर्ष होत असेल आणि तो इराणच्या 46 वर्षांपासूनच्या सत्तेला धक्का देत असेल, तर इराण आपल्या प्रादेशिक सहकारी गटांकडून कोणत्या ना कोणत्या पातळीवर सक्रियतेची अपेक्षा करेल. हे त्या गटांच्या शक्ती आणि उपलब्ध संसाधनांवर अवलंबून असेल.

धोक्याचा अंदाज

इराणनं इस्रायलसोबतच्या संघर्षात इस्रायली शहरं आणि लष्करी ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. पण त्यांनी याची पूर्ण काळजी घेतली की, असं कोणतंही पाऊल उचलू नये, ज्यामुळे अमेरिका थेट हल्ला करेल.

जर हे युद्ध अशाच प्रकारे चालू राहिलं, तर इराणला इस्रायलवर डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांची संख्या कमी करावी लागेल.

पहिल्या दिवशी इराणनं 150 क्षेपणास्त्रं डागली होती, पण आता ही संख्या दररोज सुमारे 30 वर आली आहे.

क्षेपणास्त्रांच्या घटणाऱ्या संख्येवरून हे दिसतंय की, जर युद्ध लांबलं, तर इराणची ताकद कमी होईल. प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे इराण एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्धात अडकू शकतो.

एका बाजूला इस्रायल आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका. यामध्ये अमेरिकेचा हल्ला अत्यंत प्रबळ असू शकतो आणि त्यामुळे इराणची सत्ता गंभीर संकटात सापडू शकते.

आता इराण पर्यायांवर विचार करताना हाही विचार करतंय की, अमेरिकेशी थेट लढणं त्यांच्यासाठी फारच गंभीर आणि अस्तित्वाच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)