निमिषा प्रियाला तत्काळ फाशी देण्याची महदी कुटुंबाची मागणी, अचानक करण्यात आलेल्या या मागणीमागचं कारण काय?

येमेनच्या तुरुंगात असलेल्या निमिषा प्रिया या भारतीय परिचारिकेला देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी येमेनमधील मृत महदीच्या कुटुंबियांनी पुन्हा एकदा केली आहे.
निमिषा प्रिया मूळची केरळमधील असून तिला तलाल अब्दो महदी या येमेनमधील नागरिकाच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या ती येमेनमधील साना तुरुंगात आहे.
या परिस्थितीत, मृत तलाल अब्दो महदीचा भाऊ अब्दुल फत्ताह महदी यानं येमेनचे मेजर जनरल यांना 9 ऑगस्टला पत्र पाठवलं आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की त्यांची एकमेव मागणी आहे आणि ती म्हणजे शरिया कायद्यानुसार निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा देण्यात यावी.
याआधी, निमिषा प्रिया 16 जुलैला फाशीची शिक्षा दिली जाणार होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती.
या पत्रात म्हटलं आहे की, "आम्ही कोणताही पर्याय स्वीकारणार नाही. याबाबत आम्ही तुम्हाला वारंवार माहिती दिली आहे. त्यामुळे कोणताही विलंब न करता या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे."
अब्दुल फत्ताह महदी यानं 9 ऑगस्टला हे पत्र त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केलं आहे.
त्या पोस्टमध्ये त्यानं म्हटलं आहे की, "आम्ही आमचा अंतिम निर्णय, ठाम भूमिका सांगितली आहे. आम्ही स्पष्ट मागणी केली आहे की शिक्षेच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित करण्यात यावी. या प्रकरणात सूड घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही."
पत्रात काय म्हटलं आहे?
पत्रात म्हटलं आहे की पीडिताच्या वारसांना बदला घेण्याचा अधिकार देण्यात यावा.
त्यात पुढे म्हटलं आहे, "तिनं (निमिषा प्रिया) आमच्या समाजानं यापूर्वी कधीही न पाहिलेला अत्यंत भयंकर गुन्हा केला आहे. तिनं केलेल्या या हत्येसाठी न्यायालयानं तिला फाशीची शिक्षा सुनावली आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे."
"त्यामुळे कोणताही विलंब न करता तिला फाशी देण्यात यावी. असा गुन्हा करू पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी तातडीनं आदेश जारी करण्यात यावेत."
त्यांनी या प्रकरणाबाबत 3 ऑगस्टला आधीच एक पत्र लिहिलं होतं.

फोटो स्रोत, Abdul Fattah Mahdi/Facebook
निमिषा प्रियाच्या प्रकरणात, निमिषाच्या वकिलांचं म्हणणं आहे की तिची फाशीची शिक्षा थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे महदीच्या कुटुंबानं तिला माफ करणं.
अशा परिस्थितीत, निमिषाच्या सुटकेबाबत भारतातील काहीजणांनी केलेल्या वक्तव्यांना महदीचे कुटुंब विरोध करतं आहे.
ते असंही स्पष्ट करत आहेत की यासंदर्भात ते कोणालाही भेटलेले नाहीत. अब्दुल फत्ताह महदी याबाबत त्याच्या फेसबुक पेजवर सातत्यानं पोस्ट टाकतो आहे.

फोटो स्रोत, Abdul Fattah Mahdi/Facebook
केरळमधील एक धर्मगुरू (ग्रँड मुफ्ती ए. पी. अबुबकर मुस्लियार) हे निमिषाच्या सुटकेच्या प्रयत्नात सहभागी असल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र महदी यांच्या कुटुंबानं ते काही असल्याची बाब नाकारली आहे.
या परिस्थितीत, महदीनं एका मल्याळम वृत्तपत्रातील बातमी पुन्हा पोस्ट केली होती, ज्यात दावा करण्यात आला होता की अशी बोलणी झाली आहेत.

फोटो स्रोत, ए. पी. अबुबकर मुस्लियार
महदीनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, "पीडिताच्या कुटुंबीयांचा आदर करणं, त्यांच्या भावना निष्पक्षपणे समजून घेणं आणि सत्य स्पष्ट करणं, हे भारतीय धर्मगुरूंचं कर्तव्य आहे. या विषयात आम्ही कोणाचीही थेट किंवा इतर कोणाच्याही माध्यमातून भेट घेणं किंवा चर्चा करणं टाळतो."
मुस्लियार तडजोड करण्यासाठी बोलले असल्याचं सांगणाऱ्या बातम्यांचं संकलन असणारी पोस्ट त्यानं केली होती. त्यात त्यानं म्हटलं होतं, "आमच्या वेदनांना चुकीच्या पद्धतीनं दाखवणं आणि माहिती प्रकाशित करणं, यापेक्षा आणखी क्रूर गोष्ट काय असू शकते?"
त्यानं असंही म्हटलं होतं की, "न्यायानं काम होऊ द्या."
'आम्ही महदी कुटुंबाची माफी मागतो'
बाबू जॉन 'सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन कौन्सिल'चे सदस्य आहेत. त्यांनी याबाबत बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "निमिषाच्या सुटकेबाबत भारतातून येणाऱ्या परस्परविरोधी बातम्यांमुळे महदी कुटुंब अधिकच संतापलं आहे. ते त्यांच्याकडे असलेल्या साधनांचा वापर करून त्या चुकीच्या पद्धतीनं हाताळत आहेत."
"या प्रकरणातील खोट्या प्रचाराबद्दल आम्ही महदी कुटुंबाची पूर्ण माफी मागितली आहे. त्यांनी आमच्याशी वाटाघाटी कराव्यात अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे," असं ते म्हणाले.
काय आहे निमिषा प्रियाचं प्रकरण
येमेनमधील हुती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात राहणारी केरळमधील प्रशिक्षित नर्स निमिषा प्रिया हिला 16 जुलै 2025 रोजी फाशी देण्यात येणार आहे.
हे प्रकरण सध्या भारतात चर्चेचा आणि मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांबाबतचा विषय बनलं आहे.
निमिषा प्रिया 2008 साली येमेनची राजधानी सना इथं गेली आणि तिथल्या एका सरकारी रुग्णालयात काम करू लागली.

तिचे पती टॉमी थॉमस देखील 2012 मध्ये येमेनला गेले होते. पण तिथे नोकरी न मिळाल्यामुळे 2014 मध्ये ते आपल्या मुलीला घेऊन कोचीला परत आले.
यानंतर निमिषानं तिथे एक क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि स्थानिक व्यापारी तलाल अब्दो महदीला आपला भागीदार बनवलं.
त्यात तलाल महदीला नशेचं इंजेक्शन देऊन त्याची हत्या केल्याचा आरोप निमिषा प्रियावर आहे.
येमेनमधील स्थानिक न्यायालयानं 2020 मध्ये निमिषा प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तिच्या कुटुंबानं या निर्णयाला येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं, पण 2023 मध्ये त्यांचं अपील फेटाळण्यात आलं.
जानेवारी 2024 मध्ये हुती बंडखोरांच्या सर्वोच्च राजकीय परिषदचे अध्यक्ष महदी अल-मशात यांनी निमिषा प्रियाच्या फाशीला मंजुरी दिली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











