बालविवाहातून पळालेली अफगाणिस्तानाची रोया करिमी कशी बनली बॉडीबिल्डिंग चॅम्पियन?

- Author, महजुबा नौरोजी
- Role, बीबीसी न्यूज, अफगाण
रोया करीमीचा मेकअप आणि सोनेरी रंगाच्या तिच्या केसांमुळे जणू ती मिस युनिव्हर्सच्या फायनलमध्ये सहभागी होण्यासाठी आली आहे असंच कुणालाही वाटेल.
बालविवाह, अडचणी, सामाजिक बंधनांना झुगारून रोया करीमीने बॉडीबिल्डिंगच्या स्टेजवर आपली ओळख पुन्हा बनवली आहे.
अवघ्या 15 वर्षांपूर्वी रोया करीमी अफगाणिस्तानमध्ये किशोरवयात आई झाली होती. तिला बालविवाहाला सामोरं जावं लागलं होतं. पण ती तिथून पळून गेली आणि आपलं जीवन नव्याने उभा केलं, आज याची कल्पना करणंही कठीण आहे.
आता वयाच्या 30 व्या वर्षी रोया करीमी युरोपच्या टॉप बॉडीबिल्डर्सपैकी एक आहे. या आठवड्यात वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये (जागतिक शरीरसौष्ठव) ती सहभागी होणार आहे.
तिचा प्रवास कल्पनेपलीकडचा आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी तिने प्रोफेशनल खेळाडू म्हणून बॉडीबिल्डिंग सुरू केली होती.
पण जेव्हा तिने अफगाणिस्तान सोडून आपल्या आई आणि लहान मुलासोबत नॉर्वेमध्ये आश्रय घेतला, तेव्हा असा विचार करणंही कठीण होतं.
नॉर्वेमध्ये तिने आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली. तिने आपलं शिक्षण सुरू ठेवलं आणि ती नर्स झाली. इथंच तिला तिचे दुसरे पती भेटले, जे स्वतः देखील बॉडीबिल्डर आहेत.
रोया सांगते की, बॉडीबिल्डिंगने तिला मानसिक आणि सामाजिक बंधनांपासून मुक्त केलं. असं बंधन जे वर्षानुवर्षे तिच्यावर लादलं गेलं होतं.
"जेव्हा मी जिमला जाते, तेव्हा मला आठवतं की अफगाणिस्तानमध्ये एक काळ असा होता, जेव्हा मला मोकळेपणाने व्यायाम करण्याची परवानगी नव्हती," असं तिने बीबीसी न्यूज अफगाणला सांगितलं.

रोयाच्या आयुष्याची गोष्ट म्हणजे परंपरांच्या बंधनांविरुद्ध संघर्ष करून, स्वतःची ओळख पुन्हा नव्याने बनवण्याची कहाणी आहे.
तिची कहाणी त्या सर्व अफगाण महिलांसाठी प्रेरणादायी आहे, ज्या आजही कठोर निर्बंधांमध्ये जगत आहेत.
यातील बंधनं तेव्हाही होते जेव्हा रोया अफगाणिस्तानमध्ये राहत होती. पण 2021 मध्ये तालिबानी जेव्हा पुन्हा सत्तेत आले त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली.
आता अफगाणिस्तानमध्ये मुलींना वयाच्या 12 वर्षांनंतर शाळेत जाण्यास बंदी आहे. त्यांना बहुतांश नोकऱ्यांपासून वंचित ठेवलं जातं आणि ते पुरुष सहकाऱ्याशिवाय दूरचे प्रवास करू शकत नाहीत.
त्यांना सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलण्याची परवानगी नाही.
रोया म्हणते, "मी भाग्यवान आहे की मी त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकले. पण अनेक महिला आजही शिक्षणासारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. हे खूप दुःखद आणि हृदयद्रावक आहे."
नवीन भविष्याच्या शोधात
असं आयुष्य जगायचं नाही, असं तिने तालिबान पुन्हा सत्तेमध्ये येण्यापूर्वीच ठरवलं होतं.
2011 मध्ये अफगाणिस्तान सोडण्याचा आणि आपल्या पहिल्या पतीला सोडून जाण्याचा रोयाचा निर्णय खूप धोकादायक होता.
विशेषतः एका पारंपरिक अफगाण समाजात राहणाऱ्या महिलेसाठी.
तिला आता त्या काळातील गोष्टी आठवायच्या नाहीत आणि त्यावर बोलायलाही आवडत नाही.

नॉर्वेमध्ये पोहोचल्यावर तिला पूर्णपणे वेगळ्या वातावरणात स्वतःला जुळवून घ्यावं लागलं. तिला जास्त आधुनिक असलेल्या समाजाशी जुळवून घ्यायचं होतं.
तिला स्वतःचा आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी नोकरी करायची होती. त्याचबरोबर तिला नॉर्वेजियन भाषा देखील शिकावी लागणार होती.
सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. परंतु, हळूहळू तिच्या कष्टाला यश मिळू लागलं.
रोयाने नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि राजधानी ओस्लो येथील एका रुग्णालयात ती कामाला देखील लागली.
बॉडीबिल्डिंगने आयुष्याला दिलं नवीन वळण
जिमला जाणं आणि बॉडीबिल्डिंग करणं तिच्यासाठी आयुष्याचा पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरला.
हा फक्त शारीरिक व्यायाम नव्हता, तर स्वतःवर विश्वास आणि आपली ओळख पुन्हा निर्माण करण्याचा मार्ग बनला.
इथेच तिची भेट एका दुसऱ्या अफगाणीशी म्हणजेच कमाल जलालुद्दीनशी झाली. ते स्वतः अनेक वर्षांपासून बॉडीबिल्डिंगशी संबंधित होते.

रोया म्हणते, ''कमाल यांना भेटण्यापूर्वी मी फक्त खेळ म्हणून बॉडीबिल्डिंग करत होते, प्रोफेशनल पातळीवर नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळे मला महिलांसाठी प्रतिबंधित समजल्या जाणाऱ्या मार्गावर जाण्याचं धाडस करता आलं. मला विश्वास आहे की, जर एखाद्या पुरुषाने महिलेस साथ दिली, तर मोठ्या गोष्टी साध्य करणं सहज शक्य आहे.''
धमक्या आणि टीका
साधारण 18 महिन्यांपूर्वी रोयाने नर्सची नोकरी सोडली आणि तिने व्यावसायिक स्तरावर बॉडीबिल्डिंग सुरु केलं.
हा एक धोकादायक निर्णय होता. पण तिच्यासाठी खरं आव्हान हे नोकरी बदलण्याचं नव्हतं, तर त्या स्वातंत्र्याचा स्वीकार करणं होतं जे अफगाणिस्तानमध्ये तिला मिळालं नव्हतं.
रोया सांगते की, ''आमच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं, ते म्हणजे इतरांनी आमच्यासाठी तयार केलेल्या मर्यादा आणि नियम मोडणं. पारंपरिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा इतर कोणत्याही नावानं. पण काहीतरी नवीन करायचं असेल, तर आधी तुम्हाला त्या मर्यादेपलीकडे जायचं असतं.''
पण रोयाला या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

स्टेजवरील तिचे बिकिनीमधील रूप, खुले केस आणि मेकअप हे अफगाण समाजाच्या मानकांपासून आणि आजच्या सरकारी निर्बंधाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर टीका, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा सामना करावा लागला, यात काहीच नवल नाही.
पण ती या टीकांकडे दुर्लक्ष करते.
ती म्हणते, "लोकांना फक्त माझं बाह्य रूप दिसतं, माझा बिकिनी लूक दिसतो. माझे अनेक वर्षांचे कष्ट, दुखः आणि संयम त्यांना दिसत नाही. हे यश सहजासहजी मिळालेलं नाही."
तरीही सोशल मीडियाबद्दल रोयाचा दृष्टीकोन नकारात्मक नाही. ती याचा उपयोग अफगाणिस्तानच्या महिलांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी करते. येथे ती शारीरिक आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वतःला घडवण्याचं महत्त्व याबद्दल बोलत असते.
इतिहास रचण्याची तयारी
रोया वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपसाठी तयारी करत आहेत. ही स्पर्धा या आठवड्यात बार्सिलोनामध्ये सुरू होत आहे.
यावर्षी तिला आधीपेक्षा जास्त यश मिळवायचं आहे.
एप्रिलमध्ये तिने स्टोपेरिएट ओपन बॉडीबिल्डिंग स्पर्धेत वेलनेस कॅटेगरीत सुवर्ण पदक जिंकलं. या कॅटेगरीमध्ये स्नायूंपेक्षा नैसर्गिक फिटनेस, आरोग्यदायी दिसणं आणि साधेपणाला प्राधान्य दिलं जातं.
यानंतर लगेचच तिने नॉर्वे क्लासिक 2025 जिंकले. यात संपूर्ण स्कँडिनेव्हियातील खेळाडू सामील होतात.
यानंतर तिने युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि तिथूनच वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ती पात्र ठरली.
रोया म्हणते, "मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. असं वाटतं की, माझा सन्मान, आदर वाढला आहे. हे वर्ष खूप कठीण होतं, पण मी एक-एक पाऊल टाकत सुवर्णपदक जिंकले."
बॉडीबिल्डिंग स्पर्धांदरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेले तिचे पती आणि मुलगा नेहमी तिला प्रोत्साहन देतात.
रोयाचे पती कमाल म्हणतात की, "स्टेजवर रोयाला पाहणं म्हणजे आम्ही एकत्र पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता होणं आहे."
पण रोयासाठी ही स्पर्धा फक्त स्वतःसाठी नाही. ती म्हणते, "मला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत वाटत आहे. मी अफगाण मुली आणि महिलांच्या नावावर इतिहास घडवण्यासाठी माझी पूर्ण ताकद लावायला तयार आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











