IPL 2024 : समीर रिझवी, शाहरुख खान, रॉबिन मिंझ...लाखांची बेस प्राइस, कोट्यवधींची बोली

फोटो स्रोत, X-CHENNAIIPL
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2024 मधील खेळाडूंच्या लिलावाचा पहिला दिवस अनेक खेळाडूंना मालामाल करणारा ठरला.
मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. मिचेलला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतलं.
पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादनं 20.50 कोटींना विकत घेतलं.
या महागड्या बोलींमध्ये काही खेळाडू असे होते जे लिलावानंतर चर्चेत आले आहेत.
दुबईत मंगळवारी (19 डिसेंबर) झालेल्या लिलावात भारतीय 'अनकॅप्ड' क्रिकेटपटू ताऱ्यांसारखे चमकले.
'अनकॅप्ड' क्रिकेटर्स म्हणजे असे खेळाडू ज्यांनी आतापर्यंत भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही.
त्यांच्यामध्ये बरेच खेळाडू आहेत, ज्यांच्याबद्दल लिलावापूर्वी तुलनेनं कमी लोकांना माहिती होतं. या युवा खेळाडूंचा लिलाव सुरू झाला तेव्हा हा लिलाव कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचेल, याचा अंदाज कुणालाही आला नसेल.
आम्ही तुम्हाला अशाच काही खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.
समीर रिझवी कोण आहे ?
समीर रिझवी हा अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहे. समीरचा लिलाव 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसने सुरू झाला.
समीरला विकत घेण्यासाठी चांगली बोली लावण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात स्पर्धा सुरू झाली.
ही चढाओढ शेवटापर्यंत पोहोचली तोपर्यंत 20 लाख रुपयांची बोली 8.40 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती.

फोटो स्रोत, X/CHENNAIIPL
चेन्नई सुपर किंग्जने समीरला 8 कोटी 40 लाख रुपयांना खरेदी केलं. आयपीएल लिलावापूर्वी समीर यूपी टी-20 लीगमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रसिद्धीझोतात आला होता.
या लीगमध्ये समीरने 10 सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने 455 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही समीरच्या नावावर नोंदवला गेला.
20 वर्षीय समीर हा उत्तर प्रदेशातील मेरठचा आहे. समीरने यूपी टी-20 लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्ससाठी सर्वाधिक षटकार ठोकले होते.
या लीगमध्ये समीरने दोन शतकं झळकावली होती आणि अंतिम सामन्यात त्याने 50 चेंडूत 84 धावा केल्या होत्या. या खेळीमुळे समीरच्या संघाला स्पर्धा जिंकण्यात यश आलं.
अंडर-23 संघात समीरने राजस्थान विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 65 चेंडूत 91 धावा केल्या होत्या.
समीरचे मामा तनकीब अख्तर यांनाही क्रिकेटर व्हायचं होतं. पण त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. नंतर ते भाच्याच्या खेळात स्वत:ला पाहू लागले.
समीरने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, "मामा नेहमी माझ्यासोबत असायचे. गेल्या 14 वर्षात मला, असे 14 दिवसही आठवतही नाहीत जेव्हा मामा माझ्यासोबत मैदानावर नसतील."
समीरचे वडील हसीन रिझवी यांनी त्याचा मेव्हणा तनकीब यांना घरात येण्यापासून रोखलं होतं. कारण तनकीब यांनी समीरची क्रिकेटर बनण्याची क्षमता पाहिली होती आणि समीरने भारतासाठी खेळावं अशी त्यांची इच्छा होती.
मंगळवारी झालेल्या लिलावानं तनकीब यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल पडलं आहे.
रोहित शर्माला आपला हिरो मानणारा समीर म्हणतो, " माझ्या मामांचा माझ्यावर, माझ्यापेक्षा अधिक विश्वास होता. त्यांनी मला जबरदस्तीने बसवलं आणि लिलाव बघायला लावला. मला पाहायचा नव्हता, पण त्यांनी मला तो पाहायला लावला. मला आनंद आहे की मी तो पाहू शकलो."
समीरचे मामा तनकीब म्हणतात, " या वयात इतके पैसे...मला थोडी भीती वाटत आहे. कोच म्हणून माझी भूमिका संपली आहे. आता त्याला चांगले कोच मिळतील. माझं काम आता त्याला जमिनीशी जोडून ठेवणे आहे. ठीक आहे. हे अवघड काम असणार आहे."
कोण आहे शाहरुख खान?
7.40 कोटी रुपये.
मंगळवारी दुबईत लिलाव सुरू झाला तेव्हा सूर्यास्त होण्यापूर्वी आपलं भाग्य उजळून निघेल याचा अंदाज शाहरुखलाही आला नसेल.
गुजरात टायटन्सने शाहरुख खानला 7.40 कोटी रुपयांना खरेदी केलं. शाहरुखची बेस प्राइज 40 लाख रुपये होती. शाहरुख याआधी आयपीएल खेळला आहे आणि त्याच्यासाठी लावण्यात आलेल्या बोलीमुळे चर्चेत होता.

फोटो स्रोत, Getty Images
तामिळनाडूचा फलंदाज शाहरुखला किंग्ज इलेव्हन पंजाबने 2021 मध्ये 5.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. ज्युनियर स्तरावर स्विमिंग चॅम्पियन ठरलेल्या शाहरुख खानचं नाव फिल्मस्टार शाहरुख खानच्या नावावरुन ठेवलं आहे. असं असलं तरी तो स्वतः मात्र रजनीकांतचा फॅन आहे
1995 मध्ये चेन्नईमध्ये जन्मलेल्या शाहरुख खान याचे वडील मसूद हे देखील क्लब क्रिकेटर आहेत आणि ते लेदर व्यवसायात आहेत. त्याची आई लुबना या चेन्नईत बुटीक चालवतात. शाहरुख मधल्या फळीत झटपट धावा काढण्यासाठी ओळखला जातो.
शाहरुख 2012 मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आला, जेव्हा त्यानं ज्युनियर चेन्नई सुपर किंग्ज स्पर्धेत आपलं कौशल्य दाखवलं.
शाहरुख हा वयाच्या 18 व्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तामिळनाडूसाठी पहिला टी-20 सामना खेळला. 2014 मध्ये झालेल्या या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शाहरुखने गोव्याविरुद्ध केवळ 8 चेंडूत 21 धावा केल्या होत्या.
रॉबिन मिंझ कोण आहे?
आदिवासी खेळाडू रॉबिन मिंझ याला आयपीएल 2024 च्या लिलावात गुजरात टायटन्सनं 3.6 कोटी रुपयांना विकत घेतलं.
21 वर्षीय रॉबिन मिंझ याची बेस प्राइज 20 लाख रुपये होती. अनेक संघांनी रॉबिनमध्ये रस दाखवला पण शेवटी तो गुजरातच्या संघात गेला.
रॉबिन हा झारखंडचा आहे. तो डावखुरा फलंदाज रॉबिन हा धोनीचा फॅन आहे. धोनीप्रमाणेच रॉबिननंही अनुभवी प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आहे.

फोटो स्रोत, X/ROBINMINZ
तो झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आहे. जेव्हा मुंबई इंडियन्सने रॉबिनला ब्रिटनमध्ये प्रशिक्षण दिलं तेव्हा लोकांचं लक्ष सर्वप्रथम मिंझकडे गेलं.
सध्या तो रांचीमध्ये राहतो. मात्र आतापर्यंत तो रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या संघाकडून खेळू शकलेला नाही. पण, रॉबिन झारखंडच्या अंडर-19 आणि अंडर-25 संघांसाठी खेळला आहे.
एनडीटीव्ही स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, रॉबिनचे वडील लष्करात होते आणि निवृत्तीनंतर ते हल्ली रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर गार्ड म्हणून काम करतात. रॉबिनला दोन बहिणीही आहेत.
मुंबई इंडियन्स, लखनौ सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स यांच्याबरोबर ट्रायल्स खेळल्या आहेत. पण, 2023 च्या आयपीएल लिलावात रॉबिनला कोणताही खरेदीदार सापडला नाही.
कुमार कुशाग्र कोण आहे?
रॉबिनप्रमाणेच कुमार कुशाग्र हा झारखंडचा आहे.
दिल्ली कॅपिटल्सने कुशाग्र याला 7.20 कोटी रुपयांना विकत घेतलं. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स देखील कुमार कुशाग्रला विकत घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये होते.
अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडच्या विजयात कुमारने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
19 वर्षीय कुशाग्र यंदाच्या देवधर ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटिंमुळे चर्चेत होता. केवळ पाच डावांत कुशाग्रने 109 च्या स्ट्राईक रेटने 227 धावा केल्या होत्या.
विजय हजारे ट्रॉफीमध्येही कुशाग्र याने 37 चेंडूत 67 धावा केल्या होत्या.

फोटो स्रोत, X-DELHICAPITALS
कुशाग्र 2020 मध्ये अंडर-19 वर्ल्डकप संघात भारतीय संघाचा एक भाग होता.
2022 मध्ये कुशाग्र याने नागालँडविरुद्ध द्विशतक झळकावलं होतं. कुशाग्रने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ही कामगिरी केली होती.
कोण आहे शुभम दुबे?
शुभम दुबेचा आयपीएल लिलाव 5.8 कोटी रुपयांना झाला.
राजस्थान रॉयल्स संघानं दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकत शुभमचा आपल्या संघात समावेश केला.
शुभम दुबेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सात डावात 221 धावा केल्या. 29 वर्षीय शुभम हा मूळचा नागपूरचा आहे.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शुभम दुबे म्हणतो की, " टी-20 सय्यद मुश्ताक अलीमध्ये मी चांगला खेळलो होतो, त्यामुळे माझी निवड होईल अशी मला आशा होती. पण एवढी मोठी अमाउंट (रक्कम) येईल. मला कोटी रुपये मिळतील असं कधीच वाटलं नव्हतं. आता माझी जबाबदारी आणखी वाढली आहे."

फोटो स्रोत, X-RAJASTHAN ROYALS
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, शुभमचे वडील अनेक वर्षांपासून बेरोजगार आहेत. शुभमचा भाऊ एका खासगी कंपनीत काम करतो. शुभमला आशा आहे की आयपीएलमधून मिळालेल्या पैशामुळे त्याचं आयुष्य बदलेल.
शुभम म्हणतो, " माझ्या वडिलांकडे बऱ्याच काळापासून काम नाहीय. आम्ही खूप वाईट काळ पाहिला. वडील कधी इथे तर कधी तिथे काम करायचे. माझ्याकडे ग्लोज घेण्यासाठीही पैसे नव्हते. प्रशिक्षक सुजित जयस्वाल यांनी मला मदत केली. कोरोना काळात त्यांचं निधन झालं. जेव्हा राजस्थान संघाने मला विकत घेतलं तेव्हा सर्व आठवणी ताज्या झाल्या."
यश दयाल कोण आहे?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यश दयाल याला 5 कोटींना विकत घेतलं.
26 वर्षीय यश हा अलाहाबादचा असून डाव्या हाताने मध्यम वेगाने गोलंदाजी करतो.
यश दयाल याने 2018 मध्ये फर्स्ट क्लास सामन्यांमधून पदार्पण केलं.
यश याने 17 फर्स्ट क्लास सामन्यात 58, 42 टी-20 सामन्यात 38 विकेट घेतल्या आहेत.
कोण आहे एम सिद्धार्थ?
तामिळनाडूचा फिरकीपटू एम सिद्धार्थ याला लखनऊ सुपर जायंट्स संघाने 2.4 कोटी रुपयांना विकत घेतलं.
आरसीबी संघही सिद्धार्थला खरेदी करण्यात रस दाखवत होता पण लखनौचा संघाने त्याच्यावर अधिक बोली लावली.
सिद्धार्थची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

फोटो स्रोत, X-/LUCKNOWIPL
1998 मध्ये जन्मलेल्या सिद्धार्थने सात टी-20 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत.
त्यानं आतापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटच्या सात सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या आहेत.
कोण आहे सुशांत मिश्रा?
अंडर-19 वर्ल्डकप संघाचा खेळाडू असलेल्या सुशांतसाठी आयपीएल -2024 खास होता.
गुजरात टायटन्स संघाने सुशांतला 2 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी केलं.

फोटो स्रोत, X-GUJARAT TITANS
सनरायझर्स हैदराबादनंही सुशांतला विकत घेण्याचा प्रयत्न केला. सुशांत 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघात होता.
22 वर्षांचा सुशांत रांचीचा आहे.सुशांतने सात फर्स्ट क्लास सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत.
सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत?
- मिचेल स्टार्क, कोलकाता नाईट रायडर्स - 24.75 कोटी
- पॅट कमिंस, सनरायझर्स हैदराबाद - 20.50 कोटी
- डेरिल मिशेल, चेन्नई सुपर किंग्ज- 14 कोटी
- हर्षल पटेल, पंजाब किंग्स-11.75 कोटी
- अल्झारी जोसेफ, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 11.50 कोटी

- स्पेन्सर जॉन्सन, गुजरात टायटन्स - 10 कोटी
- समीर रिझवी, चेन्नई सुपर किंग्ज - 8.40 कोटी
- रोव्हमन पॉवेल, राजस्थान रॉयल्स - 7.40 कोटी
- शाहरुख खान, गुजरात टायटन्स-7.40 कोटी
- कुमार कुशाग्र, दिल्ली कॅपिटल्स- 7.2 कोटी
असे प्रसिद्ध खेळाडू ज्यांना खरेदीदार मिळाला नाही
- स्टीव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार
- जोश हेझलवूड, ऑस्ट्रेलियन खेळाडू

फोटो स्रोत, Getty Images
- रेसी वेन डेर डसन, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू
- कायली जेमिसन, न्यूझीलंडचा खेळाडू, ज्याची जगातील सर्वात उंच वेगवान गोलंदाजांमध्ये गणना केली जाते
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








