'रिव्हेंज पॉर्न'चा कटू अनुभव आल्यानंतर स्वतः काढली कंपनी; 'अनोख्या' टेक फाउंडरचा प्रवास

- Author, निकोला ब्रायन
- Role, बीबीसी वेल्स
टेक कंपन्यांच्या प्रमुखांबद्दल जशी कल्पना असते, तशा मॅडलिन थॉमस या 'टिपिकल' टेक कंपनी प्रमुख नाहीत. अनेक कटू अनुभवांतून गेल्यावर त्यांनी आपली टेक कंपनी सुरू केली आहे. त्यांच्या या कंपनीचा उद्देश आहे की जसा त्यांना त्रास झाला तसा इतरांना होऊ नये.
त्यांचे खासगी आणि बोल्ड फोटो वारंवार लीक करून तिची जाहीर बदनामी केली गेली. यामुळे त्या इतक्या चिडल्या की त्यांनी 'काहीतरी करायचं' ठरवलं आणि यावर उपाय शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला.
मॅडलिन म्हणतात की, "ते फोटो सुंदर होते, मला त्यांची अजिबात लाज वाटत नाही. पण एका अनोळखी व्यक्तीने ज्या प्रकारे त्यांचा वापर माझ्याविरुद्ध केला, त्यामुळे माझी बदनामी झाली त्या गोष्टीचा मला खूप त्रास झाला."
त्यांनी 'इमेज एंजल' (Image Angel) नावाची कंपनी सुरू केली. ही कंपनी फोटोंचा गैरवापर करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी 'इन्व्हिजिबल फॉरेन्सिक वॉटरमार्किंग'चा वापर करते.
वर्षभरातच या कंपनीने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. तसेच, बॅरोनेस बर्टिन यांच्या स्वतंत्र पॉर्नोग्राफी रिव्ह्यूमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
त्यांची पार्श्वभूमी पाहता हे क्षेत्र त्यांच्यासाठी पूर्णपणे वेगळं आहे. त्या डॉमिनेट्रिक्स म्हणून काम करत. डॉमिनेट्रिक्स म्हणजे अशी व्यक्ती जी परस्पर सहमतीने केलेल्या लैंगिक संबंधांमध्ये पूर्णपणे नियंत्रण आपल्या हाती ठेवतो. मॅडलिन ही सेवा प्रामुख्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्महून पुरवत.

ज्या व्यक्तीसोबत आधी सहमतीने संबंध प्रस्थापित केले आणि त्या खासगी क्षणांचे ऑनलाइन वितरण करणे याला रिव्हेंज पॉर्न म्हटले जाते. हा एक गुन्हा आहे. यासाठी आरोपीला 2 वर्षांपर्यंत जेल होऊ शकते.
असे अनुभव फक्त सेक्स इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांनाच येतात असं नाही.
'रिव्हेंज पॉर्न हेल्पलाइन'च्या रिपोर्टनुसार, युकेमधील साधारण 1.42% महिला दरवर्षी या त्रासाला सामोऱ्या जातात.
मॉन्मथशायरच्या 37 वर्षीय मॅडलिन सांगतात की, यातून वाचलेल्या महिलांना खूप मोठा मानसिक धक्का आणि सामाजिक कलंक सोसावा लागतो.
ती म्हणते, "मला माहीत आहे अनेक लोक म्हणतील, तुम्हीच इंटरनेटवर तुमचे फोटो टाकतात. मग तुम्ही आता का विरोध करत आहात."
"पण मला आदर आणि विश्वास हवा आहे आणि त्यात तडजोड का करावी हे मला समजत नाही. माझे फोटो माझ्या परिसरात किंवा माझ्या जवळच्या लोकांमध्ये पसरवले जातात जेणेकरून मला त्रास होईल. ही माझी चूक नाही, हा समोरच्या व्यक्तीकडून छळ आहे."

फोटो स्रोत, Image Angel
मॅडलिन यांनी 10 वर्षांपासून 'ऑनलाइन डॉमिनेट्रिक्स' म्हणून काम केलं. त्यांना त्यांचं काम नेहमीच आत्मविश्वास देणारं वाटलं आहे.
त्या सांगतात, "एक डॉमिनंट स्त्री म्हणून, एक सक्षम स्त्री म्हणून मी माझ्या इच्छेने माझ्या शरीराबाबत निर्णय घेऊन समोरच्या व्यक्तीला आनंद देत आहे. ही माझी इच्छा आहे, कारण हे मला करावेसे वाटतंय, कारण हे माझं शरीर आहे आणि मला जे हवं आहे ते मी करत आहे."
"लोकांना हे विचित्र वाटू शकतं, पण माझ्यासाठी हे एखाद्या न्यूट्रिशनिस्ट किंवा अकाउंटंटने सल्ला देण्यासारखंच आहे."
एका टेक कंपनीची प्रमुख असण्यातील विरोधाभास त्या खुल्या मनाने स्वीकारतात.
"मला माहीत आहे हे खूप अजब वाटतं की एक डॉमिनेट्रिक्स आता एका टेक कंपनीची प्रमुख आहे. पण ज्या व्यक्तीने हे भोगलंय, त्याच व्यक्तीला यातले खाचखळगे माहिती असू शकतात आणि काय बदल व्हायला हवेत हे चांगलं समजू शकतं."
त्यांना तंत्रज्ञानाची फारशी माहिती नव्हती. पण अनेक रात्री जागून, संशोधन करून आणि तज्ज्ञांना प्रश्न विचारून त्यांनी ही कंपनी उभी केली.
त्या सांगतात, "मी डॉमिनेट्रिक्स म्हणून काम केलंय यावरुन मला कुणी जज करतं असं मला वाटत नाही. उलट या कामाच्या अनुभवामुळे माझ्यात आत्मविश्वास आला आहे आणि माझ्या जवळ असलेलं या क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव जगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांकडे नव्हता."

'इमेज एंजल'चा वापर अशा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर (उदा. डेटिंग ॲप्स, सोशल मीडिया) करता येतो जिथे फोटो शेअर केले जातात.
जेव्हा एखादी व्यक्ती फोटो पाहते, तेव्हा त्या फोटोमध्ये एक अदृश्य 'वॉटरमार्क' आपोआप सेट होतो, जो फक्त त्या पाहणाऱ्या व्यक्तीचा असतो.

हा वॉटरमार्क फोटोच्या कॉपीमध्येच असतो. त्यामुळे फोटोचा स्क्रीनशॉट काढला, तो एडिट केला किंवा दुसऱ्या फोनने त्याचा फोटो काढला तरीही तो वॉटरमार्क त्यातच राहतो.
याचा अर्थ असा की, जर तुमचा फोटो तुमच्या परवानगीशिवाय शेअर झाला, तर तो फोटो ज्याने शेअर केला त्याची माहिती त्या फोटोमध्ये लपलेली असते. डेटा रिकव्हरी एक्सपर्ट ती माहिती शोधून काढू शकतात आणि मग कारवाई करता येते.
आतापर्यंत एका प्लॅटफॉर्मने हे तंत्रज्ञान स्वीकारलं आहे आणि इतर अनेकांशी चर्चा सुरू आहे.

मॅडलिन सांगतात की, "हे तंत्रज्ञान हॉलिवूड आणि स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंगमध्ये आधीपासूनच वापरलं जातंय. हे काही नवीन नाही फक्त आम्ही त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने करतोय. आम्ही याची चाचणी केली आहे आणि 30 वर्षांचा अनुभव असलेल्या कंपनीसोबत आम्ही काम करत आहोत.
त्यांना आशा आहे की या तंत्रज्ञानामुळे लोक कोणाचे खासगी फोटो शेअर करायला घाबरतील.
'साउथवेस्ट ग्रिड फॉर लर्निंग'च्या (SWGFL) केट वर्थिंग्टन म्हणतात की, फोटो लीक झाल्यावर पीडित व्यक्तींना खूप भीती वाटते आणि त्या स्वतःलाच दोष देऊ लागतात.
त्या म्हणतात की, "जर एखादा मित्र किंवा मदतीला आलेली व्यक्ती म्हणाली की 'तू फोटो काढलेच का?', तर त्या व्यक्तीचा स्वतःवरचा विश्वास पूर्ण उडतो. त्यामुळे त्यांना 'तुमची काहीच चूक नाही' हे सांगणं महत्त्वाचं आहे."

मॅडलिनच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलंय. त्या म्हणतात की अशा छळाला थांबवण्यासाठी फक्त एक साधन पुरेसे नाही, तर अनेक स्तरांवर प्रयत्न होणं गरजेचं आहे.
टीव्ही प्रेझेंटर जेस डेव्हिस फक्त 15 वर्षांची असताना त्यांचे फोटो त्यांच्या गावात व्हायरल केले गेले होते.
जेस म्हणतात की, "कोणीतरी मला 'ही तुझी चूक नव्हती' असं म्हणायला खूप वेळ लागला. संमतीने कोणाला फोटो पाठवणं हा गुन्हा नाही, पण तो फोटो परवानगीशिवाय दुसऱ्यांना दाखवणं हा गुन्हा आहे. दोष नेहमी फोटो पसरवणाऱ्याचाच असायला हवा."
(या लेखात ज्या गोष्टींबाबत बोलण्यात आलं आहे, तसा अनुभव तुम्हाला आला असेल तर समुपदेशन आणि सहकार्यासाठी तुम्ही बीबीसी अॅक्शन लाइव्हशी संपर्क साधू शकता.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











