बहिणीच्या नवऱ्याची हत्या करणारा सादिक ते राजनचा विश्वासू बग्गा रेड्डी...अंडरवर्ल्डच्या 4 धोकादायक शूटर्सची गोष्ट

फोटो स्रोत, PTI
- Author, रेहान फझल
मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील एक किस्सा प्रसिद्ध आहे. माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानला जाणारा, छोटा शकील एकदा सादिक जलावारला म्हणाला होता, "तुझ्या मेहुण्याची हत्या कर, मग मी समजेन की तुझ्यात काहीतरी विशेष गोष्ट आहे."
हे ऐकताच सादिकच्या पायाखालची वाळू सरकली. त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्याचा चेहरा पांढरा पडला आणि त्याचे हात थरथरू लागले.
सादिकचं त्याच्या बहिणीवर खूप प्रेम होतं. त्याच्या मेहुण्याचं नाव झुल्फिकार होतं. छोटा शकील, सादिकला म्हणाला की त्यानं (सादिक) त्याला तेव्हाच फोन करावा, जेव्हा त्याचा मेहुणा, झुल्फिकारचा मृत्यू झालेला असेल.
सादिकनं टेबलावर ठेवलेल्या एका ग्लासमधून पाण्याचा एक घोट घेतला. मग तो शकीलला म्हणाला की, हे काम होईल. मात्र शकीलला सादिकची पूर्ण परीक्षा घ्यायची होती. त्याला सादिकला कोणतीही सूट द्यायची नव्हती.
एस हुसैन झैदी यांनी 'द डेंजरस डझन, हिटमॅन ऑफ मुंबई अंडरवर्ल्ड' हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे, शकील सादिकला म्हणाला, 'तू यासाठी पिस्तूलचा वापर करावा, असं मला वाटत नाही.'
सादिकनं काही काळापूर्वीच अरुण गवळीची टोळी सोडली होती. त्याला काही झालं तरी छोटा शकीलचा विश्वास जिंकायचा होता. मग त्यासाठी त्याला त्याच्या बहिणीला विधवा करायची किंमत मोजावी लागली तरी त्याची तयारी होती.

फोटो स्रोत, Simon & Schuster
एक दिवस झुल्फिकारला एका हातानं गळाभेट दिली आणि त्याचा दुसरा हात मागच्या बाजूला ठेवला.
सादिक म्हणाला, 'भाईजान, मला माफ करा' आणि मग त्यानं झुल्फिकारवर चाकूनं पाच वार केले. त्यानं स्वत:च्या बहिणीच्या घराकडे शेवटचं पाहिलं. मग त्यानं मोटरसायकल घेतली आणि तिथून निघून गेला. मग त्यानं शकीलला फोन केला आणि सांगितलं की काम झालं.
हे ऐकून शकील स्तब्ध झाला. त्याला वाटत होतं की, सादिक त्याला फोन करून सांगेल की हे काम करणं त्याला शक्य नाही आणि त्याला दुसरं काहीतरी काम देण्यात यावं. त्या दिवसापासून सादिक जलावारला 'सादिक कालिया' म्हटलं जाऊ लागलं. या घटनेनंतर छोटा शकीलनं त्याला भेटण्यासाठी दुबईला बोलावलं.
सादिक कालियाचा एन्काऊंटर
छोटा शकीलनं सादिकची ओळख सलीम चिकना या आणखी एका गँगस्टरशी करून दिली. चिकनाची मोटरसायकल चालवण्यात हातोटी होती.
त्या दोघांनी मिळून 1990 च्या दशकाच्या मध्यात छोटा राजनच्या गँगला मुंबई सळो की पळो करून सोडलं होतं. मुंबई पोलिसांचा अंदाज आहे की या दोघांनी शकीलच्या सांगण्यावरून 20 हून अधिक लोकांची हत्या केली होती.
मात्र छोटा शकीलनं दिलेलं एक काम सादिकला पूर्ण करता आलं नाही. ते काम होतं, त्याचा जुना डॉन अरुण गवळीची हत्या करण्याचं. अरुण गवळीनं राजकारणात उतरण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
हुसैन झैदी लिहितात, "सादिककडे माहिती होती की, अरुण गवळी पुण्याहून मुंबईत येऊन एका सभेत भाषण करणार आहे. तो त्या सभेत जाऊन गवळीच्या समर्थकांसमोर त्याला गोळी घालणार होता. मात्र गवळीला याचा सुगावा लागला. मग त्यानं ती सभा रद्द केली."

फोटो स्रोत, Getty Images
सादिक कालियाने अनेक तास वाट पाहिली, मात्र गवळी तिथे आला नाही. पोलिसांच्या वर्तुळात सादिकचं नाव 'भूत' ठेवण्यात आलं होतं. कारण तो भुताप्रमाणेच गायब होण्यात पटाईत होता. दुसरं म्हणजे, तो रंगानं काळा असल्यामुळे अंधारात लपताना त्याला फायदा होत असे.
कालियाला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही. मात्र त्याचा पेजर नंबर कुठूनतरी पोलिसांच्या हाती लागला. या नंबरच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी आधी सलीम चिकनाला पकडलं. मग त्याच्या मदतीनं 12 डिसेंबर 1997 ला दादरच्या फूल बाजारात सादिक कालियाला घेरलं. पोलिसांकडून झाडण्यात आलेल्या शेकडो गोळ्यांपुढे कालियाचा निभाव लागणं शक्य नव्हतं.

फोटो स्रोत, Men's World
नंतर सब-इन्स्पेक्टर दया नायक यांनी 'मेन्स वर्ल्ड'च्या मंजुला सेन यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, "छोटा शकीलच्या सर्वात चांगल्या शूटरपैकी एक असलेल्या सादिक कालियाला मी मारलं हे माझ्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक होतं."
"आम्ही त्याला दादरच्या फूल मार्केटमध्ये घेरलं. त्यानं माझ्या दिशेनं सहा गोळ्या झाडल्या. माझ्या डाव्या मांडीत गोळी लागली. मात्र त्याला मारण्यात आम्हाला यश आलं."
बग्गा रेड्डीचं आवडतं ड्रिंक
आता जाणून घेऊया, आणखी एक हिटमॅन, वेंकटेश बग्गा रेड्डी ऊर्फ बाबा रेड्डीबद्दल. एकदा पोलिसांनी बाबा रेड्डीला अटक केली. त्याला बराच वेळ थर्ड डिग्री देऊन देखील तो पोलिसांना कोणतीही माहिती देत नव्हता.
त्यानंतर, एका कॉन्स्टेबलनं बाहेर येऊन त्याच्या अधिकाऱ्याला विचारलं, "साहेब तो म्हणतो आहे की जर त्याला त्याच्या आवडत्या ड्रिंकची एक बाटली दिली, तर तो आपल्या प्रश्नांची उत्तर देईल."
तो अधिकारी रागानं म्हणाला, "तुला वेड लागलं आहे का. आपण त्याला कोठडीत दारू कशी काय देऊ शकतो?"
त्यावर शिपायानं जे उत्तर दिलं, ते ऐकून तो अधिकारी सुन्न झाला. शिपाई म्हणाला, "साहेब, तो दारूची नाही, रक्ताची एक बाटली मागतो आहे."
शिपायांनी बाबा रेड्डीला कत्तलखान्यातून बोकडाच्या रक्ताची एक बाटली आणून दिली. त्यानंतर तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ लागला.

फोटो स्रोत, Roli Books
हुसैन झैदी लिहितात, "28 वर्षांचा असताना बग्गा मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासातील सर्वात गूढ व्यक्तिमत्व बनला होता. आणखी एक विशेष गोष्ट होती. ती म्हणजे तो फक्त बिगर हिंदूंचीच हत्या करायचा. हैदराबादजवळच्या मुशीराबादचा रहिवासी असलेल्या बग्गानं नवव्या इयत्तेनंतर शिक्षण सोडलं होतं."
"बग्गा 1989 मध्ये मुंबईत आला होता. इथे आल्यावर तो एका बारमध्ये बाउन्सर म्हणून काम करू लागला. मग त्यानं छोटा राजन गँगसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्या लोकांवर या गोष्टीचा प्रभाव पडला होता की बग्गा एकाचवेळी त्याच्यासारख्या एक डझन लोकांना मारहाण करू शकायचा. लवकरच त्यानं मोठी रक्कम घेऊन हत्या करण्यास सुरुवात केली."
त्याकाळी या कामासाठी त्याला 30 हजार ते 50 हजार रुपये दिले जात होते. नंतर बग्गा रेड्डी एक महिलेच्या प्रेमात पडला.
झैदी यांनी त्याच्या एका प्रेम प्रसंगाबद्दल लिहिलं आहे, "बग्गाला माहित झालं की त्या महिलेचं नाव शहनाज आहे आणि ती मुस्लीम आहे. त्यानं त्या महिलेशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्या महिलेनं एक अट घातली. ती म्हणजे त्याला लग्न करण्याआधी इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल."
"मुस्लिमांचा द्वेष करणारा बग्गा त्या महिलेच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तो मुस्लीम होण्यासाठी तयार झाला. त्यानं स्वत:चं नाव अझीज रेड्डी ठेवलं. लग्न झाल्यानंतर बग्गामधील क्रूरपणा कमी होऊ लागला. 26 जुलै 1998 ला एका टिपच्या आधारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला अटक केली."
जामिनावर सुटका झाल्यानंतर तो बनावट पासपोर्टचा वापर करून मलेशियाला गेला. तिथे त्याची भेट छोटा राजनशी झाली.
बग्गा रेड्डीचा शेवट
मग तो इंडोनेशियाला गेला. तिथे राजननं त्याला अंमली पदार्थ तयार करणाऱ्या एका युनिटचा इंचार्ज केलं. डिसेंबर 2002 मध्ये बग्गा भारतात परतला.
त्याला माहित होतं की दाऊद इब्राहिमचे लोक त्याला मारण्यासाठी टपलेले आहेत. आधी त्यानं वाराणसीला अड्डा बनवला. मग तो हैदराबादला गेला. हैदराबादमध्ये तो शस्त्रांचा सप्लायर बनला आणि गुन्हेगारी टोळ्यांना बेकायदेशीर शस्त्र पुरवू लागला.
त्याच्याकडे दक्षिण भारतात, नलगोंडा जिल्ह्यात 40 एकर जमीन होती. बग्गाचं वैशिष्ट्यं म्हणजे तो अपहरणाची खंडणी चेकनं वसूल करायचा. मे 2008 मध्ये पोलिसांना खबर मिळाली की बग्गा ज्युबिली हिलमध्ये येणार आहे.

फोटो स्रोत, Telangana Police
टास्क फोर्सचे कमांडो तो येण्याआधीच तिथे तैनात झाले. रस्ते मोकळे करण्यात आले. कोणत्याही वाहनाला तिथे जाण्यास मज्जाव करण्यात आला. बग्गा एका कारमधून तिथे आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कारला घेरलं.
नंतर हैदराबादचे पोलीस आयुक्त बी प्रसाद राव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं, "आम्हाला माहिती मिळाली की बग्गा त्याच्या दोन साथीदारांसह ज्युबिली हिलमध्ये खंडणी उकळण्यासाठी येणार आहे. आम्ही दोन तास त्या परिसराची झडती घेतली. रात्री सव्वा 11 वाजता आम्ही त्याच्या कारला बीएन रेड्डी नगरला जाणाऱ्या रोड नंबर 46 वर इंटरसेप्ट केलं."
पोलीस त्याच्या दिशेनं जाऊ लागताच, त्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना शरण येण्यास सांगताच, रेड्डीनं 9 एमएमचं पिस्तूल काढलं आणि पोलिसांवर गोळीबार करू लागला. त्याला पोलिसांनी गोळीबार करून प्रत्युत्तर दिलं. रेड्डीला गोळ्या लागल्या आणि तो खाली पडला. त्याचे दोन्ही साथीदार तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
डीसीपीच्या डोळ्यांवर जेव्हा पट्टी बांधण्यात आली
25 ऑगस्ट 1994 ला जवळपास 10 वाजता बांद्रा येथील हिल रोड या व्यग्र भागातील एका हाऊसिंग सोसायटीमधून पांढऱ्या रंगाची ॲम्बेसेडर कार बाहेर पडली. अचानक दोनजण कुठून तरी आले आणि त्यांनी एके-56 रायफलमधून कारवर गोळ्यांचा वर्षाव केला. पुढच्या सीटवर बसलेल्या पोलीस गार्डनं त्याच्या स्टेन गनमधून गोळीबार केला. मात्र हल्लेखोरांनी त्यालादेखील लक्ष्य करून निष्क्रिय केलं.
मागच्या सीटवर बसलेले भाजपाचे नगराध्यक्ष रामदास नायक यांचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण मुंबई पोलीस दल या हत्येच्या तपासाला लागलं. त्याचवेळेस मुंबई पोलीस दलातील उपायुक्त (डीसीपी) राकेश मारिया यांना एक फोन आला.

फोटो स्रोत, Westland
राकेश मारिया यांनी 'लेट मी से इट नाऊ' हे आत्मचरित्र लिहिलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलं आहे, फोन करणाऱ्यानं मला विचारलं, "साहेब तुम्हाला रामदास नायक हत्या प्रकरणातबद्दल माहिती हवी आहे का? मी लगेच म्हटलं, 'हो'. त्यावर तो म्हणाला, 'त्यासाठी तुम्हाला मला भेटण्यासाठी बाहेर यावं लागेल.' मी विचारलं, 'कुठे?' तो म्हणाला, मी तुम्हाला घेण्यासाठी कार पाठवेन."
"आधी मला वाटलं की ही एक चाल असू शकते. तो व्यक्ती म्हणाला की बरोबर 2 वाजता माझ्या कार्यालयासमोर एक कार मला घ्यायला येईल. थोड्या वेळानं काळ्या काचा असलेली पांढरी मारुति व्हॅन माझ्यासमोर येऊन थांबली. त्याच्या नंबर प्लेटवर चिखल लागलेला होता."
मारिया यांनी लिहिलं आहे, "मी कारमध्ये बसताच, कारमध्ये बसलेल्या लोकांनी माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली. 15 मिनिटं चालवल्यानंतर कार एका जागी थांबली. मी एका वातानुकुलित खोलीत शिरलो. मग, माझ्या कानावर तो आवाज पडला, जो माझ्याशी फोनवर बोलला होता."
"तो म्हणाला, 'साहेब, तुम्हाला याप्रकारे इथं आणण्यासाठी मी माफी मागतो.' मी म्हणालो, त्याची आवश्यकता नाही. मला सांग, तुला काय माहित आहे? त्यावर तो म्हणाला, तुम्ही फिरोज कोंकणीचं नाव ऐकलं आहे का? मी म्हणालो, नाही, हा कोण आहे. तो म्हणाला, एक धाडसी तरुण आहे. त्यानं हे काम केलं आहे. त्यानंतर कारनं मला त्याच जागी सोडलं, जिथून त्यांनी मला पिक अप केलं होतं."
फिरोज कोंकणीला नाट्यमयरित्या अटक
19 ऑक्टोबर 1994 ला मारिया यांना पुन्हा त्याच व्यक्तीचा फोन आला. तो म्हणाला, "'तुम्हाला फिरोज कोंकणी हवा आहे का?' मारियांनी उत्तर दिलं, 'नक्कीच हवा आहे'.
त्यावर त्या व्यक्तीनं सांगितलं, 'याक्षणी तो बंगलोरमध्ये (आताचं बंगळुरू) आहे. त्याला पकडण्यासाठी तुम्हाला स्वत:ला जावं लागेल.' मात्र मारिया यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना बंगळुरूला जाण्याची परवानगी दिली नाही."
"त्यांच्या जागी त्यांची टीम बंगळुरूला गेली. त्या व्यक्तीनं मारिया यांना फोन करून सांगितलं की कोंकणी आज एक चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहे. तुम्हाला त्याला तिथेच अटक करावी लागेल."
"जेव्हा सर्व तयारी झाली, त्यावेळेस त्याचा पुन्हा फोन आला की कोंकणीनं चित्रपट पाहण्याचा विचार बदलला आहे. आता तो हॉटेलमध्येच थांबून त्याच्या साथीदारांबरोबर बिअर पिणार आहे."

फोटो स्रोत, Roli Books
राकेश मारिया यांनी लिहिलं आहे, "त्या हॉटेलचं नाव होतं - 'ब्ल्यू डायमंड' आणि फिरोज रूम नंबर 206 मध्ये होता. आम्ही हॉटेलच्या व्यवस्थापकाला विश्वासात घेतलं. साडे सात वाजता रूम सर्व्हिसला रूम नंबर 206 मधून चिकन लॉलीपॉपची ऑर्डर मिळाली."
"टीमनं ठरवलं की ते ट्रॉलीमध्ये जेवण घेऊन खोलीत जातील. सब-इन्स्पेक्टर वार्पे यांना वेटर बनवण्यात आलं. त्यांनी ट्रॉलीमध्ये त्यांचं रिव्हॉल्व्हर लपवलं. खोलीमध्ये वार्पे प्लेट काढण्यासाठी वाकले आणि त्यांनी रिव्हॉल्व्हर काढून फिरोज कोकणीच्या दिशेनं रोखलं. मग आमचे इतर सहकारीदेखील खोलीत शिरले आणि त्यांनी कोंकणीला अटक केली."
कोंकणीला विमानानं मुंबईत आणण्यात आलं. कोंकणीनं मान्य केलं की त्यानं एकूण 21 हत्या केल्या आहेत. मात्र 4 वर्षांनी 6 मे 1998 ला फिरोज कोकणी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला. तो नेपाळमार्गे दुबईला पोहोचला. नंतर माहित झालं की 2003 मध्ये दाऊदच्या लोकांनी त्याची हत्या केली.
हुसैन झैदी यांना वाटतं की कोणीतरी त्याचं बोलणं टेप केलं होतं. ज्यात तो दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमला शिव्या देत होता. या चुकीमुळे त्याला जीव गमवावा लागला.
राकेश मारिया यांनी लिहिलं आहे, "कोंकणी अंडरवर्ल्डमध्ये 'डार्लिंग' या नावानं ओळखलं जात असे. तुरुंगातील गार्डनं मला त्याच्याबद्दल एक विचित्र गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट मी कधीही विसरू शकलो नाही."
"तुरुंगातील त्याच्या कोठडीत जेव्हा काळ्या मुंग्या यायच्या, तेव्हा तो त्यांना बोटांनी पकडायचा. मग एक-एक करत त्यांचे पाय तोडायचा. त्यानंतर त्यांचे पाय नसलेले शरीर जमिनीवर लोळत पाहत राहायचा."
मोहम्मद शेख 'उस्तरा'ची कहाणी
अशीच कहाणी आहे मोहम्मद हुसैन शेख या आणखी एका शूटरची. तो 'उस्तरा' या नावानं ओळखला जात असे. उस्तराला दाऊद इब्राहिमचा उजवा हात छोटा शकीलविषयी द्वेष होता. अर्थात तो जरी बंदूक चालवण्यात पटाईत होता. तरीदेखील त्याचं नाव 'उस्तरा' पडलं होतं. रेझर ब्लेडच्या वापरामुळे हे नाव पडलं होतं.
पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागला नाही, कारण तो पोलिसांना अंडरवर्ल्डची माहिती द्यायचं कामदेखील करायचा.
हुसैन झैदी यांनी लिहिलं आहे, "उस्तरानं मला त्याच्या बाहीत लपवलेलं ब्लेड दाखवलं. तो बढाई मारायचा की तो तीन सेकंदापेक्षाही कमी वेळेत एक पिस्तूल असेंबल करू शकतो. त्याचं आवडतं शस्त्र होतं, 1914 मध्ये बनलेलं माउजर."
"उस्तराच्या जवळच्या लोकांमध्ये सहाजणांचा समावेश होता. त्यातील प्रत्येकात शारीरिक दृष्टिकोनातून काहीतरी विचित्रपणा होता. कोणाला एखादं अतिरिक्त अंग किंवा अवयव होता. एखाद्याच्या डोळ्यांचा रंग वेगवेगळा होता. तर कोणाचा एक कान मोठा होता."
"उस्तराला वाटायचं की शारीरिकदृष्ट्या काहीतरी व्यंग किंवा विचित्रपणा असलेले लोक त्यांच्या क्षेत्रातील काम करण्यात निपुण असतात."
महिला हा उस्तराचा कच्चा दुवा किंवा दोष होता. तो विवाहित होता आणि काही मुलांचा बाप होता. मात्र तरीदेखील त्याचे अनेक महिलांशी संबंध होते. दाऊद इब्राहिमला याची कल्पना होती. त्यामुळेच त्यानं उस्तराच्या आयुष्यात एका महिलेचा प्रवेश घडवून आणला.
हुसैन झैदी यांनी लिहिलं आहे, एकदा त्या महिलेनं उस्तराला त्याच्या अंगरक्षकांशिवाय एकट्यानं भेटण्याचा आग्रह केला. उस्तरानं तिचं म्हणणं मान्य केलं. 1998 च्या एका सकाळी उस्तरा त्या महिलेला भेटण्यासाठी बाहेर पडताच, छोटा शकीलनं पाठवलेल्या सहाजणांनी त्याला घेरलं.
तीन सेकंदात पिस्तूल जोडणाऱ्या उस्तरावर सर्व बाजूंनी गोळीबार झाला. शव विच्छेदनाच्या अहवालात म्हटलं होतं की त्याला एकूण 27 गोळ्या लागल्या होत्या.
उस्तरा म्हणत असे, "मी अनेकजणांची कबर खोदली आहे. एक दिवस कोणीतरी माझ्यासाठीदेखील 'खड्डा' खोदेल." त्याचं ते म्हणणं अखेर खरं ठरलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











