पाठदुखी का होते? ती कशी टाळता येते? त्यावर काय उपाय करता येऊ शकतात?

फोटो स्रोत, Getty Images and BBC
बहुतांश लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी पाठदुखीला तोंड द्यावंच लागतं.
सर्वसाधारणपणे पाठदुखी काही आठवड्यांमध्ये बरी होते. मात्र वारंवार त्रास होत असल्यास त्याचा तुमच्यावर विपरित परिणाम होतो, तुम्ही अशक्त होऊ शकता. यामुळे दैनंदिन आयुष्य जगणं कठीण होतं.
मानवाच्या पाठीचा कणा फक्त बरगड्या आणि कंबरेच्या खालच्या नितंबाच्या भागातील हाडांनाच जोडलेला नसतो. यात अनेक प्रकारचे टेंडन, लिगामेंट, कार्टिलेज, स्नायू आणि नसांचा देखील समावेश असतो. त्यामुळे यातील कोणत्याही भागात समस्या निर्माण झाल्यास पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
या लेखात आम्ही काही सूचना करत आहोत, ज्या अंमलात आणल्यास सर्व वयोगटातील लोक या वेदनेपासून वाचू शकतात आणि त्याला नियंत्रणात आणू शकतात.
कंबरेबरोबर मान दुखणं ही चिंतेची बाब
ग्लोबल बर्डन ऑफ डीझीज (जीबीडी) स्टडीच्या ताज्या आवृत्तीनुसार, 2050 पर्यंत सतत कंबरदुखी असणाऱ्या लोकांच्या संख्येत एक-तृतियांशाहून अधिकची वाढ होण्याचा अंदाज आहे.
हा अभ्यास अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या, इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनच्या संशोधकांनी केला आहे.
तोपर्यंत जगातील दर दहापैकी एकापेक्षा अधिकजण या समस्येनं ग्रासलेला असेल.

फोटो स्रोत, Getty Images
जीबीडीनुसार,जागतिक आरोग्यावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या आजारांमध्ये स्ट्रोक, हृदयविकार आणि फुफ्फुसाचे आजार, मधुमेह आणि नवजात बाळांशी निगडीत समस्यांचा समावेश असेल.
अर्थात कंबरेच्या खालच्या भागामुळे जास्त त्रास होतो. कारण हा भाग शरीराच्या बहुतांश क्रिया हाताळतो. त्यावर जास्त दबाव असतो. मात्र पाठीचा वरचा भाग, विशेषकरून मान आणि खांदेदेखील त्रासाचं कारण ठरू शकतात.
उपचाराआधी निदान महत्त्वाचं
पाठदुखीमध्ये उपचार करण्याआधी निदान होणं महत्त्वाचं आहे. कारण या दुखण्यासाठी अनेक संभाव्य कारणं असू शकतात. मात्र त्याचा अर्थ हादेखील आहे की त्यासाठी कोणतीही एक चाचणी नसते.
डॉक्टर सर्वसाधारणपणे सर्वात प्राणघातक आजारांची शंका दूर करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, पित्ताशय, किंवा मूत्रपिंडाचा आजार किंवा कर्करोगाचे काही प्रकार. याच्या उपचारांमध्ये सर्वसाधारणपणे शारीरिक तपासणी आणि रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी पाहणं यांचा समावेश असतो.
रक्तचाचणीद्वारे कर्करोग किंवा सूज याबद्दल समजू शकतं, ज्यामुळे कार्टिलेजचं नुकसान होऊ शकतं आणि संधिवात होऊ शकतो.
निदानाची खातरजमा होण्यासाठी इमेजिंग टेस्टची आवश्यकता भासू शकते. उदाहरणार्थ, एक्स-रे, सीटी स्कॅन, अल्ट्रासाऊंड किंवा एमआरआय. यामुळे सांधे, हाडं, डिस्क, अवयव किंवा मऊ ऊतींची तपासणी केली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
बहुतांश पाठदुखी, सौम्य वेदना आणि स्नायू किंवा सांधे आखडण्याच्या स्वरुपात जाणवते. मात्र स्नायू किंवा लिगामेंट फाटल्यावर अचानक मोठी वेदना जाणवू शकते. जर वेदना नितंब (हिप्स) आणि पायांपर्यंत पसरलेली असेल आणि तिथे मुंग्या येत असतील किंवा सुन्नपणा जाणवत असेल, तर ते नसांच्या समस्येचं लक्षण असू शकतं.
इलेक्ट्रोडायग्नोसिसमुळे देखील स्नायू आणि नसांच्या आजारातील फरक जाणून घेण्यास मदत होते.
ही निदान प्रक्रिया प्रौढ आणि मुलं दोघांना लागू होते.

फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टर अरीन डीसूझा एक कन्सल्टंट स्पाइन सर्जन आहेत. त्यांनी भारतात आणि इंग्लंडमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून काम केलं आहे. त्या आता जर्मनीत काम करत आहेत.
त्या बीबीसी न्यूजला म्हणाल्या की जेव्हा आई-वडील मुलांना घेऊन येतात, तेव्हा त्या कोणत्या गोष्टींवर लक्ष देतात.
"मुलं नेहमीच इकडे-तिकडे उड्या मारत असतात. त्यामुळे मला पाहावं लागतं की -
- मुलांना खेळताना वगैरे दुखापत झाली आहे का?
- एखादी हाडं-स्नायूंची लक्षात न आलेली समस्या तर नाही ना?
- आईवडिलांनाच पाठदुखीची समस्या तर नाही ना?
- मुलं संतुलित आहार घेतात का?
आपण गुडखे आणि पायांमधील वाढत्या वेदनेबद्दल ऐकलं आहे. मात्र कधी-कधी ते पाठीच्या बाबतीतदेखील होऊ शकतं. कारण मुलांचा संपूर्ण पाठीचा कणा, कधी-कधी इतर हाडांच्या तुलनेत खूप वेगानं वाढतो."
निरोगी मन, निरोगी शरीर
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अनेकदा बरं होत असलेल्या रुग्णांची प्रगती निव्वळ या भीतीमुळे थांबते की पुन्हा पाठदुखी तर होणार नाहीना.
ॲडम सियू, इंग्लंडमधील 'डाऊन 2 यू हेल्थ अँड वेलबीईंग'चे संचालक आहेत.
त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "भलेही पाठीचा कणा किंवा स्नायूंमध्ये कोणतीही समस्या नसेल, मात्र पुन्हा दुखापत होण्याच्या चिंतेचा रुग्णांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो. भीतीमुळे त्यांचा सक्रियपणा कमी होतो. काहीजण तर त्यांना आवडणाऱ्या गोष्टीदेखील करणं थांबवतात."
प्राध्यापक मार्क हॅनकॉक, ऑस्ट्रेलियाच्या मॅक्वेरी विद्यापीठातत फिजिओथेरेपीचे प्राध्यापक आहेत.
त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "काही रुग्ण त्यांच्या पाठीला दुखापत होण्याच्या भीतीमुळे इतके घाबरतात की ते सामाजिक जीवनापासूनच अलिप्त होतात. जेव्हा तुम्ही, सामाजिक तणाव, वेदनेची चिंता आणि थोडासा त्रास देणारी पाठ या सर्व गोष्टींना एकत्रितपणे पाहता, तेव्हा अचानक ती एक खूप मोठी समस्या होते."

याच कारणामुळे, आता एक समग्र दृष्टीकोन स्वीकारला जातो आहे.
प्राध्यापक हॅनकॉक म्हणतात, "जगभरातील मार्गदर्शक तत्वं आता सांगतात की शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, सर्व घटकांचा विचार करणं आवश्यक आहे."
"सीएफटी (कॉग्निटिव्ह फंक्शनल थेरेपी) मुळे रुग्णांना थेरेपिस्टशी बोलण्याची संधी मिळते. जेणेकरून त्यांना हे समजून घेता येईल की कोणकोणत्या कारणांमुळे वेदना होते आहे."
"मग त्यांच्यासाठी एक योजना तयार केली जाते. ज्यात पर्यायी उपायांचा समावेश असतो. जेणेकरून त्यांना हळूहळू त्यांच्या आवडत्या कृती पुन्हा सुरू करता येतील."
"आणि जर आवश्यकता असेल, तर रुग्णाच्या जीवनशैलीत बदल करण्यासाठी थेरेपिस्ट त्यांच्यासोबत काम करू शकतात."
पुढे जात राहावं, सक्रिय राहावं
वारंवार होत असलेला त्रास किंवा वेदना आणखी वाढणार तर नाहीना, या भीतीनं...काही रुग्ण विचार करतात की विश्रांती घेतल्यामुळे हे दुखणं बरं होईल. मात्र तसं नसतं.
ब्रिटिश असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन्स (बीएएसएस) नुसार, सक्रिय राहणं हीच पाठदुखी टाळण्याची किंवा त्यातून सावरण्याची गुरुकिल्ली आहे. गेल्या दहा वर्षांमधील संशोधनातून दिसतं की विश्रांती घेतल्यामुळे रिकव्हरी टाइम म्हणजे बरं होण्याचा कालावधी आणखी वाढू शकतो.
ॲडम सियू म्हणतात, "पाठीचा कणा हा व्हर्टेब्रा म्हणजे लहान गोलाकार असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या हाडांपासून बनतो. अनेक ठिकाणी पाठीचा कणा नैसर्गिकरित्याच वक्र असतो. शरीराचा भार आणि त्याच्या कृती हाताळण्यास यामुळे मदत होते."
"वरचे 24 व्हर्टेब्रा (मणक्यातील गोल आकाराची वेगवेगळी हाडं) लवचिक असतात. त्यांना मागील बाजूस फॅसेट जॉईंट्स किंवा सांधे एकमेकांशी जोडून ठेवतात. दर दोन व्हर्टेब्रामध्ये एक इंटरवर्टेब्रल डिस्क असते."

फोटो स्रोत, Adam Siu
ॲडम सियू पुढे सांगतात, "ही नैसर्गिक रचना आणि डिस्कची धक्के शोषून घेण्याची क्षमता कमकुवत होऊ नये, यासाठी तुम्ही दीर्घकाळ एकाच स्थितीमध्ये न राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे दीर्घकाळ बसणं, वाकलेलं असणं किंवा उभं राहणं."
मात्र आजच्या आधुनिक जीवनशैलीत, डेस्क जॉब, गेमिंग, अभ्यास किंवा ऑनलाइन कंटेंट पाहणं यासारख्या गोष्टींमध्ये अनेकदा खूप निष्क्रियता असते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना स्क्रीन ब्रेक घेणं किंवा पायऱ्या चढणं-उतरणं शक्य असतं. मात्र अनेक नोकऱ्यांमध्ये हा पर्याय उपलब्ध नसतो.
ॲडम सियू म्हणतात, "जर तुम्ही ट्रक चालक असाल, तर ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर बसल्या बसल्याच स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करा. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजूरांनी अवजड सामान उचलताना दुखापत टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं पाहिजे. तसंच काय व्यायाम करायचा यासाठी फिजिओथेरेपिस्टचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
गरोदरपणात देखील पाठदुखी होऊ शकते. इतकंच काय सुरुवातीच्या टप्प्यातदेखील होऊ शकते. गर्भधारणेनंतर लगेचच रिलॅक्सिन नावाच्या हार्मोनची निर्मिती वाढते.
यामुळे पेल्व्हिसच्या लिगामेंट्स ढिल्या होतात आणि प्रसूतीच्या तयारीसाठी गर्भाशय ग्रीवा (सर्विक्स)ला मऊ होतं. मात्र हे पाठीच्या कण्यातील हाडांचे सांधे आणि कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजे जोडणाऱ्या ऊतींनादेखील ढिलं करू शकतं. यामुळे कंबरेत वेदना किंवा समस्या निर्माण होते.
जसजसं भ्रूणाची वाढ होते, तसंतसं गर्भवती महिलेच्या शरीराला मुद्रा, वजनातील संतुलन आणि तणावाबाबत मोठ्या बदलांना सामोरं जावं लागतं.
इथे आम्ही वेदना कमी करण्यासाठी काही सूचना करत आहोत -
- वळताना पाठीच्या कणा वळू नये किंवा त्याला पीळ पडू नये म्हणून पाय फिरवून दिशा बदलावी.
- वजनाची समान विभागणी करतील असे बूट वापरावे.
- मॅटर्निटीच्या (गरोदरपण, बाळंतपण आणि नवमातृत्वाचा काळ) वेळेस वापरल्या जाणाऱ्या उशा आणि चांगली गादी पुरेशी विश्रांती देण्यासाठी मदत करू शकतात.
वेदनाशामक औषधं केव्हा घ्यावीत?
ॲडम सियू म्हणतात, "सुरुवातीच्या टप्प्यात, मेडिकल स्टोअरवर मिळणारी सामान्य अँटी-इन्फ्लेमेटरी औषधं घेणं योग्य आहे. जेणेकरून तुम्हाला काम करता येईल. मात्र तुम्ही ही औषधं कित्येक आठवडे किंवा महिने सातत्यानं घेत राहिलात आणि दुखण्यामागचं खरं कारण शोधू शकला नाहीत, तर तुम्ही फक्त समस्या लपवत असता किंवा त्यावर उपाय करत नसता."

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "दुर्दैवानं, मी असे रुग्ण पाहिले आहेत जे अनेक वर्षांपासून औषधं घेत आहेत."
काहीजणांना वाटतं की वेदनेचं दमन केल्यास त्यामागचं खरं कारण आणखी वाढतं. मात्र ब्रिटिश असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन्स (बीएएसएस)चं म्हणणं आहे की, "हे अजिबात खरं नाही."
"शरीरात अतिशय शक्तिशाली रिॲक्शन्स होतात. साधारण वेदनाशामक औषधं त्या दूर करत नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही फक्त वेदना दूर करणारं औषध घेऊन उकळत्या पाण्यात हात टाकू शकत नाहीत. त्याचप्रमाणे, वेदना दूर करणारे साधारण उपाय केल्यानंतर तुम्ही पाठ हलवल्यामुळे तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही."
"आणि जर तुम्हाला अशी औषधं घेण्याबाबत काही चिंता वाटत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या."
(मूळ लेख: बीबीसी न्यूज वर्ल्ड सर्व्हिस, ग्लोबल जर्नलिझम क्युरेशन आणि बीबीसी न्यूज मराठीच्या गणेश पोळ यांचं अतिरिक्त रिपोर्टिंग)
(डिस्क्लेमर: या लेखातील माहिती ही सामान्य स्वरुपाची आहे. यात कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला नाही. कोणत्याही वैद्यकीय समस्येबाबत डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











