अमेरिकेच्या हल्ल्यात खरंच इराणचे अणु केंद्र नष्ट झाले? पेंटागॉनचा लीक झालेला अहवाल काय सांगतो?

अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमुळे इराणमधला अणु कार्यक्रम उद्ध्वस्त झालेला नाही, असं पेंटागॉनच्या सुरूवातीच्या गुप्त मूल्यांकन अहवालात सांगण्यात आलं आहे.

पेंटागॉन हे अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेचं मुख्यालय आहे.

सीबीएस ही बीबीसीची अमेरिकेतील सहयोगी वृत्तसंंस्था आहे. सीबीएसला पेंटागॉनच्या संरक्षण गुप्तहेर संस्थेशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, 21 जूनला झालेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये इराणचा युरेनियमचा साठा उद्ध्वस्त झालेला नाही.

पेंटागॉनच्या या अहवालाच्या हवाल्यानं सीएनएन आणि न्युयॉर्क टाइम्ससारख्या अनेक मोठ्या अमेरिकन माध्यमांनीही या बातम्या दिल्या आहेत.

मात्र, हा अहवाल पूर्णपणे चुकीचा असल्याचं व्हाईट हाऊसमधून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पश्चिम आशियासाठी अमेरिकेचे विशेष दूत म्हणून काम करणारे स्टीव विटकॉफ यांनीही हा लीक झालेला गुप्त अहवाल 'देशद्रोही' असल्याचं म्हटलंय.

बीबीसीने यावर संरक्षण मंत्रालयाकडून प्रतिक्रिया मागितली, तेव्हा असं उत्तर देण्यात आलं की, "अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला विनाशकारी नव्हता, असं म्हणणारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि या मोहिमेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत."

दरम्यान, इस्रायल आणि इराण यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीचा परिणाम दिसत आहे. दोन्ही देशांनी युद्धबंदी करार मान्य केला आहे.

पेंटागॉनच्या लीक झालेल्या अहवालात काय म्हटलंय?

शनिवारी, 21 जूनला अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यावरून पेंटागॉनच्या अहवालानं प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या हल्ल्यानं इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे नष्ट झालेला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान अशा इराणच्या तीन अणु केंद्रांवर अमेरिकेने बॉम्बहल्ला केला. जमिनीत 61 मीटर आत जाऊन स्फोट घडवू शकणारे हे बॉम्ब होते.

पण गुप्त अहवालाशी जोडलेल्या सूत्रांनुसार, इराणचे बहुतेक सेंट्रीफ्यूज सुरक्षित आहेत. अमेरिकेने केलेला हल्ला फक्त अणु कार्यक्रमांच्या इमारतींच्या वरच्या भागापुरता मर्यादित राहिला असंही त्यांंनी म्हटलं.

या हल्ल्यात दोन अणु केंद्रांचे मुख्य दरवाजे बंद झाले, काही इमारती नष्ट झाल्या आणि काहींचं नुकसान झालं. पण बहुतेक भूमिगत अणु कार्यक्रम सुरक्षित राहिले.

सूत्रांनी अमेरिकन माध्यमांना सांगितलेल्या माहितीनुसार, हल्ल्यामुळे इराणचा अणु कार्यक्रम फक्त काही महिने मागे गेला आहे. तो पुन्हा सुरू व्हायला वेळ लागेल. इराणला उत्खनन करून दुरुस्त्या करण्यात किती वेळ लागतो यावर ते अवलंबून असेल.

अहवालात हेही म्हटलं गेलं की हल्ल्याआधी इराणने संवर्धन केलेल्या युरेनियमचा काही भाग दुसऱ्या ठिकाणी पाठवून दिला होता.

हल्ल्यासाठी अमेरिकेने जीबीयू - 57 या त्यांच्याकडच्या सर्वांत मोठा बॉम्बचा वापर केला होता. भूमिगत अणु केंद्र नष्ट करण्यात हा बॉम्ब पटाईत असल्याचं म्हटलं जातं.

हल्ल्यानंतर अमेरिकेन लष्कराचे सर्वोच्च अधिकारी जनरल डॅन केन यांनी म्हटलं होतं की तीन्ही केंद्रांचं मोठं नुकसान झालं आहे. पण आतल्या भागात किती नुकसान झालं, हे त्यातून स्पष्ट होत नाही.

इराणच्या सरकारी चॅनेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही ठिकाणं आधीच रिकामी करण्यात आली होती आणि हल्ल्यामुळे इराणचं कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अहवालासंबंधीच्या बातम्यांना 'फेक न्यूज' म्हटलं आहे.

'ट्रूथ' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प म्हणाले, "सीएनएन आणि न्युयॉर्क टाइम्स या वृत्तसंस्था देत असलेली बातमी खोटी आहे. इतिहासातील यशस्वी हल्ल्यापैकी एक असलेल्या या घटनेची बदनामी करण्याचा प्रयत्न दोघे मिळून करत आहेत. इराणमधली अणु केंद्र पूर्णपणे नष्ट झाली आहेत. न्यूयॉर्क टाइम्स आणि सीएनएन दोघांवरही जनतेकडून टीकेची झोड उठवली गेली आहे."

या प्रकरणात ट्रम्प यांनी ट्रुथवरून पश्चिम आशियासाठी अमेरिकेचे विशेष दूत म्हणून काम करणाऱ्या स्टीव्ह विटकॉफ यांचं एक वक्तव्यही शेअर केलं आहे.

स्टीव विटकॉफ यांच्या फॉक्स न्यूज वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीचा व्हीडिओ शेअर करत ट्रम्प यांनी लिहिलं, "स्टीव विटकॉफ म्हणतात : आम्ही फोर्दो केंद्रांवर 12 बंकर बस्टर बॉम्ब टाकले. त्या बॉम्बहल्ल्याने केंद्राच्या सुरक्षेला भेद देऊन संपूर्ण विध्वंस केला असणार याबद्दल आम्हाला काहीही शंका नाही. त्यामुळे आमचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही असं म्हणणाऱ्या अहवालांना काहीही आधार नाही."

"हे अपमानकारक आणि देशद्रोही आहे आणि याचा तपास झाला पाहिजे. यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना उत्तरदायी धरलं पाहिजे."

आमच्या बॉम्बने काम पूर्ण केलं आहे : संरक्षण मंत्री

या घडामोडीवर बीबीसीने अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रतिक्रिया मागवली होती. त्यावर पेंटागॉनकडून अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांचं विधान बीबीसीला देण्यात आलं.

"मी सारं काही पाहिलं आहे. त्याआधारावर हे सांगू शकतो की आमच्या हल्ल्याने इराणची अणु हत्यार बनवण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट केली आहे. आमचे मोठे बॉम्ब प्रत्येक ठिकाणी अगदी योग्य जागेवर पडले आणि त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं. त्या बॉम्बने झालेले परिणाम इराणमधल्या मलब्याच्या डोंगराखाली दबले गेलेत."

या अहवालाबाबत बीबीसीने अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) यांच्याकडूनही प्रतिक्रिया मागवली.

या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर 60 सेकंदाचा एक व्हीडिओही पोस्ट केला. त्यात बी-2 बॉम्बर हे लढाऊ विमान आकाशात उडत बॉम्ब सोडताना दिसत आहे. व्हीडिओमध्ये एक गाणंही ऐकू येत आहे. त्यात "बॉम्ब इराण" हे शब्द सतत उच्चारले जात आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)