अतीक अहमद आणि असिफ यांच्या हत्येचं हल्लेखोरांनी सांगितलं 'हे' कारण...

फोटो स्रोत, ANI
अरुण मौर्य, लवलेश तिवारी आणि सनी.
ही तीन नावं शनिवारी रात्रीपासून वर्तमानपत्र ते टीव्हीपर्यंत सगळीकडेच चर्चेत आहेत.
उत्तरप्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन तरुण शनिवारी रात्री पत्रकारांचा वेष धारण करून घटनास्थळी हजर होते.
रात्री 10.30 च्या सुमारास पोलिसांची एक जीप प्रयागराजमधील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयाबाहेर थांबली. पोलिसांनी दोन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणलं होतं.
पोलिस जीप मधून पहिल्यांदा उतरला अशरफ, त्याच्या मागोमाग अतीक अहमदला आधार देत उतरवलं जात होतं.
जीपमधून खाली उतरल्यानंतर अवघ्या दहा सेकंदात अतीक आणि अशरफला मीडियातील पत्रकारांनी घेरलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मीडिया मधील लोकांमध्ये हल्लेखोर सुद्धा सहभागी होते.
पोलिसांनी नोंद केलेल्या एफआयआरनुसार, अतीक अहमद आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी बेड्या घालून रुग्णालयात आणलं जात होतं.
रुग्णालयाच्या मेन गेटपासून 10-15 पावलं पुढे गेल्यावर मीडियाचे कर्मचारी अतीक आणि अशरफ यांच्या जवळ आले.
एफआयआरनुसार, दोघांनीही माध्यमांना बाईट द्यायला सुरुवात केली. त्याच गर्दीतल्या एकाने आपल्या हातातील कॅमेरा सोडला तर दुसऱ्याने आपला हातातील माईक सोडून, आपली हत्यारं काढली आणि अतीक-अशरफवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर अचानक तिसऱ्या व्यक्तीनेही गोळीबार सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात अतीक आणि अशरफ यांचा मृत्यू झाला. या घटनेत पोलीस कर्मचारी मानसिंग यांच्या उजव्या हाताला गोळी लागली.
शिवाय पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन हल्लेखोरांना शस्त्रांसह पकडलं. हल्लेखोरांमधील एकजण त्याच्याच साथीदारांच्या क्रॉस फायरिंगमध्ये जखमी झाल्याचं एफआयआर मध्ये म्हटलंय.
या घटनेत एएनआय या वृत्तसंस्थेचा पत्रकार देखील जखमी झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या कलम 302, 307 आणि शस्त्र कायदा 1959 आणि फौजदारी कायदा (दुरुस्ती) कायदा 1932 च्या कलम 3, 7, 25, 27 अन्वये एफआयआर नोंदवली आहे.

फोटो स्रोत, ANI
ज्या पद्धतीने हा हल्ला झाला त्यावरून आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये हल्लेखोर गोळीबार करताना आणि नंतर पोलिसांना शरण जाताना दिसत आहेत.
पण हे हल्लेखोर आहेत कोण? नेमके कुठून आलेत ? त्यांच्याकडे शस्त्र कुठून आली? ही घटना षडयंत्र नसेल का? आणि हल्लेखोर यापूर्वी तुरुंगात गेले आहेत का?
कोण आहे लवलेश तिवारी?
अतिक हत्या प्रकरणातील 22 वर्षीय लवलेश हा उत्तरप्रदेशच्या बांद्यामधील केवतारा क्रॉसिंगचा रहिवासी आहे. त्यांच्या वडिलांचं नाव यज्ञकुमार तिवारी असं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवलेशला क्रॉस फायरिंगमध्ये गोळी लागली असून त्याच्यावर प्रयागराज येथील स्वरूप राणी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
लवलेश चार भावांमध्ये तिसरा असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेऊन बीएला प्रवेश घेतला. पण इथेही तो नापास झाला.
लवलेशचे वडील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'त्याचा आता आमच्या घरादाराशी काहीही संबंध नाही'.
टीव्हीवर ज्या काही बातम्या चालवल्या जातात, त्यातून त्यांना माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. तो चार-सहा दिवसांतून एकदा घरी यायचा आणि आंघोळ करून आवरून निघून जायचा. त्याला घराशी काही देणंघेणं नव्हतं.

फोटो स्रोत, ANI
लवलेशच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, तो तुरुंगातही जाऊन आलाय. त्याचे वडील सांगत होते, "त्याने चौकात एका मुलीला कानशिलात लगावली होती. त्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती, त्यामुळेच तो तुरुंगात होता."
लवलेशच्या लहान भावाने सांगितल्याप्रमाणे, "तो बाहेर काय काम करतो याविषयी त्याने घरी कधी सांगितलंच नाही."
लवलेशची आई सांगते की 'तो संकट मोचन देवाचा भक्त होता. त्याच्या नशिबात आणखीन काय काय वाढून ठेवलंय देवलाच ठाऊक.'
आरोपी मोहित उर्फ सनी सिंग
या हत्याकांडात पोलिसांनी सनी सिंग नावाच्या 23 वर्षीय तरुणालाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी हा उत्तरप्रदेशातील हमीरपूरमधील कुरारा गावचा रहिवासी आहे. सनीचे वडील जगत सिंग ह्यात नाहीत.
सनीचा मोठा भाऊ पिंटू सिंग मीडियाशी बोलताना सांगतो की, 'मागच्या दहा ते बारा वर्षांपासून तो हमीरपूरमध्ये राहत नाहीये.'
त्याने पुढे सांगितलं की, ते एकूण तिघे भाऊ होते. यातला एकजण ह्यात नाही.
त्याचा भाऊ सांगतो, 'सनी पहिल्यापासूनच वाईट कामं करायचा, त्यामुळेच कुटुंबाने त्याच्यासोबतची नाती संपवून टाकली.'
अरुणकुमार मौर्य
18 वर्षांचा आरोपी अरुण कुमार मौर्य हा उत्तरप्रदेशातील कासगंजच्या कटारवाडीचा रहिवासी आहे. दीपक कुमार असं त्याच्या वडिलांचं नाव आहे. त्याची काकी लक्ष्मी देवी मीडियाशी बोलताना म्हणाल्या की, "तो बऱ्याच दिवसांपासून घराकडे आलेला नाही."

फोटो स्रोत, ANI
हत्येचा कट कसा शिजला?
एफआयआरमध्ये म्हटल्याप्रमाणे, या तिन्ही आरोपींना हत्येचा हेतू विचारला असता त्यांनी सांगितलं की, "आम्हाला अतीक-अशरफच्या गँगला संपवून पुढं यायचं होतं. आणि याचा फायदा आम्हाला भविष्यात मिळणार होता."
"पोलिसांच्या संख्येचा अंदाज न आल्याने आम्हाला तिथून निसटता आलं नाही. पोलिसांनी जलद गतीने कारवाई करत आम्हाला ताब्यात घेतलं."
"अतीक आणि अशरफला पोलिसांची कस्टडी मिळाल्याची माहिती आम्हाला कळाली तेव्हापासून आम्ही या दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळेच आम्ही मीडियातील पत्रकारांचा वेष घेतला."
तुरुंगात झाली मैत्री
हिंदी दैनिक 'हिंदुस्तान'ने दिलेल्या वृत्तानुसार, या तिन्ही हल्लेखोरांवर खून, दरोडा यासह गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत.
या तिघांची तुरुंगातच मैत्री झाल्याचं त्या बातमीत लिहिलं आहे. अतीक आणि अशरफची हत्या करून तिघांनाही डॉन व्हायचं होतं.
वृत्तपत्राने पोलीस सूत्रांचा हवाला देत म्हटलंय की, किरकोळ गुन्ह्यासाठी तुरुंगात जाऊन या तिघांनाही प्रसिध्दी मिळत नव्हती. शेवटी त्यांनी काहीतरी मोठं करायचं ठरवलं.
वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अतीक आणि अशरफ अहमद यांना पोलिस बंदोबस्तात रुग्णालयात नेलं जात असल्याची बातमी या तिघांना लागली. आणि नाव कमावण्यासाठी या तिघांनी ही हत्येचा कट रचला.
त्यांनी हत्येचा कट रचला, हल्ल्यापूर्वी शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन रेकी केली. यानंतर तिघांनी पत्रकाराचा वेष धारण करून अतीक आणि अशरफ अहमद यांची हत्या केली.

फोटो स्रोत, ANI
अतीक अहमदच्या गुन्हेगारीचा इतिहास
अतीक अहमद यांच्यावर 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतीक अहमद अल्पवयीन असताना 1979 मध्ये त्यांच्यावर पहिल्यांदा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अलाहाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतीकवर बिहारमध्ये खून, अपहरण, खंडणीशी निगडित जवळपास चाळीसभर गुन्हे दाखल आहेत.
प्रयागराजच्या फिर्यादी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1996 पासून अतीक अहमद यांच्या विरोधात जवळपास 50 खटले प्रलंबित आहेत.
फिर्यादी पक्षाचं म्हणणं आहे की, अतीक आणि त्यांचा भाऊ अशरफ यांच्या वकिलाने 12 प्रकरणांमध्ये अर्ज दाखल केले होते, त्यामुळे या प्रकरणात आरोप निश्चिती झालेली नाही.
बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्येमागे अतीक अहमद मुख्य आरोपी होते. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.
पुढे 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यातही अतीक अहमद मुख्य आरोपी होते.
राजू पाल हत्याकांडात उमेश पाल हे सुरुवातीचे साक्षीदार होते. पण पुढे या हत्याकांडाचा तपास सीबीआयच्या हाती आला आणि त्यांनी उमेश पाल यांची साक्ष गृहीत धरली नाही.
प्रयागराज येथील एमपीएमएलए कोर्टाने 28 मार्च रोजी अतीक अहमद यांना 2006 मध्ये उमेश पालचं अपहरण केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








