You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'5 वर्षात 619 जणांना लखपती, 5 जणांना कोट्यधीश' करणारी महाराष्ट्र लॉटरी बंद होणार?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
यश 'आज नाही तर उद्या' आणि 'नशिबाला संधीची आवश्यकता असते' अशा जाहिरातीद्वारे घराघरात पोहोचलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी अनेकांना परिचित आहे.
अनेकांनी आपलं नशीब या लॉटरीत अनेकदा आजमावून बघितलं आहे. मात्र आता यापुढे या लॉटरीत सहभागी होता येणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र सरकारकडून चालवण्यात येणारी महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे राज्यातील लॉटरी विक्रेते चिंतेत आहेत.
मुंबईत मंत्रालयाच्या समोर कुटुंब सखीच्या बाजूला एका कॉर्नरवर सुरेश गुप्ता हे 53 वर्षाचे गृहस्थ गेल्या 30 वर्षांपासून लॉटरी विक्रीचा व्यवसाय करतात. घरामध्ये आई, पत्नी, तीन मुलं आणि एक मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे.
मुंबईतील गोरेगाव भागात ते राहतात. गेल्या 30 वर्षांपासून ते नित्यनेमाने लॉटरी विक्रीचा व्यवसाय करतात. ते सध्या दिवसाला 600 ते 700 रुपये कमावतात. मात्र आता महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार असल्यानं त्यांच्या उत्पन्नात घट होईल असं त्यांचं म्हणणं आहे.
त्यामुळे या उतरत्या वयात आमच्या रोजगाराचं आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं काय असा सवाल त्यांना पडला आहे.
सुरेश गुप्ता बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले,"आता वय झालं आहे. गेले 30 वर्षे हा व्यवसाय करत मी उदरनिर्वाह केला. मात्र आता लॉटरी बंद होणार असल्यामुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. या उतरत्या वयात मी काय करायचं, घर कसं चालवायचं हा प्रश्न आता मला पडलाय."
महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा विचार का सुरू?
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून महाराष्ट्र राज्य लॉटरी चालवण्यात येते. शासनाच्या वित्त विभागाला आता लॉटरी चालवणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहिलेलं नाही असं वाटतं.
त्यामुळे हे कारण देत हा निर्णय घेण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर दिली. त्याचा प्रस्ताव वित्त विभाग तयार करत आहे अशी माहिती महाराष्ट्र लॉटरी विक्रेता संघटनेनं दिली आहे.
तसेच वित्त विभागाला विक्रेत्यांना 15 टक्के कमिशन दिल्यानंतर उर्वरित रकमेवर 28 टक्के जीएसटी भरावा लागतो. मोठा आस्थापना खर्चही येतो. हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसल्यानं लॉटरी बंद करावी, असा प्रस्ताव आहे.
अचानक धनलाभ व्हावा यासाठी गेली साडेपाच दशके कोट्यवधी लोकांनी या लॉटरीची तिकिटं काढली. काहींचं नशीब फळफळलं, तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली.
पुढे अनेकांच्या भाग्याची परीक्षा पाहणाऱ्या लॉटरीला आता आर्थिक गणित जुळत नसल्यामुळं वित्त विभागाला गाशा गुंडाळावा लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात का झाली होती?
महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना 12 एप्रिल 1969 रोजी झाली. समाजातील मटका व जुगार या व्यसनांना प्रतिबंध घालून, त्यातून होणारी जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी, राज्याच्या वित्त विभागानं या लॉटरीची सुरुवात केली होती.
ही राज्य संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठं बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्नं साकार करण्याची संधी देते.
लॉटरी विक्रीतून मिळणाऱ्या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषी क्षेत्र आदींसाठी होतो, असं महाराष्ट्र लॉटरी विभागाच्या वतीनं सांगण्यात येतं.
त्याचप्रमाणं लॉटरीची विक्री करणं हा अनेक बेरोजगार तरुणांसाठी पूर्णवेळ किंवा अर्धवेळ व्यवसाय झाला आहे, असंही लॉटरी विभाग सांगतो.
आजपर्यंतची महाराष्ट्र राज्य लॉटरीची उद्दिष्टपूर्ती
महाराष्ट्र राज्य लॉटरीनं आजपर्यंत अनेक विजेत्यांचे जीवन आनंदी केले आहे. गेल्या 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती आणि 5 व्यक्ती कोट्यधीश झाल्या आहेत. बक्षिसाच्या रकमेचा उपयोग अनेकांनी त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी, शेतीसाठी, वाहन वा ट्रक्टर खरेदीसाठी, घर खरेदीसाठी किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी केला.
प्रत्येक सोडत जाहीरपणे पंच मंडळासमोर होते. सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा ड्रममधून निवडले जातात. यातून सोडती पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचा प्रयत्न केला जातो.
गेल्या 52 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीनं आपलं ब्रिदवाक्य 'गौरवशाली आणि विश्वासार्ह' सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.
साप्ताहिक लॉटरी वेळापत्रक
महाराष्ट्र शासन तीन राष्ट्रीय सुट्टीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते.
प्रत्येक आठवड्यात एकूण 27 सोडती, 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्य सोडती असतात. यामध्ये प्रत्येक महिन्याला 30 व्यक्ती लखपती होतात.
लॉटरी बंद करण्यास विक्रेत्यांचा तीव्र विरोध
महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या प्रस्तावावर बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर म्हणाले, "महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. कारण या निर्णयामुळे 20 हजार लॉटरी विक्रेत्यांच्या रोजगारावर गदा येणार आहे. सरकारनं असा निर्णय घेऊ नये यासाठी आम्ही आंदोलन करू."
"आकर्षक जाहिराती, अद्ययावत प्रचार यंत्रणा, सर्वाधिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पुरस्कार, बक्षिसे, परराज्यात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रीसाठी प्रयत्न, असे काही उपाय केल्यास लॉटरीची विक्री वाढू शकते. मात्र, शासन त्याऐवजी लॉटरी बंद करण्याच्या प्रयत्नात आहे," असा आरोप महाराष्ट्रातील लॉटरी विक्रेत्यांनी केलाय.
"महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, तर विक्रेते सहकारी तत्त्वावर लॉटरी चालविण्यास तयार आहेत. बंद करण्यापेक्षा विक्रेतेच संचालकांच्या भूमिकेत शिरतील. त्यासाठी 'एक पर्याय' उपलब्ध आहे."
"विक्रेत्यांना विश्वासात घेऊन सरकारनं उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक घ्यावी. विक्रेत्यांचीही 25 जानेवारीला बैठक होणार आहे. यानंतर विक्रेते आपली भूमिका जाहीर करतील. मात्र लॉटरी बंद करण्याचा प्रस्ताव रद्द करावा," असे लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी म्हटले आहे.
'सर्व पैलूंचा विचार करून अंतिम निर्णय घेणार'
लॉटरी बंद करण्याचा प्रस्ताव आणि महाराष्ट्र लॉटरी विक्रेता सेनेच्या आरोपांवर अर्थ विभागाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी संपर्क केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे यावर प्रतिक्रिया मिळालेली नाही.
मात्र, लोकमत या वृत्तपत्राशी बोलताना आशिष जयस्वाल यांनी सांगितलं की, प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. सर्व पैलूंचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.
'सरकारला जुगार वाटतो, मात्र हा आमचा रोजगार'
महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता युनियन अध्यक्ष चंद्रकांत मोरे म्हणाले, "सरकारकडे अनेक योजनांवर वायफळ खर्च करण्यासाठी पैसा आहे. मात्र हेच सरकार महसूल मिळवून देणारी लॉटरी योजना बंद करायचा विचार करत आहे."
"1995 लाही अशाचप्रकारे सरकार लॉटरी योजना बंद करण्याचा विचार करत होतं. सरकारला लॉटरी जुगार वाटतो, मात्र हा आमचा रोजगार आहे. यावर हजारो लोक अवलंबून आहेत. त्यामुळे लॉटरी बंद करू नये, अन्यथा आम्ही याला तीव्र विरोध करू."
मुंबईतील सुरेश गुप्ता यांच्यासारख्या हजारो तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक लॉटरी विक्रेते राज्यभरात महाराष्ट्र राज्य लॉटरीची विक्री करण्याचं काम करतात. हे सर्वच लॉटरी विक्रेते या प्रस्तावामुळे चिंतेत आहेत.
गेल्या 30 ते 40 वर्षांपासून विक्रेते लॉटरी विक्री करत आहेत. इतकी वर्षे याच लॉटरी विक्रीच्या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह आणि कुटुंबाचं पालन पोषण सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या तिकीट विक्रीतून साधारण 15 टक्के इन्सेंटिव्ह शासनाच्या वतीने या विक्रेत्यांना मिळतो. मात्र, आता महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार असल्यानं त्यांचे उत्पन्न देखील कमी होईल. काहींचं उत्पन्न तर पूर्णपणे बंद होईल. त्यामुळे हे सर्व विक्रेते चिंतेत आहेत.
साधारण राज्यभरात 20 हजार पेक्षा अधिक महाराष्ट्र राज्य लॉटरीची तिकीट विक्री करणारे विक्रेते आहेत. त्यामुळे या सर्वांवरच गदा येणार आहे.
हे सर्व विक्रेते विविध संघटनांशी जोडलेले आहेत. या निर्णयानंतर या संघटना एकत्रितरीत्या शासन दरबारी आपला आवाज उठवत आहेत.
लवकरच या संदर्भात अर्थ विभाग या संघटना प्रतिनिधींची बैठक घेणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा लॉटरी बंद झाल्यास 20 हजार पेक्षा अधिक लॉटरी विक्रेत्यांची चिंता वाढणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)