पुणे पोर्शे अपघातातील पीडितेचे वडील म्हणतात, 'आमच्या स्वप्नांचा चुराडा झाला'

फोटो स्रोत, ANI
अल्पवयीन मुलाने दारू पिऊन, गाडी चालवून दोघांना उडवल्याचे हे प्रकरण सध्या फक्त पुण्यातच नव्हे तर देशभरात गाजत असून राहुल गांधी यांनीही व्हीडिओ शेअर करुन पुणे अपघात प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईविषयी प्रश्न उपस्थित केले होते.
या अपघातात अनिश अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले. अनिश आणि अश्विनी या दोघांची काहीही चूक नसताना फक्त एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवत त्या दोघांना धडक दिली. ज्यामध्ये त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले. यानंतर आता अश्विनीच्या वडिलांची मन सून्न करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे.
'निदान पुढे आपल्या मुलांना गमवावे लागू नये यासाठी सरकारने पावले उचलावी,' असे अश्विनीच्या वडिलांनी म्हटले आहे.
"भारतीय संविधानात कायद्याची तरतूद आहे. त्या तरतुदीनुसारच दोषींवर कारवाई केली गेली पाहिजे. किमान यापुढे तरी अशा घटना घडू नयेत आणि पालकांना आपली मुलं गमवावी लागू नयेत असं वाटतं. आम्हीही आमच्या मुलांना सज्ञान झाल्याशिवाय गाडी चालवायला दिली नव्हती.
"जे काही घडलं आहे ते साफ चुकीचं आहे. गाडी चालवता तर आली पाहिजे ना? म्हणजे असं घडलं नसतं. माझ्या मुलीचं शिक्षण पुण्यात झालं. ती नोकरीही तिथेच करत होती. आता एका अपघातात तिचा मृत्यू झाला आहे. आमची सगळी स्वप्नं हरवली आहेत त्यांचा चुराडा झाला आहे," अशी उद्विग्न प्रतिक्रिया अश्विनीचे वडील सुरेश कोस्टा यांनी दिली आहे.
दुसरीकडे अनिश अवधियाच्या आई सांगतात, "फोनवर मला माझ्या मुलाचा अपघात झाल्याचं कळलं. पुढे मी काही ऐकूच शकले नाही. कारण काही ऐकण्याची माझी मनस्थितीच नव्हती. मला स्वतःलाच ब्रेन टयुमर आहे. एवढं मोठं दुःख मी झेलू शकत नाही. माझ्या मुलासोबत ज्याने चुकीचं केलंय त्याला तुरुंगात टाका. मला न्याय मिळवून द्या."
अनिशची बहीण सांगते की "माझा भाऊ वर्दळ नसलेल्या रस्त्यावरुन दुचाकी चालवत होता. पाठीमागून भरधाव वेगाने गाडी आली आणि त्यात माझ्या भावाचा मृत्यू झाला. माझा भाऊ पुण्यात शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी गेला होता. तो अत्यंत हुशार होता."
"ज्या व्यक्तीला गाडी चालवता येत नाही, ती व्यक्ती गाडी चालवते आणि नंतर एक निबंध लिहायला सांगून त्या व्यक्तीची सुटका होते, ही चेष्टा सुरू आहे का?" असा संतप्त सवाल अनिशच्या बहिणीने विचारला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
अनिशला अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण तसेच नोकरीही करण्याची इच्छा होती. मात्र, त्याची ही इच्छा कायमची राहून गेली. अनिश डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इंजिनिअरिंग केलं होतं. त्यानंतर तो एका कंपनीत इंटर्नशिप करत होता, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

या अपघातात बळी पडलेली अश्विनी आयटी इंजिनीअर होती. ती पुण्यात नोकरी करण्यासाठी आली होती. अश्विनीचे वडील मध्यप्रदेश वीज मंडळात काम करतात.
काय कारवाई झाली ?
पुण्यातील कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगर इथून छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. त्याचसोबत, ज्या बारमध्ये अल्पवयीन आरोपी दारू प्यायला होता, त्या कोझी आणि ब्लॅक बारचे मालक, मॅनेजर, बारटेंडर यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आलीय.

या घटनेनंतर सज्ञान आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावर न्यायालयानं काही अटी घालत जामीन मंजूर केला. या अटींवरुन जनक्षोभ उसळलेला दिसून आला.
त्यानंतर या प्रकरणी मुलाचे वडील आणि तो ज्या पबमध्ये दारु प्यायला होता, त्या ठिकाणच्या मॅनेजर, तसंच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर त्यांना अटक करण्यात आलीय.
वयाची खात्री न करता मुलाला दारू दिल्याप्रकरणी पबच्या कर्मचाऱ्यांवर आणि अल्पवयीन मुलाला कार चालवण्यास दिल्याप्रकरणी वडिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.











