'या' मुंग्या 'वास' घेऊन कॅन्सर शोधू शकतात...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पेट्रा झिविक
- Role, पत्रकार
प्राण्यांची, किटकांची घ्राणेंद्रियं तीक्ष्ण असतात हे तुम्हाला माहिती असेलच. पण काही मुंग्या चक्क त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर कर्करोगाचं निदान करू शकतील असं तुम्हाला सांगितलं तर...?
पण यादिशेने खरंच संशोधनाची पावलं पडली आहेत. या मुंग्याची गोष्ट आपण येथे पाहाणार आहोत.
सध्या मुंग्यांना उंदरांमधील कर्करोग ओळखता येईल इतपत संशोधन झालं आहे.
या संशोधनातील प्रमुख संशोधक-लेखक बाप्टिस्ट पिकरेट सांगतात, “उंदरांच्या लघवीचा वास घेऊन त्यांना कॅन्सर झाला आहे का हे ओळखण्यासाठी मुंग्यांना फक्त 10 मिनिटांचं प्रशिक्षण पुरेसं आहे.”
पिकरेट यांनी या संशोधनाला 2017 मध्ये सुरुवात केली. त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत मुंग्यांना नेहमीच्या चांगल्या निरोगी पेशी आणि कर्करोगाच्या पेशी यातला फरक ओळखायला शिकवलं.
नकोसा वाटणारा वास ओळखण्याचं मुंग्यांना प्रशिक्षण
या प्रयोगात पिकरेट आणि त्यांच्या चमूने झेनोग्राफ्ट नावाचं तंत्र वापरलं. यात मानवी स्तनाच्या कर्करोगातील पेशींचं उंदरांच्या शरीरात रोपण करतात आणि त्या वाढू देतात.
त्यानंतर ते निरोगी उंदीर आणि या कर्करोगी उंदरांच्या मूत्राचे नमुने गोळा करतात.
मुंग्यांना हे प्रशिक्षण कसं दिलं हे सांगताना पिकरेट म्हणतात, “या प्रशिक्षणात आम्ही मुंग्यांना गोलाकार भागात ठेवलं. त्यांचं खाणं आणि त्यांच्यामध्ये या उंदरांचं मूत्र ठेवलं. ज्यावेळेस मुंग्या आपलं खाणं शोधतात तेव्हा कर्करोगाच्या पेशी आणि आपलं खाणं त्यांच्या मनात जोडलं जातं. त्यामुळे नंतर मूत्रातील कर्करोगाच्या पेशी त्या ओळखू शकतात.”

फोटो स्रोत, Getty Images
“आपल्या पेशी या एखाद्या कारखान्यासारख्या असतात. त्यांना जगण्यासाठी पोषणमूल्यांची गरज असते आणि तसेच ते त्याज्य म्हणजे टाकाऊ पदार्थही तयार करत असतात. कर्करोगाच्या पेशीही काही टाकाऊ पदार्थ बाहेर फेकत असतात आणि त्या वासाने ओळखता येतात.”
आणखी नीट सांगायचं झालं तर कर्करोगाच्या पेशींमध्ये क्षणात वायुरूप होऊन उडून जातील अशी काही नैसर्गिक संयुगं असतात. ती लघवी किंवा उच्छवासात सापडू शकतात.
प्रयोगादरम्यान, खाणं बाजूला केलं तरी या मुंग्या कर्करोगग्रस्त उंदरांच्या मूत्राच्या नमुन्यांभोवती घुटमळत राहिल्या.
माणसाच्या शरीरातला कर्करोग मुंग्या शोधतील का?
पिकरेट याचं उत्तर देतात, अजून तरी नाही.
ते सांगतात, “आता पुढे संशोधन करण्यासाठी आपल्याला मानवी मुत्राच्या तपासण्या सुरू करायला हव्यात. पण उंदरांचे मूत्र आणि मानवी मूत्र याच्या चाचण्यांमध्ये फरक आहे. ही चाचणी अधिक जटील आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
मानवी मुत्राचा वास घेण्यासाठी मुंग्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. मानवी मुत्रावर परिणाम करणारे अनेक घटक असतात, व्यक्तीचं वय, लिंग, तिचा आहार तसेच प्रत्येक व्यक्तीचा असा वेगळा वास असतो. या सर्व घटकांचा विचार करावा लागेल.
पिकरेट सांगतात, “माणसांच्या मूत्राचा वास एकसारखा नसतो, तो व्यक्तीपरत्वे बदलतो. त्यामुळे मुंग्या कर्करोगाच्या पेशींवर एकाग्र होतील की नाही हे आम्हाला अजून माहिती नाही.”
पण त्यांनी पुढे संशोधन करायचं ठरवलं आहे. तसेच कर्करोग ओळखण्यासाठी हा मुंग्यांचा पर्याय एकदम स्वस्तातला पर्याय ठरेल असं त्यांनना वाटतं. मुंग्यांना प्रशिक्षण द्यायला फार वेळ लागत नाही, असंही त्यांना वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, “आणखी एक फायदा म्हणजे मुंग्या या एकत्र मोठ्या वसाहतीत राहातात, त्या आपण मिळवलेली नवी माहिती एकमेकांना सांगत असतात.”
पिकरेट यांच्या अंदाजानुसार एका वसाहतीमधील 10 टक्के मुंग्यांना जरी कर्करोगाच्या पेशी ओळखण्याचं प्रशिक्षण दिलं तर सगळ्या वसाहतीला प्रशिक्षण दिल्यासारखं होईल.
“सगळी माहिती वसाहतभर पसरेल आणि आपल्याला सगळ्या वसाहतीला प्रशिक्षण देण्यात वेळ घालवायला नको”, असं ते सांगतात.
हा सिद्धांत मधमाशांच्या बाबतीत आधीच सिद्ध झाला आहे परंतु मुंग्याच्यांबाबतीत अधिक संशोधनाची गरज आहे असं पिकरेट म्हणतात.
इतर प्राणी कर्करोगाचं निदान करण्यात मदत करू शकतात का?
गेली दहा वर्षं अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील देबजित साहा हे टोळकिडे आणि त्यांच्या कर्करोग पेशी ओळखण्याच्या क्षमतेवर संशोधन करत आहेत.
कर्करोगग्रस्त पेशी आणि निरोगी पेशी यातला फरक टोळ वासाने ओळखू शकतात असं त्यांच्या चमूला आढळलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण ते त्यांना प्रशिक्षण देत नाहीयेत तर त्यांच्या मेंदूचा वापर करुन घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
साहा यांनी बीबीसीला सांगितलं, त्यांच्या मेंदूत जाऊन त्यातील मज्जासंदेशांचा वापर करुन सध्या उपलब्ध असलेल्या मेंदूविषयक अभ्यासाच्या आधारे मॉडेल तयार करू शकतो.
टोळकिड्यांच्या मेंदूचा अभ्यास करुन मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे एक उपकरण तयार करता येईल आणि हे उपकरण किटकांप्रमाणे ज्ञानसंवेदी न्यूरॉन्सच्या आधारे रुग्णाच्या श्वासातून कर्करोग ओळखू शकतील, अशी आशा त्यांच्या चमूला वाटते.

फोटो स्रोत, DERRICK L. TURNER/MICHIGAN STATE UNIVERSITY
देबजित साहा सांगतात, जैविक अवयव कसे काम करतात याचा अभ्यास करुन त्यांचा वापर रोगनिदानासाठी करता येईल असं मला वाटतं.
पण यासाठी फक्त किडेच मदत करू शकतात असं नाही.
युनायटे किंग्डममधील मेडिकल डिटेक्शन डॉग्ज नावाची संस्था एका इलेक्ट्रॉनिक नाकावर संशोधन करत आहे, याद्वारे प्रोस्टेट कॅन्सरचा शोध घेता येईल.
कुत्रे मूत्रपिंडाचा कर्करोग शोधू शकतात हे पाहाण्यापासून आमचं संशोधन सुरू झालं. कर्करोग्यांच्या मूत्राच्या नमुन्यांमधून ते निदान करू शकतात असं वाटलं, अशी माहिती या संस्थेचे संशोधन प्रमुख सोफी अझिझ यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
या संस्थेने 2004 साली वेगवेगळ्या प्रजातींच्या 6 कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं. त्यानंतर कुत्र्यांनी केलेलं रोगनिदान त्यांच्या अपेक्षेपेक्षा 6 पट अचूक होतं असं त्यांना दिसून आलं.
नंतर झालेल्या अभ्यासांमध्ये कुत्र्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग 90 टक्के अचुकतेसह ओळखता येतो असं आढळलं.
आणखी एका अभ्यासात कुत्र्यांना रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये वासाने अंडाशयाच्या कर्करोगाचं निदान करता येतं असं दिसलं. प्रशिक्षित कुत्रे 99 टक्के घटनांत निदान करण्यात यशस्वी झाले.
त्यानंतर इलेक्ट्रॉनिक नाकाची संकल्पना पुढे येऊन त्यावर संशोधन सुरू झालं. याला वासातले वेगवेगळे बारकावे कारणीभूत ठरले.

फोटो स्रोत, Getty Images
रोगाचा विचार केल्यास हा वास व्यक्तीमध्ये असणाऱ्या सुक्ष्मजीवांनुसार आणि प्रतिकारक्षमतेनुसार बदलतो असं अझिझ सांगतात.
परंतु किटकांवर होत असलेला नवा अभ्यास कर्करोगावर होत असलेल्या इतर अभ्यासांना पूरक आहे असं त्यांना वाटतं.
अझिझ सांगतात, प्राण्याच्या विश्वाबद्दल जितकं समजत जाईल तितकं चांगलं. आमच्या किंवा इतर संशोधकांच्या संशोधनातून कर्करोग निदानाची माहिती येईल तेवढी चांगली. सगळ्यांचं योगदान यासाठी उपयोगी पडेल.”
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








