अंतराळातून परतले शुभांशु शुक्ला; देशभरातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव

फोटो स्रोत, ANI
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. अॅक्सिओम-4 या ऐतिहासिक मोहिमेतून ते यशस्वीपणे पृथ्वीवर परतले आहेत.
त्यांच्या धैर्याने, समर्पणाने संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला आहे. त्यांच्या या प्रवासाने भारताच्या अंतराळ स्वप्नांना नवी दिशा दिली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशु शुक्ला यांना शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय
पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या सोशल मीडियावर फ्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे की, "ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आपल्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेनंतर पृथ्वीवर परत येत आहेत. संपूर्ण देशाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो."
"आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून त्यांनी आपल्या समर्पण आणि धैर्याने लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. हा आपल्या स्वतःच्या मानव अंतराळ उड्डाण मोहिमेकडे जाणारा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिलं, "ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला याचं अॅक्सिओम-4 मोहिमेतून यशस्वीपणे पृथ्वीवरून परत येणं हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांनी केवळ अंतराळ गाठले नाही, तर भारताच्या आकांक्षांना नव्या उंचीवर पोहोचवलं आहे."
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अॅक्सिओम- 4 च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिलं, "ही संपूर्ण जगासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 'ड्रॅगन' यान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ सॅन डिएगो परिसरात यशस्वीपणे उतरलं आहे."
"भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण देशाचा एक सुपुत्र यशस्वी अंतराळ प्रवास करून परत आला आहे. आज भारताने अंतराळाच्या जगात आपलं कायमस्वरूपी स्थान मिळवलं आहे!"
'हा संपूर्ण देशासाठी खूप अभिमानाचा क्षण'
'आज आमच्याकडे बोलायला काही शब्दच उरले नाहीत,' अशी भावूक प्रतिक्रिया शुभांशु शुक्ला यांची बहीण शुची मिश्रा यांनी दिली आहे.
शुभांशु हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतल्यावर शुची यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

फोटो स्रोत, ANI
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या की, "तो परत आला आहे. हा संपूर्ण देशासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. आम्ही खूप उत्साहित आहोत."
"आमच्याकडे शब्दच नाहीत. आज भावना व्यक्त करायला शब्द कमी पडत आहेत. जर अभिमान मोजायचं काही माप असतं, तर आज तेही अपुरं पडलं असतं."
शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 18 दिवस घालवल्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. आयएसएसवर जाणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर आहेत.
भारताचे शुभांशु शुक्ला आणि आणखी तीन अंतराळवीर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयएसएसकडे रवाना झाले होते.
कसा दिसतो अंतराळातून भारत? काय म्हणाले होते शुभांशु?
शुभांशु शुक्ला यांची अंतराळयात्रा केवळ ऐतिहासिक नव्हती, तर विज्ञानासाठीही खूप महत्त्वाची ठरली. त्यांनी अंतराळात केवळ तांत्रिक कामच केलं नाही, तर अनेक वैज्ञानिक प्रयोगांतही भाग घेतला.
दरम्यान, अंतराळातून पाहिलं तरी, भारत आजही 'सगळ्यात सुंदर' वाटतो (सारे जहाँ से अच्छा), असं त्यांनी म्हटलं होतं.
रविवारी (13 जुलै), अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी आपले आदर्श राकेश शर्मा यांचे शब्द पुन्हा एकदा उच्चारले. राकेश शर्मा हे 1984 मध्ये अंतराळात गेलेले पहिले भारतीय होते.
ते हेही म्हणाले की, आजचा भारत अवकाशातून पाहिला तर महत्त्वाकांक्षी, निर्भय आणि आत्मविश्वासानं भरलेला दिसतो. त्यासोबतच त्यांनी अंतराळातून भारत कसा दिसतो, हे आपल्या खास शैलीत सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
रविवारी आयएसएसमध्ये झालेल्या निरोप समारंभात शुभांशु शुक्ला म्हणाले, "आजचा भारत महत्त्वाकांक्षी दिसतो, निर्भय दिसतो, आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे.
आजचा भारत अभिमानाने उभा आहे. याच सगळ्या कारणांमुळे मी पुन्हा एकदा अभिमानानं सांगू शकतो, आजही भारत 'सारे जहाँ से अच्छा' आहे. लवकरच पृथ्वीवर भेटूया."
अॅक्सियम-4 मोहिमेचे कमांडर पेगी व्हिटसन, पायलट शुभांशु शुक्ला आणि मिशन स्पेशालिस्ट स्लावोझ अझनान्स्की विझनीव्हस्की व टीबोर कापू यांनी 25 जून रोजी फ्लोरिडातून अंतराळयात्रा सुरू केली. 26 जून रोजी ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचले होते.

फोटो स्रोत, Axiom space
अॅक्सियम-4 मोहिमेच्या टीमने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर रविवारी आयएसएसमध्ये झालेल्या निरोप समारंभात शुभांशु शुक्ला म्हणाले, "आजचा भारत महत्त्वाकांक्षी दिसतो, निर्भय दिसतो, आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे."
"आजचा भारत अभिमानाने उभा आहे. याच सगळ्या कारणांमुळे मी पुन्हा एकदा अभिमानानं सांगू शकतो, आजही भारत 'सारे जहाँ से अच्छा' आहे. लवकरच पृथ्वीवर भेटूया," असं शुभांशु शुक्ला म्हणाले.
अॅक्सियम-4 मोहिमेचे कमांडर पेगी व्हिटसन, पायलट शुभांशु शुक्ला आणि मिशन स्पेशालिस्ट स्लावोझ अझनान्स्की विझनीव्हस्की व टीबोर कापू यांनी 25 जून रोजी फ्लोरिडातून अंतराळयात्रा सुरू केली. 26 जून रोजी ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचले होते.
अॅक्सियम-4 मोहिमेच्या टीमने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर त्यांच्या 18 दिवसांच्या मुक्कामाच्या शेवटच्या दिवसांत तिथे असलेल्या इतर सात सहकाऱ्यांसोबत एकत्र वेळ घालवला, गप्पा मारल्या आणि खाण्यापिण्याचा आनंद घेतला.
निरोप समारंभात अंतराळवीर भावूक
रविवारी (13 जुलै) आयएसएसवर झालेल्या एका अनौपचारिक निरोप समारंभात काही सदस्य भावूक झाले होते. चारही अंतराळवीरांनी एकमेकांना मिठी मारली.
शुभांशु शुक्ला म्हणाले, "25 जूनला या मिशनची सुरुवात झाली, तेव्हा हे सगळं इतकं सुंदर होईल, याची मला कल्पनाही नव्हती. इथला सगळा अनुभव खास वाटण्यामागे इथल्या लोकांचं मोठं योगदान आहे.
माझ्या मागे उभ्या असलेल्या (एक्सपेडिशन 73) टीममुळेच हा अनुभव खूप खास झाला. इथे येणं आणि तुमच्यासारख्या व्यावसायिक लोकांसोबत काम करणं, ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे."

फोटो स्रोत, Getty Images
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, अॅक्सियम-4 मोहीम सोमवार संध्याकाळी 4.35 वाजता आयएसएसमधून पृथ्वीच्या दिशेनं परत येईल आणि मंगळवारी दुपारी 3 वाजता अमेरिकेच्या कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळ पोहोचेल.
हे चारही अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यावर, गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाशी शरीर पुन्हा जुळवून घेण्यासाठी सुमारे सात दिवस पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) प्रक्रियेत राहतील, अशी अपेक्षा आहे.
शुभांशु शुक्ला यांच्यासाठी हा अंतराळ प्रवास ऐतिहासिक ठरला आहे. कारण ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. तसेच, अंतराळात प्रवास करणारे राकेश शर्मा यांच्यानंतरचे ते दुसरे भारतीय आहेत.
राकेश शर्मा 1984 मध्ये तत्कालीन सोव्हिएत संघाच्या सल्युत-7 स्पेस स्टेशन मिशन अंतर्गत अंतराळात गेले होते.
शुभांशु आपल्या सोबत काय घेऊन येणार?
आत्तापर्यंत शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात 18 दिवस घालवले आहेत. या काळात त्यांनी दररोज 16 सूर्योदय आणि 16 सूर्यास्त पाहिले, कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर, ताशी 28,000 किलोमीटरच्या वेगानं पृथ्वीभोवती फिरतं.
'पीटीआय'नुसार, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुभांशु शुक्ला यांच्या आयएसएस प्रवासासाठी सुमारे 550 कोटी रुपये खर्च केले आहेत. हा अनुभव इस्रोला 2027 मध्ये सुरू होणाऱ्या 'गगनयान' या मानवी अंतराळ मोहिमेची तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीर आता परतीच्या प्रवासासाठी सज्ज आहेत. ड्रॅगन कॅप्सूलमध्ये हे अंतराळवीर बसल्यावर कॅप्सूलचा दरवाजा बंद करण्यात आला. यानंतर कॅप्सून अंतराळस्थानकापासून विलग होईल. आणि पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू होईल.
ड्रॅगन अंतराळयान हळूहळू वेग कमी करून, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यासाठी ऑटोमॅटिक अनडॉकिंग प्रक्रिया सुरू करेल. त्यानंतर ते अमेरिकेच्या कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळ समुद्रात उतरेल.
नासाने सांगितलं की, "ड्रॅगन अंतराळयान 580 पाउंडपेक्षा जास्त वजनाच्या सामानासह परत येणार आहे, ज्यामध्ये नासाचं हार्डवेअर आणि या मोहिमेदरम्यान केलेल्या 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांचा डेटाचा समावेश आहे."
अंतराळवीरांनी नेमकं कोणते प्रयोग केले?
आयएसएसवरील प्रवासात शुभांशु शुक्ला यांनी मायक्रोअल्गी (सूक्ष्म शेवाळ) प्रयोगावर काम केलं. त्यांनी असे सॅम्पल घेतले, जे भविष्यात मोठ्या अंतराळ मोहिमांसाठी अन्न, ऑक्सिजन आणि बायोफ्युएलचे (जैवइंधन) स्रोत ठरू शकतात.
अॅक्सियम स्पेसने सांगितलं की, मायक्रोअल्गीमध्ये असलेली सहनशक्ती त्यांना पृथ्वीबाहेरही जिवंत राहण्यासाठी एक उपयुक्त पर्याय बनवते. नासाच्या निवेदनानुसार, गुरुवारी एक्सपेडिशन 73 आणि अॅक्सियम मिशन 4 टीमचं प्रमुख काम म्हणजे नियमित व्यायाम करणं आणि स्पेससूटच्या दुरुस्ती करणं.
याशिवाय, क्रूने 'व्हॉयजर डिस्प्ले' चा अभ्यासही सुरू ठेवला, ज्यामधून अंतराळ प्रवासादरम्यान डोळ्यांच्या हालचाली आणि त्यांचा समन्वय यावर काय परिणाम होतो, हे समजून घेतलं जात आहे.
टीमने आणखी एका अभ्यासासाठी डेटा गोळा केला, ज्यामध्ये हे समजण्याचा प्रयत्न केला जात आहे की, अंतराळात असताना अंतराळवीर त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाला कसं अनुभवतात आणि त्यासोबत कसं जुळवून घेतात.

फोटो स्रोत, AXIOM
ही माहिती भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी मानसिकदृष्ट्या आरामदायक आणि जगण्यायोग्य जागा कशा असाव्यात, याच्या डिझाइनसाठी मदत करेल.
एका दुसऱ्या अभ्यासात मेंदूमधील रक्तप्रवाहावर (सेरेब्रल ब्लड फ्लो) लक्ष केंद्रित करण्यात आलं, ज्यामधून हे समजण्याचा प्रयत्न केला गेला की मायक्रोग्रॅव्हिटी आणि जास्त प्रमाणात असलेला कार्बन डायऑक्साइड हृदयावर कसा परिणाम करतो, हा अभ्यास भविष्यात अंतराळवीरांसोबतच पृथ्वीवरील रुग्णांसाठीही उपयोगी ठरू शकतो.
क्रूने अंतराळातील किरणोत्सर्ग (रेडिएशन) कसा परिणाम करतो याची निगराणी ठेवण्यासाठी 'रॅड नॅनो डोझीमीटर' नावाचं एक छोटंसं उपकरण वापरलं. हे उपकरण अंतराळवीरांच्या सुरक्षिततेचा अंदाज लावण्यासाठी उपयोगी ठरतं.
याशिवाय, टीमने 'अॅक्वायर्ड इक्विव्हेलेन्स टेस्ट' नावाच्या एका मानसिक प्रयोगात भाग घेतला. हा प्रयोग अंतराळात शिकण्याची आणि तिथे राहण्याची क्षमता किती आहे, हे मोजण्यासाठी केला जातो.
तसंच, त्यांनी 'फोटॉनग्रॅव्ह' नावाच्या अभ्यासासाठी मेंदूच्या हालचालींशी संबंधित माहिती गोळा केला, जेणेकरून अंतराळ आणि वैद्यकीय क्षेत्रात उपयोगी ठरणाऱ्या न्यूरो-अॅडॅप्टिव्ह तंत्रज्ञानाला समजून घेता येईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.










