मुंबई: माणसांच्या गर्दींचं शहर कसं बनलं बिबट्यांचा जगातला सर्वात दाट नैसर्गिक अधिवास?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईच्या गर्दीवर आता फक्त माणसांची मक्तेदारी राहिली नाही. अलिकडेच जेव्हा मुंबईच्या बिबट्यांची खानेसुमारी झाली आणि त्याचा अहवाल प्रसिद्ध झाला, त्यात हे सिद्ध झालं की, मुंबई हा जगातला सर्वाधिक घनतेचा बिबट्यांचा अधिवास आहे.

वास्तविक, जगातल्या सर्वाधिक मानवी लोकसंख्येची घनता असलेल्या महानगरांपैकी एक असं हे शहर, मुंबई. दोन कोटी रहिवाशांचा उंबरा ओलांडून जमीन पुरत नाही म्हणून उंच इमारतींची स्पर्धा खेळणारं हे शहर.

सोबत, अगदी मध्यभागात घनदाट जंगल असणारं हे भारतातलं तर एकमेव शहर. पण आता, बिबट्यासारख्या जंगली प्राण्याचा असा सर्वाधिक घनतेचा नैसर्गिक दाट अधिवास हे जगातलं एकमेव महानगर.

मुंबईनं माणसांच्या अनेकविध कथा सांगितल्या. या शहराच्या पोतडीतून बाहेर पडणाऱ्या या अगणित कथा कधी संपणार नाहीत, यावर सगळ्यांंचं एकमत. अनेक प्रकारच्या साहित्य, नाटकं, चित्रपटांतून या कथा सांगितल्या गेल्या. पण माणूस आणि प्राण्यांच्या सहअस्तित्वाची ही 'मुंबईची गोष्ट' सगळ्यांपेक्षा वेगळी.

मुंबईकर बिबट्यांची ही कहाणी विविधांगी आहे. ती एक मोठी, जवळपास दोन दशकांच्या कालपट्टिकेवर घडून आलेली प्रक्रिया आहे.

त्याला संघर्षाचा, मानवी जीवितहानीचा इतिहासही आहे. पण त्यानंतर माणूस आणि बिबट्या या दोघांचेही स्वभाव ओळखून केलेल्या विविध प्रयोगांची, त्यातून मिळवलेल्या संघर्षाच्या नियंत्रणाची आणि मुख्य म्हणजे 'सहअस्तिवा'ची ही कहाणी आहे.

ती समजून घेण्याअगोदर या खानेसुमारीच्या आकड्यांकडेही एकदा पाहू.

गेल्या दशकभरात वाढत गेलेली 'मुंबईकर बिबट्यां'ची संख्या

महाराष्ट्राचा वनविभाग आणि 'वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन सोसायटी' यांनी फेब्रुवारी 2024 ते जून 2024 यादरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी जंगल आणि शेजारचं तुंगारेश्वर अभयारण्य या परिसरातही कॅमेरा ट्रॅप लावून ही बिबट्यांची मोजणी केली.

त्यापुढच्या काही काळात गोळा केलेल्या माहितीचं वैज्ञानिक विश्लेषण केलं गेलं आणि त्यात ही संख्या स्पष्ट झाली.

जवळपास पाच महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळे कॅमेरा ट्रॅप लावून ही मोजणी झाली होती. यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 57 ठिकाणी हे कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते, तर तुंगारेश्वर अभयारण्यात 33 ठिकाणी हे कॅमेरा ट्रॅप लावले होते.

या कॅमेऱ्यात आलेला प्रत्येक बिबट्या हा वेगळा असल्याची खात्री केली जाते.

बिबट्याच्या अंगावर जे ठिपके असतात, त्याची रचना प्रत्येक बिबट्यासाठी वेगळी असते. माणसाच्या फिंगर प्रिंटसारखी. ती एकसारखी कधीच असू शकत नाही.

बिबट्याच्या या ठिपक्यांच्या रचनेवरुनच एकदा मोजला गेलेला बिबट्या परत मोजला गेला नाही, याची खात्री केली जाते. हीच पद्धत वाघांच्या गणतीवेळेस त्यांच्या पट्ट्यांच्या रचनेवरून अवलंबली जाते.

"जेव्हा आपण हे कॅमेरा ट्रॅप लावतो आणि त्यात आपल्याकडे बिबिट्याचे फोटो येतात. तेव्हा आपण प्रत्येक बिबट्याचं आयडेंटिफिकेशन करतो. त्या प्रत्येक बिबट्याला नंबर दिला जातो. त्याचं सायंटिफिक अनालिसिस करुन डेन्सिटी मोजली जाते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जी डेन्सिटी आपण रिपोर्ट केली ती प्रत्येक 100 स्वेअर किलोमीटरला 26 एवढी आहे. ही जगभरातली सर्वाधिक डेन्सिटी आहे," निकित सुर्वे सांगतो.

निकित संशोधक आहे, बिबट्यांवर पीएचडी करतो आहे. पण तो इथे प्रकल्प 'वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन सोसायटी' चा प्रकल्प व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पाहतो. त्याची टीम आणि वनखात्याची टीम यांनीच ही मोजणी केली आणि अहवालही तयार केला.

या अहवालात जाहीर करण्यात आलेली बिबट्यांच्या संख्येची घनता ही जगातल्या इतर कोणत्याही अधिवासांपेक्षा अधिक आहेच, पण गेल्या दशकभरात ती कशी वाढत गेली याचीही आकडेवारी आहे.

मुंबई आणि ठाणे शहरांनी वेढलेल्या या 104 चौरस किलोमीटरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणि लगतच्या भागात, बिबट्यांची संख्या आणि घनता हळूहळू वाढत गेली.

"संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अथवा कोणत्याही जंगलात जेव्हा कारनिव्होरस (मांसाहारी) प्राण्यांची संख्या आपण रिपोर्ट करतो तेव्हा नेहमी घनता रिपोर्ट केली जाते, की एवढ्या एरियामध्ये एवढे बिबटे आहेत. त्याच बेसिसवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली बिबट्यांची घनता जगभरात सगळ्यात जास्त आहे."

"ही घनता सगळ्यात जास्त असण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे हे जंगल शहराच्या मधोमध वसलं आहे. म्हणजे एका बाजूला मुंबई आणि दुस-या बाजूला ठाणे," निकित सांगतो.

"या राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांसाठी मुबलक प्रमाणात वन्य प्राणी बिबट्यांसाठी उपलब्ध आहेत. हरणं, माकडं . शिवाय जी भोवतालची सीमा आहे त्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी उपलब्ध आहेत. भटके कुत्रे, मांजरी, डुक्कर. म्हणजे 'प्रे बेस' खूप असल्यानं इथं सगळ्यात जास्त घनता आहे. दुसरं कारण म्हणजे हे जंगल लैण्ड-लॉक्ड आहे. उत्तरेकडे जर तुंगारेश्वर अभयारण्य सोडलं तर बाकी तिनही बाजू बंद आहेत," निकित पुढे सांगतो.

बिबट्यांची संख्या वाढली, हे भितीचं कारण आहे का?

एका बाजूला मुंबईसारख्या शहरात बिबट्यांचा एक मोठा आणि सुरक्षित अधिवास तयार होतो आहे, पण तसं होतांना सहाजिकच सहाजिक कोणाच्याही मनात येणारा प्रश्न भितियुक्त कुतुहलानं असेल. यानं धोका तर नाही ना? घनदाट मध्यवस्तीत एवढी वाढलेली बिबट्यांची संख्या?

कारण गेल्या काही वर्षांत बिबट्यांचा अधिवास आणि मानवाची वस्ती हे जिथं एकमेकांना येऊन भिडले तिथं बिबट्या-मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात नोंदवला गेला आहे. मग आताही असं होईल?

"अजिबात नाही," डॉ विनया जंगले हा प्रश्न विचारताक्षणी उत्तर देतात. त्यांनी इथं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठा काळ प्राणी शल्यचिकित्सक म्हणून काम केलं आहे. या विषयावर बरंच लिखाणही त्यांनी केलं आहे.

"तसं असतं तर जवळपास संख्या दुप्पट झाल्यावर बिबट्यानं आतापर्यंट बाहेर पडून माणसांवर हल्ले करायला सुरुवात केली पाहिजे होती. बाहेरचं पॉप्युलेशनही वाढलं आहे. लोक पण आहेत. तरी तो बाहेर जाऊन माणसांवर हल्ला करत नाही आहे," डॉ जंगले म्हणतात.

गेल्या दोन दशकांमध्ये बिबट्या आणि माणसाचा संघर्ष हा महाराष्ट्रासह देशात एक गंभीर आणि संवेदनशील विषय बनला. नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी हल्ल्यांच्या, जीवितहानीच्या, मानवी वस्तीत शहरात बिबट्या घुसण्याच्या घटना वाढल्या.

दर कालांतरानं मानवी वस्तीत बिबट्या घुसल्याचे व्हिडिओ बातम्यांमध्ये येतात. व्हायरल होत असतात.

जरा काही आकडेवारीकडेही पाहू.

केंद्र सरकारनं 2024 मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'स्टेटस ओफ लेपर्डस इन इंडिया 2022' या अहवालात महाराष्ट्रात बिबट्यांची एकूण संख्या वाढल्याचं नोंदवलं आहेच, पण त्यात हीसुद्धा नोंद आहे की या सर्वेक्षणापूर्वीच्या 7 वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात एकूण 113 मृत्यू झाले आणि हा आकडा देशात सर्वाधिक आहे.

एकेकाळी मुंबईचं संजय गांधी उद्यानही या संघर्षाचं केंद्र झालं होतं. बिबट्याचे माणसांवर हल्ले झाले होते. 'मुंबईकर्स फॉर एस जी एन पी' चा 2011-12 चा अहवाल सांगतो, 2002 ते 2004 हा तर या संघर्षाचा पराकोटीचा काळ होता. जून 2004 या एका महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात ९ मृत्यू झाल्याची नोंद आहे.

या अहवालाच्या एक मुख्य अभ्यासिका आणि लेखिका डॉ विद्या अत्रेय होत्या. तेव्हा महाराष्ट्राच्या इतर भागातही हा बिबट्या माणूस संघर्ष उद्भवला होता, त्याचाही त्या अभ्यास करत होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार अगोदर कोणालाही समजले नाही की अचानक हे हल्ले का वाढले.

"बिबटे मुंबईमध्ये पहिल्यापासून होते. 1990 मध्ये या पार्कमध्येही होते पण त्यांचा काही त्रास नव्हता. पण 2000 ते 2005 या काळात बिबट्यांचे माणसांवर भरपूर हल्ले झाले. आम्हाला कळलं नाही की अचानक हे हल्ले का वाढले? प्रश्न सगळ्यांपुढेच होता पण कोणालाही उत्तर माहिती नव्हतं," डॉ अत्रेय 'बीबीसी मराठी'शी बोलतांना सांगत होत्या.

डॉ अत्रेय आता 'वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन सोसायटी इंडिया'च्या संचालिका आहेत आणि देशभरातल्या विविध भागात त्यांचं काम सुरु असतं.

याच 'वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन सोसायटी' सोबत वन खात्यानं मुंबईच्या बिबट्यांचं सर्वेक्षण केलं आहे. त्या सांगतात, की काही काळ अभ्यासानंतर त्यांना समजलं की मुंबईत हे हल्ले अचानक का वाढले होते.

"तेव्हा असं होत होतं की बिबट्यांना दुसरीकडे पकडलं जायचं, जिथं ते मानवी वस्तीच्या आसपास आलेले असायचे. वास्तविक त्यांनी काही केलं नसायचं. फार तर एखादी शेळी किंवा कुत्रं मारलेलं असायचं. पण त्याला पकडायचे आणि काही जागा होत्या तिथे सोडायचे."

"त्यापैकी संजय गांधी पार्क अशी एक जागा होती जिथं नाशिक किंवा आजूबाजूच्या भागात पकडलेले बिबटे सोडले जायचे. हे बाहेरुन इथे आलेले बिबटे हा हल्ल्यांमध्ये असायचे. तेव्हा आम्हाला हा संबंध समजला की तुम्ही पकडून असे सोडता तेव्हा हल्ले वाढतात. हे आम्ही जुन्नरमध्येही पाहिलं होतं," डॉ विद्या अत्रेय सांगतात.

मुंबईकर्स फॉर 'एस जी एन पी'

एकदा हा संबंध समजल्यानंतर, काही नवी पावलं उचलली गेली. त्या काळातल्या अनुभवांनी वनाधिकारी, अभ्यासक, संशोधक यांनीही धोरणं बदलली, काही नवीन प्रयोग केले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशा प्रयोगांचं केंद्र होतं. त्यापैकी एक प्रयोग 'मुंबईकर्स फॉर एस जी एन पी' असा वनखात्यासोबत सुरु झालेला प्रकल्प होता.

निकित सुर्वे 2011 मध्ये विद्यार्थी म्हणून इथे आला होता. पुढे इथेच संशोधन करुन आता तो इथल्या बिबट्यांसोबत काम करतो आहे. वनखात्यासोबतच अनेक या क्षेत्रात काम करणारे संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी या एका चळवळीत सहभागी झाले.

पण यापेक्षा महत्वाचं काम म्हणजे या प्रश्नाशी संबंधित जे जे कोणी होते त्यांना जोडून घेऊन एक जागृती निर्माण केली गेली. बिबट्या, त्याचा अधिवास, त्याचं वागणं, त्याच्या परिस्थितीजन्य प्रतिक्रिया याची माहिती या सगळ्यांना दिली गेली आणि त्यांच्या सहभाग वाढवला गेला.

"प्रत्येक की-स्टेकहोल्डरला ओळखून त्यांच्याशी संवाद साधला गेला. अवतीभोवतीचे महापालिका अधिकारी, पोलिस अधिकारी आणि मुख्य म्हणजे मीडिया. लोकांना दाखवण्यात आलं की बिबट्या किती छोटा वा मोठा प्राणी आहे. कित्येक वेळेला असं होतं की लोकांच्या मनात असलेल्या दहशतीमुळे त्यांच्या मनात छोटा बिबट्या खूप मोठा बनतो."

"जनजागृती झाली, शाळांपासून भोवतालच्या सोसायटीमध्ये जाऊन त्यांना सांगण्यात आलं की बिबट्या कसा प्राणी आहे, त्याची बायोलॉजी काय, त्याचं वागणं कसं असतं. या विविधांगी प्रयत्नांमुळे या उद्यानात संघर्ष खूप कमी झाला," निकित सुर्वे सांगतो, जो आता 15 वर्षं इथं बिबट्यांसोबत काम करतो आहे.

भोवतालच्या रहिवासी परिसरातल्या लोकांचा सहभाग या प्रयोगात वाढवल्यानं संघर्ष कमी व्हायला मदत झाली. बिबट्या आणि माणूस दोघांनी शेअर केलेला हा अधिवास आहे, ही जाणीव बळकट झाली.

दुसरीकडे, जर असा संघर्ष उद्भवलाच तर त्यासाठी आवश्यक रचना तयार झाली. आम्ही इथल्या रिस्क्यू टीमला भेटतो. या टीममध्ये आता दशकभराहूनही जास्त काळ काम केलेले वनरक्षक आहेत. त्यांना माहिती आहे की जंगल सोडून बिबट्या मानवी वस्तीत शिरला की बिबट्या आणि माणूस या दोघांनाही कसं हाताळायचं आणि दोघांनाही कसं वाचवायचं.

नियंत्रणात आलेला संघर्ष

माणूस आणि बिबट्या यांच्या संघर्षाच्या शक्यता पूर्णपणे मावळल्या नसल्या, तो कालांतरानं होत असला, तरीही गेल्या काही वर्षांतली आकडेवारी सांगते की मुंबईच्या या बिबट्या अधिवासाजवळचा संघर्ष नियंत्रणात आहे. इथंही आकडेवारी मदतीला येईल.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे साधारण दोन दशकांपूर्वी बिबट्या-माणूस संघर्ष मुंबईत खूपच वाढला होता. 2002-2004 या संघर्षाच्या पराकोटीच्या काळात 84 हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. पण पुढे धोरणं आणि प्रतिक्रिया बदलण्यासाठी प्रयोग सुरु झाल्यावर हे आकडेही कमी होत गेलेले आपल्याला दिसतात.

2011 ते 2024 एवढ्या वर्षांच्या कालावधीत 41 घटना घडल्या आहेत. ऑक्टॉबर 2022 मध्ये आरे कॉलनीजवळ बिबट्याच्या हल्ल्यात मानवी मृत्यूची शेवटची नोंद आहे.

"एवढ्या दाट वस्तीत बिबट्या बाहेर जाण्याची शक्यता वाढलेली आहे. पण आतला 'प्रे-बेस' उत्तम असल्यानं बिबट्या अन्नाच्या शोधात बाहेर जातो आहे, हल्ला करतो आहे अशा घटना आता खूप कमी दिसत आहेत. जुन्नर, नाशिक जर आपण पाहिलं तर बिबट्याचा अधिवास तिथे आहे जिथे माणसाचा रोजगारही आहे. म्हणजे उसाची शेती असेल."

"पण राष्ट्रीय उद्यानातला बिबट्या जेव्हा बाहेर जातो, तो तिथे तेवेढा कम्फर्टेबल नसतो. म्हणजे जरो तो तिकडे गेला तरी फार कमी काळ तो तिथे राहण्याची शक्यता आहे. कारण तो पूर्ण रहिवासी भाग आहे. तिथं ऊसाच्या शेतीसारखं वातावरण बिबट्यासाठी नाही. त्यामुळे पार्कचं वेगळेपण हे आहे की बिबट्याला त्याच्या अधिवासात परत येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे इथे संघर्ष सांभाळायला किंवा नियंत्रणात आणायला इथली परिस्थिती सुद्धा मदत करते," अनिता पाटील पुढे सांगतात.

मुंबईच्या या जंगलात नोंदवलेल्या 54 बिबट्यांशिवाय इथल्या बिबट्या संगोपन केंद्रातही 23 बिबटे आहेत. त्यातले काही जायबंदी झाले आहेत, काही कुटुंबापासून तुटलेले आहेत, काही रेस्क्यू करुन आणले आहेत. चार भिंतींच्या आत त्यांचा अधिवास तयार झाला आहे.

"मला कधीच हे वाटलं नव्हतं. मी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही काम केलं आहे. तिथं लोक वन्यजीवांचा स्वीकार करणारे असतात. पण मला नव्हतं वाटलं की मुंबईचे लोक बिबट्याला स्वीकारतील. पण काही वर्षांचे प्रयत्न होते की लोकांना बिबट्यासोबत स्पेस कशी शेअर करावी हे सांगावं लागलं आणि ते मुंबईचे बिबटे झालेही आता. अगदी मुंबईकर बिबटे," विद्या अत्रेय म्हणतात.

आदिकाळापासून माणसांनी आणि प्राण्यांनी निर्सग एकमेकांसोबत वाटून घेतला आहे, शेअर केला आहे.त्यात संघर्षही आहे आणि सहअस्तित्वही आहे. मुंबईसारखं विक्राळ शहर भोवती पसरललं असतांनाही मध्यभागात बिबट्यांची वाढलेली संख्या आणि घनता, याच सहअस्तिवाचा पुरावा आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)