सरकारने खासगी कोचिंग क्लाससाठी काय नवीन नियम जाहीर केलेत?

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने खासगी कोचिंग क्लासेससाठी नियमावली जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सर्वसमावेशकता अशा गोष्टी लक्षात घेऊन हे नियम तयार करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, क्लासेस असणाऱ्या ठिकाणी आगीच्या दुर्घटना, सोयीसुविधांचा अभाव या गोष्टीही नियम बनवताना विचारात घेण्यात आल्या आहेत.

नियमावलीच्या पत्रात केंद्र सरकारनं नियमबाह्य पद्धतीने वाढणाऱ्या खासगी कोचिंग क्लासेसची समस्यासुद्धा अधोरेखित केलीय.

नियमावलीत काय म्हटलंय?

या नियमावलीत कोचिंग क्लासेसमधील शुल्क, वर्ग खोली (इमारत), शिकवण्याची पद्धत आणि शिक्षक, क्लासेसच्या जाहिरात इत्यादींबाबत सविस्तर नियम जाहीर करण्यात आले आहेत.

1) एका क्लास किंवा बॅचमध्ये किती विद्यार्थी असतील, याचा स्पष्ट उल्लेख प्रॉस्पेक्टसमध्ये असायला हवा आणि वेबसाईटवर प्रसिद्ध करणं अपेक्षित आहे. क्लासेसमध्ये शिकवण्यास सुरुवात झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे यात वाढ व्हायला नको.

कोचिंग सेंटर्सकडे ट्यूटरची (शिक्षकाची) पात्रता, अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांचा अद्ययावत तपशील असलेली वेबसाइट असावी.

2) कुठल्याही कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाची किमान शैक्षणिक पात्रता पदवीपर्यंतची असली पाहिजे. तसेच गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांना कार्यरत ठेवता येणार नाही.

3) 16 वर्षांखालील विद्यार्थी/विद्यार्थिनींना कोचिंग क्लासमध्ये नोंदणी करता येणार नाही किंवा माध्यमिक शालान्त परीक्षेनंतरच ही नोंदणी करता येईल.

4) परीक्षेची काठीण्य पातळी, अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली तयारी आणि प्रयत्न यांविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.

5) विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वातावरण, सांस्कृतिक राहणीमान, वास्तविकता, शालेय परीक्षांची तयारी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यांतील फरक यांविषयीची जागरूकता निर्माण केली जाईल.

6) अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश यांसोबतच करिअरचे अन्य पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील. जेणेकरून, विद्यार्थ्यांवर भविष्याविषयीचा ताण न येता, ते अन्य पर्यायी करिअरचा पर्याय निवडू शकतात.

7) विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी मॉक टेस्ट घेतली जाऊ शकते. विद्यार्थ्यांच्या क्षमतेविषयी असणाऱ्या अपेक्षा कोचिंग क्लासेस पालकांकडे व्यक्त करू शकतात. त्याविषयीचे आगामी पर्याय आणि मार्ग कोचिंग क्लासेसने सुचविणे अपेक्षित.

8) कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश मिळाला म्हणजे वैद्यकीय (Medical), अभियांत्रिकी (Engineering), कायदा (Law), व्यवस्थापन (Management) यांसाठी प्रवेश मिळेलच किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेलच, याची खात्री नाही; ही जाणीव विद्यार्थी आणि पालकांना करून दिली जाईल.

9) कोचिंग क्लासेसने मानसोपचार तज्ज्ञांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी वेळोवेळी कार्यशाळा आणि सत्रे आयोजित केली पाहिजेत.

10) शिक्षणशास्त्र, अभ्यासक्रमाची कालमर्यादा आणि कोचिंग सेंटरमध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांविषयी कोचिंग सेंटरने विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती करावी. अनावश्यक मानसिक ताणतणाव आणि अपेक्षांचे ओझे यांमुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामांविषयी पालक समुपदेशन करू शकतात.

11) कोचिंग सेंटरने घेतलेल्या मूल्यमापन चाचणीचा निकाल सार्वजनिक करू नये. मूल्यमापन चाचणीचे निकाल गोपनीय ठेवून, त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या नियमित विश्लेषणासाठी करण्यात यावा. तसेच, ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी ढासळत आहे, त्यांना मार्गदर्शक तत्त्वांमधील तरतुदींनुसार समुपदेशन करण्यात यावे.

शुल्काविषयी

विविध अभ्यासक्रमांसाठी आकारले जाणारे शिक्षण शुल्क योग्य व वाजवी असेल आणि आकारण्यात येणाऱ्या शुल्काच्या संबंधित पावत्या उपलब्ध करून द्याव्यात.

विद्यार्थ्याने जर मध्येच कोर्स सोडला, तर 'प्रो-रेटा'च्या आधारावर उर्वरित रक्कम 10 दिवसांच्या आत परत करणे कोचिंग क्लासेसना बंधनकारक असेल. यामध्ये, जर विद्यार्थी वसतिगृहात राहत असेल तर वसतिगृहाची आणि मेसची फी यांचा देखील समावेश.

एकदा नाव नोंदणी केली तर त्यावर आधारित शुल्क आणि अभ्यासक्रम यांमध्ये वाढ करता येणार नाही.

कोचिंग क्लासची इमारत 'फायर सेफ्टी कोड', 'बिल्डिंग सेफ्टी कोड' इत्यादिंचे पालन करेल.

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रथमोपचार किट आणि वैद्यकीय सुविधा असणे बंधनकारक असेल.

तसेच इमारतीची प्रत्येक वर्गखोली हवेशीर, विद्युतरोधक असावी. तिथे पुरेसा सूर्यप्रकाश असावा.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, तक्रार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र टॉयलेट्स इ. सोयीसुविधांचा त्यामध्ये समावेश असावा.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.