ग्रीस : 2 रेल्वेंची समोरासमोर धडक, मृतांचा आकडा 43 वर

फोटो स्रोत, Reuters
ग्रीसमध्ये दोन ट्रेन्सची धडक होऊन झालेल्या अपघातील मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. ताज्या माहितीनुसार, या अपघातात 43 जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात 80 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. किरकोळ स्वरुपात जखमी झालेल्या काही जणांना घरी सोडण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितलं.
मंगळवारी (28 फेब्रुवारी) रात्री लारिसा शहराजवळ मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनचा हा अपघात झाला.
अपघातानंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आलं.
प्रवासी रेल्वेगाडीत जवळपास 350 जण प्रवास करत होते. अपघात घडल्यानंतर समोरचे चार डबे रुळावरून खाली आले. त्यानंतर समोरच्या दोन डब्यांना आगही लागली.
या प्रकरणानंतर स्थानिक स्टेशन मास्तरला अटक करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, EPA
या अपघातामधून बचावलेल्या प्रवाशांनी नेमकं काय घडलं याचं वर्णन सांगितलं.
“आम्ही मोठा आवाज ऐकला,” स्टेर्जिओस मिनेनिस यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं.
“ते दहा सेकंद हे एखाद्या दुःस्वप्नासारखे होते. आम्ही आमच्या डब्यामध्ये गडगडत होतो. तो गोंधळ थांबला. पण सगळेच जण घाबरले होते. या धडकेनंतर डब्यांनी पेट घेतला होता. दहा-पंधरा सेकंद सगळाच गोंधळ होता.
आग लागली होती, वायरी लोंबकळत होत्या, खिडक्या फुटल्या होत्या, डब्यात अडकलेले लोक ओरडत होते. आम्ही बाहेर पडण्यासाठी डब्यातून खाली उडी मारली. खाली लोखंडाचे तुकडे पडलेले होते. पण आमच्यासमोर दुसरा काय पर्याय तरी होता?” मिनेनिस यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, EPA
या दुर्घटनेत अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या 17 गाड्या, 4 क्रेन मागविण्यात आल्या होत्या. घटनास्थळी तीस अँब्युलन्सही होत्या.
हा अपघात दुर्दैवी असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अपघाताच्या चौकशीसाठी अथेन्सवरून टीम मागविण्यात आली असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
या अपघातात बळी पडलेल्यांसाठी ग्रीसमध्ये तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याचं ग्रीसच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
शुक्रवारपर्यंत (3 मार्च) सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून सरकारी कार्यालयावरील ध्वज हे अर्ध्यावर उतरविण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








