बॅटल ऑफ सेक्सेस : एक मॅच ज्यात स्त्री-पुरुष विरोधात खेळले आणि भविष्य बदललं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एका महिलेच्या एका खेळाने क्रीडा क्षेत्रातल्या महिलांचं भविष्य बदललं. बिली जीन किंग हे त्यांचं नाव आणि आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने...
आपण एखादी कलाकृती पाहतो, मग ते चित्र असेलं, म्युरल असेल किंवा पिक्चर असेल आणि तो न विसरता येणारा अनुभव ठरतो म्हणजे नक्की काय होतं.
त्यातला एक अनुभव, एक फिलिंग, एक दृश्य, एक रंग, एक कोपरा लक्षात राहातो कायमचाच आणि तोच आपला फ्रेम ऑफ रेफरन्स ठरतो आयुष्यभरासाठी.
2017 साली आलेला 'बॅटल ऑफ सेक्सेस' तसाच.
या पिक्चरमध्ये तसं लक्षात ठेवण्यासारखं खूप आहे, पण माझ्या डोळ्यासमोरून हलत नाही ती एक फ्रेम. दहा सेंकदांचा शॉट दोनदा आला असेल.
बिली जीन किंग आणि बॉबी रिग्स यांच्यातली टेनिस मॅच. प्रचंड हाईप, लाईव्ह टेलेव्हिजन ब्रॉडकास्ट, भरपूर पैसा गुंतलेला, स्पॉन्सर्स... द बॅटल ऑफ सेक्सेस! स्त्री आणि पुरुष यांच्यातली मॅच, कोण उत्तम हे ठरवणारी.
बिली जीनची प्रतिनिधी म्हणून टीव्हीवर कमेंट्री करायला आलीये रोझी कॅसल्स... सत्तरच्या दशकातली फायरब्रॅण्ड खेळाडू. बंडखोर. अनअपॉलोजेटिक. सुसाट वेगाने खेळणारी आणि सुसाट वेगाने गाडी चालवणारी.
टीव्हीची कमेंट्री सुरू होते, प्रसिद्ध पुरुष अँकर पडद्यावर येतो, त्याच्या स्वरात दिसतंच आहे की हे बायकांनी इक्वॅलिटीचं खूळ काढलंय, ते संपवायलाच हवं. आधी जुजबी माहिती देऊन, एखादा जोक मारून रोझीला बोलवतो. आणि बाकी काहीच करत नाही, फक्त रोझीच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ ओढतो. पूर्णवेळ ती बोलत असते तोवर हात काढत नाही.
एक छोटीशी कृती, स्त्रीला दुय्यम दाखवायची, तिला तिच्याच क्षमतांवर संशय घ्यायला लावणारी, तिची स्वतःची म्हणून जी स्वतंत्र भूमिका असेल त्या भूमिकेला चिरडणारी... का कारण फक्त तिच्या शेजारी उभा असलेला पुरुष ते करू शकतो म्हणून.
रोझीची बॉडीलँग्वेज आक्रसलेली, तिच्या बोलण्यात जाणवतं तिच्या खांद्यावर असलेला, तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करणारा पुरुषी हात. कोणत्याही बाईला जाणवणारा हात. रोझीचं फायरब्रँडपण गळून पडलेलं, तिला त्या पुरुष अँकरला उडवून लावता येत नाही, कदाचित नंतर तिने अशा अनेकांना उडवून लावलं असेल, पण पेट्रीआर्कीचं ओझं असतंच असं. भीती वाटावी इतकं मोठं.
डार्लिंग चहा आण आमच्यासाठी म्हणत ऑफिसमधल्या कर्तृत्ववान स्त्रियांना कमी लेखणार हा काळ. रोझीचं फक्त उदाहरण. ऑफिसात बायका हव्यात छान दिसायला, आपल्याला करमणूक म्हणून, आपल्याला चहा, कॉफी सॅण्डविच बनवून द्यायला, जमलं आणि एखादी सापडलीच स्वभावाने गरीब तर लैंगिक शोषणही करायला.
टेनिसमध्येही हव्यात. याच पिक्चरमधलं एक कॅरेक्टर म्हणतं, ‘या पोरी लहान लहान स्कर्ट घालून इकडे तिकडे पळतात ते बघायला चांगलंच वाटतं, पण ही समान पैसे द्या वाली भानगड फारच फालतू आहे.’
अमेरिकेतल्या टॉपच्या टेनिस स्पर्धेत महिला विजेतीला 1500 डॉलर्स मिळणार असतात तर पुरुष विजेत्याला 12000 डॉलर्स. महिलांपेक्षा आठपट जास्त रक्कम. हरकत नाही, कदाचित पुरुषांचे सामने जास्त लोक पाहात असतील, तसंही नाही, महिला खेळाडूंचे सामने पाहायला तेवढीच गर्दी होते, त्याचीही तितकीच तिकीटं विकली जातात. मग? या प्रश्नाला उत्तर नाही.

फोटो स्रोत, Getty Images
कधी पुरुषांच्या ताकदीच कारण दिलं जातं किंवा ते जास्त चपळ आहेत सांगितलं जातं (त्याचा काय संबंध? लोक मॅच बघतात, तिकीटं काढतात, मग स्लो असो की फास्ट असले प्रश्न पडत असतील, तर माफ करा पण तुम्हीही फेमिनिस्ट आहात. भगवान की मर्जी के आगे कौन क्या कर सकता है?).
याचा निषेध म्हणून महिला खेळाडू स्वतःची विमेन्स टेनिस असोसिएशन सुरू करतात. एका डॉलरची साइनिंग अमाऊंट घेऊन. स्वतःची टुर्नामेंट स्वतः आयोजित करतात, स्वतःच्या गाड्या घेऊन देशभराच्या टूरला निघतात, जिच्या सोबत दुसऱ्या दिवशी खेळायचं त्या प्रतिस्पर्धीसोबत रूम शेअर करतात, टेनिस कोर्ट सज्ज करतात, पत्रकारांशी बोलतात, स्पर्धेची सगळी मॅनेजमेंट पाहातात, रस्त्यावर उभं राहून तिकीटंही विकतात, आणि या सगळ्यांतून वेळ मिळालाच तर प्रॅक्टीस करतात. याचा बदला म्हणून त्यांना यूएस लॉन टेनिस असोसिएशनमधून बाहेर काढलं जातं.
दुसऱ्या बाजूला आहे बॉबी रिग्स. एकेकाळचा उत्तम टेनिसपटू, विम्बल्डन विजेता पण जुगाराचं व्यसन असलेला. जुगार म्हणजे पैज लावून खेळायचं आणि जिंकायचं. बायकोच्या पैशावर जगणारा हा अवलिया प्राणी. कधी एका हाताने खेळतो, कधी दोन कुत्रे हातात धरून खेळतो, कधी तिप्पट आकाराची रॅकेट हातात घेऊन. पण बॉबी रिग्स प्रत्येक मॅच जिंकतो, आणि पैसेही. प्रश्न पैशांचा नाहीये, प्रश्न आहे जिंकण्याच्या नशेचा. आणि त्या नशेसाठी तो वाट्टेल ते पणाला लावायला तयार असतो. कधी स्वतःची इमेज तर कधी स्वतःचं लग्न.
हा सगळा पेट्रीआर्कीचा खेळ मस्त रंगवला आहे दिग्दर्शक वॅलरी फॅरिस आणि जॉनथन डेटन यांनी. पण टेनिस, इक्वॅलिटी, पेट्रीआर्की इतकंच थोडी असतं आयुष्यात. आयुष्यांच्या समांतर प्रतलांत अनेक घटना एकाच वेळेस घडत असतात. कोर्टावर खेळणारी व्यक्ती, नात्यांमध्ये बांधली गेलेली व्यक्ती, प्रेम करणारी व्यक्ती, आपण समोरच्याच्याही नकळत त्याच्याकडून फसवले जातोय हे लक्षात येऊनही त्याला सपोर्ट करणारी व्यक्ती आणि आपल्याहून मोठ्या, लार्जर दॅन लाईफ गोष्टींसाठी लढा देणारी व्यक्ती, आणि या सगळ्या वेगवेगळ्या व्यक्ती एका माणसाच्या आयुष्याचं प्रतिबिंब असतात.
बॅटल ऑफ सेक्सेस फक्त टाळ्या पिटू पिक्चर राहात नाही तो इथे. मोजकेच प्रसंग पण मानवी भावभावनांचा, जिंकण्या-हरण्याचा, नात्यांचा, प्रेमाचा एक मस्त कॅलिडोस्कोप उभा केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बॉबी रिग्स फक्त पैज लावायची म्हणून तेव्हाच्या महिला टेनिसमधल्या नंबर वन मार्गारेट कोर्टला आव्हान देतो. ये, माझ्याशी खेळ आणि मला हरवून दाखव. त्याच्यासाठी काय पन्नास पैजांपैकी एक. त्याआधी त्याने बिली जीनला विचारलेलं असतं, ती उडवून लावते. मार्गारेट बॉबीची ऑफर मान्य करते.
पण बिलीच्या लक्षात येतं की चुकून जरी मार्गारेट हरली तर खेळांमध्ये महिलांना समानता मिळण्यासाठी त्या जो लढा देत आहेत तो पाण्यात जाईल. ती मार्गारेटला खेळू नको सांगते, पण काही उपयोग होत नाही. बॉबी कोर्टावर मार्गारेटचा धुव्वा उडवतो आणि बायकांना कमी समजणाऱ्या पुरुषांना मोकळं रान मिळतं.
आपल्या पथ्थ्यावर पडलेली गोष्ट पुरुष प्रधान संस्कृतीचे पाईक पूर्णपणे कशी वापरतात याचं उदाहरण. पैसे मिळणार असतील तर गाढवासोबतही टेनिस खेळणारा माणूस बॉबी. पण त्याला प्रेझेंट करतात पुरुषी ताकदीचा मॅस्कॉट म्हणून. बायांना कसलं काय जमतंय. त्यांनी घरात राहावं. बिली जीनला आता बॉबीची पैज मान्य करण्यावाचून पर्याय नसतो. आपली मेहनत वाचवायची, महिलांच्या समान हक्काचा लढा द्यायचा म्हणजे बॉबीला हरवायला हवं.
प्रसिद्धीसाठी (पर्यायाने जास्त व्ह्युअरशिपसाठी) बॉबी जी नाटकं करतो ती बघण्यासारखी. मेल शोव्हनिस्ट पिग बनणं, बायका स्वयंपाकघरात आणि बेडरूममध्येच मला आवडतात अशी अपमानकारक विधानं करणं आणि काय काय. पण मला आवडलेली गोष्ट, शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे बिलीचं हे सगळं लाईटली घेणं. You should know which battles to fight and which to let go. बिलीला बॉबीचा काहीही प्रॉब्लेम नाहीये, तिला प्रॉब्लेम आहे तो महिलांना कमी लेखणाऱ्या, विरोधात आवाज उठवला तर असोसिएशन मधून बाहेर काढणाऱ्या सिस्टीमचा.
म्हणूनच तिच्यावर प्रेशर प्रचंड आहे. आपण हरलो तर सगळंच संपलं ही जाणीव तिला आहे. ती अतिसराव करतेय, त्यापायी ती आजारीही पडते.
आणि मग मॅच. काहीही भव्यदिव्य, उगा शेवटच्या सेकंदापर्यंत तंगवणारं काही नाही. जशी आहे तशी मॅच. बिली बॉबीला हरवते, आणि इतिहास घडतो. लक्षात राहिलेला दुसरा प्रसंग - मॅच जिंकल्यानंतर बिली पत्रकारांच्या विळख्यातून स्वतःला सोडवून, नवऱ्याला पाच मिनिट थांबायला सांगून ड्रेसिंग रूममध्ये जाते. एकटीच बसून ढसाढसा रडते. त्या रडण्याचा अर्थ ज्याला जो लावायचा त्याने लावावा.

फोटो स्रोत, Getty Images
आता थोडंस खऱ्या बिली जीन विषयी...
बिली जीन किंग या अमेरिकेच्या ग्रँडस्लॅम विजेत्या टेनिस खेळाडू. टेनिस खेळात महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला आणि आजही त्या याच गोष्टीसाठी जगभरात ओळखल्या जातात.
1968 साली जेव्हा त्यांनी विम्बल्डनची ट्रॉफी जिंकली तेव्हा त्यांना मिळालेली बक्षीसाची रक्कम होती 750 डॉलर्स. त्याच वर्षी जो पुरुष खेळाडू जिंकला त्याला मिळालेली रक्कम होती 2000 डॉलर्स.
म्हणजे दुपटीहून जास्त. बिली जीन किंग यांनी असमानतेविरोधात लढायचं ठरवलं.
महिला टेनिसला पुरुष टेनिस इतकंच महत्त्व मिळवून देण्यासाठी त्या आयुष्यभर लढल्या. त्यांच्या लढ्यातला कदाचित सर्वाधिक महत्त्वाचा क्षण असेल त्यांची बॉबी रिग्स विरोधात झालेली मॅच.
हो स्त्री विरुद्ध पुरुष अशी टेनिसची मॅच खरोखर झाली होती आणि या मॅचला 'बॅटल ऑफ सेक्सेस' असंही नाव दिलं गेलं होतं.
1973 मध्ये झालेल्या या मॅचमध्ये बिली जीन किंग यांनी बॉबी रिग्स यांना हरवलं. ही मॅच त्या काळात जवळपास 9 कोटी प्रेक्षकांनी लाईव्ह पाहिली होती.
याच वर्षी त्यांनी यूएस ओपन स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. त्याच्या या धमकीमुळे घाबरून जाऊन यूएस टेनिस फेडरेशनने यूएस ओपन स्पर्धेत महिला-पुरुषांना बक्षीसाची रक्कम समान देण्याची घोषणा केली.

फोटो स्रोत, Getty Images
समान हक्कांसाठीचा बिली जीन किंग यांचा लढा इथेच थांबला नाही. त्यांनी 1981 साली जाहीरपणे सांगितलं की त्या समलैंगिक आहेत. तो काळ LGBT हक्कांसाठी चांगला नव्हता. या समुदायाच्या लोकांना काहीच हक्क नव्हते आणि ठिकठिकाणी व्देषाचा सामना करावा लागायचा.
त्यांचे पब्लिसिस्ट आणि वकील यांनी सल्ला दिला होता की तुम्ही लेस्बियन आहात हे सांगू नका. तरीही त्यांनी जाहीरपणे आपली लैंगिक ओळख सांगितली. याचा परिणाम असा झाला की एक यशस्वी खेळाडू असूनही त्यांना कंपन्यांनी आपली स्पॉन्सरशिप नाकारली. त्यांच्यासाठी पुढे खेळणं अवघड झालं.
पण तरीही त्या महिला आणि LGBT हक्कांसाठी काम करतच राहिल्या.
त्यांची टेनिस कारकिर्दही डोळे दिपवणारी होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 12 ग्रँडस्लॅम, 16 डबल्स आणि 11 मिक्स डबल्स जिंकल्या. 1971 साली त्या पहिल्या महिला अशा महिला खेळाडू बनल्या ज्यांच्या बक्षीसाची रक्कम 1 लाख डॉलर्स पर्यंत पोचली.
आज त्या 78 वर्षांच्या आहेत. 2018 साली त्यांनी आपल्या दीर्घकालीन पार्टनर आणि टेनिसपटू इलिनो क्लॉस यांच्याशी लग्न केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








