2000 वर्षांपूर्वीच्या रोमन इतिहासाच्या पाऊलखुणा आणि त्या ही लंडनमध्ये

    • Author, अ‍ॅलिसन फ्रान्सिस, रेबेका मोरेल
    • Role, बीबीसी न्यूज

लंडन शहरातील एक कार्यालयाच्या तळघराखाली एक ऐतिहासिक ठेवा सापडला आहे.

रोमन इतिहासासंदर्भातील शहरातील महत्त्वाचे संशोधन म्हणून याकडे पाहिले जात आहे. या ऐतिहासिक ठेव्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे.

पुरातत्व शास्त्रज्ञांनी प्राचीन शहराच्या पहिल्या बॅसिलिकाचा एक महत्त्वपूर्ण भाग इथं शोधला आहे.

ही एक 2000 वर्षे जुनी अशी सार्वजनिक इमारत आहे. जिथं महत्त्वाचे राजकीय, आर्थिक आणि प्रशासकीय निर्णय घेतले जात असत.

येथील उत्खननात आतापर्यंत दगडी भिंतीचे काही भाग समोर आले आहेत. हा बॅसिलिकाचा पाया होता. त्याची उंची अडीच मजले भरतील इतकी असेल.

लंडन शहराच्या सुरुवातीच्या काळावर प्रकाश टाकणारी ही जागा सर्व नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे.

रोमन लंडनची उत्पत्ती

"हे खूप महत्त्वाचं आहे, हे रोमन लंडनचं हृदय आहे," असं म्युझियम ऑफ लंडन आर्कियोलॉजीच्या (Mola) सोफी जॅक्सन यांनी म्हटलं. या नव्या शोधाची माहिती त्यांनी पहिल्यांदा बीबीसी न्यूजला दिली.

"ही इमारत आपल्याला लंडनच्या उत्पत्तीबद्दल, लंडन कसं वाढलं आणि ब्रिटनची राजधानी म्हणून या शहराला का निवडलं गेलं याबद्दल बरंच काही सांगेल. हे खूपच आश्चर्यकारक असणार आहे."

हा जागा 85 ग्रेसचर्च स्ट्रीट येथे सापडली. या कार्यालयाची इमारत पाडून तिचा पुनर्विकास केला जाणार होता.

पूर्वीच्या पुरातत्त्वीय तपासणीमुळं प्राचीन बॅसिलिकाचे स्थान उघड झाले. पुरातत्व टीमनं काँक्रिटच्या मजल्याखाली कोणतं रहस्य लपलं आहे, हे पाहण्यासाठी अनेक छोटे-छोटे खड्डे तयार केले.

तिसऱ्या प्रयत्नात, फाइलिंग कॅबिनेट्समध्ये खोदताना सुदैवानं त्यांना यश मिळालं.

"तुम्ही इथं रोमन काळातील दगडी बांधकाम पाहू शकता. हे इतक्या चांगल्या पद्धतीनं जतन झालं आहे की, ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. आम्ही तर रोमांचित झालो होतो," असं सोफी जॅक्सन म्हणाल्या.

ही भिंत केंटमधील एका प्रकारच्या चुनखडीपासून बनवलेली आहे, आणि ती एक भव्य इमारत होती. बॅसिलिका सुमारे 40 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 12 मीटर उंच असण्याची शक्यता आहे.

'इथंच महत्त्वाचे निर्णय घेतले जात'

या ठिकाणी इतर वस्तूही सापडल्या आहेत. त्यात या प्राचीन शहरातील एका अधिकाऱ्याच्या शिक्क्यानं छापलेली एक छताची फरशीही मिळाली.

बॅसिलिका लंडन फोरमचा एक भाग होती. जे एक सामाजिक आणि व्यावसायिक केंद्र होतं. याचं पटांगण एका फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचं होतं.

"बॅसिलिका ही नगरपालिकेची इमारत होती. तिच्या समोर एक मोठ्या खुल्या बाजाराचा चौक होता, ज्याच्या सभोवती अनेक दुकानं आणि कार्यालयं होती," असं जॅक्सन यांनी सांगितलं.

"या ठिकाणी लोक व्यवसायासाठी येत, त्यांची न्यायालयीन प्रकरणं निकाली काढण्यासाठी येत. इथंच कायदे केले जात आणि इथंच लंडन तसेच संपूर्ण देशाचे निर्णय घेतले जात असत."

रोम ने ब्रिटनवर आक्रमण केल्यानंतर शहराचे लाँडेनियम हे रोमन नाव ठेवण्यात आले. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे इसवी सन 80 मध्ये ही इमारत उभारण्यात आली.

पण पहिली बॅसिलिका आणि फोरम फक्त 20 वर्षांसाठीच वापरले गेले. त्यानंतर एक मोठा दुसरा फोरम बनवला गेला. कदाचित यामुळं शहराच्या आकारात आणि महत्त्वात किती वेगानं वाढ झाली हे दिसून येतं.

वास्तुविशारदांसाठी तांत्रिक आव्हान

या नव्या शोधामुळे इमारतीचे मालक हर्टश्टेन प्रॉपर्टीज यांना आपली योजना बदलावी लागणार आहे.

रोमन अवशेषांचे आता पूर्णपणे उत्खनन केले जाईल, नव्या ठिकाणी त्याचा समावेश केला जाईल, आणि लवकरच ते सर्वांसाठी खुले केले जातील.

वास्तुविशारदांसाठी, आता या पुरातत्व जागेच्या आजूबाजूच्या इमारतींची पुनर्रचना करताना अनेक तांत्रिक आव्हानं असणार आहेत.

"या योजनेत काही दुरुस्ती करण्यात आली आहे," असं आर्किटेक्चर फर्म वुड्स बॅगोटचे जेम्स टेलर यांनी स्पष्ट केलं.

"जमिनीतून सापडलेले खास दगड नष्ट होऊ नयेत यासाठी आम्ही कॉलमचे ठिकाणही बदलले," असं जेम्स टेलर म्हणाले.

तिथल्या स्ट्रक्चरला इजा पोहोचू नये यासाठी तिथं कमीत कमी लिफ्ट बसवल्या आहेत. यामुळं टीमला इमारतीची उंची कमी करावी लागली आहे.

जेम्स टेलर म्हणाले की, हा प्रयत्न आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान असा असेल.

"खरंतर लोकांना या जागेचा वापर करताना आणि आनंद घेताना पाहणं, सार्वजनिक हॉलमधून फिरताना आणि अवशेष पाहण्यासाठी खाली जाताना बघणं, हे खरोखर अविश्वसनीय असेल."

'भूतकाळ आणि वर्तमानातील दुवा'

"लंडनच्या स्क्वेअर माईलच्या रस्त्याखाली सापडलेला हा रोमन इतिहासाचा नवा भाग आहे. लोकांना तो नाविन्यपूर्ण पद्धतीनं दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे."

"गिल्डहॉल आर्ट गॅलरीमध्ये एका काचेच्या मजल्याखाली अ‍ॅम्पिथिएटरचा काही भाग येतो. त्याचबरोबर ब्लूमबर्गच्या कार्यालयात लोक मिथ्रासच्या मंदिराला भेट देऊ शकतील. तिथलं वातावरण आकर्षक साऊंड सिस्टिम (ध्वनी व्यवस्था) आणि लाइट सिस्टिमनं (प्रकाश व्यवस्था) जिवंत केलं जाणार आहे," टेलर सांगतात.

"जास्तीत जास्त लोकांनी इथं येऊन भूतकाळ आणि वर्तमानातील दुवा अनुभवावा," अशी इच्छा सिटी ऑफ लंडन कॉर्पोरेशनचे ख्रिस हेवर्ड यांनी व्यक्त केली आहे.

"रोमन लंडन तुमच्या पायाखाली आहे ही वस्तुस्थिती अनुभवणं ही खरंतर एक अप्रतिम अशी भावना असेल," असंही ते म्हणाले.

"त्या काळात रोमन लंडन कसं होतं ते तुम्ही प्रत्यक्षात अनुभवाल. त्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन म्हणू शकता, आता या गगनचुंबी इमारती पाहा, मोठमोठी कार्यालयं पाहा, ही प्रगती आहे. पण त्याचवेळी प्रगतीबरोबर आपल्या ऐतिहासिक वास्तूंचा सांभाळ करणंही गरजेचं आहे," हेवर्ड सांगतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.