नेपाळमध्ये वाढतंय हिंदुत्वाचं राजकारण, काय आहे आरएसएसची भूमिका?

फोटो स्रोत, Getty Images/BBC
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नेपाळच्या बीरगंजमधील सोनरनिया गावात सुरेश पासवान यांच्या घरी सुमारे 30 मुलं-मुली शिक्षण पूर्ण झाल्यावर शपथ घेत आहेत की, नेपाळला हिंदू राष्ट्र बनवायचं, धर्मांतर थांबवायचं आणि गोहत्या बंद करायची.
यातील बहुतांश मुलं-मुली दलित कुटुंबातून आलेले आहेत.
एकल विद्यालय 1992 मध्ये सुरू झाली होती. अशा एकल शाळा फक्त बीरगंजमध्येच नाहीत तर नेपाळच्या विविध भागांत चालतात.
नेपाळमध्ये हिंदुत्वाचं राजकारण पुढं नेण्यात सर्वात सक्रिय असलेला संघ म्हणजे 'हिंदू स्वयंसेवक संघ' (एचएसएस).
नेपाळशिवाय अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारख्या देशांमध्येही एचएसएस नावाची ही संघटना सक्रिय आहे.
आरएसएस आणि एचएसएस आपल्या वेबसाइटवर परस्पर संबंधांचा उल्लेख करत नाहीत, पण त्यांचा संबंध प्रत्येक स्तरावर दिसून येतो.
एचएसएसच्या जनकपूर विभागाचे कार्यवाह रणजित साह सांगतात की, संपूर्ण नेपाळमध्ये 1048 एकल शाळा आणि 35 पशुपती शिक्षा मंदिरं सुरू आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
सोहनलाल प्रसाद साह हे नेपाळच्या बारा जिल्ह्यातील एकल विद्यालयाचे प्रमुख आहेत. आम्ही बीरगंजपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या सोनरनिया गावात पोहोचलो तेव्हा सुरेश पासवान यांच्या घरात सुरू असलेल्या एकल विद्यालयात ते शिक्षक म्हणून काम करत होते.
सोहनलाल प्रसाद साह सांगतात की, हे विद्यालय आणि ते स्वतः, दोघेही आरएसएसशी संबंधित आहेत.
सोहनलाल प्रसाद साह सांगतात, "एकल विद्यालय आरएसएसचं आहे. ते कोणत्याही इमारतीत चालत नाही. ही शाळा कुणाच्या तरी घरी किंवा झाडाखाली चालते."
"आम्ही शाळेत मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल जागरूक करतो, त्यांना जाणीव करून देतो. त्यांना संस्कारांचं शिक्षण देतो. यात गाईचा आदर करणं, धर्मांतराबद्दल जागरूकता आणि नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र बनवणं यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे."
सोहनलाल प्रसाद साह यांनी आरएसएसचे 21 दिवसांचे 'ओटीसी ट्रेनिंग' गोरखपूरमध्ये घेतले होते. याची माहिती त्यांनी स्वतः दिली.
पशुपती शिक्षा मंदिर
नेपाळमधील या हिंदुत्वाच्या मोहिमेत दोन लोक नेतृत्वाच्या पातळीवर सक्रिय आहेत, रवित कुमार आणि वेद प्रकाश. पण दोघंही नेपाळमध्ये आरएसएसची भूमिका काय आहे यावर बोलणं टाळतात. रवित कुमार मेरठचे आहेत आणि वेद प्रकाश स्वतःला नेपाळच्या विराटनगरचे असल्याचं सांगतात.
29 एप्रिलच्या सायंकाळी जेव्हा आम्ही बीरगंजच्या पशुपती शिक्षा मंदिराच्या परिसरात पोहोचलो तेव्हा तिथं एचएसएसच्या स्वयंसेवकांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होता.
या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक तयार केले जात होते. वातावरणही आरएसएसच्या शाखेसारखंच होतं, गणवेशही तसाच होता. शाखेत सहभागी होण्यापूर्वी भगवा ध्वजाला वंदन करण्याची पद्धतही तशीच होती. शाखा संपण्यापूर्वीची प्रार्थनाही तीच होती- 'नमस्ते सदा वत्सले...'.
पशुपती शिक्षा मंदिरात आम्हाला पाहून आरएसएसचे रवित कुमार आणि वेद प्रकाश यांनी आश्चर्य व्यक्त केलं. "तुम्ही लोक इथंही आलात?" खरं तर, आम्ही त्यांना यापूर्वी काठमांडूमध्ये भेटलो होतो.

फोटो स्रोत, Getty Images/BBC
शाखेत आलेल्या काही लोकांनी सांगितलं की, या प्रशिक्षण कार्यक्रमात स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच लोक आहेत. शाखा संपण्यापूर्वीच्या प्रार्थनेदरम्यान रवित कुमार आणि वेद प्रकाशही उजवा हात छातीला लावून सावधान स्थितीत उभे असलेले दिसले.
आरएसएस आणि एचएसएस कधी एक आहेत आणि कधी वेगळे आहेत, हे ओळखणं कठीण आहे. काठमांडूमधील एचएसएसच्या मुख्यालयाचं नाव 'केशव धाम' आहे, तर दिल्लीतल्या आरएसएस मुख्यालयाचं नाव 'केशव कुंज' आहे.
नेपाळमधील एचएसएसचे राष्ट्रीय संघचालक आणि माजी पोलीस अधिकारी कल्याण कुमार तिम्सिना यांना आम्ही 'केशव धाम' येथे भेटण्याची विनंती केली, पण ते तिथं भेटायला तयार झाले नाहीत.
यानंतर आम्ही त्यांना काठमांडूमधील 'हिंदू राष्ट्र स्वाभिमान जागरण अभियान'च्या कार्यालयात भेटलो. कल्याण कुमार आले तेव्हा ते खूप सावध दिसले. ते एका कागदावर लिहून आणलेले नोट्स घेऊन बसले होते.
जेव्हा जेव्हा कल्याण कुमार यांना आरएसएस आणि नेपाळबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा 'हिंदू राष्ट्र स्वाभिमान जागरण अभियान'चे सरचिटणीस देवेश झा मोबाइलची स्क्रीन त्यांच्या समोर धरत.
ते त्याच स्क्रीनकडे पाहून उत्तरं देत होते. संपूर्ण चर्चेत त्यांनी आरएसएसशी आपला काहीही संबंध नाही, असंच दाखवण्याचा प्रयत्न केला, पण हिंदुत्वच आपलं ध्येय असल्याचं मात्र त्यांनी उघडपणे मान्य केलं.

फोटो स्रोत, Getty Images
आम्हाला अशा अनेक गोष्टी दिसून आल्या ज्यातून त्यांचे आरएसएसशी घट्ट संबंध उघड होत होते. उदाहरणार्थ, बीरगंजचं पशुपती शिक्षामंदिर घ्या. मुख्याध्यापकांच्या खोलीला 'हेडगेवार कक्ष' नाव दिलं आहे आणि शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर गोळवलकर यांचा फोटो ठेवण्यात आला आहे.
फेब्रुवारी 2023 मध्ये माझी भेट एचएसएसच्या जनकपूर विभागाचे कार्यवाह रणजित साह यांच्याशी त्यांच्या कार्यालयामध्ये झाली होती. त्यांच्या खुर्चीच्या अगदी मागे आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि माधव सदाशिवराव गोळवलकर यांचे फोटो लावलेले होते.
आम्ही फोटोंकडे इशारा करत रणजित साह यांना विचारलं की, तुमचे आदर्श हेच आहेत का?, यावर रणजित साह यांनी उत्तर दिलं, "मी एक स्वयंसेवक आहे. यांच्याशिवाय आमचे आदर्श आणखी कोण असतील?"

फोटो स्रोत, Getty Images
बीरगंजचे उमेश यादव सांगतात की, लहानपणी ते बाल स्वयंसेवक होते आणि आता एचएसएसला समर्पित आहेत.
उमेश यादव सांगतात की, स्वयंसेवकांच्या तिसऱ्या वर्षाचं प्रशिक्षण संघाच्या नागपूर मुख्यालयात होतं. मग ते स्वयंसेवक आरएसएसचे असोत किंवा एचएसएसचे.
उमेश यादव यांना वाटतं की, स्वयंसेवक असल्यामुळे त्यांच्या आयुष्याला शिस्त आली आहे आणि देशभक्तीबद्दल तर ते अधिक जागरूक झाले आहेत.
रणजित साह सांगतात की, नेपाळमध्ये एचएसएसच्या एकूण 12 संघटना काम करतात. या संघटना नेपाळच्या सामाजिक-राजकीय जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत सक्रिय आहेत.
आरएसएस-एचएसएस
वॉल्टर अँडरसन हे अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात दक्षिण आशिया अभ्यासाचे प्राध्यापक होते. त्यांनी पत्रकार आणि लेखक श्रीधर डी. दामले यांच्यासोबत 'द आरएसएस, अ व्ह्यू टू द इनसाइड' हे पुस्तक लिहिलं आहे.
वॉल्टर आणि दामले यांनी आपल्या पुस्तकात परदेशातील आरएसएस या प्रकरणात लिहिलं आहे, "हिंदू स्वयंसेवक संघ म्हणजेच एचएसएस हा शब्द आरएसएसच्या परदेशातील शाखांसाठी वापरला जातो. एचएसएस जागतिक स्तरावर 'राष्ट्रीय' हा शब्द वापरत नाही, कारण हा शब्द त्यांना एका ठराविक भौगोलिक क्षेत्रापुरता मर्यादित करतो."
वॉल्टर आणि दामले यांनी लिहिलं आहे की, "एचएसएस सुमारे तीन डझन देशांत आहे. परदेशात मोदींचे जे मेळावे होतात, त्यांच्या यशात एचएसएसचा मोठा वाटा असतो.
"अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये मॅडिसन स्क्वेअर येथे 28 सप्टेंबर 2014 रोजी झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेतही आरएसएसची परदेशी शाखा एचएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते."

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी लिहिलं आहे, "प्रत्येक देशातील एचएसएस हे प्रशासकीय आणि कायदेशीर बाबतीत एकमेकांपासून आणि आरएसएसपासून स्वतंत्र आहेत. परंतु, अनेकदा आरएसएसचे पूर्णवेळ प्रचारकच त्यांचं काम पाहतात.
"परदेशात मोदींचे मेळावे आयोजित करण्यात भाजपशी जोडलेली 'ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ द बीजेपी' (ओएफबीजेपी) ही संस्था एचएसएससोबत काम करते."
वॉल्टर आणि दामले यांनी आपल्या पुस्तकात ओएफबीजेपीचे समन्वयक म्हणून काम पाहिलेले विजय चौथाईवाले यांचा उल्लेख करत लिहिलं आहे की, सभांमध्ये त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं, 'हुशार, उत्साही, भारत समर्थक आणि निस्वार्थी लोक' शोधून त्यांना स्थानिक एचएसएसमध्ये सहभागी करून घेणं.
आरएसएस आणि एचएसएस यांच्यात काय संबंध आहे? हा प्रश्न नेपाळमधील आरएसएसचे प्रचारक रवित कुमार यांना विचारला असता त्यांनी त्यांना यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही, असं सांगितलं.
याविषयी त्यांनी भारतात संपर्क साधण्याचा सल्ला दिला. भारतातील आरएसएसचे सह-प्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांना विचारलं असता, त्यांनीही या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला.
नेपाळमध्ये आरएसएस
पृथ्वी नारायण शाह यांना आधुनिक नेपाळचे निर्माते मानलं जातं. त्यांची विचारधारा आरएसएसच्या जवळची असल्याचं सांगितलं जातं.
नेपाळचे प्रसिद्ध लेखक सी. के. लाल म्हणतात, "पृथ्वी नारायण शाह यांचं मत होतं की, सैनिकांच्या बळावर युद्ध जिंकता येतं, परंतु विजय मिळाल्यानंतर नियंत्रण राखण्यासाठी विचारधारा आवश्यक असते.
पृथ्वी नारायण शाह नेपाळलाच खरा 'हिंदुस्थान' म्हणायचे, कारण ज्या भूमीला हिंदुस्थान म्हटलं जातं तिथं मुघल आणि नंतर इंग्रज आले, परंतु नेपाळ मात्र स्वतंत्र राहिला."
सी. के. लाल म्हणतात, "नेपाळचे राजे-महाराजे आपल्या धार्मिक वैधतेसाठी काशीला जात असत. पृथ्वी नारायण शाह यांनीही काशीमध्ये आपलं गोत्र बदललं होतं. पृथ्वी नारायण शाह यांना जनजाती म्हणजेच आदिवासी समाजातलं मानलं जातं, परंतु काशीमध्ये मराठी ब्राह्मणांनी त्यांना क्षत्रिय गोत्र दिलं होतं."
मराठी ब्राह्मण आणि नेपाळ यांच्यातील ऐतिहासिक संबंधांबद्दल सी. के. लाल म्हणतात, "1857 च्या बंडात नानासाहेब पेशवे कानपूरची लढाई पराभूत झाल्यानंतर हिंदू राष्ट्र मानत नेपाळला पोहोचले होते. 1925 मध्ये आरएसएसची स्थापना मराठी ब्राह्मणांनीच केली."

फोटो स्रोत, Getty Images/BBC
नेपाळमध्ये चंद्र शमशेर राणा यांच्या राजवटीचा काळ (1901-1929) आणि आरएसएस स्थापन होण्याचा काळ (1925) जवळपास एकाच काळातील होता. चंद्र शमशेर राणा यांच्या शासनकाळात मराठी ब्राह्मणांचे संबंध आणखी घट्ट झाले होते.
चंद्र शमशेर राणा यांच्या मुलींचे विवाह भारतात झाले आणि ही परंपरा पुढेही सुरू राहिली. ग्वाल्हेरच्या राजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयाराजे शिंदे या याच कुटुंबातील होत्या आणि त्यांचा थेट आरएसएसशी संबंध होता.
सी. के. लाल म्हणतात, "राजा महेंद्र यांचं आजोळही भारतातील होतं. ज्या काळात आरएसएससोबत कुणी संबंध ठेवायला तयार नव्हतं, त्या वेळी नेपाळच्या सत्तेशी आरएसएसची जवळीक होती. नेपाळमध्ये सुरुवातीपासूनच ब्राह्मणवाद मजबूत राहिला आहे. 1956 मध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांना पशुपती मंदिरात प्रवेश दिला गेला नव्हता."
1964 साली नेपाळचे राजा महेंद्र आरएसएसच्या निमंत्रणावर नागपूरला एका सभेला येणार होते. त्यांच्या या सभेमुळे त्या वेळचे भारतातील काँग्रेस सरकार अस्वस्थ झाले होते. तेव्हा आरएसएसची धुरा गोळवलकर यांच्या हाती होती आणि राजा महेंद्र भारतात येणार असल्याची घोषणा त्यांनीच केली होती.

फोटो स्रोत, Getty Images/BBC
राजा महेंद्र यांनी आरएसएसचं आमंत्रण मान्य करण्यापूर्वी भारत सरकारशी संपर्क साधला होता की नाही, हे स्पष्ट झालं नाही. अखेर हा दौरा रद्द झाला होता.
1960 च्या दशकात नेपाळमध्ये भारताचे राजदूत राहिलेले श्रीमन नारायण यांनी आपल्या 'इंडिया अँड नेपाळ: अॅन एक्सरसाइज इन ओपन डेमॉक्रसी' या पुस्तकात लिहिलं आहे, "राजा महेंद्र यांनी जेव्हा दिल्लीच्या काँग्रेस सरकारशी त्यांचे संबंध चांगले नव्हते त्यावेळी आरएसएसचं आमंत्रण त्यांनी स्वीकारलं होतं. दुसरीकडे, आरएसएस नेपाळच्या राजाला हिंदू सम्राट म्हणून पाहत होता."
2008 मध्ये नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आल्यानंतर पुष्पकमल दहल 'प्रचंड' पंतप्रधान झाले. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी काठमांडूच्या पशुपतीनाथ मंदिरात भारतीय पुजाऱ्यांऐवजी नेपाळी पुजारी नेमले होते.
पशुपती मंदिराचे मुख्य पुजारी महाबालेश्वर भट आणि इतर दोन पुजाऱ्यांनी प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील माओवादी सरकारच्या दबावाखाली राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच पशुपती मंदिरात नेपाळी पुजारी नेमण्यात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images/BBC
या निर्णयाच्या विरोधात एचएसएसच्या स्वयंसेवकांनी पशुपती मंदिराबाहेर आंदोलनही केलं होतं.
काठमांडूच्या पशुपतीनाथ मंदिरात परंपरेनं कर्नाटकातील भट्ट पुजारी होत आले आहेत. त्या वेळी एचएसएसचे अध्यक्ष उमेश खनाल यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'ला सांगितलं होतं की, "धार्मिक गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही. गरज पडली तर भगवान पशुपतीनाथाचं रक्षण करण्यासाठी आम्ही शस्त्रही उचलू शकतो."
हिंदू स्वयंसेवक संघाचे सध्याचे राष्ट्रीय संघचालक कल्याण कुमार तिम्सिना यांनी बीबीसीला सांगितलं की, "शतकानुशतके चालत आलेली परंपरा तोडण्याचा अधिकार कुणालाही नाही. आता सर्व काही ठीक झालं आहे. प्रचंडदेखील आता उज्जैनच्या महाकाल मंदिरात पूजा करण्यासाठी जात आहेत."
आरएसएसबाबत बी.पी. कोईराला यांची कडक भूमिका
नेपाळमध्ये काही राजकीय वर्गांमध्येही आरएसएसबाबत अस्वस्थता राहिली आहे. जेव्हा बी.पी कोईराला 1959 मध्ये नेपाळचे पहिले निवडून आलेले पंतप्रधान झाले, तेव्हा ही अस्वस्थता आणखी वाढली.
1960 साली नेपाळगंजमध्ये 'जातीय सलोखा बिघडवण्याच्या' आणि नेपाळच्या 'नव्या प्रदेशांना' (बाँके, बरदिया, कैलाली आणि कंचनपूर) पुन्हा भारतात समाविष्ट करण्याच्या कथित मोहिमेमुळे मोठा गोंधळ झाला होता.
1960 मध्ये नेपाळच्या संसदेत या घटनेबद्दल पंतप्रधान बी.पी, कोईराला यांना प्रश्न विचारला गेला.
बी.पी कोईरालांनी संसदेत सांगितलं, "नेपाळगंजमध्ये जातीय आणि मधेशी-विरुद्ध पहाडी भावना पसरवण्याच्या प्रकरणात पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होईल. 1857 च्या बंडानंतर नेपाळगंज नेपाळला मिळाले आणि हा प्रदेश भारतात असायला हवा, असा हे लोक प्रचार करत होते."

फोटो स्रोत, Getty Images/BBC
नेपाळचे इतिहासकार ग्रीष्मबहादूर देवकोटा यांनी लिहिलं आहे की," यानंतर पश्चिमांचलच्या डीआयजीनीं सांगितलं की, मागील दोन आठवड्यांपासून सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत स्थानिक युवक, विद्यार्थी आणि इतर लोकांना लाठ्या व तलवार देऊन भारतीय राष्ट्रध्वज आणि भगवा झेंड्यासह प्रशिक्षण दिलं जात होतं."
या प्रकरणी 'नारायण शिक्षा प्रसार योजना'चे संचालक श्रीदान बहादूर सिंह, नारायण इंटर कॉलेजचे मुख्याध्यापक श्यामलाल पांडे, नारायण इंटर कॉलेजचे शिक्षक खेमराज शाह (नेपाळी नागरिक) आणि 'हिंदुस्थान समाचार' एजन्सीचे प्रतिनिधी गया प्रसाद मिश्र (भारतीय) यांच्यासह सहा लोकांना अटक करण्यात आली होती.
नेपाळी मुत्सद्दी विजयकांत कर्ण काठमांडूमध्ये 'सेंटर फॉर सोशल इन्क्लूजन अँड फेडरलिझम' (सीईआयएसएफ) नावानं एक थिंक टँक चालवतात.
ते म्हणतात, "बी.पी. कोईराला हे नेहरू आणि लोहिया यांच्या विचारसरणीचे नेते होते. त्यांच्या राजकारणात धर्मनिरपेक्षतेवर कधीही आघात झाला नाही. ते हिंदुत्वाच्या राजकारणाबाबत आणि आरएसएसबाबत खूप कठोर होते.
"राजा महेंद्र यांनी 18 महिन्यांच्या कार्यकाळानंतर 1960 मध्ये कोईराला यांना पंतप्रधान पदावरून हटवून तुरुंगात टाकलं, याचं एक कारण हेही होतं की ते हिंदुत्वाच्या राजकारणाच्या विरोधात होते. बी.पी कोईराला तुरूंगात गेल्यानंतरच नेपाळ हिंदू राष्ट्र बनलं होतं."
नेहरूंची नाराजी
विशेष म्हणजे बी. पी. कोईराला हे 'भारत छोडो आंदोलन'मध्ये सहभागी झाले होते आणि त्यासाठी तुरुंगातही गेले होते. तर संघटना म्हणून आरएसएसने स्वतःला भारत छोडो आंदोलनापासून दूर ठेवलं होतं.
राजा महेंद्र यांनी बी.पी कोईराला यांना पंतप्रधान पदावरून हटवून तुरुंगात टाकलं तेव्हा भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नाराजी व्यक्त करत याला 'राजेशाही सत्तापालट' असं म्हटलं होतं.
नेपाळमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलेले रणजित राय म्हणतात की, नेहरूचा संताप पाहून राजा महेंद्र यांनी भारतात नेहरूविरोधी शक्तींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
रणजित राय यांनी त्यांचं पुस्तक 'काठमांडू डिलेमा: रिसेटिंग इंडिया-नेपाळ टाइज' मध्ये लिहिलं आहे की, "राजा महेंद्र यांनी हिंदू भावनांचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला होता."

फोटो स्रोत, Getty Images/BBC
"बी. पी. कोईराला यांच्यानंतर नेपाळमध्ये पक्षविरहित पंचायत व्यवस्था सुरू झाली. या व्यवस्थेत तुलसी गिरी पंतप्रधान झाले. तुलसी गिरी राजकीयदृष्ट्या कोईराला यांच्या विरुद्ध होते आणि ते आरएसएसचे सदस्यही होते. हाच तो काळ होता जेव्हा हिंदुत्वाच्या राजकारणाला वाढण्याची संधी मिळाली."
रणजित राय म्हणतात, "राजा महेंद्र यांचा उत्तराधिकारी वीरेंद्र यांना विश्व हिंदू महासंघाने जागतिक हिंदू सम्राट घोषित केलं. विश्व हिंदू महासंघाचा संबंध विश्व हिंदू परिषदेशी आहे. त्या वेळी व्हीएचपीचे नेते अशोक सिंघलही राजदरबारात ये-जा करत असत."
धर्म आणि राजकारणाचा विरोधाभास
1816 मध्ये सुगौली कराराद्वारे अँग्लो-नेपाळ युद्ध संपलं आणि ब्रिटिश कंपनीने नेपाळ-भारत यांच्यात आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित केली.
1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुद्ध बंड झालं, ज्याला पहिली स्वातंत्र्य लढाईही म्हटलं जातं. या परिस्थितीत कंपनी सरकारने नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान जंग बहादूर राणा यांना मदत मागितली. त्यानंतर राणा स्वतः सैनिकांसह इंग्रजांच्या बाजूने लढायला गेले आणि त्यांनी स्वतः या लढाईचं नेतृत्व केलं होतं.
दुसरीकडे, अवधचे शेवटचे नवाब वाजिद अली शाह यांच्या पत्नी बेगम हजरत महल 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध लढत होत्या. जंग बहादूर राणांच्या येण्यामुळे इंग्रजांना फायदा झाला आणि बेगम हजरत महल यांना नेपाळमध्ये आश्रय घ्यावा लागला. बेगम हजरत महल यांनी 1879 ला नेपाळमध्येच अखेरचा श्वास घेतला होता.
जंग बहादूर राणांच्या मदतीमुळे खूश होऊन ब्रिटिश सरकारने भारतातील चार शहरं नेपाळच्या ताब्यात दिली. ही चार शहरं होती, बाँके, बरदिया, कैलाली आणि कंचनपूर. या चार शहरांना नेपाळमध्ये 'नया मुल्क' किंवा 'नवा प्रदेश' असंही म्हणतात.
नेपाळमध्ये हिंदुत्वाची ताकद
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2018 मध्ये जनकपूरला आले होते. पंतप्रधान मोदी जनकपूरला येण्यापूर्वी आणि नंतर या शहरात अनेक बदल झाले.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जनकपूर उप-महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर लालकिशोर साह यांनी शहरातील अनेक भिंती भगव्या रंगात रंगवल्या होत्या. जनकपूर उप-महानगरपालिकेचे नाव बदलून 'जनकपूर धाम उप-महानगरपालिका' केलं गेलं होतं.
2014 मध्ये भारतात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नेपाळमध्ये हिंदुत्वाच्या राजकारणाला बळ मिळालं आहे, असं नेपाळमधील अनेक लोक मानतात.

फोटो स्रोत, BBC/Getty Images
दुसरीकडे, नेपाळमध्ये मुसलमानांविषयी वातावरण बदलत आहे, असंही अनेक लोक मानतात. बिहार आणि उत्तर प्रदेशशी लागून असलेल्या मधेस भागात दररोज जातीय तणाव पाहायला मिळत आहे.
याच वर्षी 12 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत जातीय संघर्ष झाला होता. अनेक दुकाने जाळण्यात आली होती. जातीय तणाव पाहता जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली होती. त्याआधी 2023 मध्ये रामनवमीच्या मिरवणुकीतही जातीय संघर्ष झाला होता.
नेपाळमध्ये अशा घटना यापूर्वी कधीच घडल्या नाहीत, असं मधेसमधील बीरगंज परिसरात राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे.
मधेस प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री लालबाबू राऊत म्हणतात, "भारत हा मोठा देश आहे, त्यामुळे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी येतात."
लालबाबू राऊत म्हणतात, "बिहारमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलींना मोफत सायकल देण्याची योजना सुरू झाली. ही योजना आम्हालाही चांगली वाटली, त्यामुळे आम्ही ती मधेसमध्येही सुरू केली. त्याचप्रमाणे, यूपी-बिहारमधील जातीय राजकारणाच्या झळाही मधेसपर्यंत येतात."

फोटो स्रोत, BBC/Getty Images
ज्योत्स्ना साऊद या विश्व हिंदू परिषदेशी संबंधित संघटना, विश्व हिंदू महासंघाच्या उपाध्यक्ष आहेत.
नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले याबाबत ज्योत्स्ना साऊद यांना विचारले असता त्या म्हणाल्या की,"आम्हाला नैतिक बळ मिळालं आहे. नरेंद्र मोदी हे हिंदुत्वाचे प्रेरणास्थान आहेत आणि आम्हालाही त्यांच्याकडून नैतिक धैर्य मिळालं आहे. आम्हा सर्वांची हीच इच्छा आहे की, नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र व्हावे."
लोकराज बराल हे भारतात नेपाळचे राजदूत राहिले आहेत. नेपाळच्या राजकारणावर आरएसएसचा प्रभाव वाढला असल्याचं बराल मानतात.
बराल म्हणतात, "भारतात भाजप 'भारत माता की जय'ची घोषणा करते. त्याचप्रमाणे नेपाळमध्ये 'नेपाल आमा को जय'चा प्रचार वाढला आहे. हा नारा इथल्या राजकीय परंपरेत नव्हता. गेल्या 10 वर्षांत अशा अनेक गोष्टी वाढल्या आहेत. नेपाळमध्ये हिंदुइझमला हिंदुत्वात रूपांतरित केलं जात आहे."
जावेदा खातून नेपाळच्या बरदिया जिल्यातील आहेत आणि त्या नेपाळी काँग्रेसच्या खासदार आहेत. भारतात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर "नेपाळच्या मधेस भागात जातीय सलोख्यावर थेट परिणाम झाला आहे," असं जावेदा खातून यांना वाटतं.

फोटो स्रोत, BBC/Getty Images
जावेदा खातून सांगतात, "इथं धार्मिक संघर्ष वाढला आहे. आम्ही तर माता जानकी आणि गौतम बुद्धांच्या भूमीतून आलो आहोत, जिथे द्वेषाला काहीच जागा नाही. पण आता परिस्थिती बदलत आहे. भारतात ज्या प्रकारच्या राजकारणाला बळ असतं, त्याचा थेट प्रभाव नेपाळवर पडतो."
कल्याणकुमार तिम्सिना हे नेपाळचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. आता ते नेपाळ हिंदू स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय संघचालक आहेत.
काही खासदारांचा आरोप आहे की, भारतात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नेपाळमध्ये जातीय सलोख्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. यावर कल्याण कुमार तिम्सिना म्हणतात, "नेपाळ हिंदू राष्ट्र होता तेव्हा जातीय सलोखा चांगला होता, असं त्यांना म्हणायचं आहे का? म्हणूनच आम्ही हिंदू राष्ट्राची मागणी करत आहोत. नरेंद्र मोदी येण्यापूर्वीही इथं हिंदुत्वाचं राजकारण सुरू होतं."
हिंदुत्व नेपाळला कुठे नेणार?
हिंदू अस्मितेचं राजकारण करणाऱ्या लोकांना वाटतं की, नेपाळमध्ये हा जनजागरणाचा काळ आहे, जिथे लोक आपलं हिंदू असणं मोकळेपणानं व्यक्त करत आहेत, आणि त्यांच्या मते ही चांगली गोष्ट आहे.
तसेच, नेपाळमध्ये हिंदुत्वाच्या राजकारणाला बळ मिळालं तर नेपाळची सार्वभौमिकता धोक्यात येईल, असं तिथे काही लोक मानतात.
नेपाळमध्ये राजशाहीचे समर्थक आणि हिंदुत्वाचं राजकारण करणारे लोक एकच आहेत, असं नेपाळचे माजी परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञवाली यांनी 2023 मध्ये बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं.
ते म्हणाले होते, "मला वाटतं की, नेपाळमध्ये हिंदुत्वाचं राजकारण मजबूत झालं तर ते नेपाळच्या सार्वभौमिकतेसाठी धोकादायक ठरेल."

नेपाळच्या मधेसमधील सरलाही येथील अपक्ष खासदार अमरेश सिंहही मानतात की, नेपाळमध्ये हिंदुत्वाचा प्रभाव वाढला तर नेपाळच्या सार्वभौमिक अस्तित्वाबाबत शंका वाढतील.
अमरेश सिंह म्हणतात, "जेव्हा दोन देशांचा राष्ट्रवाद एकसारखा होईल, तेव्हा सार्वभौमिकता नावाची गोष्टच शिल्लक राहणार नाही."
अमरेश सिंह आरोप करतात की, "माझं तिकिट कापलं गेलं, मुसलमान उमेदवारांचेही तिकिट कापले गेले. याचा परिणाम असा झाला की, नेपाळमध्ये एकही मुसलमान थेट निवडणूक जिंकून संसदेत पोहोचला नाही. जे मुसलमान खासदार आहेत, ते प्रमाणानुसार (समानुपातिक पद्धत) संसदेत आले आहेत."
अमरेश सिंह अपक्ष खासदार होण्यापूर्वी नेपाळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीत विजयी होत होते.
एचएसएसचे राष्ट्रीय संघचालक कल्याण कुमार तिम्सिना अमरेश सिंह यांचे आरोप फेटाळतात. कल्याण कुमार म्हणतात, "त्यांचं कामच आरोप करणं आहे, तर कोण काय करू शकतो?"
धार्मिक अस्मितेची वाढती मागणी
नेपाळमध्ये आता धार्मिक अस्मितेचं राजकारण जोर धरू लागलं आहे. मधेस प्रदेशचे माजी मुख्यमंत्री लालबाबू राऊत यांच्या नावावरून ते मुसलमान असल्याचा अंदाज बांधणं कठीण आहे.
राऊत म्हणतात, "माझं नाव लालबाबू राऊत आहे, माझ्या आईचं नाव राधिका, वडिलांचं नाव दशरथ राऊत आणि भावाचं नाव राम राऊत आहे. काही लोक राजकारणाला कुरूप करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारणात माझी धार्मिक ओळख आता अनिवार्य होत चालली आहे."
"पक्षाचे लोक माझ्या नावाआधी मोहम्मद जोडतात. मी माझ्या मुलाचं नाव दाऊद ठेवलं आहे. आता लोकांचा धार्मिक ओळखीबाबत आग्रह वाढला आहे."

फोटो स्रोत, Getty Images/BBC
नेपाळमध्ये लालबाबू राऊत आणि दशरथ राऊत यांची ती पिढी संपत आहे, जिथे नाव धर्माचं प्रतीक नव्हतं.
अनेक लोक मानतात की, नेपाळच्या राजकारणात धार्मिक ध्रुवीकरणाची फारशी शक्यता नाही, कारण इथे मुसलमान फक्त पाच ते सहा टक्केच आहेत. मुसलमानांच्या एकूण लोकसंख्येतील 97 टक्के भाग मधेसमध्येच येतो, जो बिहार आणि यूपीच्या काही भागांशी लागून आहे.
नेपाळचे भारतातील माजी राजदूत लोकराज बराल म्हणतात की, नेपाळमध्ये हिंदुत्वाचं राजकारण म्हणजे 'धार्मिक ध्रुवीकरण' नाही, हे राजकारण नेपाळच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारं ठरेल.
क्रेडिट्स:
कॅमेरा : संदीप यादव
इलस्ट्रेशन आणि डिझाइन : चेतन सिंह, वासिफ खान, पुनीत बरनाला
प्रोडक्शन : वासिफ खान
फोटो क्रेडिट : गेटी इमेज
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











