प्रियकराच्या साथीने केली पतीची हत्या? पोलिसांनी दिली 'ही' धक्कादायक माहिती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गरिकीपति उमाकांत
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
एका महिलेनं तिच्या जवळच्या मित्राच्या मदतीने पतीची हत्या केली आणि नंतर संपूर्ण रात्रभर पॉर्न व्हीडिओ पाहिले.
आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील या घटनेनं खळबळ उडाली आहे.
चिलुमुरु या ठिकाणी झालेल्या या हत्येची माहिती दुग्गीरालाचे एसआय वेंकट रवी यांनी बीबीसीला दिली आहे.
मृताचे नातेवाईक असलेले शिवकृष्ण आणि शिवरामकृष्ण तसेच या खुनाचा आरोप ज्या महिलेवर आहे, तिच्या आईशी बीबीसीने संवाद साधला आहे.
नेमकं प्रकरण काय?
चिलुमुरू येथील रहिवासी लोकम नागराजू (45) यांनी 2007 साली कृष्णा जिल्ह्यातील अट्टामुरु गावातील रहिवासी असलेल्या लक्ष्मी माधुरी यांच्याशी विवाह केला होता. त्यांना दोन मुलेही आहेत.
नागराजू हे पूर्वी खाजगी नोकरी करत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते कांद्याच्या व्यवसायात होते. माधुरी यांना मात्र हा कांद्याचा व्यवसाय आवडत नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images
"माधुरी काही वर्षांपूर्वी विजयवाडामधील एका चित्रपटगृहात आणि नंतर एका खाजगी शॉपमध्ये काम करत होत्या," असं मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं.
"या प्रक्रियेत, माधुरीची भेट सट्टेनपल्ली येथील गोपी नावाच्या माणसाशी झाली. माधुरीने तिच्या पतीला गोपीसोबत ट्रॅव्हलमध्ये काम करण्याचा आग्रह केला. गोपी हा हैदराबादमध्ये कार ट्रॅव्हलचा व्यवसाय चालवतो. माधुरीच्या पतीने त्याला होकार दिला आणि तो हैदराबादला गेला," असंही त्यांनी सांगितलं.
"हैदराबादमध्ये असतानाच, नागराजूला संशय आला की, गोपी त्यांच्या पत्नीला वारंवार भेटतो. त्यामुळं त्यांनी नोकरी सोडली आणि पुन्हा घरी आले. तिथंच राहून ते लहान दुकानांना वस्तू पुरवण्याचा व्यवसाय करू लागले. त्यावरून पती-पत्नीमध्ये मतभेद वाढत गेले," असं मृताच्या नातेवाईकांनी बीबीसीला सांगितलं.
पोलीस स्टेशनमध्ये झालं होतं समुपदेशन
माधुरीने तीन महिन्यांपूर्वी दुग्गीराला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पती नागराजू हा तिला त्रास देत असल्याचं तिनं सांगितलं होतं.
पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी दोघांना बोलावलं होतं आणि त्यांचं योग्य पद्धतीनं समुपदेशनही केलं होतं.
मात्र, मृत नागराजूच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, समुपदेशनानंतरही त्यांचे कायम वाद होत होते.

फोटो स्रोत, Getty Images
"माधुरीने तिचा जवळचा मित्र असलेल्या गोपीसोबत मिळून नागराजूची हत्या करण्याचा कट रचला. 18 जानेवारीच्या रात्री तिने बिर्याणीमध्ये 20 गोळ्या मिसळल्या आणि नागराजूला दिल्या. तिनं गोपीसह नशेत असलेल्या नागराजूची हत्या केली," असं एसआय वेंकट रवी यांनी बीबीसीला सांगितलं. त्यानंतर मृत नागराजूच्या वडिलांनी गांधी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
"नागराजूच्या मृत्यूची खात्री पटल्यानंतर, गोपी निघून गेला. पण, माधुरी पहाटे 4 वाजेपर्यंत तिच्या फोनवर पॉर्न व्हीडिओ पाहत राहिली. त्यानंतर तिने आजूबाजूच्या लोकांना उठवलं आणि तिच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे, असं सांगितलं," एसआयनं वेंकट रवी यांनी ही माहिती दिली.
"गावातील आमचे नातेवाईक नागराजूला भेटायला आले तेव्हा त्यांना संशय आला. कारण, त्याच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होतं. त्यामुळे, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली," असं नागराजू यांचे भाऊ शिवकृष्ण यांनी बीबीसीला सांगितलं.
पोस्टमॉर्टममध्ये काय आढळलं?
"पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, नागराजूच्या मृत्यूचं कारण हे छातीतील हाडं मोडणं आणि श्वास रोखणं हे असल्याचं उघड झालं."
"आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं आहे आणि त्याची चौकशी करत आहोत," असं एसआय रवी यांनी बीबीसीला सांगितलं.
'नवरा पोर्न दाखवायचा आणि मला त्रास द्यायचा'
पोलिसांच्या माहितीनुसार, माधुरीनं तपासात सांगितलं की, तिचा पती नागराजूनं तिला पॉर्न व्हीडिओ पाहण्याची सवय लावली होती.
मंगलागिरी ग्रामीण सीआय वेंकट ब्रह्मम यांनी बीबीसीला सांगितलं की, मृत नागराजूच्या वडिलांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, पोलिसांनी सांगितलं की आरोपीचे नातेवाईक हे माधुरीवरील आरोप नाकारत आहेत.
पोलिसांनी सांगितलं की, माधुरीच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार त्यांच्या मुलीची वास्तवापलीकडे जाऊन बरीच बदनामी केली जात आहे.
सीआय ब्रह्मम यांनी बीबीसीला सांगितलं की, पूर्ण चौकशी होईपर्यंत काहीही स्पष्ट करता येणार नाही.
आरोपी माधुरी यांना या हत्येमध्ये मदत करणाऱ्या गोपी यांची चौकशी केल्यानंतरचं पुरेशा गोष्टी स्पष्ट होतील, असं ते म्हणाले.
ते चुकीची माहिती पसरवत आहेत: माधुरीची आई
"माझ्या मुलीविरुद्ध ते अतिशय चुकीचा प्रचार करत आहेत," असं माधुरीच्या आईनं बीबीसीला सांगितलं.
"माझ्या मुलीमध्ये आणि जावयामध्ये मतभेद होते. ती अनेकदा माहेरी निघून यायची. पण तिच्या मुलांना तिकडे सासरी चुकीचं वागवलं जाईल वा त्यांच्यावर अन्याय होईल, असं म्हणत ती तिचा विचार बदलायची.
हा सगळा कलह मिटवण्यासाठी, तीन महिन्यांपूर्वी पंचायत बसली होती. आता काय झालंय, ते मला माहिती नाही, पण ते माझ्या मुलीविरोधात खूप चुकीचा प्रचार करत आहेत.
माझी मुलगी असं काहीही करणार नाही. ते पोलीस तपास होण्यापूर्वीच बरंच काही चुकीचं लिहित आहेत. हे खूप अन्याय्यकारक आहे. ते एका मुलीचा अपमान करत आहेत," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











