बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, स्कूल व्हॅनमधून परतताना चालकाने केले दुष्कृत्य

बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शाळेच्या व्हॅनमध्ये बस चालकानं या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून या बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
साधारणपणे वर्षभरापूर्वी शाळेतील लहान मुलींवर लैंगिक शोषण झाल्याच्या एका प्रकारानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली होती.
आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली असल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
पुन्हा एकदा हादरलं बदलापूर
बदलापूर पश्चिम परिसरामध्ये ही घटना घडली आहे. पीडित मुलगी एका खासगी शाळेत शिकते.
शाळेतून घरी परतत असताना स्कूल व्हॅनमध्ये या चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची ही घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूल व्हॅनमधून घरी परतली नव्हती. त्यामुळं तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली.
त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला.

फोटो स्रोत, Getty Images
चार वर्षांची ही चिमुकली व्हॅनमधून घरी परत येत असताना चालकाने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने चिमुकलीला मारहाण केल्याचीही माहिती आहे.
या घटनेबाबत समजताच संतप्त पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
सध्या या चिमुकलीची वैद्यकीय तपासणी सुरू आहे, तसेच आरोपीला आज (23 जानेवारी) न्यायालयात हजर केलं जाणार आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
रात्रीच्या सुमारास फॉरेन्सिक टीमनं व्हॅनची तपासणीही केली.
पोलिसांनी काय सांगितलं?
सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितलं की, "बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे. या घटनेतील आरोपी सध्या अटकेत आहे."
या पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी सुरू आहे, असंही ते म्हणाले.

पुढे सविस्तर घटना कशी घडली, याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितलं की, "फिर्यादीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना स्कूल व्हॅनमध्ये घडलेली आहे. ही स्कूल व्हॅन खासगी होती. मात्र, तिचा शाळेसोबत करार झालेला होता."
फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे, असं ते म्हणाले.
ही शाळा अधिकृत आहे की नाही, याविषयी पुढील तपास करत आहोत, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
वर्षभरापूर्वी घडली होती अशीच घटना
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका शाळेत शिकणाऱ्या दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण वर्षभरापूर्वी उघडकीस आलं होतं.
बदलापूरच्या या शाळेत 13 ऑगस्ट रोजी नर्सरीतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते.
या प्रकरणी शाळा व्यवस्थापन, स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याकडून अनेक ठिकाणी दिरंगाई झाल्याचंही समोर आलं होतं.

फोटो स्रोत, BBC/ Rahul Ransubhe
त्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाली होती. तेव्हा शहरातील शेकडो पालक आंदोलनासाठी उतरले होते.
आंदोलकांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी बदलापूर रेल्वे स्थानकावर निदर्शनं केली होती. या आंदोलनादरम्यान दगडफेक देखील झाली होती.
या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते.
त्यानंतर या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे 24 सप्टेंबर रोजी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला होता.
आरोपीनं आमची बंदूक हिसकावून आमच्यावर हल्ला केला. त्यामुळे आम्ही स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे.
हे संपूर्ण प्रकरण तुम्ही इथे वाचू शकता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











