You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज (12 डिसेंबर) सकाळी 6.30 वाजता निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. लातूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले चाकूरकर यांनी लातूरचे नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री असा राजकीय प्रवास केला होता.
चाकूरकर यांच्या परिवारातील विवाह सोहळ्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर हे खास दिल्लीवरून लातूरला आले होते.
मात्र लातूरला आल्यानंतर अचानक अशक्तपणा आल्याने चाकूरकर यांची प्रकृती खालावली. चाकूरकर यांच्यावर त्यांचे फॅमिली डॉक्टर चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानीच उपचार करत होते. डॉक्टरांची टीम देखील सोबत होती.
5 डिसेंबरपासून शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रकृती आणखी खालावली होती, अगदी अन्नपाणी देखील घ्यायला चाकूरकर यांनी नकार दिला होता.
अशा परिस्थितीत अगदी एअर रुग्णवाहिकेने शिवराज पाटील चाकूरकर यांना दिल्लीला हलवण्याची चाचपणीही केली होती.
मात्र स्थानिक डॉक्टरांनी अशा परिस्थितीमध्ये त्यांना दुसरीकडे शिफ्ट करणे योग्य नसल्याचा सल्ला दिला. त्यामुळे चाकूरकरांना हलवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला. शनिवारी (13 डिसेंबर) बोरवटी गावातील त्यांच्या शेतात 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
राजकीय प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, "शिवराज पाटील यांच्या निधनानं दुःख झालं. ते एक अनुभवी नेते होते. त्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनात आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले."
"समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. गेल्या काही वर्षांत मी त्यांच्याशी अनेकदा संवाद साधला. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हाही आम्ही चर्चा केली होती. या दुःखाच्या क्षणी माझ्या भावना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ओम शांती", अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे व्यक्तिमत्व - मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना आदरांजली वाहिली.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, "लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रात गृह, संरक्षण खात्याचे मंत्री, राज्यपाल अशा विविध भूमिकांमधून काम करताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडली. तसेच लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदेशी निगडित अनेक अभिनव उपक्रमांना चालना दिली."
"तत्वनिष्ठ, अभ्यासपूर्ण आणि ठामपणे मांडणी करणारे नेतृत्व म्हणून त्यांना देशाच्या राजकारणात आदराचे स्थान होते. त्यांच्या निधनामुळे राजकारण-समाजकारणातील उत्तुंग अशा मार्गदर्शक नेतृत्वाला आपण मुकलो आहोत. महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ते कायम स्मरणात राहतील," अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.
काँग्रेस पक्षाचं कधीही भरून न येणारं नुकसान - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुखद असल्याचं म्हटलं. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, "पूर्व केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. यामुळे पक्षाचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे. सार्वजनिक सेवेतील त्यांचं समर्पण आणि राष्ट्रासाठी त्यांचं योगदान नेहमीच लक्षात राहील."
"या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पाटील कुटुंब, त्यांचे हितचिंतक आणि समर्थकांसह संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या घडीला माझ्या संवेदना संपूर्ण पाटील कुटुंब, त्यांचे हितचिंतक आणि समर्थकांसोबत आहेत."
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही आपल्या संवेदना व्यक्त केल्या. एक्सवरील पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, "ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूप दुःख झालं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो."
"पाटीलजी यांनी संरक्षण मंत्रालयासह अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आणि अनेक दशकं जनतेची सेवा केली. त्यांचं निधन काँग्रेस कुटुंबाचं कधीही भरून न येणारं नुकसान आहे," अशी भावना प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली.
'सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्व गमावल' - उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना आदरांजली देताना म्हटलं, "शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला होता. साधेपणा आणि नैतिक मूल्यांचं ते प्रतीक होते."
"आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशी विविध पदे भूषवत असताना त्यांनी राजकारणातील नैतिकता कायम जपली."
"लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकसभेचं आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण, नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले. भारतीय संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील," अशा शब्दात अजित पवार यांनी चाकूरकर यांना आदरांजली अर्पण केली.
'पितृतुल्य मार्गदर्शक हरपला' - अशोकराव चव्हाण
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने पितृतुल्य मार्गदर्शक हरपल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी म्हटले.
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना ते म्हणाले, "देशाचे एक व्यासंगी व कणखर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. राष्ट्रीय राजकारणात ते महाराष्ट्राचा एक चेहरा होते. त्यांनी आयुष्यभर सार्वजनिक प्रश्नांना प्राधान्य दिले आणि देशसेवा केली."
"केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी अनेक दूरदर्शी धोरणे अवलंबली. त्या धोरणांचा प्रभाव व सकारात्मक परिणाम आजही दिसून येतो. राजकारण, समाजकारण व प्रशासनात त्यांनी दिलेले योगदान चिरंतर राहिल. शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन माझ्यासाठी मोठी वैयक्तिक हानी आहे. डॉ. शंकरराव चव्हाण व त्यांचे बंधुत्वाचे नाते होते. मागील अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबात आत्मियतेचे संबंध राहिले आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.
राजकीय कारकीर्द
शिवराज पाटील चाकूरकर यांची राजकीय कारकीर्द
नगराध्यक्ष लातूर - 1 ऑगस्ट 1966 ते 31 मार्च 1970.
आमदार लातूर - 1972 ते 1980.
विधानसभा उपाध्यक्ष - 5 जुलै 1977 ते 2 मार्च 1978.
विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र - 17 मार्च 1978 ते 6 डिसेंबर 1979.
लोकसभा सदस्य, लातूर - 1980 ते 2004
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री - 1980 ते 1982.
केंद्रीय वाणिज्य मंत्री - 1982 ते 1983.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री - 1983 ते 1984.
लोकसभा उपसभापती - 19 मार्च 1990 ते 13 मार्च 1991.
लोकसभा सभापती - 10 जुलै 1991 ते 22 मे 1996.
केंद्रीय गृहमंत्री - 22 मे 2004 ते 30 नोव्हेंबर 2008.
राज्यसभा सदस्य - 5 जुलै 2004 ते 22 जानेवारी 2010.
पंजाब राज्यपाल - 22 जानेवारी 2010 ते 21 जानेवारी 2015.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)