अमोल मुजुमदार : ज्यांना 'पुढचा तेंडुलकर' म्हटलं जायचं, पण 'टीम इंडिया'साठी खेळणं स्वप्नच राहिलं

भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना पायांना स्पर्श करून नमस्कार केला.

कारण भारतीय महिला संघाला या शिखरापर्यंत पोहोचवण्यात संघातील सदस्यांचा जेवढा मोठा वाटा आहे, तेवढंच त्याचं श्रेय संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनाही दिलं जात आहे.

सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या बळावर अमोल यांनी प्रदीर्घ काळ देशांतर्गत क्रिकेट गाजवलं.

पण भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती. पण महिला क्रिकेट संघाच्या माध्यमातून ते सध्या त्यांचं स्वप्न पूर्ण करत आहेत.

महिला विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर अमोल यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा लेख याठिकाणी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

मुंबई रणजी संघाचं प्रशिक्षकपद मिळालं तेव्हा हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता.

तर क्षमता, सातत्य आणि कर्तृत्व या तिन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध करूनही वेटिंग मोडवर राहिलेल्या अमोल मुजुमदारची ही गोष्ट.

प्रतिक्षेत गेली उमेदीची वर्षं

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या स्टार जोडगोळीचा शालेय क्रिकेटच्या काळापासून दबदबा होता.

त्यांचे एकत्र बॅटिंग करतानाचे असंख्य किस्से क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहेत. 1988 मध्ये या जोडीने हॅरिस शील्ड या मुंबईतल्या शालेय क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या विकेटसाठी 664 धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली.

सचिन तेव्हा शारदाश्रम शाळेसाठी खेळायचा.

या विक्रमी भागीदारीमुळे सचिन-विनोद ही नावं क्रिकेटच्या नभांगणात पहिल्यांदा झळाळून निघाली. एकेरी-दुहेरी धावा आणि चौकार-षटकार यांचा सुरेख मिलाफ मैदानावरल्या चाहत्यांना पाहायला मिळाला.

सचिन-विनोद जोडीने जवळपास दोन दिवस बॅटिंग केली. तेव्हा या दोघांच्याच वयाचा एक मुलगा पॅड घालून आपल्याला बॅटिंग कधी मिळणार, याची वाट पाहत बसला होता. त्याचं नाव अमोल मुजुमदार.

शालेय क्रिकेटमधल्या या ऐतिहासिक क्षणाचा अमोल साक्षीदार झाला, पण तेव्हापासूनच त्याच्या नशिबी प्रतीक्षा करणं चिकटलं.

"कृपया प्रतीक्षा करा", "रांगेचा फायदा सर्वांनाच", "समय से पहले और भाग्य से ज्यादा कुछ नहीं मिलता", "श्रद्धा सबुरी", अशी वाक्यं तुम्ही अनेकदा विविध ठिकाणी पाट्यांवर पाहिली असतील.

पण अमोलने कडवटपणा न बाळगता जवळपास वीसहून अधिक वर्षं नाऊमेद न होता व्रतस्थ योग्याप्रमाणे धावा करण्याचं काम केलं.

130 कोटी लोकसंख्या आणि खंडप्राय पसरलेला देश यामुळे एखाद्या संधीसाठी हजारोजण प्रतीक्षेत असणं स्वाभाविक. त्यामुळे अशा सूचना ओघानेच आल्या. परंतु सगळी उमेदीची वर्षं, अख्खी कारकीर्द संधीच्या प्रतीक्षेतच गेली तर...?

क्षमता आहे, प्रदर्शन दमदार आहे, दृष्टिकोन योग्य आहे, परंतु मोठ्या व्यासपीठासाठी विचारच झाला नाही. असं होऊ शकतं?

थक्क करणारी आकडेवारी

अमोल मुजुमदार यांच्या आकडेवारीवर एक नजर टाकलीत तर असं होऊ शकतं यावर तुमचा विश्वास बसेल - 171 फर्स्ट क्लास मॅचेस, 11,167 रन्स, अॅव्हरेज 48.13चा, 30 शतकं आणि 60 अर्धशतकं.

मुंबई संघाला भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हटलं जातं. मुख्य फलंदाज आणि नंतर कर्णधार म्हणून मुंबई संघाचा आधारवड म्हणून भूमिका. असं सगळा भारीभक्कम दस्ताऐवज नावावर असूनही अमोलच्या भाळी भारतीय संघाचा टिळा लागला नाही.

अमोल खेळत असताना टेस्ट आणि वनडे हे दोन फॉरमॅट प्रचलित होते. भारतासाठी 295 खेळाडू टेस्ट तर 227 खेळाडू वनडे खेळले आहेत.

या यादीत अनेक दिग्गज आहेत. मात्र त्याचवेळी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मॅचेस खेळलेले अनेक खेळाडू आहेत. मात्र या दोन्ही याद्यांमध्ये अमोलचं नाव आहे.

कोणत्या काळात जन्माला यायचं हे आपण ठरवत नाही. मात्र दिग्गजांच्याच कालखंडात अमोल जन्मला, त्याच काळात खेळला, स्वत:ला सिद्ध केलं. मात्र भारतीय संघात पदार्पणाचं टायमिंग निवडसमितीने आणि नशिबाने जुळवून आणलंच नाही.

क्रिकेटविश्वात द्रोणाचार्य म्हणून प्रसिद्ध रमाकांत आचरेकर सरांकडे अमोलने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली.

1993-94 मध्ये फरीदाबाद इथं अमोलने मुंबईसाठी पदार्पण केलं. पहिल्यात सामन्यात त्याने 260 धावांची खेळी केली. हा एका खेळीचा चमत्कार नव्हता, हे अमोलने पुढचे असंख्य हंगाम सिद्ध केलं.

'पुढचा तेंडुलकर' म्हटले जायचे

सचिन तेंडुलकर-राहुल द्रविड-VVS लक्ष्मण-सौरव गांगुली, भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ. सार्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर, आपल्या अभेद्य तंत्रशुद्धतेसाठी प्रसिद्ध राहुल द्रविड, नजाकतभऱ्या कलात्मक बॅटिंगने चाहत्यांची मने जिंकणारा लक्ष्मण आणि ठेवणीतला कव्हर ड्राईव्ह आणि पूलचा फटका लगावणारा डावखुरा सौरव गांगुली.

सचिनने 1980-90 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं. द्रविड आणि गांगुली यांनी 1996 मध्ये लॉर्ड्स इथं पदार्पण केलं. त्याच हंगामात लक्ष्मणने अहमदाबाद इथे कारकीर्दीचा श्रीगणेशा केला.

स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शनाच्या जोरावर या चौघांनी राष्ट्रीय संघात स्थान पटकावलं. प्रवेश केल्यानंतर या चौघांनी सातत्यपूर्ण प्रदर्शन केलं, त्यामुळे त्यांना वगळण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

1996 मध्ये इंग्लंड दौऱ्यापूर्वी सौरव गांगुलीने वेस्ट झोनविरुद्ध शतकी खेळी केली होती. इंग्लंडमध्ये अमोलनं द्विशतकी खेळी साकारली. मात्र निवडसमितीने गांगुलीच्या नावाला प्राधान्य दिलं आणि सौरवच्या रुपात पुढे काय घडलं हे सर्वश्रुत आहे.

या चौघांना समकालीन कालखंडात मुंबईकर प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी यांनी राष्ट्रीय संघात स्थान पटकावलं. दोघांनीही खणखणीत सुरुवात केली. मात्र क्षमतेनुरूप त्यांची कारकीर्द बहरलीच नाही.

सचिन, राहुल आणि सौरव या तिघांनी कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात कर्णधारपदाचा मुकूटही सांभाळला. चौघेही पदार्पणापासून कर्तृत्वाने मोठे होत गेले आणि कसोटी संघात 3-4-5-6 या जागांसाठी दुसऱ्या कुणाचा विचार करण्याची वेळ निवडसमितीवर आलीच नाही.

या काळात निवडसमितीने ओपर्नसच्या बाबतीत प्रयोग केले. अमोलकडे तंत्र होतं, स्थानिक क्रिकेटमध्ये धावा होत्या.

मधल्या फळीत खेळणाऱ्या खेळाडूला ओपनर करण्याचा प्रयोग वीरेंद्र सेहवागच्या बाबतीत केला गेला. तो यशस्वी झाला. मात्र अमोलच्या नशिबी ती संधीही नव्हती.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अमोलने अनेकदा मॅरेथॉन खेळी साकारल्या. अशा खेळींसाठी संयम आणि तंत्रशुद्धता लागते. अमोलने ती वेळोवेळी दाखवली. कदाचित यामुळे याचा फक्त लाँग फॉरमॅटसाठी विचार व्हावा असा ग्रह झाल्याची शक्यता आहे.

1993-94 ते 1999-2000 या कालावधीत अमोलचे आकडेवारी पाहून हा 'पुढचा तेंडुलकर' असं वर्णन केलं जायचं. तो धावा करत राहिला परंतु राष्ट्रीय संघाचं स्वप्न दूरच राहिलं.

ब्लू जर्सीची हुलकावणी

90च्या दशकातच भारतीय अ संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. सरावादरम्यान अमोलच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि तो मॅचेस खेळू शकला नाही.

सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अमोलकडे मुंबईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. विकेटची किंमत जपणाऱ्या अमोलने ही जबाबदारीही समर्थपणे सांभाळली. त्याच्या कारकीर्दीत मुंबईला अनेकदा जेतेपद मिळवून दिलं.

2007 नंतर अमोलच्या कामगिरीत घसरण झाली आणि एकाक्षणी मुंबई संघातून बाहेर होण्याची शक्यता निर्माण झाली.

मुंबई आणि क्रिकेट या दोन गोष्टी अमोलसाठी श्वासासारख्या होत्या. या दोन्हींचा त्याग करून त्याने आसामसाठी खेळण्याचा निर्णय घेतला.

फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या दिग्गजांमध्ये गणना होणारा अमोल आसामसाठी खेळताना दिसला. दोन हंगांमानंतर त्याने आंध्रकरता खेळण्याचा निर्णय घेतला.

अमोलच्या बॅटिंगइतकंच त्याच्या अनुभवाचा दोन्ही संघांना प्रचंड फायदा झाला.

2008मध्ये देशभरात IPLचे वारे वाहू लागले. त्यावेळी अमोल मुंबई संघाचा कर्णधार होता. नावंही ठाऊक नसलेल्या अनेक खेळाडूंना IPLची दारं उघडी झाली. मात्र आयपीएल संघांनी अमोलचं मूल्य जाणलं नाही.

त्यानंतरही त्याने धावा करण्याचा वसा सोडला नाही. वाढतं वय आणि ढासळणाऱ्या फॉर्मच्या पार्श्वभूमीवर अमोलने 25 सप्टेंबर 2014ला क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.

खेळाडू म्हणून निवृत्त झाला तरी अमोलचं क्रिकेटशी असलेलं सख्य कमी झालं नाही. भारताच्या U19 आणि U23 संघांना त्याचं मार्गदर्शन मिळालं. नेदरलँड्स संघाच्या प्रशिक्षणाचं काम तो पाहत होता.

IPL स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा बॅटिग कोच म्हणूनही त्यानं काम केलं. यादरम्यान अमोलनं समालोचनाचंही काम केलं.

मधल्या काळात भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजदरम्यान अमोल दक्षिण आफ्रिका संघाचा बॅटिंग कोच होता.

अमोल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही याचा बाऊ करत बसण्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेने त्याच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कर्तृत्वाचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं होतं.

संधी प्रत्येकाच्या नशिबी नसते. मनाचं खच्चीकरण होऊ न देता, तगडं प्रदर्शन आणि निकोप दृष्टिकोनासह संधीचा दरवाजा किलकिला होईल याची प्रतीक्षा करत राहणं अवघड आहे. व्यक्तिमत्त्वात कटूपणा येऊ न देता अमोलने क्रिकेटचा ध्यास जपला.

भारतीय संघात संधी मिळाली नाही म्हणून युवा क्रिकेटपटूंनी नाराजी जाहीर करण्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण अमोल असं कधीच वागला नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षं खेळूनही भारतीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंमध्ये राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर यांचं नाव घेतलं जातं. तसाच अमोल होता.

एकेकाळी भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या प्रशिक्षकपदाची धुराही अमोलनं सांभाळली होती.

आता देशाच्या महिला संघाला विश्वचषकाच्या फायनलपर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान देत अमोलनं त्याला हुलकावणी दिलेल्या ब्लू जर्सीला जगभरात मान मिळवून दिलाय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.