बुलाकी शाह : अर्ध्या लाहोरला कर्ज देणारा 'हा' सर्वात मोठा सावकार सर्व सोडून भारतात का आला?

लाहोरच्या गुमटी बाजारातील बुलाकी शाह यांची हवेली

फोटो स्रोत, Asif Butt

फोटो कॅप्शन, लाहोरच्या गुमटी बाजारातील बुलाकी शाह यांची हवेली
    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक

पाकिस्तानातील पंजाब प्रांताची राजधानी असलेल्या लाहोरच्या आतल्या भागात 'गुमटी बाजार' नावाचा परिसर आहे. 17 एप्रिल 1929 ला या गुमटी बाजारमध्ये एक हवेली बांधून पूर्ण झाली होती.

या इमारतीपर्यंत दिल्ली दरवाजाकडून देखील जाता येत असे. मात्र, लाहोरच्या इतक्या जुन्या परिसराचे निवासी असलेल्या आसिफ बट यांनी 19 व्या शतकात तयार झालेल्या तलावाकडून तिथे जाण्याचा निर्णय घेतला.

आसिफ बट यांनी या इमारतीवर असलेले इंग्रजी शब्द वाचण्यास सुरुवात केली: 'बी...त्यानंतर काही अक्षरं तुटलेली आहेत आणि मग के आहे आणि...'

मी स्वत: या इमारतीपर्यंत जाऊ शकलं नव्हतो. मात्र, फोनवर आसिफ बट यांच्या तोंडून ही अक्षरं ऐकून मी ते शब्द पूर्ण केले. त्यांनीदेखील तेच शब्द म्हटले, 'बुलाकी मल अँड सन बँकर्स, लाहोर.'

त्यांचं खरं नाव बुलाकी मल होतं. मात्र, इतिहासकारांच्या मते, ते बुलाकी शाह याच नावानं ओळखले जात असत.

त्या काळातील सर्वात मोठा सावकार

बुलाकी शाह त्यांच्या काळातील लाहोरमधील सर्वात मोठे सावकार होते. ते लोकांना व्याजानं पैसे देत असत. तिरखा त्यांच्या एका व्लॉगमध्ये सांगतात, "बुलाकी शाह यांच्या नोंदवह्यांमध्ये (रजिस्टर) मोठ-मोठ्या जमीनदारांचे अंगठे होते किंवा सह्या होत्या. ते कधीही कोणालाही निराश करत नसत."

"महिलांसाठी तिथे वेगळी जागा होती. तिथे महिलांना सन्मानानं आणि आदरानं बसवलं जात असे. त्यानंतर त्यांना त्यांची गरज किंवा काय काम आहे ते विचारलं जात असे. महिला तिथे येऊन सांगायच्या की, लग्न आहे किंवा एखादा कार्यक्रम आहे. जर कोणी कर्जाची रक्कम घेताना दागिना गहाण ठेवला तर लाला निर्धास्त होत असत."

इतिहासकार इश्तियाक अहमद यांनी 'द पंजाब ब्लडीड, पार्टीशन्ड अँड क्लींझ्ड' हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकात त्या काळच्या पंजाबमधील आर्थिक स्थितीचं वर्णन करताना इश्तियाक अहमद लिहितात, "समाजाच्या प्रत्येक घटकानं कोणत्या ना कोणत्या पातळीवर सावकाराकडून कर्ज घेतलेलं होतं. मात्र, मुस्लिमांना या आर्थिक फासाचा सर्वाधिक फटका बसायचा."

त्यांच्या मते, लाहोरच्या बुलाकी शाह हे या सर्वसामान्य सावकारी व्यवस्थेचं सर्वोत्तम उदाहरण मानले जायचे. त्यांच्यासमोर सर्वात बडे जमीनदारदेखील कर्जदार दिसायचे.

मुनीर अहमद मुनीर यांनी 'मिटता हुआ लाहौर' हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकात मोची दरवाजाचे रहिवासी असलेल्या हाफिज मेराजुद्दीन यांचा संदर्भ देत लिहिण्यात आलं आहे की, "तुम्ही जर 100 रुपये कर्जाऊ घेतले, तर बुलाकी शाह आधी तीन महिन्यांचं व्याज कापून घेईल, मग बुलाकी शाह व्याजावर पैसे देऊन आर्थिक नाड्या आवळायचा."

मुनीर अहमद मुनीर यांचं 'मिटता हुआ लाहौर' हे पुस्तक

फोटो स्रोत, Waqar Mustafa

फोटो कॅप्शन, मुनीर अहमद मुनीर यांचं 'मिटता हुआ लाहौर' हे पुस्तक
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दानीशवर अब्दुल्ला मलिक यांनी 'पुरानी महफ़िलें याद आ रही हैं' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, लाहोरचे सर्वात मोठे सावकार असलेल्या बुलाकी शाह यांच्याकडून बहुतांश मुस्लीम जमीनदार किंवा कनिष्ठ मध्यम वर्गातील पांढरपेशे लोक कर्ज घेत असत. इतकंच काय त्यांचं कुटुंबदेखील बुलाकी शाह यांचं कर्जदार होतं.

अब्दुला मलिक लिहितात, बुलाकी शाह यांच्या हवेलीची तर माझ्या आजोबांनादेखील भीती वाटायची. बुलाकी शाह यांची भीती माझ्या मनात बसली होती.

एक दिवस मी आजोबांचं बोट धरून गुमटी बाजारातून जात होतो. माझं लक्ष खाली रस्त्यावर होतं. अचानक आजोबांनी थांबून सांगितलं, "बाळा, बुलाकी शाहना सलाम कर."

"बुलाकी शाहचं नाव ऐकताच मी घाबरलो. त्यांच्याकडे पाहिलं, मात्र मनात इतकी प्रचंड भीती आणि दहशत होती की उभं असतानाच लघवी झाली. ते पाहून बुलाकी शाह यांनी थोडंसं स्मित केलं आणि मला दीर्घायुष्याचा आशिर्वाद देऊन पुढे निघून गेले."

हाफिज मेराजुद्दीन यांचं म्हणणं होतं की मोठ-मोठाल्या धनिकांच्या जमिनी बुलाकी शाह यांच्याकडे गहाण ठेवलेल्या होत्या.

'मिटता हुआ लाहौर' या पुस्तकात राजकारणी आणि वकील सैय्यद अहमद सईद करमानी यांचा संदर्भ देऊन लिहिण्यात आलं आहे की मियां मुमताज दौलताना यांचे वडील खान बहादूर अहमद यार दौलताना यांनीदेखील बुलाकी शाह यांच्याकडून कर्ज घेतलं होतं.

आजारी पडल्यावर केली अनेकांची कर्जे माफ

'द पाकिस्तान रिव्ह्यू' या इंग्रजी भाषेतील एका मासिकाच्या 1971 च्या एका अंकात एका लेखकानं लिहिलं होतं की "1920 च्या दशकाच्या मध्यात माझे आजोबा हाजी अहमद बख्श यांनी (लाहोरमधील) त्यांची 65 कनाल (जवळपास 8.125 एकर) जमीन विकण्याचा निर्णय घेतला."

"माझे आजोबा फारसी कवी होते आणि अल्लामा मोहम्मद इकबाल यांचे मित्र होते. 20,000 रुपयांसाठी ही जमीन लाहोरचे सर्वात मोठे सावकार बुलाकी शाह यांच्याकडे गहाण ठेवण्यात आली होती."

त्यांनी पुढे लिहिलं आहे, "माझ्या कुटुंबाची ढासळती आर्थिक स्थिती पाहून चिंताग्रस्त झालेल्या अल्लामा इकबाल यांनी माझ्या आजोबांना ती जमीन विकण्यास जोरदार विरोध केला."

ते म्हणाले की "कोणत्याही प्रकारे जमीन सांभाळा. तुम्ही दागिने विकून किंवा तुमची काही घरं विकून बुलाकी शाह यांचं कर्ज फेडणं योग्य ठरेल. काळानुरुप तुमची मुलं कुटुंबाची ढासळलेली आर्थिक स्थिती सावरतील. मात्र, दुर्दैवानं माझ्या आजोबांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही."

फोटो जर्नलिस्ट एफ. ई. चौधरी यांनी 2013 मध्ये वयाच्या 104 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 'अब वह लाहौर कहाँ?' या मथळ्यानं त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत छापून आली होती.

या मुलाखतीत त्यांनी पत्रकार मुनीर अहमद मुनीर यांना सांगितलं होतं की "लाहोरच्या अर्ध्या मुस्लिमांनी बुलाकी शाहकडून कर्ज घेतलेलं होतं. बुलाकी शाह मोठ्या लोकांना मोठाली कर्ज देत असत. मोठाल्या जमीनदारांच्या, अमीर उमरावांच्या हवेल्या बुलाकी शाह यांच्याकडे गहाण ठेवलेल्या होत्या."

एफ. ई. चौधरी यांनी मुलाखतीत सांगितलं की, बुलाकी शाह यांची मुलं सेंट अँथनी शाळेत शिकत होते.

अर्थात मेराजुद्दीन यांचं म्हणणं आहे की, बुलाकी शाह अनेक संस्थांचे प्रमुखदेखील होते. पीटर ओबॉर्न यांनी वुंडेड टायगर, 'ए हिस्ट्री ऑफ क्रिकेट इन पाकिस्तान' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, बुलाकी शाह क्रिसेंट क्रिकेट क्लबच्या सर्वात मोठ्या पाठिराख्यांपैकी एक होते.

"लाहोरच्या मोची दरवाजाच्या क्रिकेट प्रेमी रहिवाशांनी हा क्लब बनवला होता. लाला अमरनाथ या क्लबच्या सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक होते."

एफ. ई. चौधरी सांगतात की, एकदा बुलाकी शाह आजारी पडले. त्यांच्याकडून कर्ज घेतलेली मंडळी त्यांची विचारपूस करायला आली.

"शाह जी तब्येत कशी आहे?"

"ते उत्तर द्यायचे की माझा श्वास कधी थांबेल हे सांगता येत नाही."

"अरे मुनीम, इकडे ये, सांग चौधरी साहेबांचे किती पैसे यायचे आहेत?"

"ते कागदपत्रं पाहायचे आणि सांगायचे की त्यांनी त्या वर्षी 200 रुपये घेतले होते."

"अरे, ही रक्कम काढून टाक, ते माझी चौकशी करायला आले आहेत."

"दुसरा देणेकरी आला, तर त्यांनी विचारलं, अरे याचे किती पैसे बाकी आहेत?"

"साहेब, दोन हजार आहेत."

"काढून टाक, मी खूप व्याज कमावलं आहे."

चौधरी सांगतात की, पाहता-पाहता सर्वजण बुलाकी शाह यांची विचारपूस करायला येऊ लागले. लाखो रुपयांचं कर्ज घेतलेले लोकदेखील आले. "शाह जी तुम्ही आजारी असल्याचं कळालं."

"हो, देवाची इच्छा."

"पंधरा-वीस मिनिटं झाली, अर्धा तास झाला, ते म्हणाले नाहीत की याचा हिशोब बघ आणि तो काढून टाक."

"मग बुलाकी शाह स्वत:च म्हणायचे: ठीक आहे, आता तुम्ही जाऊन आराम करा, तुम्ही भेटायला आलात त्याबद्दल धन्यवाद"

"त्या दिवशी ही गोष्ट प्रसिद्ध झाली की बुलाकी शाहनं छोट्या देणेकऱ्यांची कर्ज माफ केली, मात्र मोठ्यांची माफ केली नाहीत."

कर्जाची काही प्रकरणं न्यायालयातदेखील गेली

बुलाकी शाह त्यांच्याकडून कर्ज घेतलेल्या काही देणेकऱ्यांबरोबरचा वाद न्यायालयातदेखील घेऊन गेले. या खटल्यांमधून समोर येतं की त्यांच्याकडून फक्त मुस्लीमच कर्ज घेत नव्हते.

ऑक्टोबर 1901 च्या 'सिव्हिल जजमेंट्स' नावाच्या एका कागदपत्रात खटला क्रमांक 96 बद्दलची माहिती मिळते.

त्यातून समोर येतं की 19 व्या शतकाच्या शेवटच्या वर्षांमध्ये बुलाकी शाह यांनी टी जी एकर्स या रेल्वेच्या एक युरोपियन अधिकाऱ्याला दरमहा तीन टक्के व्याजानं दीड हजार रुपयांचं कर्ज दिलं होतं.

एकर्सनं काही व्याजाची परतफेड नक्की केली. मात्र मूळ भांडवलाची वेळेवर परतफेड करू शकले नाहीत. हा वाद न्यायालयात गेल्यावर कनिष्ठ न्यायालयानं म्हटलं की इतकं जास्त व्याज घेणं योग्य नाही.

मग हे प्रकरण लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हॅरिस यांच्यासमोर सुनावणीला गेलं. त्यावेळेस ते म्हणाले की एकर्सनं कर्जासाठीचा करार स्वत:च लिहिला होता. तो कोणाच्या दबावाखाली लिहिल्याचा किंवा फसवणूक झाल्याचा कोणताही पुरावा नाही.

अशाप्रकारे बुलाकी मल यांची अपील मंजूर करण्यात आली. न्यायालयानं त्यांच्या बाजूनं निकाल देताना संपूर्ण रक्कम म्हणजे 2065 रुपयांची परतफेड करण्याचा आदेश दिला.

'ऑल इंडिया रिपोर्टर' हा ब्रिटिश काळातील खटल्यांचा दस्तावेज आहे. यातून 2 फेब्रुवारी 1914 ला मुख्य न्यायाधीश केंसिंग्टन आणि न्यायाधीश शाह दीन यांच्यासमोर सुनावणीला आलेल्या एका खटल्याबद्दलदेखील माहिती मिळते.

बुलाकी शाहनं कर्जाच्या अटीनुसार, दोन वर्षे व्याज न मिळाल्यास डूनी चंद यांनी गहाण ठेवलेली मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उच्च न्यायालयानं असा कब्जा घेण्यास बेकायदेशीर ठरवलं होतं.

फोटो जर्नलिस्ट एफ ई चौधरी यांनी 'अब वह लाहौर कहाँ? या मथळ्यानं छापलेल्या त्यांच्या प्रदीर्घ मुलाखतीत पत्रकार मुनीर अहमद मुनीर यांना सांगितलं की लाहोरच्या निम्म्या मुस्लिमांनी बुलाकी शाह यांच्याकडून कर्ज घेतलं होतं

फोटो स्रोत, Waqar Mustafa

फोटो कॅप्शन, फोटो जर्नलिस्ट एफ ई चौधरी यांनी 'अब वह लाहौर कहाँ? या मथळ्यानं छापलेल्या त्यांच्या प्रदीर्घ मुलाखतीत पत्रकार मुनीर अहमद मुनीर यांना सांगितलं की लाहोरच्या निम्म्या मुस्लिमांनी बुलाकी शाह यांच्याकडून कर्ज घेतलं होतं

बुलाकी शाह यांना लाहोरचा सर्वात मोठा सावकार मानलं जातं. पत्रकार मजीद शेख यांनी एका लेखात लिहिलं होतं, "एका अत्यंत सन्माननीय वडीलधाऱ्यानं मला सांगितलं की एकदा बुलाकी शाह यांना कळालं की त्यांचा मुलगा अनेकदा टबी बाजारात (नर्तकींच्या कोठ्या) जात असतो. ते ऐकून एका रात्री तेदेखील तिथे गेले आणि मुलासमोर बसले."

"त्यांचा मुलगा नर्तकींवर जितकी रक्कम उडवत होता, त्याच्या दुप्पट नजराणा बुलाकी शाह देत होते. शेवटी बाप-बेटे रिकाम्या हातानं घरी परतले."

"त्यानंतर बुलाकी शाह यांच्या मुलाच्या लक्षात आलं की त्या नर्तकींच्या बाजारात त्यांची कोणालाच कदर नव्हती. त्या फक्त त्यांच्या पैशांसाठी त्यांचे नखरे सहन करतात. मग त्यानं तिथे जाणं बंद केलं."

"त्यामुळे टबी गल्लीतील लोकांचं इतकं नुकसान झालं की त्यांचं एक शिष्टमंडळ बुलाकी शाह यांच्याकडे आलं. त्या रात्री या बापबेट्यांनी उडवलेली सर्व रक्कम त्यांनी बुलाकी शाह यांच्यासमोर ठेवली आणि विनंती केली त्यांनी त्यांच्या मुलाला टबी गल्लीत येण्याची परवानगी द्यावी."

"बुलाकी शाह यांनी ती रक्कम परत घेतली आणि त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं."

शेक लिहितात, "मला आठवतं की माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की (पाकिस्तानची निर्मिती होण्याआधी) बुलाकी शाह यांचे नातू 'लाटो शाह' किंवा राम प्रकाश त्यांच्या वर्गात होते आणि कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये होते."

"नंतर पत्रकार झालेले मजहर अली आणि लाटो शाह हे दोघेच असे विद्यार्थी होते जे स्वत:च्या कारमधून कॉलेजात जायचे. लाटो फक्त रेशमी कपडे घालायचे आणि मजहर अली खान खादीचे कपडे घालायचे."

असद सलीम शेख यांनी 'ठंडी सड़क: माल रोड लाहौर का ऐतिहासिक, सांस्कृतिक और साहित्यिक दृश्य' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की पाकिस्तानची निर्मिती होण्याआधी मस्जिद-ए-शहदाच्या समोर सध्याच्या सादिक प्लाझाच्या कोपऱ्यावर 'टोबॅकोइस्ट' नावाचं दुकान होतं.

"याचे मालक बुलाकी शाहचे नातू होते. त्या दुकानात सर्वप्रकारची तंबाखू मिळायची."

बुलाकी शाहच्या कुटुंबाला सोडावं लागलं लाहोर

फाळणीच्या वेळेस बुलाकी शाह यांच्या कुटुंबाला लाहोर सोडावं लागलं. इतिहासकारांच्या मते, फाळणीच्या वेळेस झालेल्या दंगलींमध्ये कर्जाची रक्कम लिहिलेल्या नोंदवह्यांची पानं लाहोरच्या गटारांमध्ये फाटलेल्या अवस्थेत सापडली.

मजीद शेख यांनी लिहिलं की भारतात आल्यावर बुलाकी शाह यांनी त्यांच्या नोंदवह्या, रजिस्टर फाटून टाकले. ते म्हणाले की मी सर्वांचं कर्ज माफ करतो.

फकीर सैयद इजाजुद्दीन यांनी 'द बार्क ऑफ अ पेन: अ मेमरी ऑफ आर्टिकल्स अँड स्पीचेज' हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकात इजाजुद्दीन लिहितात, त्यांच्याकडून ज्या जमीनदारांनी कर्ज घेतलं होतं. त्यापैकी जवळपास सर्वच जमीनदारांनी बुलाकी शाह यांच्याकडे जमीन गहाण ठेवल्या होत्या.

1947 मध्ये बुलाकी शाह यांना त्यांची मौल्यवान रजिस्टर घेऊन भारतात यावं लागलं. मात्र, त्याची गॅरंटी म्हणजे कर्जापोटी लोकांनी गहाण ठेवलेल्या मालमत्ता पाकिस्तानातच राहिल्या.

सना महरा, देहरादूनमध्ये राहतात. त्यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्या सोशल मीडियावर दावा करतात की, बुलाकी शाह त्यांचे पणजोबा होते.

"त्यांची शेवटची वारस (माझी आजी, श्रीमती विजय लक्ष्मी महरा) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. लग्नाआधी त्यांचं नाव रामा कुमारी होतं. त्या नेहमी गुमटी बाजार, व्हिक्टोरिया स्कूल/आजोळची हवेली आणि इतर आठवणींचा उल्लेख करायच्या."

बुलाकी शाह

फोटो स्रोत, Waqar Mustafa

"आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्येही त्यांची इच्छा होती की लाहोरला जावं. मात्र दुर्दैवानं ते शक्य झालं नाही."

1929 मध्ये लाहोरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्याचवर्षी गुमटी बाजारात बुलाकी शाह यांची चार मजली हवेली बांधून पूर्ण झाली होती.

मुस्तसिर हुसैन तार्ड यांनी 'लाहौर आवारगी' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी या हवेलीचं कौतुक पुढील शब्दात केलं आहे.

'बुलाकी शाह यांचं घर एक अद्भूत वास्तू होती. त्याला सिमेंटच्या लता, फुलदाण्या, कमानीच्या बाल्कनी आणि लोखंडी जाळ्यांनी सजवण्यात आलं होतं. त्याच्या बाल्कनींना आधार देणारे खांब नाजूक आणि सुंदर होते. प्रवेशद्वाराचं सौंदर्य तर मनाला मोहून टाकायचं.'

काही दिवसांपूर्वी आसिफ बट यांनी ही इमारत पाहिली. त्यांनी सांगितलं की तिथे आता बूट तयार होतात. खाली चार दुकानं आहेत, तिथे चामड्याच्या वस्तू, बूट इत्यादींचा व्यापार चालतो. एक रंगांचं आणि केमिकलचं दुकान आहे.

त्यांचं म्हणणं आहे की, लाहोरच्या ज्या गुमटी बाजारात ही जीर्ण झालेली इमारत आहे, तिथल्या बहुतांश लोकांना बुलाकी शाहांबद्दल माहिती नाही.

बुलाकी शाह कोण, तर तीच व्यक्ती जिच्याकडून निम्म्या लाहोरनं कर्ज घेतलं होतं, त्यालाच तिथं कोणी ओळखत नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)