'इक्कीस' युद्धपटच, तरीही इतकी चर्चा का?

    • Author, अक्षय शेलार
    • Role, बीबीसी मराठीसाठी

प्रा. भास्कर चंदनशिव यांची एक कथा आहे. 'लाल चिखल' असं तिचं नाव. एका शेतकऱ्याच्या मुलाच्या दृष्टिकोनातून (सिनेमाच्या भाषेत सांगायचं, तर 'पॉइंट ऑफ व्ह्यू'मधून) ही कथा उलगडते.

बाजाराच्या दिवशी धडाधड कोसळत जाणारा शेतमालाचा भाव, त्या (बहुदा त्रिकोणी) कुटुंबाची घालमेल आणि ओढाताण, लहान मुलाचं विश्व, बापाच्या मनातील चीड, शेतकऱ्याची अवहेलना आणि शीर्षकातच ढळढळीत दिसणारा (टमाट्यांचा) लाल चिखल याविषयीची ही कथा.

या कथेचं यश असं की, काय घडणार आहे, कथा कुठे जाणार आहे हे माहीत असूनही त्यातला वास्तववाद आणि त्याची प्रवाही सहजता वाचणाऱ्याला खिळवून ठेवते. कथा वाचताना जीवाची तगमग होते. लेखकाने चितारलेलं शब्दचित्र अक्षरशः अंगावर येतं.

कुणी मला विचारलं की, श्रीराम राघवन या दिग्दर्शकाचा 'इक्कीस' हा ताजा सिनेमा कसा आहे, तर मी म्हणेन, "तो भास्कर चंदनशिवांच्या 'लाल चिखला'सारखा आहे. सूचक, तरीही थेट; आणि उरात प्रचंड करुणा असलेला."

डग स्टॅनहोप या विचारवंत-कॉमेडियनचे एक आवडते वाक्य आहे, तो म्हणतो, "Nationalism does nothing but teach you to hate people you never met, and to take pride in accomplishments you had no part in." ("राष्ट्रवाद तुम्हाला तुम्ही कधीही न भेटलेल्या लोकांचा द्वेष करायला शिकवतो आणि ज्या यशात तुमचा काहीही वाटा नाही त्याचा अभिमान बाळगायला लावतो.")

स्टॅनहोप म्हणतो ते लक्षात घेतल्यास (विखारी) राष्ट्रवादाच्या पलीकडे जात मानवतावादी दृष्टिकोनापर्यंत पोचता येऊ शकतं. भारतात बनलेले दोन (हिंदी) सिनेमे असे करण्यात यशस्वी होतात. पहिला म्हणजे मेघना गुलजारचा 'राज़ी' (2018) आणि दुसरा म्हणजे राघवनचा 'इक्कीस'.

राघवन आणि त्याचे सहपटकथाकार अरिजित बिस्वास आणि पूजा लधा सूरती हे तिघे फारच चतुर पद्धतीने 'इक्कीस' रचतात.

हा सिनेमा मुख्यतः 1970-71 आणि 2001 या दोन काळांमध्ये घडतो. एकीकडे लेफ्टनंट अरुण खेतरपालचे (अगस्त्य नंदा) उमेदीच्या काळातील आयुष्य दिसते, तर दुसरीकडे त्याचे वडील ब्रिगेडियर एमएल खेतरपाल पाकिस्तानमधील त्यांच्या शाळेतील स्नेहसंमेलनासाठी तिथे पोचतात तेव्हाच्या घटना दिसतात.

ही रचना मूलतःच फार रोचक आहे. कारण, एकीकडे आपल्याला 'कमिंग-ऑफ-एज' प्रकारातील घडामोडी पाहायला मिळतात. वयाच्या विशीतला, अवघं आयुष्य पुढे असणारा तरुण अरुण. तो प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. 'Arrogance has to be earned,' असं म्हटलं जातं. तर, 1970-71च्या कालावधीत अरुण अक्षरशः असा अहंकार (आणि सर्वांचा आदरदेखील) कमावताना दिसतो.

सैनिकांना आपण जवान म्हणतो. दाते शब्दकोशानुसार या जवान शब्दाचे काही अर्थ सांगतो: तरुण, सोबती, शूर नि पराक्रमी, दिलदार. युद्धपूर्व काळ आणि युद्धाचा काळ, या दोहोंदरम्यान आपल्याला अरुण खेतरपालची ही सारी रूपं पाहायला मिळतात.

त्यात युद्धाचं, किंबहुना खरंतर युद्धामध्ये पराक्रम गाजवण्याचं आकर्षण आहे. त्यात जवानीचा जोश आणि लैंगिक आकर्षण आहे. काहीतरी करून दाखवण्याची खुमखुमी आहे, परंतु सामान्य हिंदी चित्रपटांचा (वाचा: युद्धपटांचा) भाबडेपणा आणि अतिरेकी क्रौर्य अजिबातच नाही. कारण, इथले दोन्ही नायक संवेदनशील आहेत.

2001 च्या टाइमलाइनमध्ये आधीच्या घटनांमधील तरुण रक्ताच्या उत्साहाला लाजवेल असा धर्मेंद्रच्या व्यक्तिरेखेचा वावर आहे. परंतु, वयोपरत्वे येणारी समजही त्यात आहे. त्यामुळेच पाकिस्तान हा देश, तिथले आजी-माजी सैनिक किंवा तिथले सामान्य लोक, तिथली माती-तिथल्या जागा या केवळ 'दुश्मन मुल्क, दुश्मन लोग, दुश्मनों कि सरजमीं' म्हणून समोर येत नाहीत.

विशाल भारद्वाजने लिहिलेल्या नि मेघना गुलजारने दिग्दर्शित केलेल्या 'राज़ी'सारखा समंजस, प्रौढ दृष्टिकोन यात आहे. बाळबोध अतिराष्ट्रवाद किंवा फाजिल देशाभिमान (जिन्गोइझम्) यात नाही. कारण, इथली माणसं अवघ्या पाऊण शतकापूर्वी त्या तिथे पलीकडे राहत होती! यांच्या 'पुश्तैनी' घरांनी माणसामाणसांत भेद न करता अनोळखी हिंदू-मुस्लिमांचे वंश वाढताना पाहिले.

तिथल्या झाडांनी आपलं बीज कुणी रुजवलं असेल याचा विचार न करता साऱ्यांना समान पद्धतीने सावली दिली. तिथल्या मातीने मुस्लिमांचीही पिकं उगवलीच की! लॉर्ड माऊंटबॅटनच्या अखत्यारीत मातीवर मारल्या गेलेल्या रेघोट्यांच्या दोन्ही बाजूला माणसंच राहतात, हे समजून घेण्यासाठी नितळ आकलन लागते.

राघवन आणि त्याच्या चमूचं हे आकलन धर्मेंद्र या देखण्या पंजाबी (चिर)तरुणाच्या रुपात आणि त्याच्यासोबतच्या पाकिस्तानी ब्रिगेडियर निसारच्या (जयदीप अहलावत) अस्तित्त्वातून सहज आकारास येते. या साऱ्यामुळे चित्रपटात फारच नितळ मानवतावाद दिसतो.

सिनेमाचा आशय आणि कथा बऱ्याच अर्थी पुरुषांच्या जगाविषयी आहे. बाप नि मुलगा, तारुण्य व वार्धक्य या मार्गाने पुढे जात तो पुरुषांच्या मनातल्या आणि जगण्यातल्या गोष्टी मांडत राहतो. पण, म्हणून यातल्या स्त्रिया टू-डिमेन्शनल (द्विमितीय) आहेत, असं घडत नाही.

उलट, त्या सजग आणि बोलक्या प्रेक्षक आहेत. जसे की, निसारची पत्नी मरियम (एकावली खन्ना), त्याची मुलगी सबा (अवनी राय) आणि अरुणची प्रेयसी किरन (सिमर भाटिया). त्यांच्यामुळे पुरुषांचं जगणं अधिक बहारदार तर होतंच.

पण, सोबतच सिनेमातल्या या स्त्रिया आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणं पुरुषांकरिता फार सोपं बनवून टाकतात. त्यामुळे त्यांच्या ढोबळ (भासणाऱ्या, परंतु प्रत्यक्षात तशा नसणाऱ्या) हजेरीऐवजी त्यांचा सूचक वावरच अधिक ठळकपणे लक्षात राहतो.

सिनेमा शिकवताना कॅमेऱ्याला आपला डोळा समजा, त्याला आपल्या शरीराचेच एक एक्स्टेन्शन माना, असे आम्ही शिकवत असतो. त्यामुळे चांगला चित्रपटकर्ता आपल्याला त्याचा हा 'तिसरा डोळा' थोडावेळ उसणा देत असतो. त्यामुळेच चांगला सिनेमा इतका आपलासा वाटतो की, तो एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने कसा काय बनवला असू शकतो, असं आपल्याला वाटू लागतं.

राघवनचा सिनेमा हा असा सिनेमा आहे. त्याला सिनेमा इतका जास्त कळला आहे नि तो कशासाठी वापरायचा हेही इतकं आकळलं आहे की, त्याचा सिनेमा पाहताना आपणच सिनेमा होऊन जातो. अशी ही श्रीरामाची दैवी 'दिठी' आहे!

राघवनच्या या दृष्टीत युद्धाविषयीचं मुलभूत आकर्षण, ते निभावून नेण्याची धमक आणि युद्धातील (व त्यानंतरचीही) होरपळ फारच चपखलपणे येते. मात्र, तो त्याचं खरं कसब पणाला लावतो ते मेलोड्रामामध्ये, अर्थात क्षोभनाट्यात.

प्रा. चंदनशिव यांच्या कथेप्रमाणेच आपल्याला कधी काय घडणार आहे, याचा अंदाज लागलेला असतो. राघवन आपल्याला रडवणार असतो, हेही आपल्याला माहीत असतं. पण, सारं काही आकळत असूनही तो दृक्-श्राव्य स्तरावर आपल्याला चकित करतो!

त्याच्या नेहमीच्या ढंगात किंचित विनोदी, किंचित गंभीर मॅच-कट्स (समछेद) वापरतो. (2007च्या 'जॉनी गद्दार'मधील कट्स आठवून पहा!) तरुणाईतलं लैंगिक आकर्षणही अशाच एक-दोन गंमतीशीर कट्समधून (एकतर समछेद किंवा मग विषम छेद, अर्थात जम्प कट्स) मोठ्या चलाखीने दाखवून सेन्सॉरला हुलकावणी देतो.

त्यामुळे युद्धपटातला मेलोड्रामा असूनही ब्लॅक कॉमेडीवाला राघवन अजूनही तसाच आहे, हे पाहून आपण सुखावतो. अवचित वेळी, अवचित ठिकाणी जुन्या मित्राने आपल्याला गाठावं आणि थोडंसं इमोशनल मारत खूप आनंद द्यावा, अशी ही जुनीच चित्रपटीय ओळख आहे.

त्यामुळेच 'इक्कीस'मध्ये जुन्या सिनेमांचा, जुन्या गाण्यांचा नि कवितांचा, अर्कायवल फुटेजचा मुबलक वापर पाहायला मिळतो. सिनेमाचे, सिनेस्टार्सचे दृश्य व श्राव्य संदर्भ पदोपदी आढळतात. भारत आणि पाकिस्तान हे देश सिनेमा, क्रिकेट आणि माणसं या दृष्टीने किती घट्ट जोडलेले आहेत, हे आपल्याला लख्खपणे दिसतं.

अरेषीय (नॉन-लिनियर) पद्धतीने सिनेमा मांडता मांडता राघवन आणि त्याचा चमू देश, धर्म नि सीमारेषांच्या पल्याड जाणारी पुष्कळ मानवी गुंतागुंत उभी करतात. मग निष्णात दिग्दर्शकाच्या सफाईने हा गुंता फारच सहजगत्या सोडवलाही जातो. (अगदी शेवटाकडे जाताना दिसणारी 'पाकिस्तान नामक देश कसा वाईट्टच आहे', असं सांगणारी लांबलचक पाटी वगळता—जिच्यामागे निर्मात्यांचा किंवा सेन्सॉरचा हात असावा, असं वाटतं!)

राघवनची दृष्टी इतकी नितळ आहे की, त्यामुळे अवाक् व्हायला होतं. कारण, तो माणूस असण्याचा अर्थ इतक्या सहजतेनं स्पष्ट करतो की, आपल्या डोळ्यांवर अशी कुठली नि किती 'धुरं'धर'' झापडं आहेत, असं वाटून जातं.

बरं, या साऱ्या पटात पुन्हा एकदा धर्मेंद्रच्या प्रेमात पडण्याचं कर्तव्यही राघवन मनःपूर्वक पार पाडतो!

'इक्कीस'मधील एखाद-दोन दोषांची चर्चा मागाहून करता येईल. परंतु, विखारी नि पोकळ राष्ट्रवादाच्या काळात ठामपणे आणि मोठ्या समजूतदारपणे, मोठ्या संयमाने आपलं म्हणणं मांडण्याच्या राघवनच्या निर्णयाला आणि कन्व्हिक्शनला भरभरून दाद द्यायला हवी.

सिनेमा या माध्यमाच्या प्रेमात पडण्यासाठी म्हणून हा सिनेमा पाहायला हवा. सिनेमा पाहता पाहता सिनेमा होऊन जायला हवं.

(या लेखात लेखकाची वैयक्तिक मतं आहेत)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)