त्वचेचं झालं अंडं, अंड्याचं झालं बाळ; भविष्यात गर्भधारणेचं चित्र बदलणार?

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, हेल्थ आणि सायन्स प्रतिनिधी

अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी अनोखी कामगिरी करून सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी पहिल्यांदाच मानवी त्वचेच्या पेशींमधून डीएनए घेऊन त्यात बदल केले. त्यानंतर त्यांनी ते शुक्राणूंशी एकत्र करून सुरुवातीच्या टप्प्यातील मानवी भ्रूण तयार केलं आहे.

या तंत्रामुळे वय जास्त झाल्याने किंवा आजारामुळे आलेल्या वंध्यत्वावर मात करता येऊ शकते. कारण शरीरातील जवळजवळ कुठलीही पेशी वापरून नव्या जीवनाची सुरुवात करता येईल.

या शोधामुळे भविष्यात वंध्यत्वाची समस्या कमी होऊ शकते.

समलैंगिक जोडप्यांनाही जनुकीयदृष्ट्या (जेनेटिक) त्यांच्या दोघांच्याही जनुकीय वैशिष्ट्यांचं समावेश असलेलं बाळ मिळू शकतं.

या पद्धतीत अजून खूप सुधारणा होण्याची गरज आहे. त्यासाठी दहा वर्षेही लागू शकतात. त्यानंतरच एखादं फर्टिलिटी क्लिनिक ही पद्धत वापरण्याचा विचार करू शकेल.

तज्ज्ञ म्हणाले की, हा एक खूप प्रभावी शोध आहे. परंतु, विज्ञानामुळे काय शक्य होतंय याबद्दल लोकांसोबत खुलेपणाने चर्चा करणं आवश्यक आहे.

पूर्वी प्रजननाची गोष्ट साधीच होती. पुरुषाचा शुक्राणू आणि स्त्रीचं अंडाणू म्हणजे अंडी एकत्र येऊन भ्रूण तयार होतो आणि नऊ महिन्यांनी बाळाचा जन्म होतो.

आता शास्त्रज्ञ हा नियम बदलत आहेत. त्यांचा हा नवीन प्रयोग मानवी त्वचेपासून सुरू होतो.

वंध्यत्वाची समस्या गंभीर

ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या तंत्रात त्वचेच्या पेशीतून केंद्रक (न्यूक्लियस) काढलं जातं. या केंद्रकात शरीर तयार करण्यासाठी लागणारा पूर्ण जनुकीय कोड असतो.

हे केंद्रक मग अशा दात्याच्या अंड्यात ठेवलं जातं, ज्यातून आधीच्या जनुकीय घटक काढून टाकलेले असतात.

आतापर्यंत ही पद्धत डॉली द शीपसाठी (मेंढी) वापरलेल्या तंत्रासारखी आहे. डॉली ही 1996 मध्ये जन्मलेली जगातील पहिली क्लोन केलेली सस्तन प्राणी होती.

पण हे अंडाणू आता शुक्राणूंद्वारे फलित होण्यास तयार नाहीत, कारण त्यात आधीच सर्व जनूक (क्रोमोसोम्स) आहेत.

प्रत्येकाला पालकाकडून 23 डीएनएचे संच मिळतात (आई आणि वडिलांकडून एक एक). म्हणजे एकूण 46 डीएनए संच आणि हे अंड्यात आधीच असतात.

तर पुढचा टप्पा म्हणजे, अंडाणू त्यातील अर्धे क्रोमोसोम्स सोडेल. या प्रक्रियेला शास्त्रज्ञांनी 'मायटोमायोसिस' नाव दिलं आहे (हा शब्द मायटोसिस आणि मायोसिस यापासून तयार झाला आहे. पेशी विभागण्याचे हे दोन मार्ग आहेत).

नेचर कम्युनिकेशन्स या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात दाखवलं की, 82 कार्यशील (फंक्शनल) अंडी तयार झाले.

हे शुक्राणूंद्वारे फलित केले गेले आणि त्यातील काही सुरुवातीच्या भ्रूण विकासाच्या टप्प्यावर पोहोचले. पण सहा दिवसांनंतर, कोणताही भ्रूण विकसित झाला नाही.

"जे अशक्य समजलं जात होतं, ते आम्ही साध्य केलं," असं ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीच्या भ्रूण पेशी व जनुकीय उपचार केंद्राचे संचालक प्रा. शौखरत मितालीपोव्ह यांनी सांगितलं.

ही पद्धत अजून पूर्ण नाही. कारण अंडी क्रोमोसोम्स कसं सोडायचे हे अचूक ठरवू शकत नाही. त्यामुळे काही प्रकाराचे दोन क्रोमोसोम्स राहतात तर काहींचे एकही राहत नाहीत.

याचा यशाचा दरही खूप कमी आहे (सुमारे 9 टक्के) आणि क्रोमोसोम्समध्ये एक महत्त्वाची प्रक्रिया, ज्याला क्रॉसिंग ओव्हर म्हणतात. ती प्रक्रियाही होत नाही.

"आम्हाला हे तंत्र परिपूर्ण करावं लागेल," असं जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. मितालीपोव्ह म्हणाले.

"शेवटी, मला वाटतं भविष्यात हाच मार्ग असेल. कारण ज्यांना मूल होऊ शकत नाहीत, असे रुग्ण वाढत आहेत."

आयव्हीएफचाही फायदा होत नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाचं

हे तंत्रज्ञान एक वाढत असलेल्या क्षेत्राचा भाग आहे, जे शरीराबाहेर शुक्राणू आणि अंडी तयार करण्याचा प्रयत्न करते. ज्याला इन व्हिट्रो गेमोजेनेसिस म्हणतात.

ही पद्धत अजूनही फक्त शास्त्रज्ञांच्या संशोधनाच्या पातळीवर आहे, क्लिनिकमध्ये वापरण्यासाठी नाही. पण याचा उद्देश अशा जोडप्यांना मदत करणं आहे, ज्यांना आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) घेता येत नाही. कारण त्यांच्याकडे वापरण्यासाठी शुक्राणू किंवा अंडी नाहीत.

ज्या स्त्रियांकडे अंडी किंवा ज्या पुरुषांकडे पुरेसे शुक्राणू नाहीत. त्याचबरोबर कॅन्सरच्या उपचारांमुळे मूल होऊ शकत नाहीत, अशा लोकांना ही पद्धत मदत करू शकते.

ही पद्धत पालकत्वाचे नियमही बदलते. या तंत्रज्ञानात फक्त स्त्रीच्या त्वचेच्या पेशी वापरत नाही तर पुरुषांच्या पेशीही वापरता येऊ शकतात.

यामुळे अशा समलैंगिक जोडप्यांनाही मूल होऊ शकतं, जे दोन्ही पालकांशी जनुकीयदृष्ट्या संबंधित असतील. उदाहरणार्थ, पुरुष समलैंगिक जोडप्यात एका पुरुषाची त्वचा वापरून अंडी तयार करता येईल आणि दुसऱ्या पुरुषाचा शुक्राणू फलित होईल.

ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीच्या प्रा. पॉला अमाटो म्हणाल्या की, "अंडी किंवा शुक्राणू नसल्यामुळे वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या लाखो लोकांसाठी ही पद्धत आशेचा किरण ठरू शकते.

यामुळे समलैंगिक जोडप्यांनाही मूल होण्याची संधी मिळेल जे दोन्ही पालकांशी जनुकीयदृष्ट्या संबंधित असतील."

लोकांचा विश्वास मिळवणं गरजेचं

हुल युनिव्हर्सिटीच्या प्रजनन औषधशास्त्राचे प्रा. रॉजर स्टर्मे यांनी हे विज्ञान 'महत्त्वाचं' आणि 'प्रभावी' असल्याचं सांगितलं.

त्यांनी पुढं सांगितलं, "असं संशोधन लोकांशी प्रजनन संशोधनातील नव्या प्रगतींबाबत सातत्याने खुलेपणानं चर्चा करण्याचं महत्त्व अधोरेखित करतं."

"अशा संशोधनामुळे आपल्याला नियम पक्के ठेवण्याची गरज लक्षात येते. जेणेकरून जबाबदारी ठरवता येईल आणि लोकांचा विश्वासही वाढेल."

एडिनबर्ग युनिव्हर्सिटीतील एमआरसी प्रजनन आरोग्य केंद्राचे उपसंचालक प्रा. रिचर्ड अँडरसन यांनी नवीन अंडी तयार करण्याची क्षमता 'एक मोठी प्रगती' ठरेल, असं म्हटलं.

त्यांनी सांगितलं की, "या पद्धतीसंदर्भात सुरक्षिततेबाबत महत्त्वाची चिंता असेल. परंतु, हा अभ्यास अनेक स्त्रियांना त्यांचं स्वतःचं जनुकीय संबंध असलेलं मूल मिळवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.