ऑस्कर जिंकणारी अशी अभिनेत्री, जी गुप्तहेर होती, वाचा थरारक कहाणी

ऑड्री हेपबर्न या 1950 आणि 1960 च्या दशकात चित्रपट आणि फॅशन आयकॉन झाल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑड्री हेपबर्न या 1950 आणि 1960 च्या दशकात चित्रपट आणि फॅशन आयकॉन झाल्या होत्या.
    • Author, ख्रिस्तोफर लू
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ही कहाणी नेदरलँडमध्ये लहानाची मोठी झालेल्या, ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या एका अभिनेत्रीची आहे.

त्याकाळी नेदरलँड हा देश नाझींच्या ताब्यात होता. ही अभिनेत्री तेव्हा अगदीच किशोरवयात होती. परंतु, तिने डचांच्या विरोधात धीरोदात्तपणे भूमिका घेतली होती.

'बीबीसी रेडियो फॉर पॉडकास्ट हिस्ट्रीज यंगेस्ट हिरोज' या शोमध्ये निकोला कफलन हे इतिहासातील अशा लोकांच्याच असाधारण गोष्टी सांगतात, ज्यांनी आपल्या अपरिमीत धैर्याने जग बदलून टाकलं होतं.

या शोमधील अलीकडचाच एक एपिसोड हा ऑड्री हेपबर्न यांच्यावर आधारित होता. त्या 1950 आणि 1960 च्या दशकात चित्रपट आणि फॅशनच्या दुनियेमधील एक सुप्रसिद्ध आयकॉन झाल्या होत्या. त्यांना तब्बल पाचवेळा ऑस्करसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.

1953 मध्ये ऑड्री हेपबर्न यांनी रोमन हॉलिडेमध्ये सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी 'बेस्ट एक्ट्रेस'चा ऑस्कर अवॉर्ड देखील जिंकला होता.

मात्र, दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्या अगदीच किशोरवयीन होत्या. तेव्हा मात्र त्यांनी एक वेगळीच भूमिका बजावली होती. त्याच भूमिकेविषयी आपण जाणून घेणार आहोत.

त्यांनी नाझींची सत्ता असताना त्यांच्या प्रतिकारासाठी डचांना आवश्यक असलेला निधी गोळा करण्याच्या चळवळीत सहभाग घेतला होता. त्यासाठी त्या तेव्हा गुप्तपणे बॅले डान्स सादर करायच्या आणि त्यातून पैसे गोळा करुन या चळवळीला मदत करायच्या.

हेपबर्न यांचं कुटुंब

हेपबर्न यांचा जन्म ब्रसेल्समध्ये 1929 साली झाला होता. त्यांच्या आई एला वॅन हेमस्ट्रा या डच होत्या, तर त्यांचे वडील जोसेफ हेपबर्न रस्टन हे ब्रिटीश-ऑस्ट्रियन उद्योजक होते.

त्यांच्या आई-वडिलांचा कल हा ओसवाल्ड मोस्ले यांच्या बाजूने होता. ओसवाल्ड मोस्ले हे ब्रिटीश युनियन ऑफ फॅसिस्टचे नेते होते. हेपबर्न यांच्या आई वॅन हेमस्ट्रा यांनी बीयूएफच्या मासिकासाठी एक लेख देखील लिहिला होता.

या लेखामध्ये त्यांनी नाझी जर्मनीचं कौतुकपर वर्णन केलं होतं. हेपबर्न-रस्टन यांना ते सहा वर्षांचे असतानाच आपलं कुटुंब सोडावं लागलं होतं.

नंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर 'परदेशातील फॅसिस्ट लोकांचे सहकारी असण्याचा आरोप' होता. यानंतर युद्धाच्या दरम्यानचा पूर्ण काळ ते तुरुंगातच राहिले होते.

ऑड्री हेपबर्न (उजवीकडे) आणि त्यांच्या आई एला वाना हेमस्ट्रा (डावीकडे). हा 1946 मधील फोटो आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑड्री हेपबर्न (उजवीकडे) आणि त्यांच्या आई एला वाना हेमस्ट्रा (डावीकडे). हा 1946 मधील फोटो आहे.

अभिनेत्री ऑड्री हेपबर्न यांचा सर्वांत लहान मुलगा लुका डॉटी यांनी रॉबर्ट मॅटजेन यांना सांगितलं की, "सर्वांत लहान असूनही ती खूप बोलकी होती. हसणं, खेळणं आणि अभिनय करणं तिला आवडायचं. माझी आजी तिला 'मंकी पझल' म्हणून हाक मारायची."

रॉबर्ट मॅटजेन हे 'डच गर्ल' पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी 'हिस्ट्रीज् यंगेस्ट हिरोज'साठी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ऑड्री हेपबर्न यांचं आयुष्य नेमकं कसं होतं, याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.

मॅटजेन यांनी सांगितलं की, "ऑड्रीच्या आईने ठरवलं होतं की सर्वसाधारणपणे इंग्लंड किंवा विशेषतः केंट हे ऑड्रीसाठी सुरक्षित ठिकाण नाहीये. कारण, जर्मनी अचानक फ्रान्सच्या दिशेने कूच करेल आणि नंतर इंग्लंडवर हल्ला करेल, असा धोका होता."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

जेव्हा ऑड्री पोहोचल्या नेदरलँडला

वॅन हेमस्ट्रा यांनी आपल्या मुलीला ब्रिटीश बोर्डिंग स्कूलमधून काढलं. त्यानंतर ते सगळे नेदरलँडमधील त्यांच्या वडिलोपार्जित घरामध्ये रहायला गेले.

तिथे ऑड्री यांनी डान्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांनी आपलं नाव एड्रियांत्जे वॅन हेमस्ट्रा असं करुन घेतलं होतं. जेणेकरुन ते अगदी डच नावासारखंच वाटेल.

मात्र, जेव्हा हेपबर्न यांनी अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती, तेव्हा त्यांनी आपलं आडनाव हेपबर्न असंच केलं होतं.

ऑड्री हेपबर्न या 1958 साली हॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय झाल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑड्री हेपबर्न या 1958 साली हॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय झाल्या होत्या.

तेव्हाही त्यांची आई अ‍ॅडॉल्फ हिटलरचंच कौतुक करत होती. त्या असं मानत होत्या की, हिटलर कधीही त्यांच्या देशावर हल्ला करणार नाही.

डॉटी नेदरलँडमध्ये आपल्या आईला आलेल्या अनुभवांबद्दल सांगताना म्हणतात की, "हॉलंडला जाणं घरी जाण्यासारखं अजिबात नव्हतं. ती डच बोलू शकत नव्हती. तिला डच स्कूलमध्ये नव्या मुलांमध्ये जावं लागायचं. खरं तर तिला एकही शब्द समजत नसायचा. इतर मुले तिची खिल्लीही उडवायचे."

हिटलरने मे 1940 मध्ये नेदरलँडवर हल्ला केला आणि त्यावर आपला ताबा मिळवला.

मॅटजेन त्या सगळ्या काळाविषयी माहिती देताना सांगतात की, "जर्मन लोकांना सैनिकांसाठी भोजन आणि कपड्याची आवश्यकता होती. आणि त्यांनी हे सगळं डच आणि इतर देशांकडून घेतलं होतं."

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

हेपबर्न अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या होत्या

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हेपबर्न यांचे काका म्हणजेच काऊंट ऑटो वॅन लिम्बर्ग यांनी नाझी लोकांविरोधातील भूमिका उघडपणे घेतली होती. 1942 मध्ये, नाझी विरोधी गटाने रॉटरडॅमजवळ जर्मन ट्रेन उडवण्याचा प्रयत्न केला होता.

वॅन लिम्बर्ग स्टिरम या कटामध्ये सामील नव्हते. मात्र, तरीही त्यांना फक्त यासाठी अटक करण्यात आली होती कारण ते चर्चेत असलेले नाझीविरोधक होते. नाझींच्या एंजट्सनी त्यांच्या समवेत चार लोकांना जंगलात नेऊन गोळी मारली होती. तसेच, त्या सर्व लोकांना अज्ञात कबरीत दफन करुन टाकलं होतं.

हेपबर्न आपल्या काकांवर अगदी वडिलांसारखंच प्रेम करायची. त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर हेपबर्न अगदी उद्ध्वस्तच झाल्या होत्या. मॅटजेन यांनी यासंदर्भात सांगितलं की, "ही घटना राष्ट्रीय पातळीवरची घटना झाली होती. या घटनेमुळे डच लोक आतून आणखी पेटले होते."

नाझींनी नेदरलँड्समधून अन्न आणि इतर संसाधनं दूर केली होती. त्यामुळे व्हॅन हेमस्ट्रा यांच्या कुटुंबाची उपासमार झाली होती.

जेव्हा हेपबर्न 15 वर्षांच्या झाल्या, तेव्हा त्यांना कलाकारांची युनियन असलेल्या कुल्टर्कमरमध्ये सहभागी होण्यास अथवा सार्वजनिकपणे डान्स करण्यास मज्जाव करण्यात आला. तेव्हा हेपबर्न यांनी डान्स सोडण्याचाच पर्याय निवडला.

डॉटी यांनी आपल्या आईच्या कलेप्रती असलेल्या निष्ठेबाबत म्हटलं की, "डान्सच्या माध्यमातून ती स्वप्नं पाहू शकत होती. ती अक्षरश: उडू शकत होती. ती सगळं काही विसरु शकत नाही. खरं तर तोच एक असा मार्ग होता ज्या मार्गाचा वापर करुन ती वास्तवापासून थोडं दूर होऊ शकत होती."

हेपबर्न एका सेफहाऊसमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये डान्स करायच्या. त्यामुळे, त्यांना डान्स करताना कुणीच पकडू शकत नव्हतं. जेव्हा त्या परफॉर्मन्स करायच्या तेव्हा अत्यंत कमी आवाजामध्ये पियानो वाजवला जायचा.

मात्र, तिथे कुणीही टाळ्या वाजवायचं नाही. शो समाप्त झाल्यानंतर नाझीविरोधी चळवळीसाठी निधी गोळा केला जायचा.

एक प्रोफेशनल डान्सर ते गुप्तहेर

1944 मधील वसंत ऋतूदरम्यान हेपबर्न यांनी डॉक्टर हेंड्रिक व्हिसर टी हूफ्टचे सहाय्यक म्हणून स्वेच्छेने काम केलं. ते स्वत: नाझीविरोधी गटाचेच सदस्य होते.

मात्र, हेपबर्न यांच्या आईनं नाझींशी सहकार्य केल्याचं दिसून आलं होतं.

व्हिसर टी हूफ्ट यांना मदतीची नितांत गरज होती. कारण त्यांना नाझींपासून पळून जाणाऱ्या हजारो लोकांना मदत करायची होती. त्यांनी हेपबर्नवर विश्वास ठेवला. जेणेकरुन ते अशा लोकांना मदत करु शकतील.

17 सप्टेंबर 1944 रोजी हेपबर्न चर्चमध्ये गेल्या होत्या. तेव्हा चर्चमध्ये सुरू असलेली प्रार्थना इंजिनच्या आवाजामुळे बंद करण्यात आली. वास्तवात, राईन नदीवर बांधलेले नऊ पूल ताब्यात घेण्याची योजना संयुक्त सैन्याने आखली होती.

ही योजना तडीस नेण्यासाठी म्हणून ऑपरेशन मार्केट गार्डन सुरू करण्यात आलं होतं. जेव्हा हेपबर्न चर्चमधून पळून आल्या, तेव्हा त्यांनी संयुक्त सैन्याचे हजारो सैनिक पॅराशूटने उतरताना पाहिले होते.

दुर्दैवाने, त्याचवेळी नाझींचे दोन गट प्रचंड मोठ्या हत्यारांनी सुसज्ज होऊन तैनात झाले होते. व्हॅन हेमस्ट्रा यांच्या घरासमोर दोन नाझी रणगाडे उभे होते.

हे युद्ध नऊ दिवस चाललं. यादरम्यान हेपबर्न आणि त्यांचं कुटुंब तळघरात लपून राहिलं होतं. जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा त्यांना नाझींचा विजय झाल्याची बातमी मिळाली.

त्या इमारतीतून त्यांनी डच विरोधी सदस्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यांना नाझींनी छळलं होतं.

जेव्हा युनायटेड एअर फोर्सनं जर्मनीला उड्डाण केलं, तेव्हा त्यांना नेदरलँडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं.

यादरम्यान, व्हिसर टी हूफ्टने हेपबर्न यांना ब्रिटिश पॅराट्रूपर्सना भेटण्यासाठी जंगलात पाठवलं होतं. त्यांनी हेपबर्न यांना एक गुप्त संदेश आणि कोड वर्ड देखील दिला होता. तो त्यांनी त्यांच्या सॉक्समध्ये लपवलेला होता.

त्यांचं भेटून झालं होतं. पण जेव्हा त्या जंगलातून निघून जात होत्या, तेव्हाच डच पोलिसही त्यांच्या दिशेनं येत असल्याचं त्यांना दिसलं..

त्या जंगली फुले वेचायला खाली बसल्या. त्यानंतर त्यांनी स्वतःला पोलिसांसमोर सादर केलं. मात्र, ते लोक हेपबर्न यांच्यावर मोहित झाले होते. त्यामुळे, कुणीही त्यांची साधी चौकशीही केली नाही.

यानंतर, त्यांनी अनेकदा डच विरोधी गटांच्या सदस्यांसाठी गुप्तपणे संदेश आणण्याचं काम केलं.

लहान मुले झाली बंडखोरीचे नायक

डॉटी म्हणाले की, "चांगलं आणि वाईट यांच्यात मोठा सुरु संघर्ष असतो आणि या संघर्षात तुम्हाला एक बाजू निवडावी लागते, या गोष्टीवर तिचा मनापासून विश्वास होता."

मॅटजेन म्हणाले की, "जर्मन लोक मुलांना फारसं गांभीर्यानं घ्यायचे नाहीत. ते म्हणायचे, 'ये पोरा, बाजूला हो.' अशाच प्रकारच्या गोष्टी घडायच्या. त्यामुळे, डच लोकांना हे पक्कं माहित होतं की या लहान मुलांवर कोणीही संशय घेणार नाही."

"इकडून तिकडे संदेश पाठवण्यासाठी लहान मुले एक पर्याय होऊ शकतात. डच विरोधी गटाच्या सदस्यांसाठी हे महत्त्वाचं काम मुलांनीच केलं होतं."

"आणि मुलांनाही ही गोष्ट प्रचंड आवडायची. कारण, हे काम धाडसाचं आणि रोमांचकही होतं. मात्र, त्यासोबतच ते धोकादायकही होतं. त्यामुळेच, ते या बंडखोरीचे नायक बनले."

फेब्रुवारी 1945 पर्यंत, दर आठवड्याला 500 डच लोक उपासमारीनं मरत असल्याची नोंद झाली होती.

ऑड्री हेपबर्न यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सेवाभावी कार्य चालू ठेवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑड्री हेपबर्न यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सेवाभावी कार्य चालू ठेवलं होतं.

इतरांप्रमाणेच, हेपबर्न आणि त्यांचं कुटुंब देखील अन्नाच्या तुडवड्याशी दोन हात करत होतं. त्या स्वत: आजारी पडल्या होत्या. त्यांना अशक्तपणा, कावीळ आणि एडिमा यांसारख्या आजारांनी ग्रासलं होतं.

हेपबर्न आणि त्यांच्या कुटुंबाच्या घरासमोर पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं होतं. यावेळी, हेपबर्न आणि त्यांचं कुटुंब तीन आठवडे तळघरात लपलं होतं. अखेर 16 एप्रिल 1945 रोजी हे युद्ध संपलं.

तेव्हा त्यांना तंबाखूचा वास आला. खरं तर युद्धादरम्यान नेदरलँडमध्ये हा वास येणं अशक्य होतं. जेव्हा त्या तळघराच्या पायऱ्यांच्या वर पोहोचल्या तेव्हा त्यांना दिसलं की कॅनेडियन सैनिक त्यांच्या दारासमोर उभे आहेत आणि ते सिगारेट ओढत आहेत. त्यांनी हेपबर्न यांच्या दिशेनं मशीन गन रोखून धरल्या.

तेव्हा हेपबर्न यांनी लगेचच त्यांच्याशी इंग्रजीत बोलणं सुरु केलं. त्यांच्यापैकी एक जण ओरडून म्हणाला, "आम्ही फक्त हे शहर मुक्त केलेलं नाही, तर एका इंग्रज मुलीलाही मुक्त केलं आहे."

आईला केलं नाही माफ

हेपबर्न यांनी आपल्या मुलाला सांगितलं होतं की त्यांनी आपल्या आईला फॅसिस्टांबद्दल सहानुभूती दर्शविल्याबद्दल कधीही क्षमा केली नाही. युद्ध संपल्यावर त्यांना लंडनमधील बॅलेट रॉम्बर्टची शिष्यवृत्ती मिळाली.

मात्र, ती प्रतिभावान होती. मात्र, पुरेसं अन्न न मिळाल्यानं त्यांचं शरीर पूर्णपणे अशक्त झालं होतं. आता त्यांच्यात पुन्हा एकदा बॅले डान्सर बनण्याची ताकदच उरली नव्हती.

त्यामुळे, त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. वेस्ट एंड थिएटरमध्ये काही छोट्या भूमिका केल्या. त्यानंतर 'द लॅव्हेंडर हिल मॉब' सारख्या चित्रपटांमध्येही कामही केलं.

1953 मध्ये रोमन हॉलिडेमध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं समीक्षकांनी प्रचंड कौतुक तर केलंच, शिवाय, व्यावसायिकदृष्ट्याही हा चित्रपट यशस्वी ठरला.

या चित्रपटासाठी हेपबर्न यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्यांनी एमी, ग्रॅमी आणि टोनी हे पुरस्कारदेखील जिंकले. त्या आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सेवाभावी कार्य करत राहिल्या. विशेषतः युनिसेफच्या सदिच्छा दूत म्हणून त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं.

1993 साली त्यांचा मृत्यू झाला होता.

मॅटजेन म्हणाल्या, "ऑड्रीने युद्धादरम्यान बरंच काही पाहिलं होतं आणि सहन केलं होतं. तिच्याकडे अनुभवांचा अक्षरश: खजिना होता. त्यामुळेच, त्या विविध भूमिका लीलया साकारु शकायच्या."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)